मुका घ्या मुका -चित्रपटाचे जे काही झाले ते

Submitted by अस्मिता. on 5 August, 2024 - 17:09

इन्फिनिटीवर उतारा म्हणून मी दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांचा 'मुका घ्या मुका' बघितला. सध्या झी क्लासिक वर 'दादा कोंडके मॅरेथॉन' चालू आहे. त्यात त्यांच्या चावट सिनेमांची जंत्री याप्रमाणे - आंधळा मारतो डोळा, मुका घ्या मुका, पांडू हवालदार, सोंगाड्या.

लहानपणी बघू दिले नाही म्हणून उट्टे काढायला गेले तर स्वतःचेच निघाले. आयुष्यात कुठलेही मॅरेथॉन न करता हे तरी करायला हवे अशी मनाने उचल खाल्ली पण तीही पूर्ण झाली नाही. पुढच्या वेळी, अजून काही म्हातारी थोडीच झाले आहे.

पहिला अर्धा बघितला नाही. मुका हा आपल्याला वाटतो तो मुका नसून मुकुंद नावाचा भाबडा- बोलता न येणारा गावातील सगळ्यात महामूर्ख मनुष्य आहे. तरीही याच्या आईचा आग्रह की याला 'भोळा' समजा. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय माने तयाचा खेद. आईचे एकवेळ समजून घेऊ. ती काही चार्जर हरवले म्हणून वनवासाला पाठवणाऱ्या हल्लीच्या कैदाशिणी आयांच्या गटात मोडत नाही. पण गावातील सगळ्यात श्रीमंत आणि सेक्सी मुलीचे पण हेच मत आहे. नक्की महामूर्ख कोण आहे???

श्रीमंत आणि सेक्सी मुलगी गावच्या पाटील टाईप माणसाची कन्यका असून घरी सुसज्ज बाथरूम असतानाही कधीमधी नदीवर आंघोळीला जाते.स्वच्छता फार प्रिय आहे हिला.

हा भोळसट तेथे येऊन तुषार कपूर आणि शक्ती कपूर दोघांचाही आजा असल्याप्रमाणे 'आ ऊ आ ऊ' करत तिला घरच्या बाथरूममध्ये(sexy lady on the (bathroom) floor) पिंपात बसून आणि नदीवर खडकाजवळ दोन्हीकडे अंघोळ करताना बघतो. विश्वास ठेवा, काहीही सुंदर नाही यात. दोन चार 'आ ऊ' बाथरूमबाहेरही होतात, त्यात तिला हा भोळा आहे आणि आता आपल्यालाच याच्यावर प्रेम करणे भाग आहे असे वाटते. बाबा म्हणतात, ' दुसरे कोणी सापडले नाही का, हा मूर्ख आहे आहे'.... duh. प्रेमात पडलेली स्त्री जगातील सगळ्यात महामूर्ख स्त्री असू शकते.

सगळं गाव याला 'मुका' म्हणत असते, घेत मात्र कोणी नाही. चुकीचा संदेश दिला आहे. एकेदिवशी रेड्यासहित फोटो असलेल्या यमाची पूजा करून याला वाचा फुटते आणि हा इतकं द्वयर्थी बोलायला लागतो की आई हात-पाय-तोंड बांधून मारते. सगळं गाव आधीपासूनच मारत असते, त्यांना फारसा फरक पडत नाही. हा सुधारावा म्हणून कसलेतरी हवन करतात. त्याची पूर्वतयारी चालू असताना हा पंथाला लागल्यासारखे करतो व 'ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ' याचे संगीत वाजते. हे चालू असताना खाली सतत झी वरील दुसऱ्याच कशाची तरी जाहिरात म्हणून मोठे स्क्रीन व्यापी गजानन महाराज येऊ लागले. योग आणि भोग बघून टडोपाच.

मुक्याला नटीचे बाबा म्हणतात 'एक लाख आणून दे, तरच लग्न लावून देईन. पोरगी अशीही ऐकेना, जीव देण्याची धमकी देऊ लागली. 'फणसाच्या झाडा खाली भेटू' वगैरे म्हणून अंगविक्षेप सुरू झाले. उगाच नाही थोर म्हणून गेले आहेत 'खेड्याकडे चला'. या शेतीवाडी- झाडांमुळे मिळणाऱ्या स्वातंत्र्यापुढे अमेरिकन हुक-अप्स सुद्धा मागासलेले वाटावेत. आता 'मोळी विका पण शाळा शिका' चा अर्थ शोधणे आले. जीवनातले संशोधन काही संपत नाही.

