अक्षम्य ~ भाग~१

Submitted by रुद्रदमन on 18 September, 2024 - 09:28

अक्षम्य ~ भाग~१
वाड्याचा भूतकाळ ~ कुकर्माचा संहार

धारगाव हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक समृद्ध आणि सुंदर गाव. एका बाजूने पसरलेले सह्याद्रीचे जंगल आणि दुसऱ्या बाजूला जिकडे नजर फिरवावी तिकडे हिरव्यागार ऊसाचे मळे.. गावापासून थोड्या च आंतरावरून दोन कालवे वाहत होते, ज्यामुळे वर्षभर शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत नव्हती. त्यामुळे गावात बागायती शेती बाराही महिने चालत असे. गावाच्या लोकसंख्येचा विचार करता, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात होता. गावाच्या नैऋत्य कोपऱ्यात मजूर वर्गाचा वावर होता. या लोकांची घरे मुख्य गावापासून थोडेसे दूर, हनुमानाच्या मंदिराच्या आजूबाजूला विखुरलेली होती. गावातील मोजक्याच लोकांनी मुख्य गावात घरे ठेवली होती; बाकीच्यानी शेतांवरच टोलेजंग बंगले बांधले होते. मोठ्या प्रमाणात शेतकरी मळ्यात राहायला गेल्यामुळे मुख्य गाव जवळपास पूर्ण रिकामे पडले होते. कोणीच राहत नसल्यामुळे बऱ्याच घरांमध्ये उंदरांनी मातीचे ढिगारे उभे केले होते. विशेषतः गावाचा ईशान्य कोपरा तर पूर्णपणे रिकामा होता. त्या कोपऱ्यात फक्त एक गोष्ट लक्ष वेधून घेत होती - ती म्हणजे रावजी पाटलांचा कित्येक दशकांपासून रिकामा पडलेला वाडा... आणि तोच गाव रिकामे होण्याचे मुख्य कारण होता. आता गावात नांदत असलेल्या पिढीला रावजी पाटील गोरे होते का काळे हेच माहीत नव्हते.. त्यांना पाहिलेले कोणीच गावात जिवंत नव्हते. रावजींचा वाडा गावाच्या ईशान्य बाजूस शेतात रुबाबाने उभा होता. तीन मजली वाडा काळ्या दगडात बांधलेला होता आणि आजही त्याची मजबुती पाहून लोक विस्मित होत. वाड्याभोवती उगवलेल्या झाडांच्या वेली वाड्याला जवळपास पूर्ण वेढून होत्या. ज्यामुळे वाडा भितीदायक दिसत होता. वाड्याचा एकेक कोपरा आणि खोली जुने वैभव दाखवत होते. वाड्याच्या विशाल प्रवेशद्वारावर जुना नक्षीकाम केलेला पण मोठ्या प्रमाणात जीर्ण झालेला लाकडी दरवाजा होता.. वाड्यावर जळमट चढली असली तरी त्यातूनही पिढ्यानपिढ्यांची संपत्ती आणि सत्ता डोकावत होती. वाड्यात शिरल्यावर पहिला मजला म्हणजे भव्य दिवाणखाना होता. आता जरी धुळीचे थर चढलेले असले तरी पूर्वी तिथे सजीव दरबार भरत असावा हे स्पष्ट जाणवायचे.. लाकडी खांबांवर नक्षीकाम, भिंतींवर लटकलेले जुने दिवे, आणि मध्यभागी असलेल्या टेबलावर जीर्ण होऊन लटकलेली राजेशाही वस्त्रे अजूनही तशीच होती. खिडकीवर लटकणाऱ्या पडद्याच्या चिंध्या हळूवारपणे हालताना भूतकाळातील त्या वैभवशाली दिवसांची आठवण करून देत होत्या.दुसऱ्या मजल्यावर मोठ्या खोल्या होत्या, ज्या कधीकाळी रावजींच्या कुटुंबाच्या वापरासाठी असाव्यात. पण आता त्या खोली रिकाम्या आणि पडक्या झालेल्या होत्या. तिथे फक्त एक भयाण नीरव शांतता होती, जी त्या वाड्यात घडलेल्या भूतकाळाच्या गोष्टी सांगत होती.तीसरा मजला हा सर्वात रहस्यमय आणि भितीदायक होता. गावात लोक म्हणायचे की तिसऱ्या मजल्यावर काहीतरी विचित्र आहे. त्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याला मोठे कुलूप लावलेले होते, आणि त्यावर रंगीत धाग्यांचे वेढे होते. रावजींच्या शेवटच्या वारसाने वाडा सोडताना मांत्रिकाला बोलावून काहीतरी बंदिस्त केले होते. त्यामुळे त्या मजल्याला आतून कोणीच पाहिले नव्हते. शक्यतो वाड्या च्या बाजूला कोणीच फिरकत नसे... ज्या लोकांची शेती वाड्याच्या पुढच्या बाजूला होती, त्यांना वाड्याच्या समोरून जाणे भाग होते.... त्यांनी कधी तरी चुकून रात्री शेतावर उशीर झाल्या मूळे, येताना तिसऱ्या मजल्यावर आत मध्ये काही तरी जळत असल्याचा उजेड अनुभवला होता.. त्या उजेडात खिडक्यांवर पडलेली पुरुषी सावली पण काही नी पहिली होती.. त्याच बरोबर त्या वाड्यातून रात्री बेरात्री पुरुषाचा अभद्र किंचाळण्याचा आवाज पण ऐकू यायचा , जणू तिथे कुठल्यातरी अदृश्य शक्तींचा वावर होता. अश्या आफवा गावभर पसरलेल्या होत्या..आता त्या अफवा होत्या की सत्य हे ऐकणाऱ्या ला आणि बघणाऱ्याला च माहीत.. पण गावातील बहुतेक लोक या बद्दल अजिबात शंकित नव्हते की वाड्याच्या आस पास गेल्यावर वातावरणात एक अघोरी भारलेपणा जाणवतो... त्या भागातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची भावना मनात उत्पन्न होते..
खरे तर या सर्व बाबींमुळे रावजींचा वाडा गावातील अघोरी रहस्यांचे आणि भयाण घटनांचे प्रतीक बनला होता.. या सर्वा मागे नक्की काय कारण होते या बद्दल गावात एक अख्यायिका होती..

