‘फ्रीजेस’बरोबर अनुभवूया ऑलिम्पिक

Submitted by पराग१२२६३ on 20 July, 2024 - 00:20

पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत. त्यामध्ये भारताचे 117 क्रीडापटू सहभागी होणार आहेत. टोकियोमधील 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रीडापटूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताने आजवरची सर्वाधिक पदके जिंकली होती. तशाच कामगिरीची भारतीय क्रीडापटूंकडून यंदाही पुनरावृत्ती व्हावी अशी आशा भारतीयांना आहे.

पॅरिस शहर 1900, 1924 नंतर आता तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करत आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन जरा वेगळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. यावेळी ऑलिम्पिक स्टेडियमऐवजी उद्घाटनाचे स्थळ पॅरिसमधून वाहणारी सेन नदी असणार आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकच्या निमित्ताने पॅरिसमध्ये आलेल्या क्रीडापटूंचे, क्रीडाप्रेमींचे आणि पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी ऑलिम्पिकचा शुभंकरसुद्धा आता सज्ज झाला आहे. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या शुभंकरासाठी मात्र प्राण्याऐवजी एका वेगळ्या वस्तूची निवड करण्यात आलेली आहे. ती वस्तू आहे ‘फ्रीजियन’ (Phrygian) टोपी. ही टोपी फ्रेंच प्रजासत्ताकाच्या अनेक प्रतिकांपैकी एक आहे. फ्रान्समध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या या टोपीला स्वातंत्र्य आणि क्रांतीचे प्रतीक मानले जाते. ‘फ्रीजियन’ टोपी फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून फ्रेंच जनतेकडून वापरली जात होती. त्यामुळे या टोपीला फ्रेंच इतिहासात महत्वाचे स्थान लाभले आहे. आजही ती टोपी फ्रान्समध्ये राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाची मानली जाते. त्या टोपीवरून साकारलेल्या या शुभंकरांचे नाव ‘फ्रीजेस’ असे ठेवण्यात आले आहे. या ‘फ्रीजेस’चे ध्येय आहे, खेळाला प्रोत्साहन आणि मूर्त स्वरुप देणे. या शुभंकराची रंगसंगती फ्रेंच राष्ट्रध्वजातील रंगांशी जुळणारी आहे.

पॅरिस 2024 चे बोधचिन्हही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तीन वेगवेगळ्या प्रतीकांचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. ऑलिम्पिकचे सुवर्ण पदक, ऑलिम्पिकची ज्योत आणि ‘मारियान’ची प्रतिमा यांचा मेळ घालून हे बोधचिन्ह साकारलेले आहे. फ्रान्सची ओळख आणि मूल्यांचे प्रतिबिंब या बोधचिन्हात उमटले असल्याचे सांगितले जाते. ‘मारियान’ ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे प्रतीक असून ती फ्रेंच प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धांमध्ये जगभरातील महिला क्रीडापटूंनी मुक्तपणे सहभागी व्हावे हासुद्धा संदेश या बोधचिन्हाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या बोधचिन्हाला पॅरिसमध्ये 1900 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला क्रीडापटूंचाही संदर्भ देण्यात आलेला आहे.

पॅरिस 2024 ऑलिम्पिक स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे ‘Games wide open’. संपूर्ण जगाने ऑलिम्पिकच्या काळात पॅरिसला यावे आणि नव्या भावनांचा एकत्रितपणे अनुभव घ्यावा अशा अर्थाने हे ब्रीदवाक्य तयार करण्यात आले आहे. परस्परांमधील भेदाभेद नष्ट करून खुल्या मनाने एकत्र येण्याचे आवाहन या ब्रीदवाक्यातून करण्यात आले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन हा प्रत्येक आयोजक देशाच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचा विषय असतो. त्यामुळे या स्पर्धांमधील प्रत्येक बाब अनोखी, आपल्या देशाची मान उंचावणारी आणि उत्कृष्ट कशी असेल याकडे अतिशय बारकाईने लक्ष पुरवले जात असते. मग ती शुभंकराची किंवा बोधचिन्हाची निवड असो वा स्टेडियमची बांधणी किंवा ऑलिम्पिकची क्रीडानगरी. अशाच प्रयत्नातून पॅरिस ऑलिम्पिकसाठीची मशालही वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यात आली आहे. तिचे आरेखन मॅथ्यू लेहान्यू यांनी केले आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिक स्पर्धांच्या समानता, जल आणि शांतता या संकल्पनांचा आधार घेऊन ही मशाल तयार करण्यात आली आहे. मशालीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि त्यावरील आरेखन पॅरिसमधून वाहणाऱ्या सेन नदीच्या प्रवाही पाण्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही मशाल टाकाऊ पोलादापासून बनवण्यात आलेली असून ती सुमारे दोन फूट उंच आणि दीड किलो वजनाची आहे. अर्सेलोमित्तल कंपनीने या मशालीची निर्मिती केलेली आहे.

