इथे भुरटे चोर खूप आहेत..

Submitted by SharmilaR on 26 October, 2024 - 02:38

‘इथे भुरटे चोर खूप आहेत..’

अमेरिकेत अजू-कमू कडे पोहोचल्यावर दोन दिवसात आम्ही घरात सेट झालो, अन् मग नजर बाहेर वळली.

तसं पहिल्याच दिवशी मुलांनी घराभोवती फिरण्याची जागा दाखवून ठेवली होती. घर नं चुकता अगदी घराभोवतीच्या परिसरातच प्रदक्षिणा मारायची ठरवलं, तरिही छान एक किलोमीटरचा राऊंड होत होता तो. मग एक-दोन दिवस तसंच घराला प्रदक्षिणा मारत फिरलो.

घरात किचनमधलं तंत्र, म्हणजे इंडक्शन वापरणं.., डीश वॉशर लावणं..,हे जमायला लागलं. म्हणजे घाई कसलीच नव्हती, तरी मलाच तिथे पटकन स्वावलंबी व्हायचं होतं हे सगळं जमवून!

आता स्वावलांबनाची पुढची पायरी म्हणजे, आपलं आपलं दूध, भाज्या, किराणा.. आणता येण्याची. रोज ‘ऑफिस मधून येतांना काही सामान आणायचं आहे का..?’ ह्या मुलांच्या प्रश्नाला, ‘काही नकोय... तुम्ही (वाट वाकडी नं करता) घरीच या सरळ..’ असं उत्तर द्यायचं होतं.

‘फार जड सामान नाही आणणार.. जरा चार लोकं दिसतील तिथे.. मला आवडतं भाज्या वगैरे घेत, गंमत बघायला.... फिरायला आणखी एक ठिकाण होईल..’ असं आग्रहाने सांगितल्यावर अजुने घरापासून दीड-दोन किलोमीटर वर असलेल्या ‘क्रोगर’ चा पत्ता अन् तिथे जाण्याचा रस्ता सांगितला.
आता जवळपास रोजच आमचा ‘मॉर्निंग वॉक’ क्रोगर च्या दिशेने व्हायला लागला.

सिग्नलवर बटण दाबून रस्ता ओलंडण्यातलं नावीन्य.. जिथे सिग्नल नसेल तिथे रस्ता ओलंडायला वाहनं थांबून रहातात आपल्याकरता, ह्याचं कौतुक अन् आश्चर्य वाटणं.. अन् आपण त्यांचा खोळंबा करतोय की काय असं वाटून कानकोंड होणं.. रस्त्याने भेटणारी प्रत्येक व्यक्ती उत्साहाने आणि हसऱ्या चेहऱ्याने ‘विश’ करणारच, म्हणून आपला चेहरा आधीच हसरा ठेवणं.. , कुत्रा घेऊन फिरणारा/फिरणारी कुणी असेल तर, त्यांनी समोरून कुणी येतांना दिसल्यास, आधीच आपला कुत्रा बराच बाजूला घेऊन दुसऱ्याला वाट करून देणं.. (त्यांना बहुदा ‘काही करत नाही तो/ती..’, ‘हा चावत नाही.. पाळीव आहे..’ ही वाक्य माहिती नसावीत.) ह्यातली गंमत अनुभवत होतो.

आता आमच्या सकाळच्या फिरण्याला एक ‘उद्देश’ मिळाला होता. निरूद्देश भटकणं संध्याकाळी व्हायचच. (जवळपास) रोज सकाळी आम्ही दोघं नवरा-बायको खांद्यावर दोन पिशव्या अन् त्यात काही जुन्या क्रोगरच्याच प्लास्टिकच्या पिशव्या टाकून भाजी-अंडी-ब्रेड हे, किंवा ह्यापैकी काहीतरी आणायला बाहेर पडायचो.

