ती

Submitted by पुरंदरे शशांक on 29 October, 2024 - 05:55

ती

अचपळ वारा धरु पहाता
हातास काही लागत नाही
गंध जरासा किंचित ओला
आत कुठेसा थबकून जाई

अथांग सागर अफाट पाणी
दिपवी त्याची दिव्य भव्यता
आत आत मी सुखावतो की
ओंजळ इवली भरता भरता

निळेनिळेसे अंबर डोई
नजर न काही तेथ ठरावी
दर्पणातुनी येत हाताशी
तुकडा तो तर जपून ठेवी

ओलांडुनिया शब्दराशींना
अमर्याद ती सदैव नूतन
प्रतिबिंबित ती शब्दामधुनी
धन्य धन्य ते सार्थ सुदर्शन

----------------------------------------------
अचपळ.... अति चपळ

अंबर.... आकाश

दर्पण.... आरसा
............................................................

या कवितेतील शेवटच्या कडव्यातील *ती* म्हणजे कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभाशक्ती इ.

कुठल्याही कलेतून जे काही व्यक्त होते ते अफाट, अमर्याद, अनंत प्रतिभाशक्तीचा केवळ अंशमात्रच !
जसे की वार्‍यासोबत येणारा गंधमात्र, सागरातले ओंजळभर पाणी वा आकाश ज्यात प्रतिबिंबित होते तो छोटासा आरसा...

अशा या अनंत कल्पनाशक्तीचे अंशमात्र दर्शन जरी कुठल्याही कलेतून घडले तरी धन्योहं असे सार्थ उद्गार रसिकाकडून निघतात...

आणि जो अस्सल कलाकार असतो तो कायमच अशा उदात्त भावामधेच असतो की मी तर केवळ एक माध्यमच आहे - माझ्याकरवी कोण हे घडवतो/लिहितो/साकारतो कोण जाणे !

जसे की श्रीतुकोबा म्हणतात - "बोलविता धनी वेगळाचि"

कलाकाराचा हा जो भाव असतो तोच रसिकालाही नेमका जाणवतो व तो स्वतःला धन्योहं म्हणून मोकळा होतो.... त्या शब्दातून, त्या कलाकृतीतून त्याला त्या अफाट कल्पनाशक्तीचे अंशमात्र दर्शनही सुदर्शन होऊन जाते !

इति ।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users