ह्या दोन सहस्रमूर्खांपुढे सासरेबुवा-व्हिलनचेही अवसान गळते. मुक्या डायरेक्ट ट्रेन पकडून मुंबईला निघाला. स्टेशनवरही 'हॉट टमाले'ने मिठ्या मारल्या. 'सांभाळून जा' या दोन शब्दांसाठी सुद्धा बराच चावटपणा केला.

एकदाचा रेल्वेत बसला, त्याच डब्यात सुळसुळीत रोब घातलेले श्रीमंत गृहस्थही बसले होते. वरिजनल श्रीमंत न वाटता गणेश मंडळातील नाटकातले श्रीमंत वाटत होते. त्यांच्याशी विनाकारण भांडणं उकरून काढली आणि पुन्हा कमरेची साखळी व रेल्वेतील ओढायची साखळी यावर द्वयर्थी संवाद व मारामारी केली.

नंतर खाली सतरंजी टाकून त्यावर भाकरी भाजी व कांदा यांची पिकनिक केली. हे बघून मला एकदम खावेच वाटले. Happy रात्री निरवानिरव झाल्यावर दोघे- हा खाली आणि रोबवाला आपापल्या बर्थवर- पडलेले असताना चोर येऊन अर्थातच रोब वाल्यावर सुरीने हल्ला करतो. कशाला घालावा रोब? तेव्हा मुका मधे पडून त्याचा जीव वाचवतो. मग म्हातारे इतके खुष होते की त्याला घरी नेऊन स्वतः लाख रुपये देऊ करते. त्याला लक्षात येतो की वरून कितीही महामूर्ख, मंद, आचरट, उथळ, बावळट, लंपट , उद्धट (अजून किती दुर्गुणं लिहू?) वाटला तरी मनाने साधाभोळा आहे. जवळजवळ नाड्याची चड्डी घातलेला कुणी साधुसंतच..! तो श्रीमंत याने दिलेले वीस रू एकदम डोळ्याला लाऊन प्रसादासारखे ठेवून घेतो.

हा महामूर्ख लग्नाची स्वप्नं बघत परतीच्या प्रवासाला लागतो.
एकुणएक गाण्यात एवढा आचरटपणा आहे की गाणे थोडे लांबले असते तर दोन-चार लेकरेही झाली असती.

रेल्वेच्या डब्यात भरपूर गर्दी असते व एक भारीचे केशरी टर्टलनेक स्वेटर घातलेली संशयास्पद व्यक्ती सोडून बाकी धोतरटोपीवाली गरीब-जनताच असते. संशयास्पद व्यक्ती संशयास्पद असल्याने भुरटा चोर असते. इकडे या वेड्याने 'गाय छाप बिडी' लिहिलेल्या पोत्याच्या पिशवीत लाख रुपये ठेवलेले असते. चोर त्याकडे बघतच असतो. हा मंद त्याला म्हणतो 'नाहीतरी तुम्ही उचल्यासारखे हिकडं तिकडं बघत आहातच, तर मी झोपेन तुम्ही या पिशवीकडे लक्ष ठेवा, यात एsssक लाsssssख रूपये आहेत.' झोपेत भक्कम नटीसोबत अजून एक आचरट गाणे होते. तोपर्यंत चोर सगळं लंपास करतो.

हा परत येतो व स्टेशनवर याच्यावर कुणीही विश्वास न ठेवल्याने बेदम मार खातो. वर्षानुवर्षे असलेल्या प्रतिमेपायी मार खाण्याची ही काही पहिलीच वेळ नसते. आपल्याला काहीच आश्चर्य वाटत नाही. कुणीतरी पोलिस बोलावून आणते, पोलिस चोर शोधून आणतात. तोपर्यंत हिरोईन सगळ्यांच्या हातापाया पडते. 'सोडा हो माझ्या भोळ्या सांबाला' टाईप. पुन्हा अचानक ते नकली श्रीमंत सद्गृहस्थ येऊन नोटांची ओळख सांगतात व हिला कळवळून 'आज पासून मला आबा म्हण, पोsssssरी' म्हणतात व डोक्यावरून हात फिरवतात.
शेवटी मुका मंदिरात जात असताना गाभाऱ्यातील घंटा लागून डोक्यावर परिणाम होऊन (इतका वेळ काय होतं मग ?) पुन्हा वाचा गमावतो.

