मी पहिल्यांदाच - बर्फात घसरुन पडलो... ('शमोनिक्स'चे प्रवासवर्णन)

Submitted by सॅम on 13 June, 2009 - 20:12

तसं या वेळी मी बर्‍याच गोष्टी पहिल्यांदाच केल्या. जसं,
- पहिल्यांदाच जवळपास ताशी २५० कि.मी. वेगाने प्रवास केला (अर्थात जमिनीवरुन... हवेत केला तर काय विशेष)
- पहिल्यांदाच बर्फाच्छादीत पर्वतावर गेलो
- पहिल्यांदाच समुद्रसपाटीपासुन ३८४२ मी उंच जमीनीवर गेलो

मी बोलतोय आमच्या शमोनिक्स प्रवासाबद्दल. 'शमोनिक्स-मों ब्लाँ' हे त्या जागेचे नाव (शमोनिक्स हे त्या दरीचं/व्हॅलीच नाव). त्यातले मों ब्लाँ (Mont Blanc) हे पश्चिम युरोपातील सर्वात सर्वोच्च शिखर (उंची ४८१० मी). ते आल्प्स पर्वतरांगेत फ्रांस-इटली सीमेवर आहे. माझा फ्रेंच बॉस शमोनिक्सचे फार कौतुक करायचा, त्यामुळे एका सलग चार दिवस सुट्टीला आम्ही तिथे जायची तयारी सुरु केली.

... ताशी २५० कि.मी. वेगाने प्रवास
पहिल्यांदा, रेल्वेचं तिकिट काढलं, साध्या सुध्या नाही, तर टे.जे.वे (TGV). (Train à Grande Vitesse) म्हणजे फ्रेंच अतिवेगवान रेल्वे. तरी एक कोड होतं ते म्हणजे लागणारा वेळ. पॅरिस-शमोनिस्क टीजीव्ही नी सहा-सात तास लागतात, त्यापेक्षा पॅरिस-मार्सेअ हे अंतर जास्त असले तरी तीनच तास लागतात. याच उत्तर आम्हाला प्रत्यक्ष गाडीत मिळालं, अतिवेगवान ते अतिशय संथ असा या गाडीचा प्रवास... टीजीव्ही ही अतीवेगवान गाडी किती संथ जाउ शकते ते पण आम्ही अनुभवलं!!

गाडी सुटल्यापासुन मला उत्कंठा लागली होती कधी एकदा आपण फुल फास्ट जातोय... पण खरं सांगु का, काही खास वाटत नाही हो! वेगाबरोबरच वाहन कोणतं यालापण महत्व आहे. जसं माझ्या भावाची स्पेंडर ताशी ५० च्या वेगाने व्यवस्थीत जाते, पण ६० ओलांडला की स्पीडोमिटर कडे न बघताच कळतं की आपण फार वेगात चाललोय... तेच माझ्या पल्सर वर ७० ओलांडले तरी काही वाटत नाही!

आणि गाडी जशी डोंगराळ भागात शिरली, तसा गाडीचा वेग मंदावला... गाडीतुन बाहेर छोटी घरं, गवताचे कुरण आणि त्यातल्या गाई दिसायच्या, जसं काही सुंदर चित्रच. पण अंधार पडल्यावर ते पण दिसेना, मग आम्ही पत्यांचा कॅट काढुन मस्तपैकी रमी खेळत बसलो.

एक मानलं पाहिजे, ही फ्रेंच लोकं केवढी शांतता पाळत होती. तिथे तसं लिहिलं पण होतं (पण म्हणजे पाळायलाच पाहिजे असं थोडीच) फोन करायला/घ्यायला पण जागेवरुन उठुन, पार्टिशनपलिकडे, ड्ब्याच्या शेवटी जायची. आमच्या दोन सीट मागे एक लहान मुलगा होता, त्याचा आवाज थोडा वाढला तरी त्याचे आई/बाबा तो खाली आणायचे... असं नाही की लहान मुलगा आहे, आवाज होणारच. तुलनाच करायची तर हॉलंडशी करु (हो... आपल्याशी नाही हो करत... तुमच्या प्रतिक्रीया माहिती आहेत मला :)), हॉलंडमधल्या गाडीत आमचं डोकंच उठलं होतं. जो तो एवढा जोरात बोलत होता काही विचारु नका.

