
"तोंड आणि शरीर लहान पडते म्हणून मोठा मासा हा मगरीला आणि शार्कला खाऊ शकत नाही. त्यामुळे तो छोट्या माशाला खातो" या म्हणीप्रमाणे, आजकाल भारतातील ट्राफिक झाली आहे. विशेषकरून शहरांमध्ये!
"हीट एंड रन" अपघात आता इतके कॉमन झाले आहे की, बिचारा कॉमन मॅन पटापट मृत्यूला प्यारा होऊ लागला आहे. आता "सुपर मारिओ" या मोबाइलमधल्या "जंप एंड रन" या प्रकारात मोडणाऱ्या गेमसारखा "हीट एंड रन" गेमपण लवकरच बाजारात येईल. रस्त्यावरील वाहने म्हणजे यमदूतांनी नेमून दिलेले असिस्टंट आहेत की काय असे वाटण्यासारखी भीषण परिस्थिति झाली आहे!
मोठे मासे म्हणजे प्रचंड अवजड वाहतूक करणारे ट्रक किंवा प्रचंड मोठ्या आकाराच्या बसेस हे कार, दुचाकी, रिक्षा, टमटम, टेम्पो आणि पादचारी यांना सहजपणे धडक देऊन उडवून लावतात: "आले मोठे मध्ये मध्ये येणारे!"
मोठ्या माशांना वाटते सगळं समुद्र फक्त आपला आहे, तसे यांना वाटते सगळं रस्ता आमच्या आजोबांचा आहे!
शहरात छोटे रस्ते असतांनाही अवाढव्य, रणगाड्यांच्या आकाराच्या चारचाकी गाड्या अभिमानाने विकत घेणारे, तसेच त्या अत्यंत धुंदीत वेगाने चालवणारे अल्पवयीन (किंवा पूर्णवयीन असोत) हे समोरच्या बाईक, टेम्पो, रिक्षा आणि पादचाऱ्यांना कचरा झटकल्यासारखे उडवून लावतात आणि स्वच्छतेला हातभार तरी लावतात! नाहीतर तुम्ही! रात्रीच्या अंधारात येऊन रस्त्यात कचरा टाकून पसार होतात! वेडे कुठले!
मग बाईकवाले तरी मागे कसे राहतील? भीती दाखवायला त्यांना फक्त पादचारीच उरतात ना! त्यामुळे ते पादचाऱ्यांना रस्तासुद्धा ओलांडू देत नाहीत. फुटपाथवरुनसुद्धा बाईक चालवतात. आधीच फेरीवाल्यांनी फुटपाथ काबीज केलेत, त्यामुळे पायी चालणाऱ्यांना जागाच उरली नाही. गल्लीबोळातून वळतांना, मुख्य रस्त्यावर येतांना बिलकुल हॉर्न वाजवण्याची किंवा इंडिकेटर देण्याची तसदी बाईकस्वार घेत नाहीत. आम्ही मनाचे राजे! आम्ही कशाला इंडिकेटर देऊ? तुम्ही धडकलात तर तुमची चूक!
रिक्षा धुतल्या तांदळाच्या असतात का? नाही! रिक्षेच्या विशिष्ट रचनेमुळे, तीन चाकांमुळे आणि बाईकसारखे हँडल असल्याने ती अचानक, कधी कुठे गरर्कन गिरकी घेऊन वळेल किंवा यु-टर्न घेईल किंवा गोल गोल फिरायला लागेल आणि अजय देवगण, रोहित शेट्टी यांना "गोलमाल" चा पाचवा भाग काढायला प्रेरणा देईल याचा बिलकुल अंदाज येत नाही.
रिक्षाचालक मस्तपैकी मान डोलवत डोलवत कानात हेडफोन खुपसून गाणे ऐकत ऐकत मागे बसलेल्या कस्टमरच्या हाडांचा विचार न करता खड्डे आणि स्पीड ब्रेकरवरून रिक्षा जोराने चालवतात आणि आपले अवगुण उधळवतात!
एक सासू रिक्षा, सून रिक्षेला रात्री जेवतांना विचारते, "काय गं, कुठे गुण उधळून आलीस आज?".
सून रिक्षा सांगते, " सासूबाई, मी आज चार कस्टमर उधळून आली, त्यांची हाडे मोडून, त्यांना स्लिप डिस्कचा रोग गिफ्ट दिला आणि हॉस्पिटलमध्ये पोचवून आली!"
