चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अस्वा वाचताना लक्षातच आले नाही तो अरविंद स्वामींना शॉर्टकट मारलाय. मला ते कॅरेक्टरचे नावच वाटत होते.
>>>> अरेरे, मला पण. आता लक्षात आले. मी ते 'अश्वा' असेल उच्चार म्हटले. Proud कपाळाला हात.

धन्यवाद हर्पा. Happy

छान रिव्ह्यू.. वाचून पिक्चर पहायची इच्छा होतेय… कुठे तरी ट्रेलर वगैरे बघितलेला बहुतेक. त्यातले तुम्ही म्हणताय तसे लग्न आठवतेय आणि कार्ती…

माधवजी, सुंदर पोस्ट.

ओएमजी २ आताशी पाहिला. चांगला विषय आहे. बर्‍यापैकी सेन्सीबल आहे पण ओ एम जी चा फॉर्मॅट बनलेला आहे. त्याच साच्यात बसवला आहे. त्यामुळे कुठे तरी संभाव्य वादांचा विचार करून हाताळणी केली आहे असे वाटले. पंकज त्रिपाठीचा वादच नाही. त्याचा अभिनय सुद्धा आता स्टिरीओ टाईप होतोय का असे वाटत असतानाच त्याच त्या मॅनरिझमचा वापर करून तो पुन्हा एक उत्तम परफॉर्मन्स देतो.
अर्थात परेश रावल चा कानजीभाई काही च्या काही टॉप आहे. तो मनुष्य अफाट आहे. दोघे गुरू शिष्य असावेत असे वाटावे असे आहेत.
विनोदाचे शिडकावे पहिल्या भागापेक्षा कमी आहेत.

एक गंभीर विषय ओ एम जी च्या नाट्यमय फॉर्मॅट मधे तीन तासात सुटतो, लोक लगेच बदलतात, आंदोलने होतात यापेक्षा वेगळं काही बघायला आवडलं असतं. तरीही कौतुकच.

*Meiyazhagan - Netflix*
मस्त पिक्चर आहे.
Highly recommended
मी आताच बघितला.
अरविंद स्वामी कधी त्याच्या जवानीत सुद्धा आवडला नव्हता. तू ही रे गाण्यात मनीषा कोईराला बघताना जितके छान वाटायचे तितके ती याच्यासाठी धावतेय बघून त्याचा हेवा वाटायचा.
पण याच्यात छान वाटला.
दुसरा ॲक्टर सुद्धा कमाल आहे.
काही ना काही प्रत्येकाला रिलेट होईलच पिक्चरमध्ये..

फारएण्डने वाहत्या धाग्यावर रेको दिल्याने नंदिता दासने दिग्दर्शित केलेला कपिल शर्मा व शहाना गोस्वामी यांचा 'झ्विगाटो' बघितला. खूप साधा सरळ सिनेमा आहे. कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या आयुष्यातल्या अनिश्चततेची कथा आहे. कपिल शर्मा फॅक्टरी मॅनेजरची नोकरी गेल्याने झ्विगाटो साठी फूड डिलिव्हरी करायला लागतो. अशा प्रकारच्या नोकरीत येणाऱ्या अडचणी, संघर्ष, ग्राहकांचा उद्दामपणा, सतत गाडीवर बसून ऑर्डर डिलिव्हर करणे. प्रत्येक ऑर्डरचे कमिशन, कस्टमरचे रेटिंग, कस्टमरने डिलिव्हरी बॉयला दिलेले रेटिंग हे त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.

कपिलने अतिशय सुंदर काम केले आहे. तो कुठेही विनोदी कपिल शर्मा वाटत नाही. अगदी साधा, निर्व्यसनी, कष्टाळू, कुटुंबावर प्रेम करणारा कामगार वाटतो. शहानाचेही काम सुरेख झाले आहे. तिची घरात काही तरी कमावून हातभार लावण्याची तळमळ फार खरी वाटते, नवऱ्याचा ताण कमी करण्यासाठी ती मॉल मधे सफाईकामगार, कधी मालिशवाली वगैरे होत असते. उच्च वर्गीय आणि कष्टकरी कामगार यातला फरक छोट्या छोट्या गोष्टींतून छान दाखवला आहे. शहानाला वेगळी लिफ्ट घ्यायला सांगणे, तिचा अवतार बघून तिच्याकडून मालिश नको म्हणून परत पाठवणे. कपिलला 'जास्तीचे पिझ्झा तुझ्या मुलाबाळांना नेऊन दे' म्हणणे. त्यांच्या कामाला न मिळणारा आदर आणि त्यामुळे त्यांना मिळणारी हीन वागणूक किंवा एकंदरीत अप्पर क्लासकडून मिळणारी अदृश्य वागणूक छान दाखवली आहे.

असे अनेक प्रसंग दाखवून व्हाईट कॉलर- ब्लू कॉलर फरक फार 'सटली' दाखवला आहे. कुठेही नाट्यमयता नाही, कुठेही अंगावर येणारी गरिबी नाही. त्यांच्या आयुष्यातील काही काळाचा किंवा त्या वर्गातील लोकांचा कायमच्या संघर्षाची झलक दाखवली आहे. जी एरवी आपल्या लक्षात येत नाही. शेवटी जलरंगातली चित्रे आहेत, ज्यात या वर्गातील आपल्यासाठी अदृश्य असणाऱ्या सर्व चाकरमान्यांचे दैनंदिन जीवनातील प्रसंग दाखवले आहेत. चित्रपट कुठल्याही उंचीवर वा खोलीवर न जाताही जे सांगायचे ते व्यवस्थित पोचवतो. मला आवडला.