आम्ही पॅरिसहुन दुपारी निघालो आणि रात्री आमच्या स्टेशनला पोचलो. तिथुन बसनी शमोनिक्स्-मों ब्लाँ. तिथुन हॉटेलला चालत! रात्री १२ ला तर पॅरिसपण सुनसान असतं... त्यामुळे आधीच फोन करुन आम्ही हॉटेलमधे चौकशी केली होती. पण इथे तर रस्त्यावर बरीच लोकं होती, बरीचशी हॉटेल्सपण (खाण्या/पिण्याची) उघडी होती.

... बर्फाच्छादीत पर्वतावर
एखाद्या सुंदर जागी जायच असेल तर असंच रात्री काहीही न पाहाता गुपचुप जाउन झोपाव, मग सकाळी उठल्यावर एकदम समोर जे सौदर्य दिसतं... जवाब नही! सकाळी उठल्या उठल्या हॉटेलच्या बाल्कनीमधुन समोर दिसणारे बर्फाचे डोंगर! आ हा हा... काय नजारा होता.

शमोनिक्स ही फ्रेंच आल्प्स मधिल दोन लांबलचक डोंदररांगांमुळे तयार झालेली एक चिंचोळी दरी आहे. रुंदीला १ कि.मी. तर लांबी ७-८ कि.मी. समुद्रसपाटीपासुन उंची साधारण १००० मी. थंडीत गावातही बर्फ असंत. आम्ही गेलो होतो मार्च मधे. तेंव्हा थंडीचा म्हणजे पर्यायाने स्कि-सिझन संपायला आला होता. गावात बर्फ नव्हतं. इथे तसं वर्षभर पर्यटक येतंच असतात. थंडीत स्की करायला तर उन्हाळ्यात सायकलिंग, जंगल ट्रेल्स, पर्वतारोहण याकरता.

पहिल्या दिवशी उठल्यावर, आजुबाजुचे बर्फाचे डोंगर बघुन मन भरल्यावर (खरतर आता लांबुन बघुन भागत नव्हत, तर त्या बर्फात जायच होतं) आम्ही आवरुन आम्ही शमोनिक्सच्या पर्यटन विभागात गेलो. इथे युरोपात आम्ही सर्वात पहिल्यांदा पर्यटन ऑफिसमधेच जातो. सगळी माहीती अगदी फर्स्ट हँड मिळते! शिवाय सगळी माहितीपत्रकंपण मिळतात, हवामानाचा अंदाज कळतो. इथेही आम्हाला व्यवस्थीत माहीती मिळाली.

इथे सगळे स्की करण्यासाठीच येतात... इतर पर्यटकांसाठी स्थळं अशी दोनच, अ‍ॅगुय-दु-मिडी हे शिखर आणि मेर-दु-ग्लास नावाची हिमनदी. बाकी इथे बर्‍याच केबल कार आहेत. त्यातल्या ज्या अगदीच उघड्या-बाघड्या नाहीत त्यात आपणही जाउ शकतो. बाकीच्या लिफ्ट (हो इथे केबल-कारला लिफ्ट म्हणतात) खास स्की करणार्‍यांसाठी आहेत.

मग उरलेल्या आर्ध्या दिवसात आम्ही अशाच दोन लिफ्टमधुन वरती जाउन आलो.

