चकवा ~ मध्यरात्रीचा थरारक अनुभव भाग~४

Submitted by रुद्रदमन on 11 September, 2024 - 15:41

सिद्धार्थ शांतपणे माझ्या बाजूला बसले होते.आज शुभ्र सफेद सदरा आणि पायजमा त्यांना शोभून दिसत होता.. त्यांचे डोळे बंद होते.. त्यांच्या शांत आणि स्थिर मनोवृत्तीने माझ्या मनातील चलबिचल कमी झाली होती. ते मनोभावे प्रार्थना करत होते, आणि त्यांच्या त्या साधनेच्या शक्तीचा प्रभाव मला जाणवत होता. त्यांचा विश्वास आणि साधनेचे बल मला उर्जा देत होते....
सर्व विवंचना सिद्धार्थ वर सोडून, मी बाहेर निसर्गाचा आनंद लुटत ड्रायव्हिंग वर लक्ष केंद्रित केले..
नुकतेच उजाडले असल्यामुळे निसर्गाने धुक्याची चादर गुंडाळलेली होती.. अचानक धुक्याचे पुंजके कारच्या समोर येत होते. त्यामुळे मी काळजी घेत गाडी चालवत होतो... अजूनही हवे मध्ये समुद्राचा खारट वास जाणवत होता.. जस जसे आम्ही पुढे जात होतो त्याची तीव्रता कमी होत होती.. कोकण सोडून घाटमाथ्यावर प्रवेश करण्यासाठी जाणारा रस्ता डोंगर रांगांमधून जात होता.. घाटातील ती वळणे अजूनच लक्ष केंद्रित करायला लावत होती... गाडीचा स्पीड मी बऱ्याच प्रमाणात नियंत्रित ठेवला होता.. गाडीत रेडिओवर मंद गाणी वाजत होती, पण माझ्या मनाचा संवाद हा डोंगर आणि रस्त्याशीच चालू होता..अचानक एखादा धबधबा दिसत होता,पाण्याचे थेंब अगदी आमच्या गाडीपर्यंत पोहोचत होते.. मी त्यात हरवून गेलो होतो.. हा निसर्ग आणि हा रस्ता, हे सर्व निसर्गाच्या कुशीतले एक जिवंत स्वप्न आहे असे वाटत होते. निसर्गाचे एक अप्रुप मला त्या दिवशी जाणवले.. मनात कितीही विचारांचे काहूर असू द्या पण निसर्गाचे सानिध्य त्यांच्यावर मात करून स्वतः कडे आपल्याला आकृष्ट करतेच करते... हे प्रकरण मिटल्या नंतर यथेच्छ कोकण फिरायचा माझ्या मनाने पक्के केले होते..

आकरा वाजत आले होते.... कोकणातील प्रवासात जाणवणारी खारट हवा केव्हाच गायब झाली होती.. अगोदर समुद्र तट ,डोंगर दऱ्या,ऊसाचे मळे ओलांडत आम्ही जवळपास दोनशे किलोमीटर आलो होतो.. गुळेगाव आता फक्त साठ किलोमीटर होते..
"रोहित एखादे शुद्ध शाकाहारी भोजनालय बघुन गाडी थांबव.. थोडे फार जेवण करून घेऊ." सिद्धार्थ माझ्या कडे बघत बोलले..
रात्री अनुष्ठान करावयाचे असल्याने त्यांनी फक्त दोन सफरचंद आणि थंडगार दूध घेतले होते, याची आठवण मला झाली.. आता आम्ही माझ्या भागात पोहोचलो होतो.. त्यामुळे तेथील हॉटेल्स विषयी मला सर्व माहिती होती.. मी माझ्या माहितीतील एक चांगले हॉटेल बघून गाडी थांबविली.. दोघांनी एक एक राइस प्लेट खाली.. आणि तिथे जास्त उशीर न करता निघालो..
"रोहित हे सर्व आवरले कि मला मढीला दर्शनाला जायचे आहे, कामाच्या व्यापातून बरेच दिवस झाले या बाजूला चक्कर च झाला नाही, आता आलो आहे तर एकदा माथा टेकवून जावे असे मनात आहे", सिद्धार्थ माझ्याकडे बघत बोलले..
