जोगीण

Submitted by अनघा देशपांडे on 23 September, 2024 - 04:26

जोगीण

तुझ्यासवेे सदैव हासते भास तुझ्या जगण्याचे
तुझ्या खांद्यावरी रुदते पाश तुझ्या नसण्याचे
आठवांचे ठरते चांदणे अश्रू डोहात अजूनही
उशाशी थिजते रात्र न मालवते दीप चूकूनही

हृदय फुलांचे गुंंफतो गजरा परंतु सुवास कोरा
जूनी उसवते वीण, नाही तुझ्यापास सुई दोरा
विसरणे विसरुनी गेले जखडलेली प्रीत बेडी
स्नेहगुणाची न मूर्ती होते ठाऊक नव्हत्या रुढी

ना भेटते नित्य दिवसापरी पाहते तुला आरश्यात
पानात सुर्य डोकावतो परी तू हरवला कवडश्यात
शेल्याचा ना धरिला शेव चूकलासे वाट आपसूक
तान्ह्या बाळासम दिल्या हाका अखेर झाले मूक

अबोल जाली नियती तुझ्यासम बोलके कर्मभोग
का असा पडला फासा? नाट्याचा नव्हता प्रयोग
तरुपरी ऐसा तू वनवासी मी अजून मातीत रुजून
तुझीच होते तुझीच राहिले होऊनी सखी जोगीण

-अनघा
२०२४ सप्टेंबर

Group content visibility: 
Use group defaults