हिवाळ्यात 'स्की' हेच मुख्य पर्यटन आकर्षण असल्याने गावात हात-पाय मोडलेले बरेच लोक दिसतात!! इथे अमेरिकन/ब्रिटीश पर्यटक चिक्कार आहेत... अगदी पॅरिसपेक्षा जास्त! बाकी आफ्रिकन, मंगोलियन, देसी फारच कमी दिसतात. सगळ्या ठिकाणी व्यवस्थीत इंग्लिश बोलतात, त्यामुळे फ्रांसमधे आहोत असं वाटतच नाही :).

... समुद्रसपाटीपासुन ३८४२ मी उंच
दुसर्‍या दिवशी सकाळीच आल्प्समधील अ‍ॅगुय दु मिडी या शिखरावर जायचं ठरलं. तिथे जायला दोन लिफ्ट बदलुन जावं लागत. सकाळी लवकर गेल्यामुळे गर्दी बेताचीच होती. लिफ्ट्सनी जाताना आम्ही १००० मी पासुन ३८४० मी वर गेलो, साधारण २० मिनीटात! कानाला काय जबरदस्त दडे बसले (परत खाली आल्यानंतर तर अर्धा तास मला नीट ऐकुच येत नव्हते).

वर गेल्यावर पाहिलं तर जोरात वारा, ढग आणि बर्फ पडतोय! इथुन पुढे अजुन वर जायला काही जिने आहेत. एक सोव्हेनिअरचे दुकान आहे आणि हे सगळ शिखराच्या आतमधे कोरलेलं (फोडलेलं), बाहेर फक्त काही observation decks एक शमोनिक्स कडचा तर दुसरा मों ब्लाँ कडे. या जिन्यांवरन चढताना जाणवलं पटपट चढलं तर लवकर दम लागतोय... 'उंच ठिकाणी हवा विरळ होत जाते' हे फक्त पुस्तकात वाचलं होतं. ढग असल्यामुळे वरुन तसं आम्हाला काही दिसलं नाही Sad

या ठिकाणाहुन एक मार्ग शमोनिक्सच्या विरुद्ध बाजुस उतरतो. त्या पलिकडल्या दरीच नाव आहे 'वॅली ब्लाँश' (म्हणजे पांढरी दरी). धाडसी स्कीअर लोकांसाठी इथुन एक परिक्रमा सुरु होते, आपल्या स्कि घेउन डोंगरावरुन खाली दरीत उतरायच - तिथुन हिमनदीवरुन स्की करत मेर्-दु-ग्लास च्या शेवटपर्यंत जायच. या मार्गाची विशेषता म्हणजे, no patroling, no avalanche control, you are on your own...

आम्ही तो मार्ग पाहायला गेलो, जिथे तो मार्ग सुरु होतो तिथे एवढा बर्फ-वारा होता की पाच मिनिटात आम्ही आतमधे आलो. आणि ही लोकं १०-१५ च्या गटने गाइडबरोबर स्की खांद्यावर घेउन खाली उतरत होते!

इथुनच अजुन एक केबल कार जाते हेलब्रोनर या दुसर्‍या शिखरावर... 'वॅली ब्लोंश' पार करुन थेट इटलीत!! अशा प्रकारे केबल कार मधुन एखाद्या देशाची सीमा पार करण दुसरीकडे कुठे शक्य नसणार. पण ही केबल कार फक्त उन्हाळ्यात (आणि ते ही हवामान चांगले असेल तर) चालु असते त्यमुळे आर्थात आम्हाला जाता आले नाही :(.

तिथुन खाली आल्यावर निघालो हिमनदी बघायला... तिचे नाव 'मेर्-दु-ग्लास', म्हणजे बर्फाचा समुद्र. तिथे जायला शमोनिक्स स्टेशनहुन एक छोटी गाडी घ्यावी लागते, त्याला कॉग रेल्वे म्हणतात, चाकांबरोबरच डोंगराचा चढ चढण्यासाठी रॅक-पिनियन पण असते. आपल्याकडे दार्जिलिंगला आहे तशी. हा प्रवासही अतिशय सुंदर... मस्त उन पडलेलं, गाडी हळु हळु डोंगर चढतेय, डावीकडे दरीत शमोनिक्समधील छोटी छोटी घरं, काहिंच्या छतावर अजुनही बर्फ आहे, उजवीकडे पाइनचे जंगल, जमीन सगळी बर्फाच्छादित, हा बर्फपण कोणीही न हाताळलेला, एक नाजुक थर...