सासू रिक्षा बोटे मोडून कानाला लावत कौतुक करत म्हणते, "गुणाची गं माझी सूनबाई!"
आता उरले पादचारी! ते तर सगळ्यात लहान मासे! पण ते तरी कुठे कमी आहेत? ते कशाला मागे राहतील? त्यांची पण छोटी मोठी वळवळ सुरूच असते. म्हणजे कुठूनही कसेही, मनाला वाटेल तसे, वाटेल तेव्हा कुठूनही अचानकच रस्ता ओलंडतात. झेब्रा क्रॉसिंगची त्यांना एलर्जी असते. कधी कधी तर ते बिचारे रास्ता ओलंडतांना वर्क फ्रॉम रोड, कॉफी विथ की की किरण (म्हणजे प्रेयसी सोबत गप्पा!) हे कार्यक्रम करतात.
रस्त्यावरील चढ उतार म्हणजे खड्डे आणि स्पीड ब्रेकर यावरून बिनधास्त चालतांना शेयर बाजाराच्या चढ उताराची क्षणाक्षणांची माहिती काहींना पाहिजे असते. म्हणून ते बिचारे फोनवर बोलता रास्ता क्रॉस करतात! काही चूक असते का, सांगा बरं त्यांची? रस्ता ओलंडता ओलंडता एखादा शेयर पडला तर? भले त्या पादचाऱ्याला वाचवता वाचवता बाईकस्वार पडला तरी चालेल!
एकूणच काय, तर रस्त्यावरील वाहतुकीचा तालच बिघडला आहे.
असे वाटते की, अनिल कपूर आणि ऐश्वर्या रॉय, या दोघांना भर चौकात उभे करून "ताल से ताल मिला!" गाणे म्हणायला लावले पाहिजे. फक्त तिथे अक्षय खन्ना यायला नको म्हणजे झालं! असो! नाहीतर तिथे वेगळेच "दृश्यम" दिसायला लागेल. सुभाष घई तर तिथे मुळीच यायला नको नाहीतर त्याच्या नावातच "घाई" असल्याने ते आणखी एखादा एक्सिडेंट करतील!
वरीलपैकी कोणत्याही वाहनाचा चालक आणि पादचारी हे, "ट्राफिक नियम तोडणे हे आपले हक्काचे कर्तव्य" असल्यासारखे वागतो. पादचाऱ्यांसाहित इतर सर्व प्रकारच्या वाहनांचे चालक, वाहन चालवतांना मस्तपैकी "भर रस्त्यात वाहन चालवतांना मोबाईलबर बोलणे हा माझा जन्मोजन्मीचा हक्क आहे" अशा आविर्भावात वागतात.
ते वर्षातून एकदा म्हणजे "जागतिक दूरसंचार दिवस" या दिवशी मोबाइल टॉवर भोवती मोबाईलवर बोलता बोलता फेऱ्या मारून "मला पुढच्या जन्मी आणि पुढील प्रत्येक जन्मी दोन्ही कांनाऐवजी दोन मोबाइल हे जन्मत: शरीराचे अभिन्न अंग म्हणून दे!" असे वरदान मागतात!
आणि खाली दिलेल्या सहा गोष्टीचा तर मुळीच दोष नाही. त्यांना दोष दिला तर खबरदार!
पहिली गोष्ट: रस्त्यावर ठिकठिकाणी ठाण मांडून बसणारे कायमचे पाहुणे म्हणजे खड्डे, त्यांच्याविना रस्ता सुना सुना वाटेल! "यार बिना चैन कहा रे?" असे खड्डे रस्त्यांना रोज म्हणतात आणि अनिल कपूर, अमृता सिंग पायऱ्यांवर बसून कौतुकाने बघतात! खड्ड्यांशीवाय रस्त्यांना चैन पडत नाही. उगाच कुणाला दोष देऊन फायदा नाही!