ब्रिटिश काळा मध्ये वाड्याचे मालक रावजी पाटील त्या भागाचा जमीनदार होते.. ते आपल्या कुटुंबासह त्या वाड्यात निवास करत होते... त्यांच्या अधिपत्या खाली असलेल्या भागातील जनतेशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.. त्यामुळे रावजी पाटलांना चांगली प्रतिष्ठा होती . इंग्रज पण त्यांना वचकून होते..त्यांना दोन मुले होती.. मोठा मुलगा जयंत हा अतिशय सभ्य आणि कामाशी काम ठेवणार.. त्या उलट धाकटा धनंजय अतिशय बिघडलेला.. बाई आणि बाटली या मध्येच त्याचा दिवस उगवायचा आणि मावळायचा... अनेक वेळा समजावूनही त्याच्या वागण्यात फरक पडत नव्हता.. शेवटी त्याच्या या प्रतापाना वैतागून रावजीनी त्याला वरचा तिसरा मजला राहायला देऊन टाकला आणि मागच्या बाजूने त्याला एक जिना काढून दिला होता.. त्याच्या बरोबर असलेले सर्व कौटुंबिक संबंध तोडून टाकले होते.. त्यामुळे धनंजय वर कोणताच अंकुश राहिला नाही. जसे जसे दिवस जात होते तसा त्याच्या मधील नीच पना वाढत चालला होता.. त्यात त्या भागावर नेमलेला इंग्रज आधिकारी त्याला साथ देत होता... पुढे पुढे तो गावात किंवा बाहेर कुठेही कोणतीही स्त्री आवडली की तिला रात्रीच्या वेळी उचलून वाड्यावर आणू लागला.. मागच्या जिन्याने वर नेऊन उपभोगू लागला.. रावजिंचा मुलगा आणि त्यात इंग्रज अधिकारी साथीला असल्या मुळे त्याची सगळी कडे दहशत पसरलेली होती.. त्यामुळे त्याच्या विरुद्ध ब्र काढायची कोणाची हिम्मत होत नव्हती... ज्यांनी काढायचा प्रयत्न केला ते गायब झाले होते ... त्याच्या शी असलेले सर्व संबंध तोडून टाकलेले असल्यामुळे रावजी पण या भयानक प्रकारा पासून अनभिज्ञ होते..
पण म्हणतात ना काळे कृत्य करणारा जास्त दिवस टिकत नाही.. एक दिवस पापाचा घडा भरतोच... त्याच्या काळया कृत्यांची त्याला शिक्षा मिळाली.. त्याने केलेल्या नीच कर्मामुळे म्हणा किंवा इतर कशा मुळे, त्याला असाध्य रोग झाला... अनेक वैद्य हकीम केले पण त्यातून त्याला बरा होण्याचा काही मार्ग दिसत नव्हता... सडत सडत आलेले मरण डोळ्यासमोर दिसत असताना... इंग्रज अधिकाऱ्याने रावजींच्या प्रतीष्ठे वर शेवटचा आघात करण्यासाठी त्याची एका मंत्रिकाशी भेट घालून दिली.. त्याला आता परत आयुष्य डोळ्या समोर दिसायला लागले.. त्याने त्या मंत्रिका कडे जाणे सुरू केले... मांत्रिकाने त्याच्या कडील शक्तीने काही नरबळींच्या बदल्यात त्याला पूर्ण बरे केले...
मांत्रिका चा बराच सहवास आणि त्या दरम्यान बघितलेली त्याची शक्ती बघून, धनंजय काळया साम्राज्याकडे आकर्षित झाला.. त्याने पण त्या विकृत शक्ती च्या उपासनेला सुरुवात केली..
त्या मंत्रिकाच्या सहवासात धनंजय काळ्या जादूच्या उपासनेत गुंतून गेला.