हे सगळ पाहात पाहात थोड्या वेळातच आम्ही त्या डोंगराच्या पलिकडल्या बाजुस पोचलो. उतरुन थोडे पुढे गेल्यावर समोर दोन डोंगरांमधुन येणारी हिमनदी दिसली. तशी जास्त मोठी नव्हती आता, हिवाळा संपला होता त्यामुळे असेल कदाचीत.

तिथे खाली बर्फात गुफापण आहेत पण त्याही बंद होत्या. वर सांगितलेले अ‍ॅगुय दु मिडी पासुन ट्रेक सुरु करणारे 'धाडसी' लोकं नदीवरुन स्की करत येताना दिसत होते. स्की पुन्हा पाठीवर घेउन ही लोकं चढुन वर येत होती. थोडावेळ तिथे थांबुन आम्ही त्याच कॉग रेल्वेने परत आलो.

त्या संध्याकाळी गावात हिंडलो. रात्रीचा बेत म्हणजे खास अल्पाइन जेवण, फॉन्डु आणि सावोयार्ड वाइन!

फॉन्डु म्हणजे टेबलावर छोट्या विस्तवावर एका भांड्यात वितळलेले चीज असते, त्यात आपल्या आवडी प्रमाणे मसाले किंवा मशरुम किंवा बीफ वगैरे असते. आपण ब्रेडचे तुकडे त्यात बुडवुन खायचे. ज्यांना चीज आवडत नाही त्यांनी विचारही करु नये. पण मी चीज चा 'पंखा' असल्याने माझं Spices & Herbs वालं फॉन्डु संपवुन बायकोचं Mushroom वालं फॉन्डु पण खाल्लं (ती नाहिये पंखा Happy )!
असं फर्स्ट-क्लास जेवण झाल्यावर मस्तपैकी हॉटेलमधे येऊन ताणुन दिलं.

... बर्फात घसरुन पडलो
एवढे दिवस सगळ्यांना स्की करताना पाहुन मलापण खुमखुमी आली होती. तशी माहीती पण काढली होतीच, माझे स्कीचे ज्ञान शुन्य असल्याने मला पहिल्यांदा थोडे शिकावे लागणार होते. सकाळी २ तासाची सामुहीक शिकवणी - २० युरो मधे. स्की-बुट चे आख्या दिवसाचे भाडे २० फक्त युरो... हो फक्तच म्हणायचे, २० युरो म्हणजे दोन वेळचे जेवण, रुपयात बोलायचे तर त्याचे मुल्य १०० रु.

