यंदाच्या १५ ऑगस्टला खरंतर एक संकल्प केला होता तो म्हणजे, आता किमान एक महिनाभर तरी कुठलाही नवा लेख लिहायचा नाही. कारण ? कारण फक्त एक - मनावर संयम. लिहायचेच नाही असे एकदा ठरवले की आपोआप आपले वाचन, मनन आणि चिंतन वाढते. एरवी नवे लेखनविषय शोधण्यासाठी मनात सतत जो एक कोलाहल चालू असतो तोही थांबतो. खरं म्हणजे त्या संयमाचा शांतपणे अनुभव घ्यायचा होता.
पण . . .
हा संयम मोडायला लावलाय यंदाच्या आपल्या गणेशोत्सवाच्या कल्पक संयोजकांनी !
‘माझे स्थित्यंतर’ हा मार्मिक आणि अतिशय सुंदर विषय त्यांनी लेखनासाठी ठेवल्यामुळे कितीही टाळू म्हटलं तरी हा लेख लिहायचा मोह झाला. मग मनातल्या मनात एक आरोळी ठोकली,
“लेखन संयमाची ऐशी की तैशी ! . . . ते पाहू नंतर पुन्हा कधीतरी. . . अन आता मात्र झपाटल्यागत लिहूनच टाकू” !
1980 च्या दशकात लेखनाला सुरुवात केल्यापासून आतापर्यंतच्या आयुष्यात लेखन हाच एकमेव छंद जोपासलाय. त्यातल्या एका पैलूच्या स्थित्यंतरासंबंधी काही लिहितो आणि तो आहे विज्ञानलेखन.

आयुष्यात लेखनाला सुरुवात केल्यानंतर जवळपास दहा वर्षे त्याचे माध्यम हे फक्त वृत्तपत्रातील वाचकांची पत्रे हेच होते. त्यातून मुख्यतः दैनंदिन जीवनात जाणवणाऱ्या किंवा खटकणाऱ्या सामाजिक विषयांबद्दलच लिहीत होतो. तेव्हा एक दोन परिचितांनी विचारलेही होते, की आरोग्य विषयांवर तुम्ही का लिहीत नाही. तेव्हा मी त्यांना सरळ सांगितले होते, की त्यात मला बिलकुल रस नाही. या तीव्र नकाराचे मूळ मध्यमवर्गातील आपल्या बहुतेक पालकांच्या पठडीबंद शैक्षणिक मनोवृत्तीत आहे.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, “केवळ तुला अमुक इतक्या टक्क्यांच्यावर गुण आहेत म्हणून तू विज्ञान शाखेलाच जायचे” ही जी मानसिकता तत्कालीन पालकांमध्ये होती त्याचाच मी एक बळी. किंबहुना दहावी झालेल्या मुलाची स्वतःची शैक्षणिक आवड काय आहे किंवा नाही हे विचारायची देखील पद्धत तेव्हाच्या बहुतांश पालकवर्गात नव्हती. दहावीनंतर सायन्स आणि पुढे दोन वर्षांनी त्या अभ्यासशाखेला फक्त दोनच फाटे फुटतात. त्यापैकीच आपण एक निवडायचा असतो हेच ते बाळकडू व साचेबद्ध संस्कार. निव्वळ संस्कारच नाही तर एक प्रकारची सक्ती !
अशा तऱ्हेने वैद्यकीय पदवीधर होईपर्यंत पालकांच्या या मनोवृत्तीबद्दल मनात एक प्रकारची नाराजी दडलेली होती. म्हणून, आता छंद म्हणून जे स्वीकारलय ते अर्थातच विज्ञान शाखेपासून कोसो लांब असलेले अन्य काहीतरी पाहिजे हे ओघाने आले. त्यातूनच मग लेखनविषय निवडताना समाज, संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन हे प्रांत आपलेसे वाटत होते.
सातत्याने लेखन करण्यासाठी आपल्या मनात सतत वाचनाचे इंधन भरावेच लागते. वाचनाचे विषय निवडतानाही तोच दृष्टिकोन ठेवला. आपल्याला ज्या विषयासंबंधी लिहावसं वाटतंय त्याच प्रकारचे वाचन आपण करत राहावं हे बरं. लेखनाचे एकंदरीत स्वरूप साहित्यापेक्षा पत्रकारितेच्या अंगाने जाणारे होते. त्यामुळे वृत्तपत्रे आणि नियतकालिकांच्या वाचनावरच अधिक भर राहिला. तेव्हा वृत्तपत्र अगदी मन लावून आणि बारकाईने वाचायची सवय होती . परंतु त्याचबरोबर त्यात कुठल्याही प्रकारचे विज्ञानलेखन दिसले की मात्र त्याकडे सरळ पाठ फिरवित होतो. “कुणी सांगितलाय डोक्याला पीळ”, हाच त्यामागचा मनोभाव.
