किरदुर्ग ~ एक भय मालिका भाग~ ६ समाप्त...

Submitted by रुद्रदमन on 17 September, 2024 - 07:34

किरदुर्ग ~ भाग ६

निरोप देऊन हरी निघून गेल्यानंतर यशवर्धन आणि सुधाकर ने सकाळचे नित्य कर्म उरकून घेतले.. आंघोळ झाल्यानंतर यशवर्धन नित्य नियमाप्रमाणे महादेवाच्या पिंडी समोर जाऊन बसला.. विधिवत सकाळची पूजा अर्चना केल्या नंतर, पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या लाल कापड मध्ये गुंडाळलेला दंडक त्याने कपाळाला लावला आणि अतिशय सन्मानपूर्वक बॅग मध्ये परत ठेवला...
सुधाकर ने पुढे येऊन देवांना नमस्कार केला..
थोड्याच वेळात दोघेजण मल्हार रावांच्या घराच्या दिशेने निघाले. गावावर पसरलेली शोककळा वातावरणात ठळकपणे जाणवत होती.. जे थोडे फार लोक बाहेर दिसत होते, त्यांचे चेहरे मूर्तिमंत भीतीने पछाडलेले होते...
"आज यांची या जाचातून सुटका होईल, उद्या हे चेहरे प्रसन्न झालेले दिसतील." यशवर्धन सुधाकर कडे बघत निर्धाराने म्हणाला...
सुधाकर ने विश्वासू नजरेने त्याच्याकडे बघितले...

मल्हार रावांच्या घरात पोहोचल्यावर त्यांनी यशवर्धन ला सर्व घडामोडी सांगितल्या...
यशवर्धन ने पण रात्री घडलेली सर्व घटना काकांना सांगितली...
रात्रीच्या घटनेचे हुबेहूब वर्णन केल्यानंतर...
"काका पण रात्री ध्यानात असताना मी बघितले कि घराघरात पोथी वाचन सुरू होते.. त्या पोथी वाचनातील ध्वनीं च्या प्रभावाने प्रत्येक घरावर एक रक्षा कवच निर्माण झालेले होते.. असे असून सुद्धा हे घडले कसे?" यशवर्धन शंकेच्या सुरात काकांकडे बघत बोलला..

"यशवर्धन किसनराव म्हणजे माझा सख्खा सावत्र भाऊ, लहानपणापासूनच अतिशय बिघडलेला, त्याला पैशाची प्रचंड हाव होती. गावातल्या गरीब लोकांना व्याजाने पैसे देऊन त्यांची लुबाडणूक करण्याचा त्याचा मुख्य धंदा होता. मला त्याचे हे वागणे पटत नव्हते, त्यामुळे मी त्याला नेहमी विरोधच करत आलो होतो. सुरुवातीला तो खाली मान घालून ऐकून घ्यायचा, पण जसा जसा सावकारी च्या धंद्यावर तो श्रीमंत होत गेला. तसा तसा त्याचा मला विरोध वाढला.. तो मला त्याचा शत्रू समजायला लागला... पूर्ण गावात तो एकटाच आहे जो माझ्या विरोधात आहे.. मी रात्री सर्व गावाला निरोप पाठवला होता की घराघरात पोथी वाचन सुरू करा.. पण माझ्याविषयी मनात असलेल्या रागामुळे त्याने कदाचित माझी सूचना मान्य केली नाही... त्याचे फळ म्हणून त्याचे दोन मुल गायब झालेत.." मल्हार काकांनी अगदी थोडक्या शब्दांमध्ये किसन रावांचा संपुर्ण इतिहास सांगितला...

"किसनराव कुठे राहतात?" यशवर्धन ने तातडीने विचारले.
मल्हार रावांच्या चेहऱ्यावर ताण उमटला, त्यांनी शांतपणे उत्तर दिले "किसनराव त्यांच्या शेतावर असलेल्या बंगल्यात आहेत, तुला हवे असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो."

ते तिघे किसनरावांच्या शेती कडे निघाले. गावाच्या बाहेर शेतावर असलेला किसनरावांचा टोलेजंग बंगला दूरवरून च डोळ्यात भरत होता... बंगल्यात प्रवेश करताच यशवर्धन ला घरातील ऐश्वर्याची जाणीव झाली होती. विविध महागड्या वस्तूंनी आणि मखमली फर्निचरने सजलेले घर.. पण एक विचित्र शांतता पसरलेली होती. यशवर्धन च्या नजरेत किसनरावांचे थकलेले रूप आले... अंगावर सोने चांदीचे दागिने लादलेल्या या माणसाचा मुख्य धंदा सावकारकी चा होता. गावातील गरीब शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात अडकवून त्यांची संपत्ती लुबाडून उभी केलेली ही मालमत्ता.. आता त्या सर्वांची परतफेड ही दोन्ही मुलांचा वियोग सहन करून करावी लागत होती. एवढा धिप्पाड माणूस, पण दुःखाने अचानक वयस्कर झाल्यासारखा दिसत होता.

मल्हार काका स्वतःहून पुढे झाले, त्यांनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला... अशा परिस्थितीत असताना सुद्धा मल्हाररावांना बघताच त्यांच्या कपाळ वर एक आठी उमटलीच...
ते बघून यशवर्धनला त्याही परिस्थितीत हसायला आले..
मल्हार रावांच्या नजरेतून दोन्ही गोष्टी सुटल्या नव्हत्या.. त्यांनी यशवर्धनला डोळ्याने इशारा करत पुढे बोलावले आणि किसनरावांशी त्याची ओळख करून दिली.. यशवर्धनला बघताच किसनरावांच्या त्या धूर्त चेहऱ्यावर एक आशेचा भाव चमकून गेला..
किसनरावांनी यशवर्धन कडे वळून विचारले, "तूच का तो यशवर्धन?"

"होय मला तुमच्या दोन्ही मुलांच्या बेडरूम कडे घेऊन चला," किसनरावांचा भूतकाळ विचारात घेता यशवर्धन ने त्यांना त्रोटक शब्दात उत्तर दिले.. अशा व्यक्तीबरोबर जास्त वार्तालाप करायची त्याची मनोमन इच्छा नव्हती..
किसनरावांना देखील ती गोष्ट जाणवली.. ते काहीही न बोलता जिन्याच्या दिशेने निघाले...
त्यांच्या मागोमाग यशवर्धन दोन्ही मुलांच्या बेडरूम मध्ये आला.. खोलीत लाल मातीचे ठसे दिसताच.. मांत्रिकाला 21 बळी मिळालेले आहेत ही गोष्ट त्याच्या मनात स्पष्ट झाली....