वर्षा मागून वर्ष जात होते. परिसरातून माणसे स्त्रिया गायब होत होते पण ते कुठे गेले याचा कधीच कोणाला थांगपत्ता लागला नव्हता.. अनेक बळी देऊन तो आता काळया शक्ती ला प्रसन्न करण्याच्या शेवटच्या वळणावर होता.. त्यातच मांत्रिकाने शेवटच्या बळी साठी त्याच्या रक्तातील मुलीला बळी म्हणून आणण्यास सांगितले... धनंजय त्या काळया शक्ती साठी इतका वेडा झाला होता की त्याने स्वतःच्या भावाच्या मुलीला न्यायचे ठरवले.. त्याच्या नीच वागण्यामुळे रावजी आणि बाकी सर्व घराने त्याला पूर्ण त्यागलेले होते.. त्यामुळे खाली दोन्ही मजल्यावर त्याला प्रवेश वर्जित होता... त्या दिवशी बराच वेळ वाट बघितल्यावर त्याला ती संधी मिळाली.. संध्याकाळी वाड्याच्या प्रांगणात खेळत असताना आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करत त्याने जयंत च्या मुलीचे तोंड दाबून तिला उचलले... आणि चादरी मध्ये गुंडाळून थेट जंगलाच्या दिशेने निघाला... बरेच दूर जायचे असल्या मूळे तो लगबगीने चालला होता .. त्याच्या डोळ्यासमोर आता उपासना पूर्ती ने मिळणारे फलित नाचत होते..
इकडे वाड्यात मुलगी गायब झाल्या नंतर लगेच शोधाशोध सुरू झाली... एका नोकराने ही बातमी ऐकून सांगितले की लहाने मालक चादरी मध्ये काही तरी गुंडाळून लगबगीने जंगला कडे गेले आहेत... हे ऐकून रावजी प्रचंड संतापले होते.. त्यांनी काही विश्वासू नोकरांना बरोबर घेत घोडे काढायला सांगितलेत.. त्या नोकराला बरोबर घेत सगळे जण वेगाने त्याने सांगितलेल्या दिशेला निघालेत.. बराच वेळ शोध घेतल्यानंतर रावजी ना तो खांद्यावर चादरीची वळकुटी टाकून घेऊन चाललेला दिसला..
त्यांनी त्याला पकडायला सांगितले... पकडल्यानंतर त्याला बांधून टाकून मुलीला सुखरूप घरी रवाना केले.. रावजींच्या डोक्यात नक्की काय विचार फिरत होते त्यांनाच माहीत.. पण त्यांनी भरवशाच्या तीन जणांना बरोबर ठेऊन बाकी सर्वांना घरी पाठवून दिले.. पूर्ण अंधार पडे पर्यंत ते तिथेच थांबलेले होते... तो स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होता.. भेसूर आवाज काढून त्यांना अघोरी विद्येने संपवून टाकण्याची धमकी देत होता... पण रावजींच्या मनात आता त्याला संपवण्याचे निश्चित झाले होते... अंधार चांगला गडद झाल्यावर त्यांनी त्याला उचलायची खूण केली.. दोघांनी कोलदांडा घालून त्याला उचलले.. तोंडातून भला मोठा बोळा कोंबला.. आणि ते रावजींच्या मागे निघाले... रावजीच्या क्रोधाची आता परिसीमा झाली होती.. त्यांनी त्याला संपवण्यासाठी घराच्या तिसऱ्या मजल्याची निवड केली... ज्या खोल्यांमध्ये त्याने अबलांवर अत्याचार केले होते तिथे ते त्याला त्याने केलेल्या अक्षम्य अपराधाची शिक्षा देणार होते..
