शेवटचे अद्यतन : १०/२/ २०२५
. . .
गेल्या चार वर्षात (भारतासहित) जगभरात अनेक संसर्गजन्य रोगांच्या साथी येऊन गेल्या. त्या अनुषंगाने संबंधित जिवाणू अथवा विषाणूजन्य आजारांवर स्वतंत्र लेखांतून चर्चा झालेली आहे. प्रस्तुत धागा काढण्याचा उद्देश मात्र वेगळा आहे.
आयुष्यात असंख्य प्रकारच्या आजारांचा सामना आपल्याला व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर करावा लागतो. जे आजार मोठ्या प्रमाणात आढळतात त्यांच्यासंबंधी विविध माध्यमांतून जनजागृती वारंवार होतच असते. परंतु जे आजार मुळात दुर्मिळ किंवा अतिदुर्मिळ असतात त्यांच्याबद्दल जनसामान्यांना एरवी माहिती नसते.
कधीतरी अचानक जगाच्या एखाद्या मर्यादित प्रदेशात (गाव, शहराचा भाग) काही आजारांचा अचानक प्रादुर्भाव होतो आणि त्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. असे झाले की संबंधित भागातील आरोग्य यंत्रणाना खडबडून जागे व्हावे लागते तसेच नागरिकांनाही सतर्क राहावे लागते. या प्रकारच्या दुर्मिळ आजारांचा जेव्हा केव्हा जगात कुठेही उद्रेक होईल त्यासंबंधी टिपणी करण्यासाठी हा धागा उघडून ठेवत आहे. इथे प्रसंगानुरूप प्रतिसादांमधून कोणीही भर घालू शकता.
या निमित्ताने अलीकडेच पुण्यामध्ये अचानक उद्रेक झालेल्या Guillain-Barré syndrome (GBS) या आजाराची थोडक्यात माहिती लिहून ठेवतो.
आजाराची ठळक वैशिष्ट्ये :
१. हा ऑटो इम्युन प्रकारातील आजार असून त्यामध्ये बाधिताच्या चेतासंस्थेवर परिणाम होतो.
२. साधारणपणे दरवर्षी एक लाख लोकसंख्येमागे एखादा रुग्ण असे या आजाराचे सरासरी प्रमाण अत्यल्प आहे.
३. तो अधिकतर पन्नाशी ओलांडलेल्या लोकांमध्ये आढळतो.
४. त्याचे नक्की कारण अद्याप अज्ञात आहे परंतु आतापर्यंत समजलेली कारणमीमांसा पुढील मुद्द्यामध्ये येईल.
५. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट जिवाणू अथवा विषाणूंचा संसर्ग होतो. त्यातून पचनसंस्था किंवा श्वसनसंस्थेत बिघाड होतो. हा बिघाड त्या संस्थांपुरता मर्यादित न राहता त्यातून ऑटोइम्युन प्रकारची हानिकारक प्रक्रिया होते. त्यातूनच चेतासंस्थेच्या विशिष्ट भागाला (peripheral nervous system) इजा होते.
६. अशा प्रकारे या आजारास कारणीभूत ठरणारे रोगजंतू या प्रकारचे आहेत :
Campylobacter jejuni, Norovirus, COVID-19 विषाणू , Zika, cytomegalovirus, or Epstein-Barr virus.
७. काही वेळेस रुग्णावरील शस्त्रक्रिया किंवा काही लसीकरणानंतर हा आजार झालेला आढळला आहे.
रुग्णाची प्रमुख लक्षणे :
- खूप अशक्तपणा येणे, चालताना किंवा जिने चढताना पाय अडखळणे,
- विचित्र प्रकारच्या संवेदनांचे भास होणे - जसे काही त्वचेखाली किडे वळवळणे, स्नायूदुखी.
- आजाराचे स्वरूप तीव्र झाल्यास डोळ्याच्या स्नायूवरही परिणाम होतो तसेच चघळणे, गिळणे आणि बोलणे या क्रियाही बिघडू शकतात. काही रुग्णांमध्ये नाडीचे ठोके आणि रक्तदाब बिघडतात. तर अन्य काहींमध्ये आजार तीव्र होऊन श्वसन दौर्बल्य आणि पॅरालिसीस सुद्धा होऊ शकते.
बहुतेक रुग्ण उपचार घेतल्यानंतर कमीअधिक कालावधीनंतर पूर्ववत होतात.
रोगनिदान हे विशिष्ट तज्ञांकडून केले जाते. त्यासाठी चेतासंस्थेच्या शारीरिक तपासणी बरोबरच काही विशिष्ट चेताचाचण्या, पाठीच्या मणक्यातील द्रव तपासणे आणि एमआरआय इत्यादींचा गरजेनुसार वापर केला जातो.