यानंतरही सिद्धार्थ चा मला सहवास मिळेल यामुळे मी आनंदीत झालो होतो ..
"नक्कीच सिद्धार्थजी मलाही तुमच्याबरोबर येवून दर्शन घेण्यास आवडेल, आणि आमचे गाव ही जवळच आहे.. तेव्हा तुम्ही एकदा आमच्या घरी भेट द्यावी ही विनंती आहे." मी आनंदात संमती दर्शविली...
"होय नक्कीच, तेवढेच अजय ला देखील बघता येईल." असे बोलत त्यांनी पुढे बघितले...
माझ्या आनंदाला सीमा राहिली नव्हती... एकूणच सिद्धार्थच्या व्यक्तिमत्वाने मला चांगलीच मोहिनी घातली होती..
रस्त्याच्या कडेला गुळेगाव १० किलोमीटर अशी पाटी बघितल्यावर , "रोहित अगोदर गाडी पुलावर घे, त्या नंतर आपण सुहास चा शोध घ्यायला जाऊ.. मला एकदा तो पुल नजरें खालून घालने गरजेचे आहे.." सिद्धार्थ काहीतरी ठरवून माझ्याकडे बघत बोलले..
मी होकारार्थी मान हलवत रस्त्यावर लक्ष केंद्रित केले...
पुल गुळेगावच्या एक किलोमीटर पुढे होता..
साधारण एक वाजे च्या सुमारास आम्ही गुळेगाव मध्ये पोहोचलो..
"अगोदर नक्की पुलावरच जायचे का?", मी परत एकदा कन्फर्म करण्यासाठी गाडीचा स्पीड हळू करत सिद्धार्थ ना विचारले..
त्यांनी होकारार्थी मान हलवली.. मी परत गाडीला स्पीड दिला.. पुढच्या मिनिटाला तो पुल नजरेसमोर आला.. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती.. मागच्या वेळी पुलावर झालेली घटना परत एकदा फुल स्पीड मध्ये डोळ्यासमोरून तरळून गेली.. मी भानावर आलो तेव्हा आम्ही पुलाच्या दुसऱ्या कडेला होतो.. त्या रात्री जिथे गाडी लावून आम्ही आम्ही पुलाखाली गेलो होतो, अगदी त्याच जागी आम्ही होतो.. सिद्धार्थ ने मला खाली उतरण्याची खूण केली. ते पण खाली उतरून पुलाचे निरीक्षण करू लागले.. मी मठ्ठ मुलासारखा सारखा फक्त कधी त्यांच्याकडे तर कधी पुलाकडे बघत उभा होतो...
सिद्धार्थ परत गाडी जवळ गेले आणि त्यांनी बॅग मधून तो धागा हातात घेतला.. काहीही न बोलता ते सरळ पुलावरून खाली उतरत खालच्या दिशेला निघाले.. मी त्यांच्या मागेच होतो.. त्यांना नक्की काही तरी जाणवत होते .
तो धागा हातात तसाच होता... ते आता एक्झॅक्ट आम्ही त्या रात्री ती सुजाता जिथे बसलेली बघितली तिथेच उभे होते.. त्यांनी जमिनीकडे बघितले... डोळे बंद करून मंत्र पुटपुटायला लागले.. थोडक्या मंत्रावरून मला एक कळत होते की ते श्री गुरुदेव दत्तांना आवाहन करत आहेत.. मी फक्त एक प्रेक्षक बनून आजूबाजूला बघत उभा होतो.. काही घडते की काय अशी जिज्ञासा मला लागली होती... पण मनाने चिंतल्याप्रमाणे काहीही घडले नाही.. किंवा जर काही घडले असेल तर ते माझ्या मानसिक क्षमतेच्या समजण्यापलीकडे होते...
जय जय श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त असा एक जय घोष करत ते मागे वळून ,"चल, आता आपण सुहास चा शोध घेवूयात," म्हणत गाडीकडे निघाले..
मी मात्र ते असे म्हणताच त्यांच्या पुढे पळालो..
मला तिथे त्यांना सोडून एक सेकंदही थांबायची इच्छा नव्हती किंवा असे म्हणा की माझ्यामध्ये हिम्मत नव्हती..