बरोबर ‘जुन्या क्रोगरच्याच प्लास्टिकच्या पिशव्या’ ह्या करता की, घरात शक्य तितकं प्लॅस्टिक कमी यावं, ह्यासाठी कमू जागरूक असते. म्हणून मग ती जुन्याच पिशव्या साठवून ठेवते आणि दुकानातून सामान आणताना त्याच वापरायला लावते.
तर कमूने सांगितल्या प्रमाणे, सामान घेऊन ‘सेल्फ चेक’ करून झाल्यावर मोठ्या पिशवीत ते वेगवेगळं ठेवायला ह्याच नेलेल्या पिशव्या वापरायचो आम्ही.

ह्या सेल्फ चेकिंगची पण एक गंमतच होती. ज्या वस्तूंवर बार कोड होता, त्या वस्तू पटकन स्कॅन करता यायच्या. पण ज्या वस्तू सुट्या असायच्या, त्या घेतांना कायम काळजी वाटायची. म्हणजे दुकानात असलेल्या दहा प्रकारच्या कांद्यामधून मी मध्यम प्रतीचे (भावाचे) कांदे घेतले, तर स्कॅन करतांना किंमत चढी तर नाही लावल्या जाणार नं..? मशीन ला वजन कळेल, पण क्वालिटी कशी कळणार..? असे विचार करत करत स्क्रीनवर काही शोधे पर्यंत आमचा स्क्रीन लॉक व्हायचा अन् तिथे ‘हेल्प इज ऑन द वे’ चा मेसेज झळकायचा. पण मग एक-दोन मिनिटात कुणी तरी अटेंडंट येऊन तिचं ‘एम्प्लॉइ कार्ड’ वापरुन पुढचं प्रोसेसिंग करायची.

पुढे पुढे तर आम्ही दिसताच अटेंडंट आमच्याकडे यायला तयार व्हायची. पण लवकरच स्कॅन च्या ऐवजी तिथे आपल्या वस्तूचं नाव टाकलं की (अनेक) चित्र येतात, अन् मग आपल्याला हवं ते सिलेक्ट (योग्य भाव) करता येतं हे कळलं.

सुरवातीला बऱ्याच भारतीय आई-बापांप्रमाणे आमचेही ‘अरे बापरे! हजार रुपयांचे अंडी आणि कांदे!!!! बाराशेच्या भाज्या!!!!!’ करून झाले. पण हेही मग अंगवळणी पडलं, अन् आम्हीही झालो नॉर्मलाईझ. आपलं आपलं घरातून बाहेर पडण्यापासून, अशी छोटी मोठी खरेदी केली की, लहान मुलांसारखा आनंद व्हायला लागला. ‘स्वावलंबन झिंदाबाद!!!!’

रोजच्या ह्या फिरण्यातूनच मग सिग्नल च्या आधीही एक कॉम्प्लेक्स आहे अन् तिथेही एक रोजच्या गरजा भागवणारं दुकान आहे ह्याचा आम्हाला शोध लागला. हे सिंगल वुमन दुकान क्रोगर पेक्षा बरंच लहान होतं. इथे आणि ‘सेल्फ चेकिंग’ नव्हतं आणि मिरच्या कोथिंबीर.. एखादी इंडियन भाजी इथे जास्त चांगली मिळते हे आमच्या लक्षात आल्यावर अधून मधून आम्ही ह्या दुकानात पण जायला लागलो.

असंच एक दिवस सकाळी त्या लहान दुकानात भाजी, मिरच्या कोथिंबीर अन् तत्सम सामान (त्याच त्या क्रोगर च्या पिशव्यांतून) घेऊन बाहेर पडलो अन् मला एकदम आठवलं, आज रात्री मला जेवायला कोलंबिचं कालवण करायचं होतं. कोलंबी तर तिथे फक्त क्रोगर मध्येच मिळणार होती. मग आमचा मोर्चा क्रोगर कडे वळला.