दुसरी गोष्ट: "दृष्ट लागण्याजोगे सारे" हे मराठी गाणे आठवण्याइतपत सुंदर आणि चांगल्या दर्जाचे रस्ते आपल्याकडे विशेष करून पुणे आणि मुंबईत आहेत. ते रस्ते पाहायला मंगळ ग्रहावरच्या सरकारने एलियनचे शिष्टमंडळ पाठवले होते, पण खड्ड्यात उतरल्यावर "धूप" न मिळाल्याने त्यांची "जादू" चालली नाही, आणि ते खड्ड्यातच गायब झाले. मंगळ ग्रहावरच्या सरकारने कपाळावर एंटिना मारून घेतला कारण एलियनला हातऐवजी एंटिना उगवतो! तिकडचे लोक खूप प्रगत झालेत! त्यात राकेश रोशनचा काहीच दोष नाही!
तिसरी गोष्ट: वाहतूक यंत्रणेतील ऑफिसमध्ये दुपारी जेवतांना तोंडी लावण्यासाठी लागणारा "आचार" म्हणजे भ्रष्टाचार! आता सांगा, लोणचे नसेल तर जेवणाला चव कशी येणार हो! लोणच्याला दोष देऊन उपयोग आहे का? जिभेला तरी दोष कसं देणार? असो!
चौथी गोष्ट: जगात सर्वात नंबर एकवर असलेली भारताची रेकॉर्ड ब्रेक लोकसंख्या. अनेक समस्यांचे मूळ असलेली हो गोष्ट आता सर्व गोष्टींच्या मुळाशी आली आहे. असो, आपल्याला काय त्याचे? आपण आपले बाजारातून मुळे, कंद, गाजर घेऊन यायचे आणि त्याचे खाद्यपदार्थ बनवून खायचे एवढेच आपल्या हातात आहे! मूळ प्रॉब्लेम विसरून कंदमुळे खा!
पाचवी गोष्ट: शहरातील गर्दीला सामावून घेण्यासाठी "अपुरी" पडणारी आणि कार्यालयात "छोले पुरी" खात बसलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था!
सहावी गोष्ट: सरकार, महापालिका वगैरे! खबरदार यांना दोष दिला तर! सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करणे (वादविवाद स्पर्धा), एकमेकांचे उणेदूणे काढणे, एकमेकांवर चिखलाचे गोळे फेकणे (एक नवीन स्पोर्ट प्रकार), एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊन खो देऊन पुन्हा आपल्या पक्षात येणे असे खेळीमेळीचे खेळ खेळून त्यांना ऑलिंपिकमध्ये पदक जिंकायचे आहेत! त्यांना कशाला वाहतूक, खड्डे, हीट अँड रन, अपघात अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्रास देऊन डोक्याला "हीट" (ताप) द्यायची उगाच?
सामान्य माणसाच्या हातात एकच राहिले आहे! "मै निकला गड्डी लेके!" असे गाणे म्हणत कुणी ट्रक, रिक्षा, टेम्पो, कार, बाईकवाला दिसला रे दिसला ("मला बघून गालात "घातक" हास्य हसला गं बाई हसला") आणि गाडीचा हॉर्न वाजला रे वाजला की मग त्या हॉर्नमागचा गर्भित इशारा लक्षात घ्यायचा ("Run, Otherwise I Will Hit You!") आणि बाजूला धप्पकन उडी मारायची आणि "मारिओ" सारखा "Jump And Run!" हा गेम खेळायचा!
या सगळ्यात सायकल बिचारी कुठे हरवली पत्ताच नाही. बहुतेक "आवारा भवरे, जो होले होले गाये" हे गाणे म्हणत म्हणत काजोल ती सायकल गार्डनमध्ये घेऊन भवऱ्याच्या मागे गेली असावी किंवा सायकल पंक्चर झाली ते दुरुस्त करायला गेली असेल माहीत नाही!
हीट & रन कमी & यातायाती ची
हीट & रन कमी & यातायाती ची वाईट हालात असा झालाय लेख.
पण सद्य परिस्थिती!!
हीट & रन कमी & यातायाती ची
हीट & रन कमी & यातायाती ची वाईट हालात असा झालाय लेख.
पण सद्य परिस्थिती!! +१११
अचानक signal न देता आडवे येणारे bike आणि रिक्षा वाले ह्यांचं काय करायचं कळात नाही.
यातायाती ची वाईट हालात आणि
यातायाती ची वाईट हालात आणि त्याची लेखात दिलेली विविध कारणे यामुळे हीट एंड रन प्रकार वाढले आहेत.