पाय क्रस्ट साठी:
१. २ कप मैदा - All purpose flour
२. पाव कप साखर
३. १/२ टीस्पून मीठ
४. २ स्टीक्स किंवा १/२ पाऊंड बटर (सॉल्टेड, अनसॉल्टेड कुठलही चालतं)
५. १/२ कप थंडगार/बर्फाचं पाणी.
सारणासाठी
१. सहा मध्यम आकाराची सफरचंद (सोलून, लहान चौकोनी फोडी करून. साधारण ८ कप भरतात).
२. १ टेबसस्पून लिंबाचा रस
३. १/२ कप साखर
४. १/२ टीस्पून दालचिनी पावडर
५. चिमुटभर मीठ
६. १ टेबलस्पून बटर - थंडगार, बारीक तुकडे केलेलं (ऐच्छिक)
गेल्यावर्षी ख्रिसमसला मी सेवरी पाय (रिकोटा, फेटा चिज आणि पालक घालून) केला होता. पण पुन्हा केला गेला नाही. ह्या वर्षी थँक्स गिव्हिंगला काय मेन्यू करावा हे ठरत नव्हतं. घरात असलेल्या गोष्टींमधूनच, फार तयारी/खरेदी करावी लागणार नाही असच काहीतरी करायचं होतं. सकाळी निवांत उठल्यावर ठरलं की वडापाव करूया! मग त्याच्या जोडीला घरात असलेला सालमन ग्रील करून आणि भाज्या रोस्ट करून घेऊया. घरात केळी आणि सफरचंद होती. पण मग गोड म्हणून अगदीच शिकरण करण्याऐवजी अॅपल पाय करायचं ठरवलं!
अॅपल किंवा कुठलाही पाय करताना दोन उप-कृती वापराव्या लागतात. एक म्हणजे पाय क्रस्ट आणि दुसरी म्हणजे सारण. पैकी सारण गोड किंवा तिखट दोन्ही करता येतं आणि दोन्ही साठी क्रस्टची कृती सारखीच असते. मी दोन्ही वेळी बटर क्रस्टच केलं होतं पण बाकीही काही प्रकारे करतात म्हणे. तयार क्रस्ट बाजारात मिळतं पण मला घरीच करून बघायचं होतं.
१. एका मध्यम आकाराच्या भांड्यात मैदा, साखर आणि मीठ एकत्र करून घेतलं.
२. थंडगार बटरचे सुरीने अगदी बारीक तुकडे करून घेतले. कांदा जाडसर चिरताना जेव्हड्या जाडीचे तुकडे होतात साधारण तसे करायचे. अर्धा सेमीचे.
३. बटर वरच्या मिश्रणात घालून हाताने एकत्र केलं.
४. थोडं थोडं पाणी घालत आधी काट्याने आणि मग लागेल तसं हाताने एकत्र केलं. पाणी बर्फाचं/थंडगार हवं. एकत्र करताना शक्यतो काटा वापरावा म्हणजे हाताच्या उष्णतेने बटर वितळत नाही. पाणी लागेल तसच घालत/ शिंपडत रहावं.
५. सगळं पीठ मिसळलं गेलं आणि गोळा एकत्र होईल इतपतच एकत्र करावं. ह्यात पाणी खूपच कमी आहे आणि मळायचं पण अजिबात नाहीये.
६. पीठाचा गोळा प्लॅस्टीक रॅपमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवला.
७. दरम्यान सफरचंद सोलून, त्याचे तुकडे करून घेतले.
८. सफरचंदाचे तुकडे, साखर, मीठ, दालचिनीची पुड आणि लिंबाचा रस सगळं एकत्र करून घेतले. सफरचंद आंबट असतील तर लिंबाचा रस कमी घालावा पण थोडातरी घालावा कारण लिंबाच्या ताज्या रसाचा स्वाद छान लागतो.
९. साधारण १५ मिनीटांनी फ्रीजमधून पिठाचा गोळा बाहेर काढून त्याचे दोन भाग केले.
१०. ९ इंचाच्या पाय डीशमध्ये बसेल एव्हडी पोळी लाटून घेतात. पीठ साधारण शंकरपाळ्याच्या पीठासारख असतं (लाटताना त्याला भेगा पडू शकतात). पोळीची जाडीही शंकरपाळे करताना ठेवतो तेव्हडीच ठेवावी. मी ह्यावेळी चार लहान पाय करता येतील अशी डीश वापरली. त्यामुळे मोठी पोळी लाटून त्याचे कातण्याने चार गोल करून घेतले.