आज पहिल्यांदाच भरलेल्या पिशव्या घेऊन आम्ही क्रोगर मधे येत होतो. आता ह्या भरलेल्या पिशव्यांचं काय करायचं कळेना. आता ह्या ठेवायच्या कुठे? आपल्याकडे (भारतात) बरंय.. बाहेर काऊंटर असतो बॅगा.. पिशव्या ठेवायला!

‘अरेच्चा!’ तेव्हा लक्षात आलं, अशा मोठ्या दुकांनामध्ये/ मॉल मध्ये रिकाम्या पिशव्या घेऊन जायला आपल्याकडे मुळी परवानगीच नाही. ते सगळं बाहेर ठेवायला लागतं. मनीपर्स मोठी असेल, तर तीही सील करून आपल्या हातात मिळते!

इथे तर आम्ही रोजच रिकाम्या पिशव्या घेऊन आत जायचो. मुख्य दरवाजा जवळ असलेली बास्केट घेऊन त्यात वस्तू घेऊन, बिल झाल्यावर मग त्या वस्तू आमच्या पिशव्यांमध्ये टाकायचो.

पण आज आधीच दुसरीकडून सामान घेऊन आलो होतो. बरं दोघांपैकी एकाने बाहेर थांबायचा पर्यायही नको होता. कारण आत असणार चार प्रकारच्या कोलंबी! मग ही घ्यायची की ती ह्यावर विचार विनिमय!

शेवटी ठरवलं, मुख्य दरवाजा मधून आत गेलो की, दुकानात जाण्याआधी जो कॉरिडॉर लागतो, तिथे एक बाक होता, त्यावर ठेऊया आपण आपलं सामान. पाच सात मिनिटात तर येणार परत. हाकानाका!

अगदी पाच सात मिनिटांमद्धे नाही, पण बऱ्यापैकी लवकर आलो बाहेर, कोलंबीचं एक मोठ्ठं पॅकेट घेऊन. एवढी जास्त कोलंबी तीन चारदा तरी करता येणार होती. बाकावर आमच्या पिशव्यां जवळ एक हट्टा कट्टा (इथले सगळेच हट्टे कट्टे!) माणूस बसला होता.

‘Hi!’ असं (त्यांच्या पद्धतीने हसऱ्या चेहऱ्याने) त्याला म्हणत मी आमच्या पिशव्या उचलल्या.
‘इज इट यॉरस?’ त्याने विचारले.
‘येस..’
‘इथे का ठेवल्या? आय वॉज वंडरींग.. हूज ईज धिस.. यू नो..’ अर्थातच हे सगळं संभाषण इंग्लीश मध्येच चालू होतं.
‘आम्ही ऑलरेडी दुसरीकडून सामान घेतलं होतं.. म्हणून मग ते आत नाही नेलं. ’
‘सो व्हॉट..? यू शुड नॉट हॅव केप्ट इट लाइक धिस.. इथे किती चोरया होतात तुम्हाला माहिती आहे का..? कुणीही हे सामान घेऊन पळून गेलं असतं. म्हणून मी इथेच बसून राहिलो.. हल्ली दिवस फार वाईट आले आहेत.. अशा बाहेर वस्तू अन्अन्टेडेड नाही ठेवायच्या.. ’

तो बराच वेळ आम्हाला समजावून सांगत होता, कुणावर विश्वास नं ठेवण्याबद्दल.. आमच्या वस्तूंची काळजी घेण्याबद्दल..

‘येस.. येस.. यू आर राइट..’

आम्ही दोघंही हो.. हो.. करत माना हलवत होतो.

‘आम्ही रोज इथे पायी पायी येतो.. बाकी इथे येणारे सगळे त्यांच्या गाड्या घेऊन आलेले असतात.. कोण कशाला आमच्या एवढ्याश्या समानाची चोरी करेल..’ इत्यादी मनात!

