माझी प्रार्थना...

Submitted by मुग्धमानसी on 2 November, 2024 - 10:08

बिन ढगाळी शुभ्र माझी प्रार्थना
विहरते निरभ्र माझी प्रार्थना

बुद्धिचा ग्रह नेणिवेच्या तारका
भोवती अवकाश माझी प्रार्थना

भाबड्या शब्दांत अंगाई जणू
तान्हूली निर्वस्त्र माझी प्रार्थना

मागला संदर्भ ना पुढली दिशा
एकटे पाऊल माझी प्रार्थना

वासनेचे, लालसेचे अस्तर
जीव धागा वीण माझी प्रार्थना

आशयाच्या बंधनातून मोकळी
अंतरी आसक्त माझी प्रार्थना

ही जिथे जाईल जाओ बापडी
फेकली गगनात माझी प्रार्थना...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वा!

छान!
शब्द, भाषा बंधने ही तोकडी
तोडिते आदिम ऐसी प्रार्थना!