तश्या नवीन गोष्टी मी लवकर शिकु शकतो (असं मला आत्तापर्यंत तरी वाटत होतं!) पण इथे ते बुट आणि स्की हातात घेतल्यावरच मला जाणवलं की आजचा दिवस वेगळा आहे!!! ते बुटच ५-६ किलोचे होते, शिवाय त्या स्कीपण धातुच्या, चांगल्याच जड होत्या. तो सगळा जामानिमा करुन आम्ही सगळे (माझ्याबरोबर अजुन ६-७ नवशिके होते) आमच्या शिक्षका पाठोपाठ एका छोट्याश्या उतारापाशी गेलो. आधी त्याने आम्हाला स्किवर चढायचे कसे ते शिकवले, मग पुढे कसे जायचे, बाजुला कसे जायचे, थांबायचे कसे ते शिकवले. हे होइपर्यंतच मला घाम फुटला होता. माझ्या कडे स्की करताना घालायचे कपडे नव्हते त्यामुळे थंडी वाजु नये म्हणुन मी येतानाच दोन टी-शर्ट-त्यावर पुलओव्हर-वरुन जॅकेट असं घालुन आलो होतो. आता हे सगळ नकोसं होऊ लागलं. स्की करताना घाम येइल, आपण दमु असं मला वाटलंच नव्हत. खाली बर्फ आणि वरती घामाच्या धारा!! शेवटी अंगात फक्त पुल ठेवला. आता वेळ आली त्या इटुकल्या उतारावरुन खाली यायची... एकतर आम्ही घसरत न जाता जागच्या जागी 'घसरुन' पडायचो, नाहीतर 'घसरतच' जायचो... इथे मनसोक्त पडुन झाल्यावर मी माझा उत्साह आवरता घेतला. (शिवाय दुपारी परतीच्या प्रवासापण निघायचं होतं Happy )

पहिल्यांदाच बर्फ बघितल्यामुळे असेल पण शमोनिक्स जाम आवडलं. तसा बर्फ आपल्याकडेपण आहे, पण इथे कुठेही भारताशी तुलना नाही... तुलना होऊच शकत नाही... मों ब्लाँ म्हणजे युरोपातल्या वासरातली लंगडी गाय. पण काय करणार भारतात असताना कधी हिमालयात जायचा योग आलाच नाही.
आकडेवारीच द्यायची म्हणलं तर, शमोनिक्स गाव १००० मी वर तर महाबळेश्वर १३५३ मी.,मनाली १९५० मी तर आख्ख लडाख ३००० मी च्या वर आहे. आम्ही जिथे गेलो ते अ‍ॅगुय दु मिडी ३७४२ मी., तर भारतात लोक आरामात गाडीत बसुन बर्फ 'बघायला' जातात तो रोहतांग पास (शिखर नाही... पास) ३९७८ मी आहे. युरोपातील सर्वोच्च शिखर मों ब्लाँ ची उंची ४८०० मी आणि माउंट एव्हरेस्ट बद्दल तर बोलणंच नको (८८४८ मी Happy ). फरक एवढाच की विषुववृत्ताच्या जवळ असल्यानी आणि उत्तरेकडील थंड हवा हिमालयानी आडवल्यामुळे आपल्याकडे उंची असुनही बर्फ नाही :(.

एकंदर आमचा प्रवास एकदम घमाल झाला.

जाणार असाल तर:
- शमोनिक्स : http://www.chamonix.com/page.php?page=0&r=accueil&ling=en
- गॉगल, सनस्क्रिन लोशन घ्यायला विसरु नका!
- पॅरिसहुन रेल्वे: http://www.sncf.com/en_EN/flash/, जिनिव्हाहुन बस/रेल्वे आहे. इटलीहुन कारने येउ शकता, मों ब्लाँ टनेल मधुन डायरेक्ट शमोनिक्स.
- लिफ्ट पास: दोन प्रकारचे एकात खालच्या लेवलच्या सर्व लिफ्ट, तर दुसरा ग्रांड पास (४४ युरो प्रत्येकी एका दिवसासाठी) ज्यात सर्व लिफ्ट+अ‍ॅगुय-दु-मिडी+मेर-दु-ग्लास.
- अंतर्गत प्रवास: हॉटेलकडुन एक कार्ड (फ्री) मिळते त्यावर दरीतील बस फुकट आहे.
- हॉटेल : http://www.hrs.com/web3/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी रे !! मस्त माहीतीपुर्ण लेख लिहीला आहेस. मस्त वाटलं वाचून ! Happy

फोटोही फक्कड आलेत ! ४ नंबरचा तर खासच....अजुन असले तर टाक ना !

छान लिहिलं आहे.
शेवटून तिसरा फोटो खूपच आवडला.

