आई, भिती वाटतेय ग

Submitted by पल्ली on 27 July, 2024 - 04:15

आई भिती वाटतेय ग आजूबाजूला लपलेल्या बुआ ची..
माझ्या मनाला बाऊ झालाय, त्यावर घाल न ग फुंकर.
खोडी काढलीय आयुष्यानं, त्याला कर न हात रे...
कट्टी केलीय सुखशांतीनं जणू, त्यांना सांग न माझ्याशी बोलायला..
वाईट्ट लोकांनी त्रास दिलाय ग, त्यांचं घर बांधशील उन्हात?
काळा राक्षस आताशा दिवसापण येतो, घाबरवतो..
त्याला चिरडून टाक न हातावर.
खूप भूक लागलीय, भरव न चार घास सुखाचे. एक घास गोविंदाचा एक श्रीरामाचा, एक राधेचा एक सीतेचा..
गोष्ट सांग न एखादी छान छान... जिचा शेवट असेल खात्रीशीर गोड.
झोपू दे तुझ्या हातावर, तुझ्या कुशीत.. येऊ दे तुझं हे पिल्लू आज तरी खुशीत!
माझी मलाच नजर लागलीय बहुतेक, लावशील काळं तीट?
मी घरी लवकर यावं म्हणून ठेवशील वाटीखाली मीठ?
-पल्ली

Group content visibility: 
Use group defaults

माझ्याच मनातल्या भावना वाचल्यासारख्या वाटल्या. गेले एक वर्ष आठ महिने हेच सांगतेय मी तिला. पण ती सर्व ऐकण्याच्या पलिकडे गेलीय कुठेतरी....

>>>>>>>गेले एक वर्ष आठ महिने हेच सांगतेय मी तिला. पण ती सर्व ऐकण्याच्या पलिकडे गेलीय कुठेतरी....
Sad