११. ही पोळी पायडीशमध्ये पसरून घेतली आणि त्यावर सफरचंदाचं मिश्रण घातलं. भरपूर दाबून बसवावं कारण बेक करताना उष्णतेने सफरचंद आक्रसतात आणि मग पायचे खुळखुळे होतात.
१२. पिठाच्या दुसर्या भागाची थोडी लहान पोळी लाटली आणि ती मिश्रणावर ठेवावी.
१३. बाहेरची पोळी आतल्या पोळीवर दुमडून घेतली आणि बोटाने दाबून पाय सील करून टाकला. करंज्यांची मुरड घालतात तसं बोटांच्या चिमटीने कडेला मुरड घालून घेतली.
१४. सुरीचे वरच्या थराला थोड्या खाचा मारून घेतली म्हणजे वाफ बाहेर जायला मदत होते.
१५. अवन ३७५ डिफॅला प्रिहीट करून त्यात पाय बेक केला. पहिल्या पंधरा मिनिटांनी तापमान ३५० डिफॅ केले. एकूण साधारण ५० मिनिटांमध्ये सोनेरी रंग येतो. सुरीने वरचा थर झाला आहे ना ते बघून अवन बंद केला.
हा कापलेला
भरपूर बटरमुळे छान फ्लेकी पाय होतो. साखरेचं हे प्रमाण एकदम बरोबर आहे. अजिबात जास्त गोड होत नाही. मला सफरचंदाच्या फोडी थोड्या कमी शिजलेल्या चालल्या असत्या (जरा क्रंची) पण आधी बंद केलं असतं तर मग पिठ कच्च राहीलं असतं.
हा स्पिनॅच पाय (बेक करण्यापूर्वी)
बेक करून
१. पाय करताना जर सारण खूप ओलं असेल तर पाय क्रस्ट आधी 'ब्लाईंड बेक' करून घ्यावं लागतं. तसं नाही केलं तर ओलं सारण आणि पिठ हे एकत्र होऊन त्यांचा लगदा होतो. ब्लाईंड बेक म्हणजे कच्च्या पायक्रस्ट वर वजन ठेऊन साधारण वीस मिनिटे बेक करायचं. बाजारात बेकिंग करताना वापरता येणारी वजनं मिळतात. गोट्यांसारखी असतात. नाही तर त्यावर पार्चमेंट पेपर घालून त्यावर तांदूळ घालायचे. (ते तांदूळ फुकट जात नाहीत, नंतर भात करायला वापरता येतात.) हे करण्याचं कारण म्हणजे बेक करताना क्रस्ट फुगू नये, सपाटच रहावा. त्या वजनांमुळे आपल्याला क्रस्टचा रंग दिसत नाही म्हणून "ब्लाईंड बेक". गेल्यावर्षी मी सेवरी पाय करताना हे केलं होतं. पण अॅपल पायला गरज वाटली नाही.
२. सेवरी पायला मी वरून चटई सारखी जाळी केली होती. वरच्या पोळीच्या पट्ट्या कापून त्या चटई सारख्या विणायची. सेवरी पायमध्ये बर्याचदा खूप जास्त बाष्प असल्याने असं मोकळं डिझाईन करतात. पिकन, पंपकीन वगैरे पाय ह्यांना वरचा थरच नसतो आणि ते तसेही चांगले लागतात.
३. गोड पाय खायला घेताना गरम किंवा गार कसाही तुमच्या आवडीप्रमाणे खावा. गरम पाय बरोबर आईस्क्रीमचा गोळा आणि गार पाय बरोबर व्हिपिंग क्रिम छान लागतं. तिखट मिठाचा पाय गरमच खावा.
४. पुढच्यावेळी मी कप केकच्या ट्रे मध्ये करून बघणार आहे. जरा खेळत बसावं लागेल पण मग माणशी एक खाता येईल.
अरे वा… मस्त रेसिपी व फोटो.
अरे वा… मस्त रेसिपी व फोटो. सेवरीची रेसिपी पण द्या, आधी दिली नसेल तर.
गावातले फॅमिली फ्रेंड उत्तम बेकर आहेत. गेल्याच आठवड्यात हा अॅपल पाय खाल्लाय आणि आवडलेला. आता मलाही करुन पाहता येईल.
अरे वा ! मस्त दिसतोय ऍपल पाय
अरे वा ! मस्त दिसतोय ऍपल पाय
कालच मी द माँक सिरीजमधला ऍपल पाय एपिसोड पाहिला आणि आज तुझी पाककृती . आता करुन पहावा लागेल
अरे वा!!! पाय मलाही आवडतात.