अरे बेस्टच रे! शॅमोनी लै भारी ये.. मी दोनदा गेलो तिथे.. शेवटून तिसरा फोटो हा शॅमॉनीच्या एका छोट्या ट्रेकच्या शेवटी दिसते (मॉन्ट ब्लाँ चा जो रोप वे आहे त्याच्या दुसर्‍या स्टेजला उतरुन शॅमॉनी गावाला समांतर चालत गेलात की ५ किमी नंतर तिथे पोचाल (जिथून हा फोटो घेतला आहे). हा फोटो साधारण जिथून घेतला असशील त्याच्या समोर ले द्रुक्स नावाचं एक छोटुसं पण सुंदर शिखर दिसेल.
तू जो गिर्यारोहकांचा फोटो घेतला आहेस त्या मार्गाने मी एका फ्रेन्च माणसाबरोबर उतरलो होतो. त्याच्याकडे स्पेअर कॅरॅबिनर होते, आणि पर्का वगैरे भाड्याने घेतला होता शॅमॉनीत. जीनीव्हातून शॅमॉनीत जाणारा रस्ता पण सुंदर आहे (मी अ‍ॅमस्टरडॅम ते जीनीव्हा विमानाने आणि मग जीनीव्हातून शॅमॉनीला वडापनी Happy हो तिथे पण शॅमॉनी-शॅमॉनी असं ओरडत गाडी भरुन नेतात. फकस्त लिमिटपेक्षा जास्त भरत नाहीत.)

गंमत म्हणजे त्या चिमुरड्या शॅमॉनी गावात 'टायगर' नावाचे भारतीय रेस्टॉरंट आहे.

तू घेतलेल्या ग्लेशिअरच्या बाजूला दिसणारे ले द्रु हे शिखरः

les_drus_1.jpg

छान लिहिलं आहे Happy फोटोसह.

टण्या तुमचा एकपानी तर अप्रतिम आहे Happy

मज्जा केलीस की रे !

आणि हॉलंडमध्ये "सायलंट" डब्बे असतात ना? तिथे लोक पाळतात हो नियम..! Wink

झक्कास!
उभ्या उरलेल्या आयुष्यात कधी जाईन अस वाटत नाही, अशा ठिकाणान्च वर्णन अन फोटो बघायला मिळणे म्हणजे मेजवानीच! Happy
या लेखाबद्दल धन्यवाद! Happy

>> हॉलंडमध्ये "सायलंट" डब्बे असतात ना?
हो का? कुठे दिसले नाहीत!

>>उभ्या उरलेल्या आयुष्यात कधी जाईन अस वाटत नाही
कल किसने देखा है?!! मला स्वप्नातही वाटलं नव्हत, हिमालायाआधी आल्प्स पाहायला मिळेल ते!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मस्तच. वॅली ब्लाँश नंतरचा हिमनदीचा फोटो अप्रतिम आहे.

सहीच. सॅम, टण्या शॅमोनीला मी पण जावुन आलेय. माझ्याकडे पण त्या ग्लॅसिअरचा अगदी असाच फोटो आहे.

छान लिहिले आहे. फोटोपण मस्त आहेत. टण्याने टाकलेला फोटोपण सही आहे. Happy

मस्त लिहिलय... फोटो पण आवडले.. Happy

मुग्धा

खुपच छान लिहिलय्.फोटोसुद्धा छान आलेत.

छानच आहे प्रवासवर्णन. अगदी आत्ता उठून जावंसं वाटलं. बर्फात एक गूढपणा भरलेला असतो नाही कां?

छानच आहे प्रवासवर्णन. अगदी आत्ता उठून जावंसं वाटलं. बर्फात एक गूढपणा भरलेला असतो नाही कां?

वाचताना बर्फात असल्यासारख वाटल. खुप छान वर्णन आहे.