मी अर्धवट/तुकड्यातुकड्यात बघितला आहे, सुरवातीचा बघावा म्हटलं तर तो भलताच चावट होता, बघूच शकले नाही. चावट असण्यापेक्षा जास्त भीती मी 'जसा आहे तसा' लिहिण्याची होती. Lol

मराठी चिकवावर लिहायला सुरुवात केली पण पोस्ट लांबली.
-अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९८८ हे जबरदस्त वर्ष होतं.

सचिन ने बनवाबनवी केला याच वर्षी.

ब्लाॅकबस्टर्स-

कयामत से कयामत तक
तेजाब
बीबी हो तो ऐसी
खून भारी मांग
दयावान
हत्या
वारीस
शहेनशाह

चाललेले-

राम अवतार
जीते है शान से
घर घर की कहाणी
दरिया दिल
प्यार का मदीर
पाप की दुनिया
सोने पे सुहगा
जखमी औरत
कातील
गंगा जमना सरस्वती
यतीम
आखरी अदालत
वीराना

क्लासिक्स-

सलाम बाॅंबे
पेस्तनजी

'दिठी' वर लिहून मीही पापप्रक्षालण केले आणि आणि तुमच्या पोस्टींनीही दग्धता नाहीशी झाली साजिरा. Happy

छान लिहिलेले साजीरा, आवडली पोस्ट.
दादांची जुनी गाणी कानावर आली की मी पण बालपणात पोचतो. अर्थाचा काही संबंध नाही. कुठे तरी लग्नाचा मांडव घातलेला तिथे कामं सुरू आहेत आणि ही गाणी लाऊडस्पीकरवर वाजत आहेत आणि आम्ही कुठंतरी गोट्या, विटी दांडू वगैरे खेळत आहोत असं दृश्य डोळ्यापुढे येतं.

हे टायटल सुचल्याची काय स्टोरी आहे, ते बघितलं पाहिजे
>>>>
याला फेसबुक वर प्रकाश ठुबे ऊर्फ मायबोलीवरचे रॉबीनहूड यांनी दिलेलं उत्तर, विषय चालूच आहे तर त्यांच्या परवानगीने पेस्ट करून ठेवतो—
..
राम राम गंगाराम टायटलची कुळ कथा अशी आहे की 1975 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी आणल्यानंतर सर्वत्र मोठे कडक वातावरण झाले व सरकारच्या विरोधात आवाज काढण्याची कोणाचीही प्राज्ञा नव्हती या आणीबाणी सोबतच इंदिरा गांधींनी गरीब वर्गासाठी एक वीस कलमी कार्यक्रम आणला होता त्यामध्ये अनेक समाजवादी योजना होत्या उदाहरणार्थ कमी उत्पन्न गटासाठी घर बांधणी अतिरिक्त जमिनीचे गोरगरिबांना वाटप इत्यादी सामाजिकन्यायाच्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या त्याला त्याकाळी 20 कलमी कार्यक्रम असे म्हटले जायचे समकालीन सामाजिक राजकीय गोष्टींचा आपल्या कलाकृतीमध्ये समावेश करून व त्यावर कॉमेंट करून टायमिंग साधण्याची समय सूचकता दादांच्या मध्ये होती त्यामुळे तर त्यांचे चित्रपट आणि मूळ त्यांचे नाटक इच्छा माझी पुरी करा ही पॉप्युलर झाले होते आणि त्यामुळे त्यात फ्रेशनेसही राहायचा. राम राम गंगाराम चित्रपट निर्माण झाला त्यावेळी त्याचे नाव दादांनी गंगाराम वीसकलमे किंवा गंगाराम इसकलमे असे ठेवले होते म्हणजे घोषित केले होते परंतु त्यावेळी असलेली आणीबाणी आणि सत्तारूढ पक्षाची दादागिरी लक्षात घेता हा चित्रपट सरकारची टिंगल आहे असे वाटून सेंसर च्या तावडीत सापडेल अशी दादांना भीती वाटल्यामुळे व आर्थिक नुकसान होईल असे लक्षात आल्यामुळे त्यांनी त्या चित्रपटाचे नाव सौम्य केले आणि राम राम गंगाराम असे ठेवले
..