आता ह्याला कसं सांगणार होतो (प्रश्न फक्त भाषेचा नव्हता!).. इथलं आम्हाला महित नाही, पण अशा भरलेल्या पिशव्या घेऊन (खरंतर रिकाम्या पण) दुकानाच्या आत जायला आमच्या देशात परवानगी नसते.. आत जाणाऱ्या प्रत्येकावरच अविश्वास दाखवला लागतो. (संधी बाहेर पेक्षा आतच असते. बाहेर सामान टोकन घेऊन ठेवलेलं असतं ना!)

संधी मिळाली तर किती लोकं वस्तू ढापणार नाहीत असं होईल? किमान बारक्या बारक्या..? किती बॅगा बाहेर येतांना चेक करणार? बरेच लोकं निव्वळ योग्य संधी अभावी सज्जन असतात.

दुकान/ मॉल चे नियम करणाऱ्यांच तरी काय चुकलं म्हणा? कुठे आणि किती लक्ष ठेवणार? (अगदी कॅमेरे असले म्हणून काय झालं!) मागे एकदा मुंबई गोवा मार्गावर चालू झालेल्या फाइव स्टार ट्रेन च्या पहिल्याच दिवशी त्यातले एलसीडी स्क्रीन, पॉकेट हेडफोनस लोकांनी ओरबाडून नेले होते. ह्या वस्तू नेणारे कुणी ‘गरीब’, ‘गरजू’ वगैरे नव्हते तर चांगले व्यवस्थित तिकीट काढूनच प्रवास करत होते!. हॉटेल मधून तर चमचे.., हेयर ड्रायर सकट वस्तू चोरून नेणारे आहेतच..

तरीही आम्ही मात्र अभिमान बाळगतो, ‘जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा.. जहा सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा..!!!’
आमच्या ह्या पिशव्यांच्या आतल्या प्लॅस्टिक च्या पिशव्या तर क्रोगरच्याच आहेत. कुणाला असं वाटलं असतं, की हे सामान आम्ही आत्ता इथूनच घेतलं आहे.. तर?(आमचं भारतीय डोकं भारतीय पद्धतीनेच विचार करणार!) ते दुसऱ्या दुकानाचं बिल दाखवणं वगैरे वगैरे तर पटकन डोक्यातही आलं नसतं.

‘एनी वे.. फार नाही फक्त दहा पंधरा डॉलर चं सामान आहे त्यात.. बट इट वॉज सो काइंड ऑफ यू.. थॅंक यू व्हेरी मच..’ मी त्याचे आभार मानले.
(‘अरे बापरे! हजार रुपये..!! बाराशे.. !!!! पासून आता ‘फक्त दहा पंधरा डॉलर’ पर्यंत प्रगती झाली होती.)
‘सांभाळून रहा.. इथे भुरटे चोर खूप आहेत..’ आम्हाला बाय करता करता त्याने परत ‘वॉर्न’ केलं.

*********************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहा… भुरटे चोर जगाच्या पाठीवर कुठेही आहेत… >>+१
काही झाले तर अनुभवाखाती पैसे गेले, धडा शिकलो म्हणायचे.

मुद्याच्या मानाने लेख विस्तृत आहे छानपैकी!

'आपलं पाळीव कुत्रं बाजूला घेऊन जातात' हे आवडले तिथल्या लोकांचे! त्यांना 'समोरून येणारे' आपल्या पाळीव कुत्र्याला काही करणार तर नाहीत ना ही भीती असावी.

इकडे, आमच्याकडे माणसे बाजूला होतात. कुत्रे पाळीव असो वा भटके वा ते कुत्रेच का नसेना!

धन्यवाद साधना, केशवकुल, किल्ली, बेफिकीर.
मुद्याच्या मानाने लेख विस्तृत आहे छानपैकी!>> एका अनुभवाच्या निमित्ताने आणखीन काही अमेरिका अनुभव मांडायची संधी घेतली.

