डिजिटल आतिषबाजी

Submitted by एम.जे. on 22 July, 2024 - 18:47

गेला आठवडा अमेरिका खंडातल्या ३ देशांच्या स्वातंत्र्यदिनाचा… कॅनडाचा जुलै १, अमेरिकेचा जुलै ४ तर व्हेनेझुएलाचा जुलै ५ ! भारतातल्या दिवाळी फटाक्यांची मौज इथे ४ जुलै आणि ३१ डिसेंबरला फिटते. एकावर्षी आम्ही रोडट्रीपहून परत येत होतो आणि दूरवर रस्त्याच्याकडेने वेगवेगळ्या रहिवासी भागातून उडणाऱ्या शोभेच्या दारुकामाचे दर्शन होत होते. काही वर्षं नेमाने हजेरी लावून आम्ही ऑस्टिन डाऊनटाऊनमध्ये रात्रीच्यावेळी आकाशात साजरी होणारी आतिषबाजी पाहायला जायचो. मागच्यावर्षीपासून यामध्ये वेगळा बदल येऊ घातलेला आहे. दरवर्षीच्या शोभेच्या दारुकामातून होणारे ध्वनी आणि धूर यांचे प्रदूषण, त्याचा पशुपक्षी जगतावर, वृद्ध, रुग्ण नागरिक तसंच पर्यावरणावर होणार परिणाम हा विषय चर्चिला जातो. डिस्नीसारख्या पर्यटनाच्या स्थळी संगीत आणि आतिषबाजी हे गेल्या कित्येक वर्षांचे दैनंदिन आकर्षण आहे. आता या पारंपरिक आतिषबाजीमध्ये डिजिटल रूपांतरण पाहायला मिळते आहे… ड्रोनच्या स्वरूपात !

शेकडो ड्रोन आकाशात झेपावून विविध रंग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या चित्राकृतीतून ही डिजिटल आतिषबाजी आता अमेरिकेतल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचा एक भाग होते आहे. यामध्ये धूर आणि प्रदूषण टाळले जाणे तसंच फटाक्यांच्या अपघातातून निर्माण होऊ शकणारा धोकाही टळणार आहे. शिवाय नवनिर्मितीला भरपूर वावही मिळणार आहे. अमेरिकेच्या बऱ्याच शहरात शोभेच्या दारुकामाच्या अतिरेकी वापरावर घातल्या जाणाऱ्या बंदीला ड्रोन आतिषबाजी आता पर्यायी ठरणार आहे. या नवीन डिजिटल आतिषबाजीचा प्रयोग मोजक्या पारंपरिक दारुकामाबरोबर साजरा केला गेला जेथे लोकांना जुन्या आणि नव्या गोष्टींचे सुंदर मिश्रण पाहायला मिळाले. काही वर्षांपूर्वी जेव्हा लोकांना ड्रोन माहिती नव्हते तेव्हा त्यांना हे सादरीकरण जादुई किंवा परग्रहावरून आलेले एलिअनस् वाटले असते का? काहीही म्हणा, या नव्या खेळाने आता रंगत आणलेली आहे. या डिजिटल आतिषबाजीच्या प्रत्यक्षदर्शींनी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.

‘दरवेळी हे किंवा ते असा पर्याय का? प्रदूषण नको म्हटले तरी पारंपरिक आतिषबाजीच्या आवाजाने एक वेगळाच उत्साह संचारतो तो या मूक ड्रोनपटात मिळेल का? की यामध्ये सुश्राव्य संगीताची भर टाकता येईल?’ असे प्रश्न काही लोकांनी उपस्थित केलेले आहेत तर कोणी हे ड्रोनच्या पंख्यांचे आवाज जणू लाखो मधमाश्यांच्या उठलेल्या आणि मोठ्याने गुणगुणणाऱ्या मोहोळासारखे तर नाही वाटणार अशी शंका व्यक्त केली आहे. पारंपरिक आणि डिजिटल आतिषबाजीच्या मिश्रणातून शोभेची आणि नाविन्याची सुरेख मेळ बसेल असे काहींना वाटते आहे. काहींना लग्न, समारंभ, कार्यक्रमांना यांचा नियमित वापर केला गेल्यास ‘डिजिटल आतिषबाजी’ हा एक नवीन मोठा उद्योग उदयास येईल असे वाटते आहे. काहींना शोभेच्या दारूसारखी ही डिजिटल आतिषबाजी चोहोबाजूंनी दिसेल की ठराविकच प्रेक्षकांना याचा लाभ घेता येईल असा प्रश्न पडला आहे. एकाने ‘यातून पर्यावरण कसे वाचणार आहे?’ असा सवाल करून या ड्रोन आतिषबाजीची तुलना कॉफी असून कॉफी नाही अशा डी-कॅफशी आणि मांसासारखे असून मांस नाही अशा व्हेगन-मांसाहाराशी करत व्यंग अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींना हे लेसरशोपेक्षा बरे वाटतेय. कोणाला ही इको-फ्रेंडली आणि तंत्रज्ञानाने आणलेली मजेदार त्रिमितीय (३-डी) अनोखी जादू वाटते आहे. आणखीन एकाने सगळं डिजिटल होत चालल्या गोष्टीवर आक्षेप नोंदवून आपण सत्यापासून दूर जात आभासी बनत असल्याची खंत व्यक्त केली आहे.