साधारणपणे 1990 च्या दशकापासून अनेक वृत्तपत्रांनी आठवड्यातून एक दिवस विज्ञान पुरवणी देखील चालू केलेली होती. त्या दिवशीचे वृत्तपत्र हातात घेतले की पहिल्याप्रथम त्याच्या पोटातली ती विज्ञान पुरवणी अगदी झुरळ झटकावे तशी बाजूला काढून ठेवत असे आणि मग मुख्य अंक मात्र चवीने वाचे.
कालांतराने जेव्हा स्वतंत्र लेखन नियमित करू लागलो तेव्हाही पूर्वीचेच धोरण ठेवले होते ते म्हणजे, विज्ञान हे प्रकरण पूर्णपणे नजरेआड करून आपल्या आवडीच्या इतर विषयांवर लिहित राहणे. नाही म्हणायला सटीसामाशी एखादा धूम्रपान किंवा मद्यपानविरोधी लेख मात्र अगदी राहावले नाही म्हणून टाकणं टाकल्यागत लिहीला परंतु त्यात मानसिक गुंतवणूक काही नव्हती.
मासिकांमध्ये लेखन करू लागल्यानंतर अनुभवकथन आणि ललितगद्य या प्रकारांमध्ये गती आली आणि ते छानपैकी आवडतही होते व आजही आवडतात. पण अजूनही आरोग्य विज्ञानलेखनात आपण नियमितपणे पडावे असे बिलकुल वाटत नव्हते. किंबहुना पोटापाण्याचा उद्योग जर आरोग्यविज्ञान आहे तर छंद हा वेगळ्याच प्रांतातला असलेला बरा, असे स्वतःला ठाम बजावले होते.
अशाप्रकारे बिगरवैज्ञानिक लेखन आणि वाचन सुखेनैव चालू होते.
आता नक्की आठवत नाही पण ते अंदाजे 2016 साल असावे. तेव्हा आमच्या वैद्यक संघटनेच्या मासिकाचा एक अंक ‘इन्सुलीन विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्यातील या औषधाचा इतिहास मी वाचला मात्र आणि अक्षरशः झपाटलो. मग मला राहवेना. हा मनोरंजक भाग मराठी वाचकांसाठी लिहिलाच पाहिजे असे तीव्रतेने वाटले.
अशा तऱ्हेने ‘इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा’ (https://www.maayboli.com/node/64203) हा लेख १४/१०/२०१७ या दिवशी लिहिता झालो. या लेखाने मी मायबोलीवरील आरोग्य लेखनाचा श्रीगणेशा केला. माझ्या लेखनातील स्थित्यंतराचा हा प्रारंभ म्हणता येईल. तोपर्यंत लेखनाला 35 वर्ष होऊन गेली होती आणि त्या दीर्घ काळात मी जे करायचे टाळले होते तेच आता करून बसलो होतो ! त्या लेखावर वाचकांशी छान संवाद झाल्यानंतर मला ‘कोलेस्टेरॉल’ खुणावू लागला. मग त्यावरही लिहीले. आता माझ्या लक्षात आले,
“अरे, जे लेखन स्वतःला कंटाळवाणे वाटेल या शंकेपोटी मी टाळत होतो, तेही इथे तेवढाच आनंद देत आहे”.
मग मोठ्या उत्साहात आरोग्यलेखन चालू झाले. त्यातून झालेला वाचकसंवाद ही माझी आनंदयात्रा ठरली; ती आजही टिकून आहे.
वरवर पाहता असं दिसतंय की मी वाचलेला उपरोल्लेखित लेख हा या स्थित्यंतरास कारणीभूत ठरला. परंतु खोलवर विचार करता आज असे वाटते, की हे एक तात्कालिक कारण असावे. सन 2000 पासूनच साहित्यक्षेत्र आणि वाचनसंस्कृती या संदर्भात एक हाकाटी ऐकू येत होती. ती म्हणजे, आता एकंदरीत टीव्ही आणि इंटरनेटमुळे वाचनाचे समाजातील परिणाम झपाट्याने कमी होतंय .. वगैरे. पण त्याचबरोबर जो काही चोखंदळ वाचकवर्ग टिकून आहे त्याचा वाचन विषयांचा कलही बराच बदललेला आहे.