आम्ही गुळेगाव ला पोहोचलो तेव्हा तीन वाजत आले होते.. मी सिद्धार्थ ना घेऊन त्या दिवशी आम्हाला भेटलेल्या एक वयस्क व्यक्ती च्या घरी गेलो. त्यांचे नाव होते सखाराम बाबा.. त्यांनी मला बघितल्या बघितल्या ओळखले.. चहा घेताना मी सिद्धार्थची त्यांच्याशी ओळख करून दिली....चहा झाल्यावर,"मुलांनो काय काम काढले आता गुळेगावात." सखाराम काका नी येण्याचे प्रयोजन विचारले..
त्यांना ती रात्रीची घटना तर माहीतच होती.. मी तिथून पुढे सकाळी पासून तर सद्य वेळेपर्यंत घडलेली एक ना एक गोष्ट सांगितली.. ऐकताना त्याच्या चेहेर्यावर कधी घाबरण्याचे भाव तर कधी आश्चर्यचकित होण्याचे भाव येत होते.. सुजाता बरोबर घडलेली घटना ऐकताना मात्र त्यांना जवळजवळ रडूच कोसळले..
माझे पूर्ण सांगून झाल्यावर मी शांत बसलो..
"अरे देवा सोन्यासारखी पोरगी होती सुजाता, नुकतीच आई झालेली होती.. नवरा मात्र एक नंबर चा डांबिस होता.. घात झाला हो पोरीचा.. इतर काही झाले असते तर चालले असते पण असे नको व्हायला पाहिजे होते... म्हणजे त्या पुलावर छन्नवीच्छिन्न अवस्थेत सापडलेले ते तीन मृतदेह त्या राक्षसांचेच होते तर," बोलताना सखाराम काका च्या डोळ्यात पाणी होते..
"काका आम्ही इथे आलो आहोत तिच्या दूर्भागी आत्म्याला मुक्ती मिळवून देण्याचा उद्देशाने, त्यासाठी आम्हाला सुहास हवा आहे. त्याचे घर आम्हाला दाखवा", सिद्धार्थ ने काकांना सांगितले..
"मुलांनो पण सुहास तर आता या गावात नाही, तो आता देवगिरीला मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे.. त्याला तिथे भरती करून जवळ जवळ एक वर्ष झाले". काका बोलले..
"काय? काय झाले होते त्याला आणि कधी झाले होते हे ." सिद्धार्थ आश्चर्यचकित होऊन बोलत होते.. पण एक आनंदा ची चमक त्यांच्या डोळ्या मध्ये तरळून जाताना मी बघितली.. मला काही कळत नव्हते की ही गोष्ट ऐकून सिद्धार्थ आनंदी कसे झालेत..
माझ्या मनात हे विचार चालू होते तेव्हाच अचानक काका पुन्हा बोलायला लागले.. माझे विचारचक्र थांबवून मी पण त्यांचे म्हणणे मन लावून ऐकायला लागलो..