आमच्याकडे दादा कोंडकेच्या एका सिनेमाची ऑडिओ टेप होती.त्यात संन्याश्याच्या उपयोगी गोष्टी तीनच, छाटी, कुबडी आणि मंडलखंडलू असा काहीतरी डायलॉग होता.
कधी पाहणं झालं नाही.पण लक्ष्या अशोक लोकांना त्या वेळी विशेष आवडायचे नाहीत, आता नॉस्टॅल्जिक म्हणून बनवाबनवी प्रचंड आवडतो, तसंच कोंडके चित्रपटांचं पण होत असेल.
अजून 15 वर्षांनी कोणीतरी 'ऍनिमल, एंटरटेनमेंट सारख्या दर्जेदार कलाकृती आमच्या काळात बनायच्या. सुवर्ण काळ होता तो.आताच्या फडतूस न्यूड सॉंगस सारखं भिकार प्रकार नव्हता' सारखं काहीतरी उसासे सोडून लिहीत असेल.
(या माझ्या प्रतिसादाला मूळ लेखास कॉम्प्लिमेंटरी असं एकही मूल्य नाही. पण असे प्रतिसाद असले अधून मधून की मग लेखातले इतर हिरे प्रतिसाद झळाळून निघतात Happy )

रौप्यमहोत्सवी (सलग २५ आठवडे चालणाऱ्या) सर्वाधिक नऊ चित्रपटांसाठी दादा कोंडके यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली

खरं आहे ते. एक काळ होता लक्ष्या च्या त्याच त्या लकबी, अशोक सराफचा अतिपरीचयाने किंमत न राहिलेला विनोद असे सगळे सुरू होते. अशीही बनवाबनवी ची चर्चा त्याकाळात जितकी झाली नसेल तितकी आता सुरू आहे. केवळ नॉस्टॅल्जियाच आहे बाकी काही नाही. दादांच्या चित्रपटांचा एकूण कालखंड आणि ते चित्रपट हे एकंदर मिश्रण खरंतर चांगल्या आठवणी निर्माण करण्यापेक्षा अस्वस्थ करणारंच अधिक होतं त्या काळात.

Biggrin उताऱ्यावर उतारा घ्यायची वेळ आणावी असा चित्रपट आहे! धमाल लिहिले आहे.
स्वछतेची आवड, खेड्याकडे चला, मोळी विका पण शाळा शिका, योग आणि भोग, हॉट टमाले >>अगदी चौके पे चौका Lol
चावट असण्यापेक्षा जास्त भीती मी 'जसा आहे तसा' लिहिण्याची होती>> सिक्सर Biggrin

लहानपणी नुसते ऐकून असायचो. बघायची परवानगी (आणि हिम्मत) नव्हती. गाणी बरीच गाजायची, ती रेडीओवर ऐकली जायची. उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर तर असलीच गाणी म्हणतात, असा माझा गैरसमज झाला होता. ते लोंबणाऱ्या नाडीवाल्या चड्डीतले फोटो डोक्यात इतके फिट बसले होते की नंतर ' जीवा शिवाची बैल जोड ' ह्या गाण्यातला नट दादा कोंडके आहे ह्यावर विश्वास बसला नव्हता.

लिहिलंय छान पिसे काढून एकदम.
दादांच्या चित्रपटात जुनं गाव दिसतं ते बघायला आवडतं आता. बाकी डबल मिनींग जोक आवडण्याच्या वयात ( इयत्ता 6 ते 9 वी वै ) चित्रपट आवडला असता कदाचित.
आता बघू शकणार नाही.

दादांचे सुरुवातीचे सिनेमे चांगले होते, त्यातले काही विनोद अजूनही आठवतात.