अफलातुन फोटुज.. नि वर्णन मस्तच !! आभारी आहोत 'शमोनिक्स' च्या प्रवासवर्णनाबद्दल ! Happy

फरक एवढाच की विशुववृत्ताच्या जवळ असल्यानी आणि उत्तरेकडील ठंड हवा हिमालयानी आडवल्यामुळे आपल्याकडे उंची असुनही बर्फ नाही
हो ना Sad

छान लिहिलंय. फोटोही आवडले.
टण्या, तुझा झब्बू फोटोपण सहीच आहे!

(रमी न बोलता कशी खेळलात?) Happy

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

मस्त फोटो आणि प्रवासवर्णन.
च्यायला तीन महिने पॅरिसमधे राहूनही तेव्हा हे बघून यायची बुद्धी झाली नव्हती Sad
जाता जाता -- फोफावता वारा आणि जोरात वारा ह्यांच्या अदानप्रदानीतून 'फोरात वारा' हा शब्द तू लिहिला असण्याचे काय चान्सेस असा विचार करतोय Wink

भरगोस प्रतिसादाबद्दल आभार!!

संदीप,
>>च्यायला तीन महिने पॅरिसमधे राहूनही तेव्हा हे बघून यायची बुद्धी झाली नव्हती
तीन महिने तसा कमी वेळ आहे (कुणी तीनच महिने असेल तर त्याच्या priority list मधे शमोनिक्स असणं मुश्किल)
>> 'फोरात वारा'
चुकुन मिस्टेक झाली... पण तुमचं कारण आवडलं (फोफावता आणि जोरात वारा) Happy

माझं शुद्धलेखन लहानपणीपासुनच कच्च आहे Sad त्यामुळे, आपल्या सुचनांच स्वागत!

मस्तच ...

पण एक शंका ..

त्यातले मों ब्लाँ (Mont Blanc) हे युरोपातील सर्वात उंच शिखर >>

युरोपातील सर्वात उंच शिखर jungfaujoch आहे ना? स्वित्झर्लंड मधे ?

>> युरोपातील सर्वात उंच शिखर jungfaujoch आहे ना? स्वित्झर्लंड मधे ?
नाही... ते युरोपातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. उंची ३४७१ मी. त्याला Top of Europe का म्हणतात माहीत नाही.
पहा ... http://en.wikipedia.org/wiki/Jungfraujoch

फोटोज आणि लिखाण आवडलं सॅम.
टण्या, तू टाकलेला फोटोही सहीच.. (फोटोत पाहिलेल्या) कैलासाची आठवण झाली..

बरोबर .... याहू वर असे details आहेत ...

Highest Mountain in Europe
Elbrus, Russia (Caucasus): 18,510 feet / 5642 meters

Highest Mountain in Western Europe
Mont Blanc, France-Italy: 15,771 feet / 4807 meters

Light 1

सहीये...मस्तच....खूपच छान फोटो...आणी वर्णन...
बेडेकर्...तुमचा फोटो तर खासच!
बाकी रोहतान्ग पासला आम्हीही थोडावेळ गाडीतून आणी नन्तर घोड्यावरून गेलो होतो. पण बर्फ पहायची आमची पण पहिलीच वेळ अस्ल्याने तेही आवडले होते......
फुलराणी

sam ,

तुमचे प्रवास वर्णन आवडले

thank you

युरोपातले सर्वात उंच शिखर माउन्ट एल्ब्रसच.. पश्चिम युरोपातले मात्र मॉन्ट ब्लाँ.. आणि हे आल्प्समध्ये येत असल्याने अजून प्रसिद्ध.. एल्ब्रस आल्प्सच्या रांगात येत नाही (चू.भू.द्या.घ्या.)..
सगळ्या खंडांवरची सर्वोच्च शिखरे सर करणारे लोक एल्ब्रसच सर करतात युरोपसाठी..

कुणाला आवड असल्यास डिक बासचे सेवन समिट्स वाचा. छान आहे.

Pages