"मुलांनो साधारण दोन वर्षापूर्वी सुहास शी झालेल्या भांडणाने सुजाता मुलीला घेऊन घर सोडून गेली.. त्या रात्री धो धो पाऊस कोसळत होता.. सकाळी सुहास ची नशा उतरली तेव्हा त्याला समजले की सुजाता आणि मिरा दोघी घरात नाही.. त्याला त्याचा रात्रीचा प्रताप आठवला.. तो मागे कितीही नालायक वागला असला तरी मनाच्या एका कोपऱ्यात त्याचे सुजाता आणि मीरावर असलेले प्रेम शिल्लक होते.. ती आणि मिरा गायब झाल्याने आणि अश्या धोधो पडणाऱ्या पावसात त्यांना काही बरे वाईट तर नाही होणार ना या कल्पने ने एक बाप आणि एक नवरा शहारला.. मन चिंती ते वैरी न चिंती या उक्ती प्रमाणे, त्या पाऊसात पण तो वेडा पिसा होत त्या दोघींना शोधू लागला.. पण किती ही प्रयत्न केले तरी त्या काही त्याला सापडल्या नाहीत.. दिवसा मागून दिवस जात होते.. सुहास ला नातेवाईक कोणीच नव्हते.. सुजाता खूपच गोड मुलगी होती.. त्यामुळे त्याच्या मदतीला गावकरी धावले..आम्ही गावकऱ्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला.. अगदी पोलिसांमध्ये कंप्लेंट पण केली.. पोलिसांनी पण सर्व दिशांना शोध घेतला पण त्या काही सापडल्या नाहीत.. ना त्या कुठे गेल्या याचा थांगपत्ता लागला होता.. त्यानंतर त्याचे दारू पिने कमालीचे वाढले.. स्वतः ला दोष देत तो पूर्ण पने दारूच्या आहारी गेला होता.. त्याला नोकरीवरून काढून टाकले गेले.. दिवसभर दारूच्या दुकानात पडून राहू लागला.. कित्येक दिवस अंघोळ करत नव्हता.. नोकरी नाही तर पैसे नाही, नंतर दारू मिळेनाशी झाली.. अति दारू सेवन केल्याने डीलिरियम ट्रेमेन्स मुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा.. पण सुहास ला त्या दोघी दिसायला लागल्या होत्या.. जिकडे बघावे तिकडे त्याच दिसत होत्या.. सुरुवातीला कोणी विचारले तर तो म्हणायचा की सुजाता च्या अंगावर असंख्य वारांच्या जखमा आहेत... तिचे सर्व शरीर रक्ताळलेले आहे.. तिची आणि मिरा ची पूर्ण त्वचा अनेक दिवस पाण्यात राहिल्याने फोड आल्यासारखी दिसते आहे.. माझी एवढीशी मिरा आणि सुजाता मला त्यांच्या कडे बोलावत आहे.. असे म्हणून तो त्या दिसत आहेत त्या दिशेला पळत सुटायचा... नंतर नंतर फक्त एकच वाक्य त्याने लाऊन धरले होते.. ती मला बोलावते आहे.. ती मला घेऊन जायला आली आहे.. त्यानंतर लगेच कुठे तरी अज्ञातात नजर लावत जोरजोरात रडून तुम्ही परत याना, तुम्ही परत याना म्हणत तिथेच लोळायचा.. त्याच्या वेडाचे प्रमाण इतके वाढले की त्याला ना कपड्याची शुद्ध होती ना नित्य कर्माची.. फक्त अखंड बडबड ती बोलावते आहे मला जायला हवे ...
शेवटी आम्ही गावकऱ्यांनी निर्णय घेतला आणि बाळू ला पाठवून त्याला देवगिरी च्या मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. आता तो तिथेच आहे.. बाळू अधून मधून जात असतो, पण त्याच्यामध्ये कोणताच फरक नाही." एव्हढे बोलून काका थांबले..
"हुश्श काय ही करून कहाणी, जेव्हा जवळ होती तेव्हा तिची किंमत नाही समजली.. जेव्हा समजली तेव्हा वेळ निघून गेली होती, जाऊ द्या त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळाली. आणि आमच्या साठी पुढील गोष्टी पण जरा सोप्या झाल्या," सिद्धार्थ थोडे आनंदातच बोलत होते..
"काका तुम्ही आम्हाला त्या हॉस्पिटल चा पत्ता देऊ शकाल का?" सिद्धार्थ बोलला..
"पत्ता कशाला बाळू येईल तुमच्या बरोबर, त्यानेच तर तिथे ऍडमिट केले होते सुहास ला, तुम्ही ना रक्ताचे ना नात्याचे तरी बिचाऱ्या सुजाता ला मुक्ती मिळण्यासाठी एव्हढे करताय, आम्ही तर गाववाले आहोत.." असे बोलत काकांनी घरातल्या एका छोट्या मुलाला बाळू कडे पाठविले..
जरी बाळू तुमच्या बरोबर येत असेल तरी तुमच्या कडे पत्ता राहू द्या, म्हणत काकांनी एका कागदावर पत्ता अगदी व्यवस्थित पने लिहून दिला.. आणि काही मदत लागली तर कॉल करण्यासाठी त्यांचा नंबर पण लिहून दिला..