एका सिनेमात दादा नायिकेला (जी इंग्लिश मध्ये एम ए असते) इंग्लिश शिकवत असतात, गायीचे पाय दाखवून हे लेग, शेपूट दाखवून हे टेल वगैरे शिकवून झाल्यावर नायिका आचळाला हात लावून याला इंग्रजीत काय म्हणतात असे विचारते तर ते वेळ मारून नेण्यासाठी म्हणतात 'ईंग्लिश गायीला ते नसतय'

दुसर्‍या एका सिनेमात अध्यात्मिक गुरू (रजनीश चे पॅरोडी) प्रवच देताना 'काल माझ्या स्वप्नात आत्मा व परमात्मा आले होते, आत्म्याने परमात्म्याला काय विचारलं असेल ?' असे विचारतात तर दादा 'पादुका' असे ओरडतात. कारण दादांकडे पादूका सांभाळायचे काम असते (नाव पादुकानंद) व एक गोरा माणून नेमका तेव्हाच दादाना विचारतो की 'हे काय आहे ?'

दादांच व व्ही शांताराम यांचे पटत नसे. एका सिनेमात दादा गटरीत जातात व विविध वस्तू घेऊन येतात असे ओह्ते त्यात पिंजराही होता.

नंतर नंतर त्यांचे वयही दिसायला लागले व विनोदही ओढून ताणून केलेले होते.

साजिरा, खूप सुरेख पोस्ट! गाण्यांच्या बाबतीत भूतकाळात नक्कीच जायला होतं. अजूनही मला दादांची गाणी ऐकूनच माहीत आहेत, प्रत्यक्षात पाहिलेली नाहीत. कधी बघेन असं वाटत नाही, कारण दोन गोष्टी - उषा चव्हाण आणि दादांचा तो अवतार! त्यावेळी कोल्हापूरला नेहमी जाणं व्हायचं, तिथे दादांच्या सिनेमांची प्रचंड क्रेझ असे.

दादांनी तेव्हाच्या "असला नवरा नको गं बाई" पिक्चरच्या नावाला उत्तर म्हणून "ह्योच नवरा पाहिजे" हे त्यांनी त्यांच्या एका पिक्चरचे नाव मुद्दामून ठेवले असे वाचले आहे Happy

बनवाबनवी रिलीज झाला तेव्हाही बराच चालला होता. नंतर त्याचा कल्ट मूव्ही झाला पण मुळात तो हिट होताच.

या स्टार्स बद्दल काही ढोबळ अंदाज सहसा लागू पडतात. हे अगदी अ‍ॅक्युरेट नसते त्यामुळे लगेच अपवाद सापडतीलच पण, दादांची गाणी जर जयवंत कुलकर्णीच्या आवाजात असतील तर पिक्चर चांगला, महेंद्र कपूर असेल तर नंतरच्या काळातला. लक्ष्याची "हेअर स्टाइल" असेल तर स्टार झाल्यावरचा पिक्चर व विनोद जेन्युईन लक्ष्यास्टाइल असायची शक्यता कमी. हेच प्रॉपर कटिंग केलेले केस असतील तर तो ओरिजिनल लक्ष्या (हिंदीत हेच तंतोतंत राजेश खन्नाबद्दल) Happy अशोक सराफ बद्दल असा अंदाज मला तरी लावता येत नाही. मुळात त्याचे वाईट रोल्स कमीच असतील.

अजून 15 वर्षांनी कोणीतरी 'ऍनिमल, एंटरटेनमेंट सारख्या दर्जेदार कलाकृती आमच्या काळात बनायच्या. सुवर्ण काळ होता तो.आताच्या फडतूस न्यूड सॉंगस सारखं भिकार प्रकार नव्हता' सारखं काहीतरी उसासे सोडून लिहीत असेल. >>> नक्कीच. प्रत्येक जनरेशनचे नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू असलेले पिक्चर्स असतील. मला टुकार वाटणार्‍या पिक्चर्स व गाण्यांबद्दल हळवे होऊन लिहीणारे (आणि ते त्या काळात जन्मले याबद्दल स्वतःला लकी समजणारे) लोक पाहिले आहेत. फेबुवर ग्रूप्स आहेत Happy मी ते लेख आवर्जून वाचतो. या लोकांना त्यात इतके काय सापडते या कुतूहलाने. बहुतेकांच्या कॉलेजच्या काळाशी संबंधित या आठवणी असतात.