आता पांढरपेशा काल्पनिक लेखनापेक्षा उपयुक्त प्रकारचे लेखन वाचण्याकडे वाढता कल दिसू लागलेला होता. दरवर्षीचे अ. भा मराठी साहित्य संमेलन झाले की त्याच्या वृत्तांतात, संमेलनादरम्यान जोरदार खपलेली एक-दोन पुस्तके कुठली हे पाहिले तर त्यात प्रामुख्याने माहितीपर पुस्तकांचा उल्लेख असायचा. त्या पुस्तकांची व्याप्ती, ‘कुत्र्यांचे पौष्टिक खाद्य’ इथपासून ते ‘माझा कर्करोगाशी लढा’ इथपर्यंत असायची. या सामाजिक वाचन स्थित्यंतराची देखील माझ्या मनात कुठेतरी सुप्त नोंद झालेली असावी. आजवरच्या लेखन कारकिर्दीत एक सूत्र मनाशी पक्के ठरवलंय ते म्हणजे, वाचक हा लेखकाचा ग्राहक आहे. आणि ग्राहकशास्त्राच्या मूलभूत तत्वानुसार, ‘मागणी तसा पुरवठा’ हेच त्रिकलाबाधित सत्य आहे. जर वाचकांचा एक मोठा गट माहितीपर लेखन आवडीने वाचतोय तर मग आता आपण तरी लेखक म्हणून आखडते कशाला घ्या, अशी मनाची समजूत पटली.
मग काय, त्यानंतर आरोग्यलेखनाची एक्सप्रेस गाडी अगदी वेगाने दौडू लागली.
सलग तीन वर्षे कुठल्या ना कुठल्या विषयावर आरोग्यलेखन झाल्यानंतर एक जाणवत होते की या प्रकारचे लेखन हे काहीसे एकसुरी होतंय. एका वाचकाचा तसा प्रांजल प्रतिसादही इथे आला. तो मी मोलाचा मानतो. त्या प्रतिसादाशी व्यक्तीशः सहमत आहेच. परंतु या प्रकारचे विज्ञानलेखन, रंजक करू म्हटले तरी किती रंजक करणार, याला एक अंगभूत मर्यादा आहे. म्हणून लेखमालेचा अपवाद वगळता लागोपाठ स्वतंत्र आरोग्य लेख लिहायचे नाहीत असा मात्र प्रयत्न जमेल तितका करतो. तसेच विषय निवडताना माझ्या आवडीपेक्षा समाजातील चालू आरोग्यविषयांना प्राधान्य देतो. हे लेखन माहितीपर असले तरी त्यातून वाचकावर माहितीचा भडिमार होऊ नये एवढी दक्षता घेतली जाते. हा स्थित्यंतराचा पुढचा टप्पा म्हणता येईल.
आता आंतरजाल सेवा जगभरात प्रस्थापित होऊन 25 वर्षे तरी लोटली आहेत. कुठल्याही प्रकारची माहिती आता जगातील कोणालाही टिचकीसरशी उपलब्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारानंतर तर लेखकासह अन्य काही कलाकारांनी आता संन्यास घेतला तरी चालेल, अशा प्रकारच्या चर्चा आता वारंवार होतात. तरीसुद्धा जे काही आरोग्यलेखन घडते आहे त्याला अजून तरी वाचकांची पसंती मिळताना दिसते. (अन्य काही विज्ञान लेखकांच्या मुलाखतीतून सुद्धा हा मुद्दा मांडला गेलाय). ती अजून किती टिकेल ते काही सांगता येत नाही. त्यामुळे आरोग्य काय किंवा अन्य प्रकारचे विज्ञानलेखन काय, किती काळ समाजात वाचले जाईल याचे उत्तर येणारा काळच देईल. जी माहिती विज्ञानपत्रिकांमधून जालावर सहज आणि अगदी प्रश्न-उत्तर स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे, त्यासंबंधी अन्य लेखकांनी वेगळ्या लेखन माध्यमांमध्ये मुद्दामहून असे सुलभ लेखन करावे किंवा नाही हा पुढील काही वर्षांमधला यक्षप्रश्न असेल. भविष्यात यदाकदाचित अशा प्रकारचे माहितीपर लेखन जवळपास बंद झाले तर ते विज्ञानलेखनातील एक मोठे समाजस्थित्यंतर म्हणावे लागेल.
*********************************************************************************************************
सुंदर आणि प्रांजळ लेख!
सुंदर आणि प्रांजळ लेख!
>या प्रकारचे विज्ञानलेखन, रंजक करू म्हटले तरी किती रंजक करणार, याला एक अंगभूत मर्यादा आहे. म्हणून लेखमालेचा अपवाद वगळता लागोपाठ स्वतंत्र आरोग्य लेख लिहायचे नाहीत असा मात्र प्रयत्न जमेल तितका करतो.
>त्यामुळे आरोग्य काय किंवा अन्य प्रकारचे विज्ञानलेखन काय, किती काळ समाजात वाचले जाईल याचे उत्तर येणारा काळच देईल.