थोड्या च वेळात बाळू आला.. त्याला थोडक्यात काकांनी सर्व समजावून सांगितले.. तो सुद्धा मोकळ्या मनाने आमच्या बरोबर यायला तयार झाला..
काकांनी जेवायचा खूप आग्रह केला पण सिद्धार्थ नाही म्हणाले आणि आम्ही देवगिरीच्या दिशेने निघालो.. मोजून सत्तर किलोमिटर अंतर.....
सिद्धार्थ अगदी निश्चिंत बसलेले होते.. मी निघाल्या पासून त्यांचे निरीक्षण करत होतो.. सकाळच्या तुलनेत आता ते खूपच शांत दिसत होते.. स्वतःला बरेच आवरले तरी माझा प्रश्न ओठावर आलाच,"सिद्धार्थ तुमच्या डोळ्यात आनंद दिसत आहे त्यामागचे कारण समजेल का? "
"अरे प्रायश्चित्त घेणे हे कोणत्याही पापाचे परिमार्जन करण्याची शेवटची स्टेप आहे. सुहास ची ही अवस्था त्याच्या मनाने त्याच्यासाठी घेतलेले प्रायश्चित्तच आहे."सिद्धार्थ माझ्याकडे बघत बोलले...
मला सर्व समजले होते. माझ्या बऱ्याचश्या प्रश्नांची उत्तर त्यांच्या एवढ्याशा वाक्यात मिळाली होती...
आम्हाला पोहोचता पोहोचता रात्रीचे आठ वाजलेत....

आम्ही हॉस्पिटल समोर पोहचलो.. गाडी हॉस्पिटल समोर घेत मी हॉस्पिटल कडे कटाक्ष टाकला.. समाजाने त्यागलेले, कुटुंबाने सोडलेले सर्व उपेक्षित घटक त्या हॉस्पिटलमध्ये राहत होते.. या एकाच विचाराने माझ्या शरीरावर शहारा आला.. गाडी मधूनच इमारतीचा भव्य आकार दिसत होता.. जुन्या काळातील एक उंच, गडद मातकट रंगाची इमारत, जणू एखाद्या दुःखाने ग्रासलेली. पूर्ण इमारतीचा रंग उडालेला आणि खिडक्याच्या काचा फुटलेल्या धुळीने माखलेल्या होत्या. मी काळाच्या एखाद्या वेगळ्याच परिमाणांमध्ये येऊन पोहोचलो आहे असे वाटत होते..माझ्या अंतर्मणाला तिथे भयानक नकारात्मकता जाणवली.. कदाचित त्या उपेक्षित जगाविषयी समाजात असलेली नकारात्मक भावना देखील माझ्या विचारां मागे असू शकते असा विचार करत.. मी मन शांत केले..
आम्ही गाडीतून उतरलो आणि भव्य अशा लोखंडी दरवाज्या समोर गेलो.... सिद्धार्थ नी दरवाजावरील बेल वाजवली..
काही वेळ वाट बघितल्यानंतर, निळ्या रंगाचा पेहराव केलेल्या वॉचमनने दरवाजा उघडला. "कोण तुम्ही? काय काम होत पाहूने?" असे म्हणत त्याने चौकशी केली..
"काही नाही आम्हाला एका पेशंटला भेटायचे होते, थोडे अर्जंट काम होते त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत", सिद्धार्थ ने पुढे होत सांगितले..
"पावणे भेटायची वेळ टळून गेली आहे तुम्ही आता उद्या सकाळी या." असे म्हणत वॉचमन ने आम्हाला काहीही बोलायची संधी न देता दरवाजा बंद केला...
मी आता काय या मुद्रेने सिद्धार्थ कडे बघितले.. सिद्धार्थच्या चेहऱ्यावरती कोणताही फरक पडला नव्हता, ते सरळ मागे वळले आणि गाडीमध्ये येऊन बसले.. मी आणि बाळू सुद्धा त्यांचे अनुसरण करत गाडीमध्ये येऊन बसलो.. त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि कॉल केला.. कॉल वर कामाविषयी सगळी माहिती दिली आणि भेटू देण्याची परवानगी मागितली... मोबाईल खिशात ठेऊन ते शांत बसून राहिले..