किसनराव धडधडत्या हृदयाने यशवर्धनला विनंती करू लागले, "माझ्या मुलांना शोधून आणशील का? तू मागशील तेव्हढा पैसा देईन तुला."
पैशाचे नाव ऐकताच यशवर्धन चा चेहरा कठोर झाला. पण त्याने स्वतःवर संयम ठेवत शांततेत उत्तर दिले,"पैशाचे माझ्यासाठी काही मोल नाही. मी हे काम माणुसकीच्या नात्याने करत आहे."
इथे आपल्या धन संपत्ती ला कवडीची किंमत नाही हे समजून किसनराव नरमले होते... त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ओघळणाऱ्या अश्रूनी थबथबलेल्या डोळ्यांनी ते यशवर्धन च्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत बराच वेळ उभे होते.....

यशवर्धन, सुधाकर आणि मल्हारराव परत मल्हाररावांच्या घरी आले..
"काका मी आणि सुधाकर आता थोड्याच वेळ मध्ये जंगलाकडे निघणार आहोत.. सूर्यास्ताच्या आत ते गुप्त ठिकाण शोधणे गरजेचे आहे.. जर उशीर झाला तर 21 जण आपल्याला जिवंत सापडण्याची सुतराम शक्यता नाही." सुधाकर ला उठण्याची खुण करत यशवर्धन बोलला...

"बाळा तू आमच्या गावासाठी एवढ काही करायला तयार आहेस.. तुला एकट्याला त्या मरणाच्या दारामध्ये आम्ही कसे जाऊ देऊ.. आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर येणार आहोत.. हा लढा आपल्या सर्वांचा आहे आणि तू त्याच्यामध्ये आमचा सेनापती आहेस.." काका निर्धाराने बोलले..
यशवर्धनने बराच विरोध करायचा प्रयत्न केला.. पण काका ऐकायला तयार नव्हते..
"ठीक आहे काका पण मग त्यासाठी आपल्याला काही निवडक लोकांनाच बरोबर घ्यावे लागेल." शेवटी यशवर्धन ने त्यांच्या येण्याला संमती दर्शवत म्हटले..

काकांनी लगेच हरी तर्फे गावामध्ये निरोप पाठवला.... थोड्याच वेळात हरीच्या पाठोपाठ काही लोक वाड्यात हजर झाले होते.. हे तेच लोक होते जे मांत्रिकाच्या मृत्यूच्या वेळी जंगलात उपस्थित होते. गावा वरील हे संकट दूर व्हावे म्हणून, गावकरी यशवर्धनला कोणतीही मदत करण्यासाठी तयार होते... यशवर्धन ची चिंता वाढत चालली होती.. कारण सूर्यास्ताच्या आधी त्या २१ जणांना शोधण्या बरोबरच, बरोबर असलेल्या १० जणांच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्या शिरावर आली होती...
जंगलात आवश्यकता पडेल अश्या साहित्याची एक लिस्ट यशवर्धन ने त्यांच्या कडे दिली.. सर्व साहित्य बरोबर घेऊन त्यांना एक तास मध्ये सुधाकर च्या घरी हजर होण्यास सांगितले..

सुधाकर ला घेऊन यशवर्धन त्याच्या घरी आला... सुधाकरला त्याने शेजारी ध्यानस्थ बसायला सांगितले... बॅग मधून दंडक आणि दहा धागे बाहेर काढून ते दंडक वर गुंडाळले.. बराच वेळ धागे गुंडाळलेला दंडक हातात घेऊन यशवर्धन रात्री सिद्ध केलेला मंत्र म्हणत होता... सुधाकर ला रात्री सारखाच दंडका मधून आणि धाग्या मधून विद्युत प्रवाह वाहत गेल्याचा आभास झाला होता...
यशवर्धन ने दंडक बाजूला ठेवला... ध्यानस्थ होत गुरूंना पाचारण करून पुढील मोहिम विषयी माहिती दिली...
गुरुंनी त्याला विश्वास दिला,"मी सुद्धा आता ध्यानस्थ स्थितीमध्ये बसणार आहे. तुला जेव्हा गरज पडेल तेव्हा तू मला आवाज दे. मी तुझ्या मदतीला असणार आहे."
गुरूंच्या त्या शब्दांनी यशवर्धन च्या चेहऱ्यावर एक विश्वासाचे स्मित उमटले. त्याच्या मनात आता कोणताही संदेह नव्हता की त्याची लढाई विजयश्री ने संपेल.
अनुष्ठान संपल्यानंतर यशवर्धन ने एक ग्लास थंड दूध घेतले.. तो पर्यंत मल्हारराव त्या उर्वरित नऊ जणांना घेऊन तिथे हजर झाले होते.. यशवर्धनने मंतरलेले धागे दंडका वरून सोडले आणि दहा ही जणांच्या हातावर बांधले... कोणत्याही परिस्थितीत हातावरील धागा तुटू न देण्याची सूचना केली...
सुधाकर ने तो पर्यंत यशवर्धन च्या सुचने नुसार अनुष्ठान मध्ये वापरलेले पाणी आणि अग्निकुंड मधील राख बॅग मध्ये भरून ठेवली. ..

पुढच्या काही क्षणातच यशवर्धन सर्वांना घेऊन जंगलाच्या दिशेने निघाला होता. सुधाकर च्या माहितीप्रमाणे ती जागा गावापासून खूप दूर दाट जंगलात होती. जंगलातील वातावरण अधिक भयाण होत चालले होते. यशवर्धन आणि गावकरी जंगलाच्या खोलात शिरत होते.. त्या भयप्रद वातावरणात प्रत्येक पावलाला थरकाप उडत होता. दाट झाडांच्या पलीकडून येणारे आवाज, झाडांच्या सळसळी चा विचित्र सूर आणि पाया खालच्या मातीचा चिकट स्पर्श सगळ्यांच्या मनाला धक्का देत होता.. वातावरणात वाढत चाललेली भीती जाणवत होती आणि सगळेजण काळजीपूर्वक पावले टाकत होते.. बराच वेळ ते जंगलामध्ये चालत होते... इतके शोधूनही त्या जागेचा काही सुगावा लागत नव्हता.. दुपारी चार वाजत आले होते.. सूर्यास्ताला फक्त तीन तास बाकी होते.. ..
यशवर्धन ची चिंता वाढायला लागली होती.. त्याला एक क्षण वाटले की आपण चुकीच्या दिशेने तर शोधत नाही आहोत ना...
तेवढ्यात त्याच्या अंतरात्म्यात आवाज गुंजला,"नाही यशवर्धन तू बरोबर मार्गावर आहेस, तुझ्या माध्यमातून मला जवळच त्याची उपस्थिती जाणवते आहे.. चालत रहा, तुम्ही त्याचा खूप जवळ आलेले आहात," गुरूंचा आवाज होता तो.. गुरु सदैव आपल्या बरोबर आहेत, हा विचार करून यशवर्धन निश्चिंत झाला..
आजूबाजूला काळजीपूर्वक बघत, "सामान्य जर असते तर हे जंगल किती मोहक वाटले असते" यशवर्धन सुधाकर कडे बघून बोलला.. सुधाकर ने आजूबाजूला बघत होकारार्थी मान हलवली...

