याआधीचा भाग! -
https://www.maayboli.com/node/85821
त्या आलिशान बंगल्यात पार्टी रंगली होती. काहीही कारण नसताना सुलतानने पार्टी का दिली, याचं सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं.
असो... सुलतानची पार्टी म्हणजे दारू, गांजा, कोकेन यांची रेलचेल होती.
"सुलतान, जयदीप खन्ना, दिलबाग कपूर आणि बलबीर साहनी तुझी वाट बघतायेत." रहमानने आवाज दिला.
"जी." तो उठला आणि आतल्या खोलीत गेला. त्याला बघताच तिघेजण उठून उभे राहिले.
"जयदीप, वजन बढ रहा है, कम कर." तो जयदीपची गळाभेट घेत पोटावर गुद्दा मारत म्हणाला.
जयदीप कसानुसा हसला.
"बलबीर तुझ्या नवीन मूवीच पोस्टर बघितलं. आता आम्हाला विसरलास तू."
"तुला कसा विसरेन सुलतान. माझी सगळ्यात हिट मूवी तुझ्याबरोबरच दिली होती मी." बलबीर म्हणाला.
"सुलतान. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. नेक्स्ट मूवी ची स्क्रिप्ट आणलीय मी." जयदीप म्हणाला.
"कपूर साब. तुम्ही तर नवनवीन प्रयोग करतायेत गुड."
"आता जुना जमाना गेला सुलतान."
"हो." तो कसानुसा हसला. "पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत ना. गेल्या पाच दशकापासून तुम्हीच तर बॉलिवूडचं अर्थकारण फिरवतायेत. मी तीन दशकांपासून टॉपला आहे. का? कारण आपण सगळे सोबत आहोत म्हणून."
"ये भी बराबर है." कपूर म्हणाला.
"मी जेव्हा आलो होतो, तेव्हा या इंडस्ट्रीमध्ये माझं कुणीही नव्हतं. आता ही सगळी इंडस्ट्री माझी आहे. तुम्ही लोक माझे आहात. आणि आपण सोबत आहोत, म्हणूनच बॉलीवूडवर आपलं राज्य आहे."
"सुलतान. नेमकं काय हवय तुला."
"मिहिर पाटील तुमच्या आणि तुमच्या सर्कलच्या कोणाही व्यक्तीच्या फिल्ममध्ये दिसायला नको.."
...कपूर साहेब हसले.
"सुलतान. आम्ही त्याला एका पायावर आमच्या फिल्ममध्ये घ्यायला रेडी आहोत. पण..."
"पण काय?"
"त्यालाच आपल्या सर्कलमधल्या कुणाहीबरोबर फिल्म करायची नाहीये."
सुलतान विचारात पडला.
"सुलतान, तू काय आणि मी काय, आपण इतकेही पॉवरफुल राहिलेलो नाहीत."
"असं नाहीये कपूर साब."
"असच आहे. आज सगळ्यात मोठा वितरक आणि निर्माता कुणी असेल, तर तो जयदीप आहे. पण त्याच्याही मुविला त्याने नकार दिला..."
"...त्याला थियेटर मिळाले नाहीत तेव्हा कळेल." जयदीप उत्तरला.
"तो तुमचे सगळे नियम धाब्यावर बसवत पुढे चाललाय. तुझी दिवाळी, मोहसीनची ईद, रेहमतचा ख्रिसमस... कधीही तो मूवी रिलीज करत नाही. मागचा मूवी त्याने एप्रिल मध्ये रिलीज केला होता. जे जुने डायरेक्टर आहेत, त्यांच्यासोबत तो काम करत नाही. महावीर साठी तो देवराजाबरोबर काम करतोय, जो हिंदीमध्ये कधीही काम करत नाही. आदित्य आणि बाजीराव, दोघंही त्याने वर्माबरोबर केलेत. त्याच वर्माला तू सायको म्हणून बाहेर काढलं होतं."
"तो आहेच सायको."