"सिद्धार्थ, आज इथेच थांबावे लागेल की काय आपल्याला?" मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघून विचारले..
"थोडा वेळ वाट बघू मग निर्णय घेऊ", असे म्हणत ते दरवाजा कडे बघायला लागले..
आम्हाला काही कळतच नव्हते.. मी बाळू कडे आणि बाळू माझ्याकडे बघत होता.. मी जास्त काही त्यांना विचारायच्या भानगडीत पडलो नाही..
पुढच्या दहा मिनिट मध्ये हॉस्पिटल चा तोच लोखंडी दरवाजा उघडला गेला.. वॉचमन स्वतः गाडी पर्यंत धावत आला आणि त्याने क्षमा मागून आम्हाला मध्ये यायला सांगितले...
घडलेल्या गोष्टीवरून मी आश्चर्यचकित झालो होतो, पण मी सिद्धार्थ ला हे कसे शक्य झाले या बद्दल काहीच विचारले नाही.. एकंदरीत घटनेवरून सिद्धार्थ काही छोटे व्यक्तिमत्व नाही याची प्रचिती मला आली... पुढे सिद्धार्थ आणि वॉचमन आणि मागे मी आणि बाळू, आम्ही त्या इमारतीमध्ये प्रवेश केला. वॉचमन आम्हाला मुख्य वॉर्डन च्या ऑफिस मध्ये घेऊन गेला.. तिथे वॉर्डन शी थोडीफार चर्चा झाली, कुठून तरी आलेल्या फोनमुळे वार्डन जास्त चौकशी करण्याच्या फंदात पडला नाही.. थोड्याच वेळात आम्ही सुहास च्या खोली च्या दिशेने निघालो... वार्डन स्वतः आमच्याबरोबर आले होते...
मुख्य बिल्डिंगमध्ये शिरताच वासाचा एक असह्य भपकारा नाकाशी आला... औषधांचा, अमोनिया चा मिक्स वास... समोरच एक लांबलचक कॉरिडॉर पसरलेला होता, दोन्ही बाजूंनी छोटीशी काचेची खिडकी असणारे बंद लोखंडी दरवाजे आणि त्यातून मधून अस्पष्ट हसण्याचे, बोलण्याचे आणि कधीकधी भयकंपित किंकाळ्यांचे आवाज ऐकू येत होते. त्या आवाजांनी माझे मन अधिकच बेचैन झाले . प्रत्येक पावलागणिक मला असे वाटत होते की हे स्थान मानवी जीवनातील हतबलतेच्या असंख्य करून कहाण्यांनी भारलेले आहे.
भिंतीवर काही जुने आणि फाटलेले पोस्टर दिसत होते, त्यावर मानसिक आरोग्याबद्दल सूचना लिहिलेल्या होत्या. एकंदरीत हॉस्पिटलमध्ये एक वेगळाच शोक भरून राहिला होता. त्यामुळे येथील सगळेच रुग्ण कुटूंबाने सोडलेले, समाजाने त्यागलेले आहेत याची प्रचिती येत होती... समोरून एक नर्स हळूहळू चालत येत होती, तिचे थकलेले डोळे आणि गंभीर चेहरा पाहून मनात तिथल्या परिस्थितीची भयानकता अजून स्पष्ट झाली..
वॉर्डन ने एका खोलीकडे बोट दाखवत आम्हाला काचेच्या खिडकीतून डोकावण्यास सांगितले.. माझी तर पुढे जायची हिम्मत नव्हती...
मी काहीही बोलण्याच्या आत, स्वतः सिद्धार्थ पुढे झाले आणि त्यांनी मध्ये डोकावून बघितले.. मागे फिरत वॉर्डन कडे बघत त्यांनी रूमचा दरवाजा उघडण्यास सांगितले.. रूमचा दरवाजा उघडला गेला.. आम्ही आत शिरलो समोर एका कोपऱ्यात सुहास बसलेला होता.. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती.. कुठेतरी अज्ञातात बघून तुम्ही कुठे गेलात , मी कसा येऊ, मला तुमच्याजवळ यायचंय असे तो पुटपुटत होता.. मीरा मीरा म्हणून टाहो फोडत होता.. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती.. पूर्ण खोली अमोनियाच्या वासाने भरलेली होती.. त्याच्या शरीरावरील कपड्यांवर पिवळे पिवळे डाग दिसत होते.. त्याची परिस्थिती बघून माझे मन भरून आले... त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच वेदना झळकत होती..