अचानक समोरच्या एका घनदाट झाडी असलेल्या कोपऱ्यातून कोणीतरी अस्पष्ट शब्दात काहीतरी पुटपुटत असल्याचा आवाज यशवर्धन च्या कानावर आला.. तो थांबला त्याच्या पाठीवर घामाचे थेंब जमा झाले. "सावध राहा," त्याने इतरांना सूचना दिली. सर्वजण सज्ज झाले. त्याच्या गुरूंची ताकद त्याच्या सोबत असल्याने त्याचे मन दृढ होते, पण परिस्थिती अनिश्चित आणि भयाण होती...

"यशवर्धन ती बघ तिच जागा असावी, असे माझे मन मला सांगते आहे" दूरवर त्याच दाट झाडी कडे बोट करत सुधाकर ने यशवर्धन ला सांगितले...
मल्हारराव आणि बाकीचे सर्व देखील त्या रात्री मांत्रिकाच्या मृत्यूचे साक्षीदार होते. त्यांनी त्या दिशेला बघितले आणि त्यांना ही जागेची ओळख पटली.. त्यांनी पण होकारार्थी मान हलवली...

खात्री होताच यशवर्धनने त्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले... जसे ते दाट झाडीच्या जवळ जात होते.. त्यांना काही विचित्र चिन्हे दिसू लागली होती... रक्ताने माखलेले खडे, फुटलेल्या बांगड्यांच्या काचा , तुटलेल्या झाडांच्या फांद्या, जमीन ठिक ठिकाणी खोदून बघितल्याचे चिन्ह....
जेव्हा यशवर्धन दाट झाडीच्या अगदी जवळ पोहोचला.. त्याच्या हृदयावर एक विशिष्ट प्रकारचे दडपण त्याला जाणवायला लागले होते.. यशवर्धन ची खात्री पटली की ही जागा साधी नाही. सर्व अघोरी प्रकार याच जागेच्या आस पास घडले होते..

अचानक, समोरील झाडीत एक प्रचंड सळसळ माजली आणि खर्जातील आवाजातले हसणे सर्वांच्या कानावर पडले.. त्या मागोमाग "माझ्या परम पिता शैताणाच्या राज्यात तुमचे सर्वांचे स्वागत आहे.. आज मी माझ्या शैतानाला एकवीस ऐवजी तेहतीस बळी चढवणार,"त्या दाट झाडी मधून भेसूर आवाज सर्वत्र पसरला...
तो आवाज आल्या बरोबर झाडांवर असलेले पक्षी किलबिलाट करत उडून गेले, पानांची सळसळ पूर्णतः थांबली, जंगलात एक जीवघेणी शांतता पसरली... यशवर्धन बरोबर आलेल्या सर्वांची आवाजातील दहशतीने दातखिळी बसली होती... यशवर्धन ने सर्वांकडे आश्वासनात्मक नजर टाकली आणि डोळे बंद करून, "आता खरी लढाई सुरू होते आहे, इथेच कुठेतरी त्याने 21 जणांना लपवून ठेवले आहे.. नक्कीच या दाट झाडीमध्ये कुठेतरी अशी गुप्त जागा आहे. मी आत जाण्यास सिद्ध आहे तुमची अनुमती असावी." यशवर्धन ने मनोमन गुरूंना अनुमती मागितली...

"यशवर्धन काळजी करू नकोस.. तू तुझ्या विजयाच्या अगदी निकट आहेस. जा आणि नष्ट कर हे शैतानाचे राज्य, कोणतीही काळजी करू नको.. साक्षात त्रिकालदर्शी महाकाल तुझा पाठीराखा आहे.." गुरुंनी यशवर्धन ला चढाई करण्यास परवानगी दिली...

यशवर्धन ने मागे वळून मल्हाररावा कडे बघितले आणि बरोबर आणलेल्या कुऱ्हाडीची मागणी केली. कुऱ्हाड हातात घेऊन तो पुढे सरसावला होता.. यशवर्धनला कळले होते हा पूर्ण भाग त्या मांत्रिकाच्या छत्राखाली आहे..
तो काळजीपूर्वक एक एक पाऊल टाकत त्या झाडी जवळ गेला... तिथे काय आहे हे शोधण्यासाठी तिथे जागा करणे गरजेचे होते.. त्याने एका झाडाच्या बुंध्यावर कुऱ्हाड चालवली.. त्याचवेळी एका फांदीचा जोरदार वार त्याच्या दिशेने आला, पण यशवर्धन ने तो मोठ्या शिताफीने चुकवला..