मागच्या जिन्याने त्याला वर आणले गेले... त्याच्या त्या तिसऱ्या मजल्यावर त्याच्या तोंडातून बोळा काढत त्याला त्याच्या पापांचा पाढा वाचण्यास सांगितले... मरण डोळ्यासमोर दिसत होते म्हणून वडील क्षमा करतील या विचाराने त्याने सर्व काही सांगितले.. आणि जीवनदान देण्याची याचना करू लागला. पण त्याच्या तोंडून त्याने केलेली सर्व नीच कर्मे ऐकल्यानंतर रावजींचा राग पराकोटीला गेला होता..
त्यांनी बरोबर आलेल्यांना त्याच्या तोंडात बोळा कोंबण्यास सांगितले.. त्याने जिवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न केला.. पण त्या सर्वांच्या ताकती समोर तो काहीच नव्हता...
रावजींनी तिसऱ्या मजल्यावरील सर्व खोल्यामधून त्याने वापरलेले कपडे आणि दिवे पेटविण्यासाठी वापरात येणारा तेलाचा डब्बा आणन्यास संगितले.. त्या तिघांना रावजी काय करणार आहेत याची शंका आली.. त्यांच्या पायाखालची जमीन हादरली... स्वतः च्या मुलाला ही शिक्षा रावजी देणार. हा विचार करून त्यांच्या पण अंगाचा थरकाप उडाला होता .. हूकुमा प्रमाणे सर्व कपडे आणून त्यांनी रावजी समोर टाकले.. रावजींनी स्वतः एक एक करत सर्व कपडे त्याच्या अंगा भोवती गुंडाळले... हे करताना एक बाप अक्रंदत होता.. पण त्यांच्या समोर इतर कोणताच पर्याय धनंजय ने सोडला नव्हता... डोळ्यातील अश्रुना आवरत रावजींनी, दिव्यासाठी वापरात येणारा तेलाचा डब्बा त्याच्या वर रिकामा केला.. दिव्याच्या वातीने त्याला जिवंत पणी अग्नी डाग दिला... जिवंत जळताना होणारे त्याचे हाल आणि त्याच्या डोळ्यात असलेली मूर्तिमंत भीती बघून रावजींचा राग थोडा फार शांत झाला होता..
उरलेले त्याचे कलेवर रावजींनी नोकरांना खोल जंगलात फेकून यायला सांगितले.. माणसे त्याचे राहिलेले शरीर जंगलाच्या बाजूला घेऊन गेलीत.. ते जात असताना त्यांच्या कडे बघत रावजी बराच वेळ जिन्यात उभे होते... ते दिसेनासे झाल्यावर एका बापाने अंघोळ केली आणि बिछान्यावर जड अंतःकरणाने अंग टाकले....शेवटी पित्याने आपल्याच कुकर्मी संतानाची हत्या केली होती.. रावजी च्या मनाने धनंजय नावाचा डाग घराण्याच्या नावावरून कायमचा पुसला गेला हेच गृहीत धरले होते.. या घटनेचे भविष्यात वाड्या मध्ये काय परिणाम उमटतील याची कोणालाच माहिती नव्हती..

हे सर्व घडत असताना एक उंच, कृश मुक साक्षीदार त्यांच्यावर नजर ठेऊन होता.. माणसे जंगलामध्ये गेल्यावर अंधारातून जिन्यात उभे असलेल्या रावजीं कडे लालसर असलेल्या डोळ्यांनी एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकून अंगावरचे काळे वस्त्र व्यवस्थित करत आणि माने पर्यंत आलेल्या जटांना उडवत तो त्या माणसांच्या मागे निघाला होता...

क्रमशः...

लेखक : रूद्रदमन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users