सामान्य व्यक्ती समाजाने वेडे ठरवलेल्या व्यक्तींपासून चार हात दूर राहतो. पण सिद्धार्थ चालत चालत त्याच्याजवळ गेले.. त्याला स्पर्श करत सिद्धार्थ नी त्याला विचारले ,"सुहास तुला मीरा ला आणि सुजाताला बघायचे आणि भेटायचे आहे'"...
त्यांच्या बोलण्यातील, त्यांच्या स्पर्शातील संवेदना त्याच्या मनापर्यंत पोहोचली त्याच्या शून्य नजरे त जिवंत पणा डोकावला, त्याने नजर वळवून सिद्धार्थ कडे बघितले.. त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद पसरला होता.... आम्हाला एक गोष्ट कळली होती की मागे काहीही असो पण आता त्याचे पूर्ण आयुष्य हे सुजाता आणि मीराच्या भोवती गुंडाळले गेले होते..
"तुम्ही मला त्यांच्या कडे नेणार का ते मला बोलावतात, पण कुठे जावं तेच कळत नाही मला,त्यांच्या दिशेला गेलो की ते गायब होऊन जातात, ती बघा तुमच्या मागेच उभी आहे मला बोलावते आहे,".. आलो सुजाता आलो म्हणत तो आमच्या दिशेने निघाला.. तेवढ्यात सिद्धार्थ नी त्याच्या दंडाला पकडले..
मी मात्र दचकून मागच्या बाजूला वळून बघितले, मागे कोणीही नव्हते... हे सर्व बघितल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली मुक्तीची आवश्यकता फक्त सुजाताला आणि मीरालाच नव्हती तर ती सुहास ला सुद्धा होती..
"चल माझ्याबरोबर चल.. मी तुला मीराची आणि सुजाताची भेट घालून देतो," असे म्हणत सिद्धार्थ त्याला घेऊन बाहेरच्या बाजूला निघाले.
सुहास एखाद्या आज्ञाधारक मुलासारखा त्यांच्याबरोबर चालत होता...

ऍडमिट करताना फॉर्म वर बाळू चीच सही होती त्यामुळे इतर कोणत्याच अडचणी आल्या नाहीत...वॉर्डनच्या ऑफिसमध्ये बाकी सर्व सोपस्कार पूर्ण करून, त्याला घेऊन निघायला आम्हाला रात्रीचे अकरा वाजलेत.. निघताना वार्डन कडून सिद्धार्थ नी कसले तरी इंजेक्शन आणि सिरींज मागून घेतलेत... आता माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास बसलेला होता.. मी त्याबद्दल त्यांना काहीही विचारले नाही...
गाडी मध्ये बसल्यावर सिद्धार्थने सखाराम काकांना फोन केला आणि आम्ही सुहासला घेऊन येत असल्याचे सांगितले..
गाडी मध्ये कोणीच काही बोलत नव्हते.. एक विचित्र शांतता पसरलेली होती. सुहास आणि बाळू मागच्या बाजूला बसलेले होते.. सुहासची तोंडातल्या तोंडात अखंड बडबड चालू होती, "मी येतो आहे, मी येतो आहे मीरा आणि तुझ्याकडे, आता परत मी कधीच चुकीचा वागणार नाही." शब्दांबरोबरच त्या शांततेला भेदणारा सुहासच्या घशातून येणारा खरखर आवाज माझे मन अजूनच विचलित करत होता..
रात्री एकच्या सुमारास आम्ही गुळेगाव मध्ये पोहोचलो.. एव्हाना मला सिद्धार्थ चे मन कळायला लागले होते.. मी काहीही न विचारता गाडी हनुमानाच्या मंदिराकडे घेतली.. मंदिरा जवळच सखाराम काका आणि अजून गावातील दोन-तीन गृहस्थ आमची वाट बघत उभे होते...