उपचार : सध्या तरी या आजाराला बरा करणारा रामबाण उपाय सापडलेला नाही. जे उपाय उपलब्ध आहेत त्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते आणि रुग्णाची रिकवरी लवकर होऊ शकते. अशा उपचारांमध्ये प्रामुख्याने यांचा समावेश आहे :
- Plasma exchange : यामध्ये शरीरातील दूषित रक्त काही प्रमाणात काढून टाकून त्या जागी थोडा निरोगी रक्तद्रव भरला जातो.
- इंजेक्शनद्वारा immunoglobulinचे उपचार
पुण्यातील सद्यपरिस्थिती ( २७/१ )
- आतापर्यंत ११० जणांना बाधा. त्यातील बहुतेक जण पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील आहेत
- त्यापैकी काहींना Norovirus तर काहींना Campylobacter jejuni ची बाधा झालेली होती. या जंतूंचा प्रसार दूषित अन्न अथवा पाण्यामार्फत होतो.
- संबंधित रुग्णांवर योग्य ते उपचार चालू आहेत. सर्वसामान्यांनी वृत्तपत्र/ माध्यमांतील ठळक/भडक बातम्या पाहून घाबरायचे काहीच कारण नाही असे पुण्याच्या न्यूरोलॉजिकल सोसायटीने जाहीर केले आहे. फक्त दूषित अन्न अथवा पाण्याचा संपर्क न येण्याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे.
. 73 पुरुष व 37 स्त्रिया. त्यापैकी 13 जणांना व्हेंटिलेटरचे उपचार
* या आजारावरील उपचार महाग असल्यामुळे पुणे महापालिकेने ‘शहरी गरीब योजने’अंतर्गत रुग्णांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
* राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन लवकरच मार्गदर्शक सूचना तयार करीत आहे- इति राज्य आरोग्यमंत्री
*************************************************************************************************************
संदर्भ :
१. https://www.ninds.nih.gov/health-information/disorders/guillain-barre-sy...
२. https://www.indiatoday.in/health/story/norovirus-campylobacter-bacteria-...
३. वैद्यकीय पाठ्यपुस्तके
* * * * * * *
3/2/2025
पुण्यातील रुग्णांच्या बाबतीत जिवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर प्रतिकारशक्तीमध्ये कोणता बदल झाला असावा की ज्यामुळे जीबीएस उद्भवला, याचा आता शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी 63 रुग्णांचे नमुने काही विशिष्ट अँटीबॉडीज तपासण्यासाठी बंगळुरू येथील NIMHANS कडे पाठवलेत.
पुणे अद्यतन :
खात्रीशीर निदान झालेले रुग्ण 127; त्यापैकी 27 अतिदक्षता विभागात तर 16 व्हेंटिलेटरवर.
27 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
. . .
१०/२/ २०२५
* पुण्यातील ५५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष.
* साथरोग नियंत्रण कायदा प्रभावी होण्यासाठी येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विधेयक मांडणार.
......
अमिबाजन्य मेंदूज्वर
अमिबाजन्य मेंदूज्वर
या दुर्मिळ व घातक आजाराचा केरळमध्ये प्रादुर्भाव झालेला असून यंदाच्या वर्षी आतापर्यंत 69 रुग्ण आढळले आणि त्यापैकी 19 जणांचा मृत्यू झाला. गेल्या सहा वर्षांत या आजाराचे फक्त दहा रुग्ण आढळले होते.
तापमानातील वाढ आणि पाणीपुरवठ्यातील अस्वच्छता यामुळे हा आजार वाढल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
https://www.newindianexpress.com/lifestyle/health/2025/Sep/17/keralas-ri...
अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा
अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर ही अनेक आजारांच्या मुळाशी असलेली समस्या आहे.
विकसनशील देशांच्या पाणी प्रश्नांशी संबंधित मौलिक संशोधन केल्याबद्दल पुण्याचे वैज्ञानिक डॉ. हिमांशु कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय पाणी पुरस्कार मिळालेला आहे
अभिनंदन !!
https://indianexpress.com/article/cities/pune/pune-based-scientist-becom...
पाण्याचा विषय निघाला म्हणून
पाण्याचा विषय निघाला म्हणून थोडी गमतीशीर माहिती. मी नुकताच आइसलँड येथे जाऊन आलो, तेव्हा तिथे कळले की अख्ख्या आइसलँडमध्ये कुठेही वॉटर ट्रीटमेंट प्लांट नाही. ग्लेशियरचे पाणी नळातून थेट घरात पाठवतात.
Pages