'समोरून येणारे' आपल्या पाळीव कुत्र्याला काही करणार तर नाहीत ना ही भीती असावी.>> आपल्या कुत्र्याचा इतर कुणाला त्रास नको ही भावना दिसली मला.

छान लेख ! असेच अनुभव शेअर करत राहा..

तिथे येणारे जाणारे अनोळखी लोकं सुद्धा हसून हाय हॅलो करून जातात हे ऐकून होतो. आपल्याकडे तो ट्रेण्ड कधी येणार नाही. कारण सहज मोजून बघितले तर आज घराबाहेर पडल्यापासून दिवसभरात मला ओळखीचे आणि अनोळखी मिळून टोटल तेरा हजार सातशे सव्वीस चेहरे दिसले. इतक्या जणांकडे पाहून हॅलो बोलणे दूरच, साधे हसायचे म्हटले तरी आठवड्याभरात जबड्याचे ऑपरेशन करावे लागेल Happy

धन्यवाद भक्ती, जाई, ऋन्मेष.
@ऋन्मेष,
बरोबर आहे आपल्याकडे तो ट्रेंड येणार नाही. उलट हसावे लागू नये म्हणून लोकं नजर चुकवतात चक्क.

इतक्या जणांकडे पाहून हॅलो बोलणे दूरच, साधे हसायचे म्हटले तरी आठवड्याभरात जबड्याचे ऑपरेशन करावे लागेल >> क्राउन मालिकेतला प्रसंग आठवला. राणी एलीझाबेथ ने तिचा पाहिला ब्रिटिश सम्राज्याचा दौरा पूर्ण केल्यानंतर तिला असेच सतत हसावे लागल्यामुळे जबड्याचे ऑपेरेशन करावे लागले होते.
ही मालिका सत्यघटनांवर आधारित आहे.

ऋन्मेषने जे लिहिले आहे, त्यावर मी माझा अनुभव सांगते.
आज आपण वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाकडे बघून हसायचे असे मी एके दिवशी ठरवले.
हसत हसत लोकल ट्रेन पकडली. आणि मला खूप गर्दी असलेल्या ट्रेन मध्ये चक्क सीट क्लेम करायला मिळाली. मी सीट क्लेम केल्यावर त्या बाईकडे बघून छान हसले. मग दोन तीन मिनिटांनी तिने माझ्याकडे परत बघितले तर मी पुन्हा हसले. तिला इतका राग आला. तोंड वाकडे करून ती म्हणे इतके हसायला काय झाले?
आता मी कसे काय सांगू माझा आजचा संकल्प. मी पटकन म्हणाले इतक्या गर्दीत मला सीट क्लेम करता आली म्हणून मला खूपच आनंद झालाय म्हणून मी हसत आहे. त्या बाईने मझ्याकडे असा कटाक्ष टाकला जणू काही ती मनात म्हणाली असावी यडपटच दिसतय हे ध्यान.
मला फार मजा आली.
त्यानंतर मी असला संकल्प कधीही केला नाही.

छान अनुभव रोहिणी.
तुमच्या अनुभवावरून मला माझाही हसण्याचा एक अनुभव आठवला.-

माझ्या मुलाच्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल बघायला मी जिल्हा परिषद कार्यालयात गेले होते.
निकाल चांगला असणार ह्याची खात्री होती पण अतिशय चांगला म्हणजे तो गुणवत्ता यादीत जिल्ह्यात दुसरा आला होता. आणि त्याचे सर्व मित्र मैत्रिणी पण पहिल्या दहात होते.
मला अर्थातच प्रचंड आनंद झाला. माझं हसू चेहऱ्यावर मावत नव्हतं. तेथून बाहेर पडले तर माझ्या स्कूटरवर ट्रॅफिक हवालदार बसला होता.
तो पण माझ्याकडे बघून हसायला लागला. मी कारण विचारलं तर म्हणाला, "तुम्ही हसताय म्हणून..."

चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल.. तो गुणवत्ता यादीत जिल्ह्यात दुसरा आला होता...
>>>>
मी मुंबईत चौथा आलो होतो Happy

बाई दवे,
@ रोहिणी अनुभव,
उगाचच कोणी हसताना दिसले ट्रेन वगैरे मध्ये तर पहिल्या वेळी मलाही छान वाटते, हसून परतीची स्माईल दिली जाते. पण पुन्हा पुन्हा कोणी हसले तर ऑकवर्ड वाटते, अरे हा तर मागेच पडला म्हणून नजर चोरावीशी वाटते, मी माणूसघाना असल्याने आता याच्याशी बोलावे सुद्धा लागणार का याचे टेन्शन येते, तसेच याच्या नियतमध्ये काही खोटं नाही ना, सावध राहावे असेही कधीतरी वाटते..

( स्माईल देणारी मुलगी असेल तर वरची पोस्ट बाद Happy )

Smile संसर्गजन्य असते एकानी दिली तर आपसूक आपणही हसतो आणि मग सुंदर दिसतो Happy
बराच वेळ तो ती हास्याची लकेर टिकते आणि मनातला केर नाहीसा होता. हास्य हा सर्वात श्रेष्ठ मेक अप आहे. आपल्या संस्कृतीत मंद हास्याला महत्व आहे. देव सुद्धा मंद हसतात.आपले पूर्वज खूप हुशार होते ते नेहमी हास्य घेऊन वावरायचे त्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूनचा व्यायाम होऊन jawline sharp व्हायची. हल्ली वेस्टर्न कल्चर मध्येही smile चे गोडवे गायले जातात. जीवनात उन्नती करायची असेल तर हास्य विलसू द्या!!!

हसण्याबाबत माझे मत जरा वेगळे आहे. म्हणजे वर जे लिहिले आहे ते चुकीचे आहे असे नाही. पण हसण्याला फार ओवरहाईप करून ठेवले आहे असे वाटते. वेळ मिळाला की स्वानुभवांसह सविस्तर वेगळ्या लेखात लिहितो..

किल्ली+१ छान प्रतिसाद.
पण सगळीच हास्ये निरागस असतात असे नाही.
तेव्हा हास्याचे प्रकार जाणून घ्यायाला आणि ओळखायला शिकले पाहिजे.
सखे शेजारिणी तू हसत रहा हास्यात पळे गुंफीत रहा.
असे हास्य विरळाच. त्याला नशीब लागते.

@ऋन्मेष
मी मुंबईत चौथा आलो होतो>> अभिनंदन!
पुन्हा पुन्हा कोणी हसले तर ऑकवर्ड वाटते, अरे हा तर मागेच पडला म्हणून नजर चोरावीशी वाटते>> हे तर आहेच शिवाय आधीच म्हंटल्याप्रमाणे गर्दी खूप. म्हणून बरेच लोकं सरळ नजर चुकवतात.
येऊ दयात तुमचा नवीन लेख.

@किल्ली
प्रतिसाद द्यायला आले आणि व्हाट्सअँप forward तयार झालाय>> छान प्रतिसाद दिलाय हास्याबद्दल.

मस्त कथा ..!

तुमच्या कथेतले किस्से वाचायला आवडतात ..

धन्यवाद रुपाली.
अशा मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे लिहिण्याचा उत्साह येतो.

छान लिहिलयं!
पुढे कधी असे झाल्यास कस्टमर सर्विसला विचारा, ते पिशव्यांना 'पेड' चा स्टिकर लावून देतील. दिवस वाईट आहेत हे खरे पण तरीही भुरट्या चोरी पेक्षा 'कुणाचे तरी विसरलेले सामान' म्हणून ते सामान कस्टमर सर्विसला दिले जाण्याची शक्यता बरीच जास्त.

धन्यवाद स्वाती.
आता मी भारतात परत आलेय. त्यामुळे असे अनुभव इतक्यात तरी येणे नाही.

Pages