"पण तो बेस्ट होता. सुलतान... टाईम बदल रहा है. हमको बदलना पडेगा." कपूर साहेब म्हणाले.
थोडावेळ शांतता पसरली.
"पर... जैसे अनिका कपूर को साईडलाईन किया गया, तसंच मिहिर पाटीलला आम्ही तिघेही साईडलाईन करू. बॉलिवूडमध्ये कुणाही आऊटसायडरला थारा नाही. बॉलिवूड कायम आपलं होतं, आपलंच राहणार."
...कपूर साहेब उठले आणि तिथून निघून गेले.
*****
"पुढे जाण्याआधी एक प्रश्न विचारतो. तुला बॉलिवूडची काही माहिती आहे का?" अज्ञातवासीने मानसीला विचारले.
"नोप." ती उद्गारली.
"मग काही बेसिक गोष्टी तुला सांगाव्या लागतील. बॉलिवूड, म्हणजेच हिंदी भाषेची फिल्म इंडस्ट्री. पूर्वापार इथे काही फॅमिलीचा अंमल चालतोय. कपूर त्यांच्यापैकी एक... पण साहनी आणि खन्ना यासुद्धा प्रचंड पॉवरफुल होत्या.
मिहिरच्या खूप वर्षे आधी, सुलतान बाहेरून आलेला होता, पण त्याला अमाप प्रेम मिळालं, आणि त्याच्या स्वभावाने त्याने जीवाभावाचे मित्रही जोडले. जयदीप खन्ना आणि बलबीर साहनी यांनी त्यांच्या पहिल्या मुव्हीज त्याच्यासोबतच केल्या.
जयदीप म्हणजे शोबॉय. त्याकाळी कुणीही स्टार कीडला लॉन्च करायचं असलं, तर जयदीप अग्रेसर असायचा. त्याच्या पार्टीज, त्याचे कॉन्टॅक्टस, सर्व इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते. त्याची स्वतःची प्रोडक्शन कंपनी होती. स्वतःची वितरण व्यवस्था होती...
...पण बलबीर त्याहीपेक्षा पॉवरफुल होता. त्याचं बॅनर त्याकाळी बॉलिवूडमधलं सगळ्यात मोठं प्रॉडक्शन्स होतं, पण त्याचबरोबर त्याचं वितरकांच जाळं सगळ्यात मोठं होतं...
...आणि याच बळावर ते इंडस्ट्री नाचवत होते.
सुलतान, मोहसीन आणि रेहमत. तीन खान. तिघांची एकहाती इथे सत्ता होती. अजून काही स्टार्स होते, पण यांचं स्टारडम सगळ्यात जास्त होतं.
नवीन पिढीतल्या स्टार्समध्ये नव्वद टक्के लोक आधीपासून बॉलिवूडमध्ये असलेल्या लोकांचे नातेवाईक होते. त्यांनाच मोठे प्रोजेक्ट मिळत असत...
...बाहेरचेदेखील लोक होते, पण त्यांना छोटे प्रोजेक्ट मिळत, आणि काही दिवसांनी ते बाहेर फेकले जात.
आणि म्हणूनच मिहिर पाटील आता सगळ्यांच्या रडारवर होता, कारण त्याची सुरुवातच टॉपवर झाली होती. त्याचा पहिलाच चित्रपट त्याला स्टारकडे घेऊन गेला होता.
...आणि मुख्य म्हणजे, तो सगळे प्रचलित नियम धाब्यावर बसवून आपले चित्रपट चालवत होता...
...सुलतान प्रस्थापित व्यवस्थेचा फक्त प्रतिनिधी होता.
मात्र संपूर्ण व्यवस्था वाट बघत होती,फक्त त्याच्या एका चुकीची."
तो थांबला. आणि त्याने पुन्हा सुरुवात केली.
*****
एक दोन वर्षांची छोटी मुलगी...
हळूहळू त्याच्याजवळ आली.
तो झोपलेला होता.