लेख न लिहिता , तीच माहिती इतर स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे? कदाचित तुमचे लेखन एक नवीन सकारात्मक बदल निर्माण करू शकेल.
उदा.
मधुमेव , हृदयविकार या विषयावर किर्तन .
गर्भवती स्त्रियांसाठी स्त्रीगीते / ओव्या /लोकगीते जी त्यांना योग्य ती काळजी / आहार घेण्यासाठी मदत करेल.
डॉक्टर आणि पेशंट यांच्यातले सवाल जबाब - जे लावणी/तमाशामधे वापरता येतील
काही किर्तनकारांनी , स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात जागरुकता करण्यासाठी किर्तनाचा योग्य उपयोग करून घेतला. म्हणजे अ-पौराणीक विषयांवर किर्तनाची परंपरा आपल्याकडे आहे. पण वैद्यकीय / शास्त्रीय विषय त्यात आले नाहीत कारण त्यांना योग्य ते शिक्षण नव्हते. तुम्ही या प्रकारात लेखन करून भावी किर्तनकारांची एक मोठी सोय करून देऊ शकता.
हे पहा डॉ. विद्या अत्रेय यांनी लिहिलेल्या "वाघोबाचा खट्ला" या मह्त्वाच्या विषयावर एक शॉर्ट फिल्म निघाली होती.
https://www.youtube.com/watch?v=7FpXZqI2DUU
जे लोक वाचत नाही / वाचण्याची आवड नाही अशा लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचण्यासाठी याचा उपयोग होईल.
अजय,
अजय,
अतिशय चांगल्या सूचना आहेत ! विचार करेन.
वेगळ्या प्रकारची माध्यमे निवडताना आपल्याला कुठली जमतील याचा अभ्यास करावा लागेल. एक प्रयोग मात्र पूर्वी इथे केलेला आहे :
कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123).
जेव्हा ती महासाथ जाहीर झाली तेव्हा बहुतेक लेखन माध्यमांतून त्या आजारासंबंधी धोपटमार्गी माहिती प्रसिद्ध होतच होती. म्हणून मी तो मार्ग टाळून एक वेगळा मार्ग चोखाळला. त्या काळात मला असंख्य परिचितांकडून वेगवेगळे प्रश्न विचारले जात होते. सामान्य माणसांनी विचारलेले असे प्रश्न त्यांच्या भाषेत जसेच्या तसे ठेवून त्याची उत्तरे देणे, असा हा प्रश्नोत्तर धागा केलेला होता.
धन्यवाद !
सर्वच प्रतिसादकांना अनुमोदन.
सर्वच प्रतिसादकांना अनुमोदन. विशेषतः अजय यांनी सुचविले आहे त्यावर सवडीनुसार डॉक्टरांनी विचार करावा, असा काहीसा आगंतुक आग्रह.
प्रांजळ लेखन तर आहेच परंतु अचंबित करणारा लेखन-आलेख आहे.
डॉक्टरांनी ज्या वैविध्यपूर्ण अभ्यासपूर्ण लेखांची /प्रतिसादांची माबोकरांना 'निरोगी ' सवय लावली आहे, ती कायम राहण्यासाठी सुद्धा त्यांनी लिहितंच राहावं असं वाटतं.
अवांतर - सुरूवातीला 'मनातल्या मनात एक आरोळी ठोकली' हे वाचून थबकायला झालं. :स्मित : डॉक्टरांचं असं एक संयमित व्यक्तिमत्त्व (संदर्भ - लेख, प्रतिसाद व गटग फोटो) डोळ्यांसमोर असताना' आरोळी मारताना' मनात का होईना, ते कसे दिसतील? या विचाराने गंमत वाटली.
धन्यवाद हो !
धन्यवाद हो !
* आरोळी मारताना' मनात का होईना, ते कसे दिसतील? >>>
खरं सांगू का ? आपला उद्योग आणि सामाजिक संकेतांमुळे आपल्याला हे संयमितपणा वगैरेचे कवच धारण करावे लागते. मनातून मात्र अजूनही कॉलेजकुमाराचीच भूमिका पसंत असते !!
>>>>>>आपला उद्योग आणि सामाजिक
>>>>>>आपला उद्योग आणि सामाजिक संकेतांमुळे आपल्याला हे संयमितपणा वगैरेचे कवच धारण करावे लागते.
होयच
>>>मनातून मात्र अजूनही कॉलेजकुमाराचीच भूमिका पसंत असते !!
क्या बात है!
<मनातून मात्र अजूनही
<मनातून मात्र अजूनही कॉलेजकुमाराचीच भूमिका पसंत असते !!> एकदम सही ! पटेश
Pages