तो थोडासा मागे सरकला.. समोरच्या झाडाच्या फांद्या एखाद्या तलवारी प्रमाणे चालत होत्या... सप सप आवाज येत होता... यशवर्धनला समजले होते. इथे फक्त शैताणाचे राज्यच नाही, तर इथल्या कणाकणा मध्ये मांत्रिकाचे पिशाच्च वसलेले आहे..
मनाशी काहीतरी पक्के ठरवून..
त्याने बॅग उघडली... दंडक बाहेर काढून कमरेला खोचला.. त्या मागून रात्रीच्या होमा मधील राखे ची पुरचुंडी बाहेर काढली.. त्यातील राख हातात घेऊन, सिद्ध केलेला मंत्र जोरात म्हटला आणि मंत्रसिद्ध झालेला अंगारा त्या झाडीच्या दिशेने फेकला..
अंगारा झाडीवर पडताच, झाडा मधून एक भयानक चित्कार बाहेर पडला... दुसऱ्या क्षणाला त्या हिरव्यागार झाडीचे राखेत रूपांतर झाले.. काहीतरी खूप वेगाने खालच्या दिशेने सरकल्या सारखे जाणवले.. त्यावेळी एक वजनदार दगड आदळल्याचा आवाज आला... तिथे एक खूप मोठा खड्डा पडला होता...
यशवर्धन पुढे होत खड्ड्यात डोकावला. महादेवाचे चे नाव घेऊन खड्ड्यात उतरला... तळाशी असलेली माती बाजूला केली.. खड्ड्याच्या तळाला एक जाड चौकोनी शिळा होती..
खड्ड्यातून वर येत यशवर्धन बोलला, "हीच ती जागा, खाली नक्कीच भुयार असणार आहे.. भुयार चा दरवाजा एका भक्कम दगडी शिळे ने बंद आहे.. आवरा पटकन आपल्याला आता घाई करायला हवी.. चला सगळे मिळून ती शिळा बाजूला करू."
त्याचबरोबर सर्व गावकरी पुढे सरसावले.. बरोबर आणलेल्या काठ्या आणि पहार च्या साह्याने सर्वांनी मिळून ती शिळा मोठ्या कष्टाने बाजूला केली...
शिळा बाजूला होताच, त्या खाली एक भुयार नजरेस पडले.. नजरेसमोर उभा तो गुप्त मार्ग अंगावर काटा आणणारा होता. जणू काही या ठिकाणी काळ घाला घालण्यासाठी दबा धरून बसलेला होता.
भुयारात जाणारा रस्ता दगडी पायऱ्यांनी बांधलेला होता..... त्या मधून येणारा दमट वारा सर्वांच्या मनात कापरे भरवत होता... सूर्याचा प्रकाश जास्त खोलवर पोहोचू शकत नव्हता.. एक ठराविक अंतराच्या पुढे सर्वत्र अंधारलेले दिसत होते.. सुधाकर ने बरोबर आणलेले पलीते पेटवायला सांगितले..
त्याने मल्हाररावांना परत गावात जाण्याची सूचना केली.. कारण मल्हारराव वयोवृद्ध होते आणि भुयारमध्ये नक्की कसला सामना करावा लागणार आहे हे स्वतः यशवर्धनला सुद्धा माहित नव्हते... मोठ्या कष्टाने मल्हार रावांना त्याने परत जाण्यास भाग पाडले... गावामध्ये घराघरात पोथी वाचन सुरू ठेवण्यास बजावले.
मल्हार राव निघून गेल्यानंतर...
एक पलीता यशवर्धन ने घेतला आणि मंत्र पुटपुटत तो एक एक पायरी उतरू लागला.. पायऱ्यांवर बऱ्याच प्रमाणात हाडांचे तुकडे पडलेले होते.. एखादे हाड पायाच्या स्पर्शाने भिंतीवर लागून होणारा एवढासा आवाज पण समोरील अंधारातून परतून येत होता.. पलीत्या च्या प्रकाशात दोन्ही बाजूंच्या दगडी भिंतीवर रेखाटलेल्या राक्षसी आकृत्या वातावरण अजूनच भय मिश्रित करत होत्या... यशवर्धन ने मागे बघून सर्वांना एकत्र राहण्याची सूचना केली.. बांधलेले धागे व्यवस्थित आहेत की नाही हे तपासायला सांगितले... खात्री पटल्यावर तो पुन्हा पुढे निघाला... हळूहळू वातावरण जास्त दमट होऊ लागले आणि हवा धुळीने भरली गेली...
पलीत्याचा प्रकाश त्यांच्या स्वतः च्याच सावल्याना भयानक आकार देता होता.. त्या बघून गावकरी दचकत होते.. पुढे काय भेसूर बघायला मिळेल, याची कल्पनाही त्यांना करवत नव्हती. पण त्या एकवीस जणांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना यशवर्धन च्या मागे जाणे गरजेचे होते....
पायऱ्यांची संख्या वाढतच होती. भूयार आता अरुंद होऊ लागले होते. कधीकधी त्यांच्या डोक्याला फटका बसत होता.. छताच्या दगड मधून पाझरणारे पाणी त्यांच्या अंगावर पडत होते... आता खालच्या बाजूला लाल रंगाचा चिख्खल दिसत होता... तो लाल रंग नक्की मातीचा की रक्ताचा हे कळणे देखील अवघड होते....
अचानक, समोरून एक भयंकर आवाज त्यांच्या दिशेने आला... त्या आवाजाच्या ध्वनी लहरींनी यशवर्धन च्या डोक्यावरचे केस अक्षरशः हवेत उडाले... वजनदार पाऊल टाकत त्यांच्या दिशेने काही तरी पळत येत होते... यशवर्धन ने वेगाने हालचाल करत कमरेला खोचलेला दंडक हातात घेतला... त्या क्षणी एक मदमस्त लाल चमकणारे डोळे असलेला राक्षसी रेडा अंधारातून यशवर्धन च्या अंगावर आला...
यशवर्धन ने मंत्राचा मोठ्याने उच्चार करत दंडक रेड्याच्या कपाळावर मारला... एका क्षणात बेसूर डरकाळी फोडत त्या रेड्या ची काळी वाफ झाली... ती वाफ वेगाने मागच्या अंधार मध्ये गायब झाली...