गाडी हनुमानाच्या मंदिर समोर उभी राहिल्यानंतर सिद्धार्थ खाली उतरले त्यांनी आम्हाला सर्वांना खाली उतरण्याची सूचना केली.. सर्वात अगोदर आम्ही सर्वांनी हनुमानाचे दर्शन घेतले... सिद्धार्थने सुहासला आणि बाळूला मंदिरातच बसायला सांगितले.. आणि ते मला आणि सखाराम काकांना बाहेर येण्याची खूण करत बाहेरच्या बाजूला गेले.. गाडीजवळ आल्यानंतर सिद्धार्थ नि बोलायला सुरुवात केली, "हे बघ रोहित आपण ज्यासाठी इथे आलो आहोत त्याचा आता हा शेवटचा अंक सुरू झाला आहे, आपण जे दुपारी पुलावर गेलो होतो, तिथे मी जे ध्यान लावले होते,त्या धाग्याच्या माध्यमातून मी तिच्याशी संवाद साधला तेव्हा तिने सुहास ला एकदा तरी भेटण्याची मागणी केली .....त्यामध्ये मला एक गोष्ट समजली की सुजाताच्या मनात कुठेतरी सुहास साठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे, तिला कदाचित त्याची ही अवस्था माहीत असावी अशी मला आता शंका येत आहे, म्हणूनच आपल्याला आता जे काही करायचे आहे त्यासाठी उद्याची रात्र आपल्यासाठी चांगली आहे.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुहासची ही स्थिती त्याचा जीव वाचवणार आहे. " असे बोलत त्यांनी सखाराम काकांकडे बघितले..
"काका आज आम्हाला इथेच थांबावे लागेल, तुम्हाला काही अडचण नाही ना?" सिद्धार्थ नि काकांकडे बघत विचारले..
"काहीच अडचण नाही आता आपण सगळेच घरी जाऊ आणि माझ्या इथे छान पैकी जेवण करू.. उद्या तुम्हाला हवे तेव्हा पुलावर जाऊन उरलेले कार्य पूर्ण करू आणि त्यासाठी मी आणि बाळू दोघे सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहोत. " बाळू कडे बघत काकांनी त्यांची इच्छा व्यक्त केली... बाळू ने काकांच्या इच्छेला अनुमोदन दिले...
त्यांनतर आम्ही सुहास ला घेऊन काकांकडे थांबलो.. आमचे जेवण आटोपल्यानंतर सिद्धार्थ नि लहान मुलासारखे चमच्याने सुहासला जेवू घातले. त्यांच्या कडे बघताना त्यांच्या मनाचा मोठेपणा बघून माझा उर भरून येत होता.. सुहासचे जेवण झाल्यावर सिद्धार्थने देवगिरीच्या हॉस्पिटल मधून येताना आणलेले इंजेक्शन सुहासला दिले... थोड्याच वेळामध्ये सुहास एकदम शांत झोपला...
त्यानंतर आमची सखाराम काकांशी आणि बाळूशी बराच वेळ चर्चा झाली.. सखाराम काकांनी आणि बाळू ने परत एकदा सुजाता वर गुजरलेल्या प्रसंगा विषयी हळूहळू व्यक्त केली.. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याची तयारी दाखवली... बाकीच्यांचे तर माहित नाही पण मी मात्र त्या रात्री खूप निश्चिंत मनाने झोपनार होतो... दुसऱ्या दिवशी या अध्यायाचा शेवटचा अंक आहे ही कल्पना मला आतापर्यंत आली होती...

सुहास जर दारुडा आणि बाहेरख्याली नसता तर त्या रात्री सुजाता ला घर सोडावे च लागले नसते.. एव्हढे सगळे घडले त्याला कारण सुहास चे वागणेच होते.. तरी सूजाताच्या मनात
त्याच्या विषयी सॉफ्ट कॉर्नर असेल?
की हे त्याला संपवण्यासाठी तिच्या आत्म्याने उभे केलेले नाटक असेल?
शेवटच्या अंकाला सुरुवात झाली आहे..
सर्व प्रश्नांचा उलगडा पुढील भागात होणार आहे.. ..

लेखक: रूद्रदमन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users