अरे वा!!! पाय मलाही आवडतात. परफेक्ट रेसिपी.
आता स्पिनॅच पायची रेसिपी येऊ द्या. मी कधी सॅवरी पाय केले नाहीत.
गार पाणी आणि बटर घातल्याने बटरचे सुक्ष्म कण पिठात राहतात व बेक करताना ते वितळून तिथे हवेच्या छोट्या पोकळ्या निर्माण होऊन पाय क्रस्ट खुसखुशीत (बिस्कीटासारखा) होतो. यासाठी पायक्रस्ट लाटताना हलक्या हाताने लाटायचा, फार जोर द्यायचा नाही.
पायक्रस्ट व सारणात सॉल्टेड बटर वापरलं तर सारणाच्या आंबटगोड चवीला जास्त चांगला इफेक्ट येतो हेमावैम. की लाईम पाय वगैरे करताना मात्र अनसॉल्टेड बटर वापरणं चांगलं कारण मग थोडीशी गुळमट चव येऊन टार्टनेस बॅलन्स होतो.
हा एक पदार्थ कधी मी करेन असं
हा एक पदार्थ कधी मी करेन असं वाटत नाही. अवघड वाटतो मला हा पदार्थ.
छान दिसताहेत तुझे दोन्ही पाय.
Wow छान दिसतोय पदार्थ
Wow छान दिसतोय पदार्थ
रेसिपी छान लिहीली आहे. इतके
रेसिपी छान लिहीली आहे. इतके छान 'पाय' केल्याबद्दल तुझे दोन्ही ' पाय' धरावेसे वाटत आहेत, हा फार ग्रेट नसलेला विनोद करायची संधी घेते!!
'तांदुळ वाया जात नाहीत. नंतर भात करायला वापरता येतात, ही टीप फार म्हणजे फार आवडली आहे...
झकास !
झकास !
रेसिपी आणि फोटो छान आहे.
रेसिपी आणि फोटो छान आहे.
छान, मी नेहेमी हा पाय करते,पण
छान, मी नेहेमी हा पाय करते,पण हे ब्लाइंड baking माहीत नसल्याने अवरण मऊ पडू नये म्हणू न सफरचंद a च्या फोडीमध्ये साखर/ गूळ व साखर समप्रमाणात घेते व काही तासांनी जे पाणी सुटतं ते काढून घेते. ( आणि त्याला microwave मध्ये आटवून त्याचा पाक वरून - ज्याला गोड हवा त्याने -घ्यावा .) Blind baking बद्दल नवीनच समजले, पुढल्या खेपेस करून बघेन
धन्यवाद
छान पाकृ आणि फोटो!
छान पाकृ आणि फोटो!
मी आयता क्रस्ट आणते, घरी क्रस्ट करुन बघायचे धाडसच होत नाही.
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!
सेवरीची रेसिपी पण द्या, आधी दिली नसेल तर. >>>> आधी नव्हती लिहिली. क्रस्टची रेसिपी सेमच आहे. सारणामध्ये रिकोटा आणि फेटा चिज आणि पालक घातलं होतं. मीठ, मिरपूड, लिंबू असं सगळं घालून एकत्र केलं. नक्की प्रमाण कुठे तरी लिहिलेलं असेल ते शोधून पाठवतो.
आता करुन पहावा लागेल >>> बघ नक्की
यासाठी पायक्रस्ट लाटताना हलक्या हाताने लाटायचा, फार जोर द्यायचा नाही. >>>> येस! ब्रेड, पेस्ट्री वगैरेच्या बरोबर उलट. इथे अजिबात ग्लुटेन तयार होऊ द्यायचं नाहीये.
की लाईम पाय >>>> हा प्रकार मला अजिबात आवडला नव्हता. अति आंबट आणि अति गोड अश्या दोन चवी एकत्र! तोंडात घोळला होता घास!
अनया
क्रस्ट करणं वाटतं तितकं त्रासाचं नाहीये. उलट मळणं वगैरे फार नसतं.
मस्त डीटेलवार रेसिपी आणि फोटो
मस्त डीटेलवार रेसिपी आणि फोटो!
की लाइमऐवजी माझा श्रीखंड पाय कर तू - तो तुला आवडेल.
श्रीखंड पाय >>> ही रेसिपी
श्रीखंड पाय >>> ही रेसिपी माहिती नव्हती. हे ट्राय करणे मस्ट झाले आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
श्रीखंड पाय >>>>> हो श्रीखंड पाय करून बघायचा आहे. आता पुढच्या वेळेला करून बघतो.