ही सर्व घटना बरोबरचे गावकरी उघड्या डोळ्याने बघत होते... बघून त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला होता. त्यांच्या कपाळावर घाम येऊ लागला होता... आता पलीत्याची ज्योत थोडीशी मंद पडली होती. त्यांना वाटत होते की आता त्यांचा शेवट जवळ आला आहे...
यशवर्धन ने त्यांना धीर दिला आणि त्याने पुढे चालण्यास सुरुवात केली..
शेवटची पायरी उतरून त्यांनी एका मोकळ्या जागेत प्रवेश केला.. अंधारात पुढे जात असताना यश आणि गावकऱ्यांनी जेव्हा मंद प्रकाशात पुढे पाहिले.. तेव्हा त्यांचे पाय जागेवर थबकले...
समोर एक विशाल गुहा होती. गुहेचे छत इतके उंच होते की पलीत्याच्या प्रकाशात त्याचा शेवट दिसत नव्हता... गुहेच्या भोवती च्या भिंतींवर चमकदार सफेद रंगात नक्षीकाम केलेले होते.. हवेत ओलावा होता.. गुहा कुजलेल्या मांसाच्या वासा ने भरलेली होती.. वास असह्य होऊन बऱ्याच गावकऱ्यांना ओकऱ्या यायला लागल्या... त्याच बरोबर एक जोरदार हास्य त्या गुहेत निनादले, "कालची जागा तुझी होती, आजची माझी आहे, इथे कणाकणात मी आहे, आज पर्यंत इथे आलेला कोणताही सजीव जिवंत बाहेर गेलेला नाही. एक जण खाली उतरायच्या आताच मला घाबरून पळून गेला वाटतं.. ठीक आहे बत्तीस तर बत्तीस बळी माझ्या पित्यासाठी," त्या मागोमाग प्रचंड हास्याचा आवाज गुहेच्या भिंतीवर आदळलायला लागला होता... यशवर्धन सोडून सर्वांनी कान घट्ट झाकून घेतले होते..
यशवर्धनने त्यांना धीर देत पुढे चालण्याची खूण केली. पुढे जात असताना त्यांना वाहत्या पाण्याचा आवाज यायला लागला.. यशवर्धन ने बाकीच्यांना जागेवर थांबायला सांगून स्वतः पुढे येऊन बागितले.. तिथे एक छोटा झरा वाहत होता.. यशवर्धन ने खाली बसत पाण्यात हात घालून पाणी ओंजळीत घेतले... ते पूर्ण काळे आणि चिकट होते... ते झटकुन हात पँट ला पुसत, पाणी कुठून येते आहे बघत तो त्याच्या उगमाच्या दिशेने निघाला...
पुढे पुढे जाताना त्याला एक विचित्र आवाज येत होता रडण्याचा विव्हळण्याचा आवाज..
अचानक त्याला एक विशाल दरवाजा दिसला. दरवाज्यावर विचित्र चिन्हे रंगवलेली होती.. त्यावर साचलेल्या धुळीने ती अस्पष्ट झालेली होती... यशने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा हालला सुद्धा नाही..
विव्हाळण्याचे आवाज त्या दरवाजाच्या आतून येत होते... त्याला खात्री पटली की ते सर्वजण त्या दरवाज्याच्या मागेच आहेत..
त्याने मागे वळून सर्व गावकऱ्यांना हाक मारली... सर्व जण धावतच त्याच्या जवळ पोहोचले... त्या भक्कम दगडी दरवाजा ला बघून आणि आतून येणारे विव्हळण्याचे आवाज ऐकून सर्वांचे हृदय विलक्षण वेगाने धडधडत होते.. आता हा खोलायचा कसा हा प्रश्न सर्वांच्या मनामधे एकदम डोकावला... परत एकदा सर्वांनी मिळून ताकद लावून बघितली.. पण दरवाजा हलत देखील नव्हता.. यशवर्धन दरवाजा जवळ जाऊन निरखून काही कळ आहे का शोधू लागला.. पण त्यावर नक्षी खेरीज काही ही नव्हते... त्याने घड्याळात बघितले सहा वाजत आले होते... ते सर्व एकवीस जन एका दरवाजाच्या अंतरावर होते... जीवन मरणाच्या दाढे मध्ये लटकलेले...
यशवर्धन विचार मग्न झाला होता..
त्याने तिथेच ध्यान लावले.. गुरूंना पाचारण केले..
"यशवर्धन दरवाजा खोलण्याचे तंत्र तुझ्या अगदी डोळ्या समोर आहे.. दरवाजा ला निरखून बघ.. म्हणजे तुझे तुलाच कळेल.. नाहीच समजले तर मी नक्की सांगेन.. पण या अश्या गोष्टी तुला स्वतःला जमायला हव्यात.. पुढे मी असेन च असे नाही." गुरूंचा करडा आवाज आला..
यशवर्धन ने ताडकन डोळे उघडले आणि दरवाज्याजवळ जाऊन त्यावरील नक्षीकाम बघू लागला.. हाताने व्यवस्थित पुसून साफ केल्यावर, त्याला दिसले त्यातील एका नक्षी मध्ये एक पात्र रंगवलेले होते.. त्या पात्रा मध्ये काळया रंगाचे द्रव्य भरलेले होते... दुसऱ्या एका नक्षी मध्ये दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दगडी पणत्या भिंती मधून बाहेर आलेल्या दिसत होत्या. त्याची नजर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला गेली.. तिथे दोन दगडी पणत्या होत्या.. त्याने शेवटचे नक्षीकाम पुसले.. त्या मध्ये त्या पात्रातील पाणी त्या पणत्या मध्ये ओततांना दाखविले होते...
त्याला सर्व समजले... त्याने गुरूंचे मनोमन आभार मानले आणि बाकीच्यांकडे वळला...
जवळपास पात्र नव्हते म्हणून सर्वांनी हाताच्या ओंजळीने त्या घरामधून काळे पाणी भरून आणले आणि एक एकाने त्या पणत्या मध्ये ओतले... ते पाणी पणती च्या तळाशी असलेल्या छिद्रा मधून भिंती मध्ये जात होते... दोन खेपा झाल्या नंतर दोन्ही पणत्या भरल्या.. आणि भिंती मधून खटका पडल्याचा आवाज आला... थोडावेळ वाट बघून यशवर्धन ने दरवाजा ढकलन्याचा प्रयत्न केला.. दरवाजा अगदी कापसाच्या पुंजक्या सारखा अलगद एका बाजूच्या भिंती मध्ये सरकला... समोर काळाकुट्ट अंधार होता....

"थांब,आत मध्ये पाऊल टाकू नकोस.. अजूनही तुला संधी देतो.. बरोबरच्या सर्वाँना घेऊन चालता हो.. आजची साधना पूर्ण झाल्यावर मी पण हे गाव सोडून निघून जाईन.. पण जर तुम्ही आत पाऊल टाकले तर मी तुम्हाला जिवंत तर सोडणार च नाही, पण तुमच्या आत्मा सुद्धा कित्येक युगे पिशाच्च योनीत सडत राहतील.." परत एकदा भयानक चित्कार समोरच्या बाजूने सर्वांवर आदळला...
बाकी सर्वजण परत एकदा भीतीने शहारले असले तरी त्या आवाजाला यशवर्धन ने कसपटा प्रमाणे उडवून लावले..
त्याच्या पेक्षा मोठ्या आवाजात तो गरजला," पलीत्यांवर तेल टाका आणि चला शेवटच्या संग्रामाला..."
सुधाकर ने घाई घाईने सर्व पालीते पुन्हा प्रज्वलित केले... त्यातला एक पालीता यशवर्धन ने घेऊन समोरच्या खोलीत फेकला.. खोली त्या प्रकाशने बऱ्या पैकी प्रकाशित झाली...
खोली कसली तो एक दरबार च होता.. दोन्ही बाजूने सहा दगडी खांब होते... त्यावर नक्षीकाम केलेले दिसत होते... मध्यभागी जाड शिळांचा एक मंडप होता... तिथपर्यंत जास्त दिसत नव्हते... यशवर्धन ने अजून एक पलिता घेऊन वेगाने त्या दिशेने फेकला.. तो नेमका त्या मंडपाच्या मध्यभागी असलेल्या होमकुंड मध्ये पडला आणि एकच भडका उडाला.. त्या उजेडात सर्व खोली प्रकाशमान झाली.. त्या मंडपाच्या आजूबाजूला २१ आकृत्या पसरलेल्या होत्या.. ते गावातून गायब झालेले लोक होते.. संपूर्ण खोलीत एक काळे सावट पसरलेले होते...
यशवर्धन ने दंडक हाता मध्ये घेतला आणि
"जय श्री महाकाल." अशी जोरदार गर्जना केली आणि दरवाजाचा उंबरा ओलांडत खोली मध्ये पाऊल टाकले...... त्या एका गर्जनेने खोली वर असलेले काळे सावट दूर होण्यास सुरुवात झाली...जसा जसा गर्जना करत यशवर्धन पुढे जात होता.. तस तसे सावट मागे हटत होते... खोली अजूनच प्रकाश मान दिसत होती...
बाकी सर्व जण त्याच्या मागे चालत होते...
ते सर्व त्या मंडपा शेजारी पोहोचले.. तिथे पसरलेल्या एकवीस आकृत्या अगदी स्पष्ट दिसत होत्या...ते सर्व जण सुकलेले होते, निश्चल अवस्थेत होते, जणू त्यांच्या शरीरातुन बऱ्याच प्रमाणत रक्त कोणीतरी काढून घेतले होते...

"सुधाकर सर्वांच्या कपाळाला आणलेला अंगारा लाव आणि आणलेले पाणी पाज.. लवकरात लवकर.. घाबरु नका जो पर्यंत धागा तुमच्या हाताला आहे तो पर्यंत हाच काय याचा सैतान सुद्धा तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. लागा कामाला." यशवर्धन सुधाकर कडे बघत गरजला...
सुधाकर आणि बाकी चे सर्व लगेच सांगितलेल्या कामात गढून गेले...