आमच्या काळात बंद दरवाजा बेडरूम का, भागता हुआ शैतान, मुर्देघर का बिल्ला, तयखाने मे धामधूम असे भावनाप्रधान चित्रपट बनायचे.
गेले ते दिवस.

मला अशोक सराफ या सगळ्यांपेक्षा चांगला अभिनेता वाटतो. लक्ष्या, सचिन, महेश कोठारे, दादा कोंडके, समकालीन सगळेच. अगदी राजा गोसावी वगैरेंपेक्षा सुद्धा.

आमच्याघरी मुलांपर्यंत दादा कोंडकेचे 'नामोनिशान' येऊ द्यायचे नाहीत. बिघडण्याच्या काळातील शाळेनंतरची प्रत्येक संध्याकाळ संस्कृत पाठशाळेत पाठवायचे. दूरदर्शन वरही काही लागायचे नाही, नाहीतर अजून किती बिघडलो असतो काय माहिती. एकट्या अमिताभचे सोडून दुसरे पुष्कळ सिनेमे बुडाले, त्यामुळे आता भरून काढावे लागतेय. ह्या एकाच तासात दादांच्या सगळ्याच सिनेमांचा आयुष्यभराचा कोटा संपला.
झकासरावांना मम. Happy

हॉट टमालेचे श्रेय Adam Sandler च्या Mr. Deeds ला द्यायचे राहिले. तोही चावटच आहे जरा Lol
अनु Lol , असे काही नाही.
धन्यवाद सर्वांना. Happy

प्रत्येक जनरेशनचे नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू असलेले पिक्चर्स असतील.
>>> आमच्या काळातले(?) कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, राजा हिंदुस्तानी, ताल, हम दिल दे चुके सनम, मोहब्बते, यादें, हम साथ साथ है, परदेस वगैरे आठवतात. यत्किंचितही हळवे होता येत नाही, त्यात 'पीडा गेली' टाईपचे समाधान आहे उलट Lol

अस्मिता Lol
सगळ्यांच्याच पोस्टस मस्त.

मला अशोक सराफ या सगळ्यांपेक्षा चांगला अभिनेता वाटतो >>> +१ मला 'गजरा' च्या काळातला आणि सुरूवातीचा लक्ष्या पण आवडतो Happy

>>>>>दादा कोंडके चा एकही सिनेमा पाहिलेला नाही मी.
सेम हियर. पहाणारही नाही.
एक तर सिनेमात अडिच तीन तास भुर्रकन उडून गेले की वैफल्य येते. याचा अर्था हा नाही की त्या काळात काही महान कार्य हातून घडणार असते पण लहानपणापासूनच टिव्ही, सिनेमा वरती बंदी होती. घरात टिव्हीच नव्हता मला वाटतं कॉलेजमध्ये गेले व टिव्ही आला.

साजिरा, मस्त दीर्घ पोस्ट.

दादा कोंडकेचे काही सिनेमे लहानपणी थेट्रात पाहिलेले आहेत.

अंजनीच्या सूता - हे गाणं मलाही फार आवडतं.
शाळेतून चालत घरी यायचो त्या रस्त्यावर कुठे ना कुठे हे लाऊडस्पीकरवर वाजत असायचंच.

पण आमच्या पिढीतही दादांचा सोंगाड्या मागे पडला होता, दादांचं (आणि उषा चव्हाणचंही) वय पडद्यावर दिसायला लागलं होतं.
नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यात सरळ सरळ दोन गट पडायचे - दादा कोंडके आवडणारे आणि न आवडणारे.
आमचे नातेवाईक पहिल्या गटात.
दादा कोंडके हा काहीतरी भारी करणारा माणूस, पण ते भारीपण आता मागे पडलंय, इतकं तेव्हा उमजलं होतं.

दादा द्वैअर्थी संवाद आणि गाणी लिहितात असा आरोप नेहेमी केला जायचा त्याला प्रत्युत्तर म्हणून दादांनी आव्हान स्वीकारून "अंजनीच्या सूता" गाणे लिहिले असे कोठेतरी वाचल्याचे स्मरते.

ख खो दा जा.

Pages