"उत." ती म्हणाली.
त्याने अजिबात हालचाल केली नाही.
"उत्..." ती पुन्हा ओरडली.
हा धिम्म होता.
...तिने दोन्ही हात वर केले...
आणि धाडधाड त्याच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली.
तो खडबडून जागा झाला...
"सुपे..." त्याने तिला आवळलं...
तिला मजा वाटत होती. तिला जे हवं ते तिला मिळालं होतं.
"सोनादीदी हिला कुणी सोडलं इथे?"
"मी सोडलं." ती आत येत म्हणाली.
"डेंजर आहे ही. सरळ मारामाऱ्या करते."
"बापावर गेलीय तिच्या. आणि तू उठ आता. बारा वाजलेत."
"अग झोपू दे. इथेच शांत झोप लागते."
"मग इथेच शिफ्ट हो."
"शक्य झालं असतं तर तेही केलं असतं. पण पुढच्या आठवड्यात हैदराबादला जायचं आहे."
"कारे?"
"शूटिंग सुरू होतेय. महावीरची."
"ये सांग ना, महावीरला चंद्रसेन भेटेल का?"
"नाही. आता सांगता येणार नाही."
"तू ना..."
"चल मी उठतो. आईसाहेब आहेत ना खाली?"
"हो आहेत ना."
"गर्दी आहे का?"
"असणारच... आमदाराकडे गर्दी नसणार तर कुठे असणार?"
"सिरीयसली... ठीक आहे चल."
त्याने मोबाईल हातात घेतला.
' कॉफी? संडे?'अनिकाचा मेसेज होता.
'श्युर...' त्याने टाईप केलं.
उद्याच त्याला निघायचं होतं.
तो उठला आणि बाथरूमकडे गेला.
******
'यशोमती निवास.
आमदार यशोमती विश्वनाथ पाटील यांचे निवासस्थान. करवीर...'
दिमाखाने पाटी झळकत होती.
"दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. टेंडर काढा आणि तयारीला लागा. कामात अजिबात कुचराई नको."
"नाही होणार ताईसाहेब."
"निवडणूक लांब नाही. लोकं फक्त यशोमती ताई म्हणून यावेळी मत देणार नाहीत. आपली कामे बोलली पाहिजेत."
"बोलतील की." एकजण म्हणाला.
"ठीक. जेवणाची व्यवस्था झाली आहे, जेवूनच जा. मी निघते."
ताई उठल्या. त्यांनी नमस्कार केला.
लोकही उठले.
ताई आत आल्या...
"निर्मला. मिहिरला आवाज दे. आणि जेवण वाढायची तयारी कर."
लगबगीने प्लेट लावायची तयारी झाली.
"मी इथेच आहे, आणि तुमच्यासाठी खास थालीपीठ." तो बाहेर येत म्हणाला.
"अरे. हे काय? त्या म्हणाल्या. मी तुझ्यासाठी हे उद्या बनवणार होते."
"पण उद्या मी नाहीये ना. म्हणून आजच प्लॅन केला."
"आणि तू हे मला आज सांगतोय?"
"सॉरी आईसाहेब. जावं लागेल. मुंबई जास्त दिवस सोडून चालणार नाही. त्यात अवॉर्डची पॉप्युलारीटी इन्कॅश करावी लागेल. वेळ निघून जायला नको."
"मी येईन पुढच्या आठवड्यात. मंत्रालयात काम आहे, भेट होईलच."
"मी हैद्राबादला निघतोय."
त्यांनी निःश्वास सोडला.
"भेटुयात कधीतरी. ओके?" त्या म्हणाल्या.
"हो आईसाहेब." तो हसला.
दोघेजण जेवायला बसले.
त्याच्या मनात मुंबई होती.
आणि त्यांच्या मनात दूर जाणारा मुलगा...
क्रमशः
छान सुरु आहे. भराभर भाग
छान सुरु आहे. भराभर भाग येऊद्या .
टुकार
टुकार