ॲथेन्समध्ये प्रज्वलित करण्यात आलेली ऑलिम्पिकची ज्योत भूमध्य सागर मार्गे 9 मे रोजी फ्रान्सच्या मार्से बंदरात पोहचली. त्या ज्योतीद्वारे प्रज्वलित करण्यात आलेल्या मशालीची सध्या फ्रान्सच्या विविध प्रांतांमधून दौड आयोजित केली जात आहे. फ्रान्सच्या जगभरात विखुरलेल्या पाच प्रदेशांमधूनही या मशालीची दौड आयोजित करण्यात आली आहे. ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले अकरा हजार क्रीडापटू फ्रान्समधील या दौडीमध्ये मशालवाहक असणार आहेत, ज्यात भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडाप्रकारातील पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा अभिनव बिंद्राचाही समावेश आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे 26 जुलैला या मशालीने ऑलिम्पिकची मुख्य ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. यंदा ही ज्योत नेहमीप्रमाणे ऑलिम्पिक स्टेडियममध्ये नसून अन्यत्र असणार आहे. मात्र ती कोठे असणार आहे याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.

<फ्रान्सच्या जगभरात विखुरलेल्या पाच प्रदेशांमधूनही > म्हणजे फ्रान्सच्या वसाहती का?

ही दीपिका कुमारी काय कामाची नाय. वशिला लाऊन नुसती जागा अडवून बसले. असल्या माठ खेळाडूंना न पाठवलेलं बरं.

<<ही दीपिका कुमारी काय कामाची नाय.>>

गेल्या २-३ ऑलिंपिकपासून दिपिकाची कायम अशीच कामगिरी राहिली आहे. मग त्यामागे कधी प्रशिक्षकांशी वादाचं कारण असतं, तर कधी वाऱ्याचं कारण.

गेल्या २-३ ऑलिंपिकपासून दिपिकाची कायम अशीच कामगिरी राहिली आहे. मग त्यामागे कधी प्रशिक्षकांशी वादाचं कारण असतं, तर कधी वाऱ्याचं कारण.
>>
4 म्हण
वाऱ्याचं कारण 2012 च्या लंडन ऑलिम्पिक च्या वेळी लॉर्ड्स वर बाण स्विंग झाल्यावर दिलं होतं.

मनू भाकरनं टोकियोनंतर बरीच मेहनत
घेतल्याचं तिच्या यावेळच्या कामगिरी दिसून आलं आहे.
>>
हो
तिथे वेपन ला इश्यू झाला होता
पण आज मस्त खेळली. एका पॉइंट च्या दहाव्या भागानी सिल्व्हर च्या ऐवजी ब्राँझ वर आली. पुढच्या वेळी भरपाई करेल नक्की...

मनुचं अभिनंदन, तिने मेडलची सुरुवात करून दिली.

आडनाव नाही लिहिलं कारण बाकर, की भाकर नक्की काय समजत नाही, दोन्ही वाचली ऐकली.

काल तो दीपिका कुमारीचा नवरा कॉमेंट्री करताना सारखा वाऱ्याच्या दिशेला नावं ठेवत होता. वारा आहे त्यामुळे बाण लागत नाहीत. त्याच वेळी हॉलंडचे व्यवस्थित लागत होते. समोरचा अँकर होता त्याने मस्त टोला हाणला. वाऱ्याचा परिणाम आपल्याच बाणावर होतोय हॉलंडच्या बाणांवर नाही होत. तेव्हा कुठे नवरोबा गप्प बसले.