अचानक समोर खोलीच्या दुसऱ्या टोकाला अग्निकुंड पेटला.. त्या अग्नी कुंडा भोवती एक काळे धुके गोल फिरत होते... अग्निकुंडा च्या लालसर प्रकाशा मध्ये भिंतीला खेटून असलेली एक भव्य मूर्ती यशवर्धन ला दिसली... लालसर चमकणारे डोळे, तोंडातून बाहेर आलेले सुळे आणि चेहेर्यावर असणारे उग्र भाव... ती शैताना ची मूर्ती होती...

"परम पित्या मला शक्ती दे.. मला शक्ती दे.. आज मी तुला बत्तीस बळी देणार आहे मला शक्ती दे."अचानक समोरून एक भयानक आवाज घुमला...
त्याच बरोबर मूर्तीचे डोळे चमकले.. त्यातून निघणारी लाल ऊर्जा त्या काळया धुक्यात शोषली जाऊ लागली.. अग्नी कुंड अजूनच धग धगु लागले... त्याच्या तांबड्या प्रकाशात ते काळे धुके अग्निकुंड भोवती फेर धरू लागले आणि थोड्याच वेळात त्या धुक्यातून मांत्रिका चा पिशाच्च अवतार प्रकट झाला... त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर, विकृत हास्य होते.
“ही माझी जागा आहे. तुम्ही सर्व आता माझ्या अधीन आहात, तुम्ही इथून कधीच जाऊ शकणार नाही,” तो म्हणाला.

यशवर्धन ने आजूबाजूला बघितले, त्याने सोपविलेले काम वेगात सुरू होते ... त्याला आता घाई करणे गरजेचे होते.. तो विलक्षण वेगाने जाऊन त्या सभामंडपात जवळील होमकुंड जवळ जाऊन बसला ... बॅग मधून सर्व साहित्य बाहेर काढले आणि अनुष्ठाना ची तयारी करायला लागला...

इकडे शैतानाची ताकद मिळाल्याने ते मांत्रिक पिशाच्च प्रचंड शक्तिशाली झाले होते... ते एका अंधकारमय ताकदीने यशवर्धन आणि गावकऱ्यां वर वार करू लागले होते... काळे धुके आणि मांत्रिकाच्या भासमय प्रतिमा अचानक जागोजागी त्यांच्या भोवती उभ्या राहू लागल्या होत्या... हातात बांधलेल्या धाग्यामुळे ते गावकऱ्यांना स्पर्श करू शकत नव्हते... पण आपल्या शक्तीने गावकऱ्यांच्या अंगात भिती पेरत होते... त्यातील काही जण त्याचा भयंकर अवतार बघुन इकडे तिकडे पळू लागले, तर काहीजण जागच्याजागी थरथरू लागले होते...
सुधाकर मात्र मरणाला न घाबरता अंगारा लावायचे काम करत होता.. आता फक्त तीन जण बाकी होते... किशोर आणि किसनरावांची दोन मुले... तो वेगाने अंगारा घेऊन किशोर कडे निघाला .. तेव्हढ्यात त्या पिशाच्चाने किशोर वर झडप घातली... किशोर त्याच्या आड झाकला गेला... एक जोरदार कर्णभेदी किंचाळी त्या खोलीत घुमली... ती किशोर ची होती... सुधाकर ने कोणताही विचार न करता हातातील सर्व अंगारा किशोर च्या दिशेने फेकला... अंगारा अंगावर पडल्यावर ते पिशाच्च जनावरासारखे किंचाळले आणि वेगाने किशोर वरून बाजूला होत मूर्तीच्या दिशेने निघून गेले...
इकडे यशवर्धन ची अनुष्ठानाची तयारी पूर्ण झाली होती.. वेगात त्याने होमा त आहुती टाकली आणि उच्च स्वरात मंत्र म्हणण्यास सुरुवात केली.. त्याच्या मंत्रांचा प्रभाव खुद्द सैतानाला हादरवून गेला... सैताना ला कळून चुकले याला जर संपवले नाही तर आपण परत एकदा पृथ्वीच्या खोल गर्भात गाडले जाऊ...
त्याने पिशाच्च ला आदेश सोडला,"उठ माझ्या मुला,मी तुला अगोदर पेक्षा जास्त शक्ती देणार आहे. त्यासाठी तुझ्या शरीरात ताकद असणे गरजेचे आहे.. जा त्या दोन जणांना अजून विभूती लावली नाही आहे, घे त्यांचा बळी आणि कर त्यांचे रक्त प्राशन."
हे ऐकताच ते काळे धुके पूर्ण ताकदीने एकत्र झाले आणि त्याने किसनरावांच्या एका मुलाकडे झेप घेतली...

किशोर ला पाणी पाजत असलेला सुधाकर त्याच्या दिशेने धावला पण त्याच्या हातातील अंगारा संपलेला होता... बघता बघता किसन रावांचा मुलगा वर उचलला गेला... सुधाकर च्या नजरे समोर गुटगुटीत दिसणाऱ्या मुलाचे रक्त संपलेले शरीर हवेतून अलगद खाली पडले...
मांत्रिकाच्या पिशाचा ने आता किसनरावांच्या दुसऱ्या मुला कडे झेप घेतली... तेव्हढ्यात होमातील आहुतीचा जोरदार आवाज झाला. त्या बरोबरच यशवर्धन चा उच्च स्वरातील ध्वनी त्या पिशाच्च वर आदळला. ते गोंधळले... त्याला गोंधळलेले बघून सुधाकर ने दोघा गावकऱ्यांच्या मदतीने किसन रावांच्या दुसऱ्या मुलाला ओढत मंडपा मध्ये आणले...
यशवर्धन चे मंत्र वेगात सुरू होते...
दुसरी कडे सैतान त्याच्यातील ऊर्जा त्या पिशाच्च कडे पाठवत होता... तिथे असलेल्या सर्वांना पिशाच्च च्या शरीरात शोषली जाणारी ती लाल रेघ दिसत होती... हळू हळू त्याचा आकार वाढत चालला होता...