मध्यंतरी एका व्यावसायिक कार्यक्रमाला प्रदर्शनांत ‘पोलिस ड्रोन’ संकल्पना मांडलेली होती ज्यामध्ये मोठमोठे ड्रोन अपघातस्थळी पोलिसांच्या आधी कसे पोहोचू शकतील आणि आवश्यकतेनुसार तेथून पोलीस किंवा अग्निशामक दलास सूचित करता येईल यावर आधारित नवी सेवा असे त्याचे स्वरूप होते. ड्रोनचे अनेक फायदे आहेत. चलचित्रीकरण, शेती, सुरक्षा यासह आता डिजिटल आतिषबाजीत खेळ-करमणुकीच्या अंगानेही त्यांचा संचार होणार आहे असे दिसते.

ऑगस्टची तारीख दिलेली असताना सर्वांना आश्चर्यचकित करत १ महिना आधी नेमक्या ४ जुलैला जन्मलेली कॅथरीन शॉईकेट ही अमेरिकन महिला म्हणते की माझा वाढदिवस आणि आतिषबाजी हे अतूट समीकरण आहे. मोठी झाले, कामात व्यग्र असले, कधी अजिबात वेळ नाही झाला तरी माझ्या वाढदिवसाला किमान एक तरी फटाक्याचा आवाज, आकाशातली आतिषबाजी बघायला मिळावी ! कालांतराने तिच्या नव्याने ओळखीत आलेल्या एका सोमनिया कुटुंबाशी परिचय झाल्यावर मात्र तिचा आतिषबाजीविषयी असलेला दृष्टिकोन पार बदलून गेला. ट्रम्प सरकारने घातलेल्या मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिक प्रवासबंदीने काही दिवसापूर्वीच अमेरिकेत पाय ठेवलेल्या त्या सोमनिया कुटुंबाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सरकारी कामात त्यांची एक मुलगी त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता निर्माण झालेली. काही महिन्यांनी ४ जुलैनंतर जेव्हा कॅथरीन त्यांना भेटली तेव्हा तिला उत्सुकता होती, या कुटुंबाला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन कसा वाटला याविषयी. तिला जे ऐकायला मिळालं ते पुरते अनपेक्षित होते. त्या कुटुंबाला स्वातंत्र्यदिनाचा उत्सव, आनंद, आतिषबाजी याचा सुतराम गंध नव्हता. संध्याकाळी जसे फटाके आणि दारुकामाचे आवाज यायला लागले तसे ते पुरते घाबरून गेले आणि लपून बसले… त्यांच्या डोळ्यांसमोर साचल्या त्या भूतकाळातल्या भोवतालच्या युद्धजन्य परिस्थितीच्या भयंकर आठवणी आणि त्यांच्या सर्वात मोठ्या लेकीची अब्रू धुळीस मिळवून केली गेलेली क्रूर, निर्दयी हत्या ! धास्तावलेल्या मनांत सार्वत्रिक फटाक्यांच्या आवाजाने निर्माण होणारा दबलेला भयाचा कंगोरा कॅथरीनला आता प्रत्येक ४ जुलैला आठवतो आणि तिच्या समोर घडणाऱ्या इतके वर्षांच्या आतिषबाजीत तिला क्षणभर का होईना मूक करतो. सोमालियाच्या त्या कुटुंबाला अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन, नवीन वर्षानिमित्त होणारी आतिषबाजी ही रात्रीची बॉम्बफेक, हिंसा, युद्ध नसून आनंद लुटण्याची वेळ असते हे अंगवळणी पडायला ७-८ वर्षं गेली…

आकाशातला लुकलुकणारा एक बिंदू… ‘अ पिक्सेल इन स्काय’ असं म्हटलं जाणारी ड्रोनची डिजिटल आतिषबाजी यासम परिस्थितीतही आगळी वेगळी ठरेल!

~
सायली मोकाटे-जोग

https://sayalimokatejog.wordpress.com/2024/07/20/digital-atishbaji/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. ड्रोन शो Firework ला पर्याय म्हणून खरोखरच खूप छान आहेत.. आजकाल भारतात पण सुरू झालेत.. खालील शॉर्ट व्हिडिओ बघा.. खूप सुंदर आहे

https://youtube.com/shorts/putGDY0pE2I?si=cUtWao01lsbMvLtf

भारतातल्या दिवाळी फटाक्यांची मौज इथे ४ जुलै आणि ३१ डिसेंबरला फिटते. >>> कायपण हा. अमेरिकेत तुम्ही रस्त्यावर पडलेल्या शेणात बार लाऊन तो फोडू शकता काय?