ध्यानमग्न स्थितीत असलेल्या गुरूंना आंतरिक ज्ञानाने ही गोष्ट जाणवली... खुद्द सैतान जर त्याच्या मदतीला आला आहे तर आपल्याला सुद्धा यशवर्धन ला अजून शक्तीशाली बनवावे लागेल.. त्यांनी आपली ऊर्जा यशवर्धन कडे हस्तांतरित केली... एक तेजस्वी प्रकाश यशवर्धन च्या भोवती पसरला.. प्रकाश इतका होता की पूर्ण खोली पौर्णिमेचा चंद्र अवतरल्या सारखे चमकायला लागली...
यशवर्धन दंडक घेऊन उभा राहिला... त्याने दंडक पिशाच्या च्या दिशेने केला आणि एक वेगवान मंत्र गरजला..... दंडका मधून एक शीतल अशी पांढरी शुभ्र ऊर्जा त्याच्यावर जाऊन आदळली. मंत्रिका चे पिशाच त्या झटक्याने मागच्या भिंतीवर जाऊन आदळले...
शैतांना कडून ऊर्जेचा प्रवाह अव्याहत सुरू होता.. त्या ताकदीने ते पुन्हा उठले आणि त्याने विचित्र आवाजात डरकाळी फोडली...
“तू मला हरवू शकत नाहीस, माझ्या पित्याची संपूर्ण शक्ती माझ्या बरोबर आहे!” मांत्रिकाने चिरकल्या सारखे ओरडत यशवर्धन वर पुन्हा हल्ला केला.. पण दंडक मधून निघणाऱ्या ऊर्जेने त्याला सभामंडप च्या बाहेरच रोखून धरले होते...
“तुझी शक्ती आता संपली आहे. तुझे कृत्य संपवण्याची वेळ आली आहे. अजूनही मी तुला एक संधी देतो.. पापांची कबुली दे मी तुझ्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती कडे पाठवून देईल.” यशवर्धन च्या आवाजा मध्ये दैवी शक्ती प्रतीत होत होती..
पण एकदा वाम मार्गाला गेलेली व्यक्ती कधीही माघारी येऊ शकत नाही. त्याला यायचे जरी असेल तरी त्याच्यात सामावलेला आसुरी अंश त्याला तसे करू देत नाही...
तसेच मांत्रिकाच्या पिशाच्याचे झाले... त्याला पुन्हा सैतानाने ताकद पुरवली.. सैताना कडून त्याच्या शरीरात येणारी ऊर्जा प्रचंड प्रकाशित झाली होती... ती ऊर्जेची धार तशीच अव्याहत सुरू होती... पिशाच्चाने त्या ऊर्जेने प्रेरित होऊन परत हल्ला चढवला.. यावेळी हल्ला भयानक ताकद वान होता.. तो थेट यशवर्धन च्या हातभर अंतरा पर्यंत पोहोचला...
यशवर्धन त्याच्या कडे बघून हलकेच हसला.. त्याने सिद्ध केलेला मंत्र म्हणत दंडक त्या पिशाच्चा च्या छातीवर टेकवला...
पिशाच्चा ने आसमंत भेदणारी किंकाळी फोडली... त्याच्या आक्रोशा ने पूर्ण गुहा थरथरली.. त्याच्या शरीरातील रक्ता सारख्या रंगाच्या ऊर्जेचे रूपांतर शीतल अश्या पांढऱ्या शुभ्र रंगात व्हायला लागले... शैतानाकडून येणारी ऊर्जेची धार तशीच होती... दंडकाच्या प्रभावाने तिचे रूपांतर पांढऱ्या रंगात होत होत एक पांढऱ्या रंगाची धार थेट मूर्ती पर्यंत गेली... एक मोठा बॉम्ब फुटल्या सारखा आवाज झाला... सगळ्यांच्या कानठळ्या बसल्या... डोळे बंद झाले... डोळे उगडले तेव्हा पूर्ण खोली धुलीकणांनी व्यापलेली होती.. ते सर्व धूलीकण हळू हळू जमिनी वर स्थिरावल्यानंतर सगळ्यांनी समोर बघितले.. ती खोली पूर्ण रिकामी होती... मूर्ती आणि पिशाच्चा चा मागमूस ही शिल्लक नव्हता... त्याच क्षणी, त्या २१ जणांच्या शरीरात हळूहळू हालचाल होऊ लागली. त्यांचे श्वास पुर्वरत व्हायला लागले आणि हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास कमी होत गेला. मांत्रिकाच्या प्रभावातून ते मुक्त झाले होते...

भयानक लढाईनंतर यशवर्धन ने स्वतःच्या अध्यात्मिक शक्तीवर आणि गुरूंच्या आशीर्वादाने पिशाच्चा सह शैतानाला ही पराभूत केले होते. त्या खोलीत असलेली शैताणाची मूर्ती आणि पिशाच्च दोघे नेस्तनाबूत झाल्यावर खोलीचे वातावरण एकदम बदलायला लागले...
"सुधाकर आता थोडाच वेळ, या जागेवर ना जाणे किती जणांचे बळी दिले गेले असतील.. त्या सर्वांच्या आत्मा इथेच एखाद्या कोपऱ्यात अडकलेल्या असतील.. त्यांना मुक्त करण्यासाठी मला एक विधी करायचा आहे.. तो पर्यंत गावकऱ्यांना सांगून या सर्वांना बाहेर घेऊन जा.." यशवर्धन ने सुधाकर ला सूचना केली..
विधी ला सुरुवात झाल्यावर, सुधाकर ने दिलेली कामगिरी व्यवस्थित बजावली... शेवटचे दोन जण पाठविल्या नंतर त्याने संपूर्ण खोली मध्ये एक चक्कर टाकली.... परत येऊन विमनस्क परिस्थीती मध्ये विधी संपण्याची वाट बघत बसला... विधी समाप्त झाल्यानंतर यशवर्धन ने प्रसन्न मुद्रेने सुधाकर कडे बघितले... त्याचा चेहरा पाहून यशवर्धन च्या मनात पाल चूकचुकली. त्याने विचारले, "काय झाले सुधाकर, सर्व काही व्यवस्थित पार पाडून सुद्धा तुझा चेहरा असा उतरला का आहे?"
सुधाकर ने यशवर्धन चा हात पकडला.. त्याला जवळ जवळ ओढतच तो शैतानाच्या मूर्ती समोरील अग्नि कुंडा जवळ घेऊन गेला.. तिथे कोपऱ्या कडे बोट केले...
यशवर्धन ने बोट दाखवल्या दिशेने बघितले..
समोरचे चित्र बघून त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा एक दुःखद छाया पसरली...
तिथे तीन छोटे सांगाडे पडलेले होते... हातातील शिल्लक बांगड्यांवरून ते गावातून गायब झालेल्या त्या तीन मुलींचेच आहेत याची खात्री पटली...
यशवर्धनने सुधाकरला बॅग आणण्यास सांगितले.. बॅग आणल्यानंतर यशवर्धन ने महत्त्वाच्या वस्तू ठेवून बाकी पूर्ण बॅग रिकामी केली आणि ते तिन्ही सांगाडे बॅगमध्ये भरून घेतले...
"त्यादिवशी जर आम्ही वेळेत आलो नसतो, तर माझ्या नेहाचा सुद्धा सांगाडा इथे असाच पडलेला असता..." सांगाडे बॅग मध्ये भरतांना सुधाकर आश्रू पुसत बोलत होता....
यशवर्धन ने त्याला धीर देण्यासाठी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि निघण्याची खूण केली...

त्या खोलीतून बाहेर निघताना त्यांना आजूबाजूला झालेला बदल जाणवला.. सर्वत्र पसरलेली काळोखी आणि भयानक ऊर्जा नष्ट झाली होती. एकेकाळी जिथे वासाने भरलेली, दमट हवा होती, तिथे आता शुद्ध आणि स्वच्छ वारे वाहू लागले होते. गुहे मधून वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज आता एक मधुर संगीत सारखा वाटू लागला होता. मघाशी काळे आणि चिकट असलेले पाणी आता निर्मळ आणि स्वच्छ झाले होते.. जणू काही त्यातून आध्यात्मिक शक्ती प्रवाहित होत होती..

गुहेच्या भिंतींवर रेखाटलेली शापित चिन्हे नष्ट होऊन गेली होती आणि भयानक आकृत्या काजळी होऊन खाली पडल्या होत्या.. सर्वत्र मंद शितल प्रकाश झळकू लागला होता..

तिथे असलेले मृतात्मे मोक्ष प्राप्तीच्या दिशेने निघून गेले होते... त्यांच्या किंकाळ्या आणि यातना थांबल्या होत्या आणि त्या जागेवर एक दैवी शांतता पसरली होती..

यशवर्धन ने गुहेतून बाहेर पडताना मागे पाहिले, तेव्हा त्याला एक शांत, निर्मल वातावरण जाणवले. जणू काही त्या जागेवरून शाप आणि वाईट शक्ती कायमची नष्ट झाली होती.
यशवर्धन त्या सर्वांना घेऊन गावाच्या दिशेने निघाला होता.. वीस जिवंत आणि एक प्रेत अश्या एकवीस जणांना घेऊन यशवर्धन आणि गावकरी चालले होते... तेवढ्यात भूकंप झाल्यासारखे जमीन हादरली... सर्वांनी मागे वळून आवाजाच्या दिशेने बघितले... ज्या भागात गुहा होती.. त्या भागात खूप मोठा परिसर खाली खचला होता... धरणी मातेने त्या गुहेला स्वतःच्या उदरात घेतले होते... भयानक वादळ सुटले होते.. ते स्वतः बरोबर पूर्ण परिसरातील सर्व काडी कचरा उडवून घेऊन जात होते...
यशवर्धन ने हळुवार गावाकडे नजर वळवली आणि प्रसन्न मुद्रेने त्यांनी परत गावाकडे मार्गक्रमण सुरू केले...
एक सेनापती काळया शक्तीवर विजय मिळवून सेनेसह परतत होता... वाहणाऱ्या प्रचंड हवे ने त्याचे केस आणि कपडे मागच्या दिशेने उडत होते...

गावात पोहोचल्यावर सर्व लोकांनी यशवर्धन चे आभार मानले.. यशवर्धन जंगला मधून जिवंत माणसांसह तीन सांगाडे आणि एक रक्त विहीन मृतदेह पण घेऊन आला होता... शोकाकुल वातावरणात त्या सर्व मृतांवर अंत्य संस्कार करण्यात आले.. या लढाई मध्ये किसनरावांनी सुद्धा एक पुत्र गमावला होता.. त्याचा अंत्य संस्कार करताना निर्माण झालेली पुत्र विरहा ची भावना, किसनरावा मध्ये खूप मोठा बदल करून गेली... एका मुलाला वाचवून आणल्या साठी त्यांनी यशवर्धन चे पाय पकडले आणि आता पर्यंत बळकावलेल्या सर्व जमिनी त्या त्या शेतकऱ्यांना परत देवून देण्याची घोषणा केली.. हे सर्व बघून यशवर्धन देखील गहिवरला...

ती रात्र सर्वांना मल्हाररावांकडे जेवणाचे आमंत्रण होते... मुलगा सकुशल परत आल्या बद्दल त्यांच्या पत्नीने देवाला गोडाचा नैवेद्य दाखवला होता... .
एक त्या पिशाच्चाच्या नाशानंतर गावात शांतता परत आली होती..
दुसऱ्या दिवशी सकाळी नित्य नियमाने यशवर्धन ने पूजा केली.. त्याला आता माघारी निघायचे होते... सर्व आवरून त्याने सुधाकर ला नेहाला घेऊन गुरूंकडे जाण्यास सांगितले... सर्व पत्ता व्यवस्थित त्याला लिहून दिला.. आणि तिथे गेल्यावर नेहा पूर्ण पने बरी होऊन या गावात विना त्रास राहू शकेल याची शास्वती दिली..

किसनरावांनी अंत्य संस्काराच्या वेळी केलेल्या घोषणे प्रमाणे, त्या दिवशी सातबारा वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता.. आणि ते वाटप यश वर्धन च्या हस्ते करण्याची त्यांनी यशवर्धन ला केली... एक चांगले कार्य म्हणून तो ते टाळू नाही शकला... सर्व कार्यक्रम आणि भेटी गाठी घेता घेता त्याला निघण्यास चार वाजले होते... एक दिवस अजून थांबण्याचा आग्रह कसा तरी मोडून यशवर्धन परतीच्या वाटेवर निघाला होता..

यशवर्धन ची गाडी जंगलाच्या घनदाट वाटेवरून हळूहळू घाटाकडे वळत होती... येताना रस्त्यावर पसरलेले वेल कालचा सुटलेला सोसाट्याचा वारा उडवून घेऊन गेला होता.. रस्त्यावर येणारे सर्व झुडपे जंगलातील आतल्या दिशेला सरकली होती.. आजूबाजूच्या परिसरात नवचैतन्य वाहत होते.. त्या भागावर इतके दिवस पसरलेले मळभ दूर झाल्या मुळे जणू काही निसर्गाने परत एकदा स्वतःचे हरित दुपटे जमिनीवर पसरवले होते. मधूनच झाडांच्या फांद्यांतून उन्हाच्या सोनेरी किरणांची हलकीशी तिरीप, एखाद्या अलंकारासारखी त्या रस्त्याला उजळवत होती. दाट झाडी मधून येणारा पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि हवेचा मंद गारवा तिथल्या पावित्र्याची साक्ष देत होता.
"पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में,
आज मैं आज़ाद हू दुनिया के चमन में!" गाणे गुणगुणत यशवर्धनने त्या वळणावरून मुख्य रस्त्याला गाडी वळविली आणि तो त्याच्या घराच्या दिशेने निघाला होता..

किरदुर्ग साठी जरी हा संघर्ष संपलेला असला तरी यशवर्धन साठी तर ही सुरुवात होती...
अश्या कित्येक पापभिरू लोकांच्या , गावांच्या मदतीला तो वेळप्रसंगी धाऊन जाणार होता...
त्याची शैताणी मानसिकते विरुध्द ची ही लढाई अव्याहत सुरू राहणार होती..

समाप्त...

किरदुर्ग ~ एक भय मालिका
लेखक : रूद्रदमन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!