शहानाला वेगळी लिफ्ट घ्यायला सांगणे >>> हो तिथली ती उच्चभ्रू बाई तिच्या कुत्र्याला तिच्याबरोबर रेसिडेन्ट्स करता असलेल्या लिफ्टमधून नेते पण हिला सर्विस लिफ्ट वापरायला सांगते. असे काही सीन्स "हे घ्या डायरेक्शन" सारखे अंगावर मारलेले नाहीत. सहज येतात.

शेवटी जलरंगातली चित्रे आहेत >>> ती चित्रे मस्त आहेत. सध्या ही नवीन फॅशन दिसते. लापता लेडीज मधे ही लग्नाचे "मोटिफ" मस्त होते.

एकदम चपखल लिहीले आहेस अस्मिता. कपिल शर्माची एकूणच बॉडी लँग्वेज फार भारी वाटली. शहाना गोस्वामी पूर्वी ग्लॅमरस रोल करायची का? इथे चांगले काम केले आहे तिने.

भुवनेश्वर मधली कथा आहे ना? आधी आठवत नाही त्या शहरातील कथा पिक्चरमधे पाहिलेली.

छान पोस्ट अस्मिता.. बघायला हवा झ्विगाटो..
अन्यथा कपिल शर्मा नाव ऐकून त्या वाटेला जाणार नव्हतो. कारण मागे एका चित्रपटात त्याला थोडा वेळ पाहिलेले ते झेपला नव्हता.

ऋन्मेश+1
मी पण एक दोनदा विचार केला होता बघायचा पण कपिल शर्मा मुळे कॅन्सल केला..आता बघते

अस्मिता, चांगला परिचय. कपिल शर्मा त्यात कपिल शर्मा वाटला नाही , हे खरेच सुखद आश्चर्य. स्टार अ‍ॅक्टर्सनाही ते जमत नाही. हा तर अभिनेता म्हणून ओळखलाही जात नाही. शहाना गोस्वामीची ओळख मिलिंद सोमणची पार्टनर अशीच होती. पाहायला हवा हा चित्रपट.

तुम्ही वेबसिरीजच्या धाग्यावर Red, White & Royal Blue बद्दल लिहिलेलं वाचल्यापासून या चित्र पटाच्या क्लिप्स माझ्या फेसबुक फीडमध्ये येऊ लागल्यात. त्यात बर्‍याच profound वाटल्या. चित्रपट तुकड्यातुकड्यांत पाहायचा नाहीए, म्हणून थांबलोय.

झ्विगाटो >>> द साँग ऑफ स्पॅरोज वरून घेतलाय का ? जितेंद्र जोशीचा मराठीत असाच कुठला तरी सिनेमा होता.

Predestination (२०१४) - सायफाय थ्रिलर - नेटफ्लिक्स (भारत)

टाईम ट्रॅव्हल च्या संकल्पनेवर आधारीत अनेकानेक सिनेमे बनले आहेत आणि त्यातील कितीतरी उत्तम आहेत. एकच संकल्पना पण ती किती विविध तर्‍हेने वापरली आहे. हे असे सिनेमे मला नेहमीच आवडतात.

पण तरीही याच संकल्पनेवर आधारीत असलेला प्रीडेस्टिनेशन हा सिनेमा ही संकल्पना एका वेगळ्याच पातळीवर नेतो आणि तिला चिक्कार पीळ देतो. काही नियम मोडले आहेत यात पण त्याबद्दल डिटेलात लिहिता येणार नाही. गोष्टही लिहिता येणार नाही कारण काही लिहिलं तरी सिनेमा बघताना उगंच क्लिक होईल आणि मजा जाईल. खरंतर सिनेमा खूप रंजक आहे आणि गोष्ट ज्या पद्धतीने उलगडत जाते ते ही फार छान आहे मात्र शेवटी आपण त्या भोवर्‍यात अडकलेलेच राहतो. विचार करत राहतो आणि नक्की कुठे काय कसं आणि मुख्य म्हणजे का याची उत्तरं शोधतच राहतो. इन्सेप्शन सारखा काहीसा क्लिफहँगर शेवट आहे.

सायफाय सिनेमे आवडणार्‍यांसाठी तर मस्ट आहे. आधी या सिनेमावर इथे चर्चा झाली आहे का?

धन्यवाद सर्वांना.‌ Happy

फा,
शहाना गोस्वामी पूर्वी ग्लॅमरस रोल करायची का? इथे चांगले काम केले आहे तिने.>>> मी तिला पूजा भटच्या 'बॉम्बे बेगम्स' मधे बघितले होते. त्याशिवाय मेमोरेबल काही आठवत नाहीये. तो ग्लॅमरस रोल होता पण तिचा लूक दोन्ही प्रकारच्या रोलना शोभतो.

मला ती जलचित्रे फार आवडली. सुरेख, समर्पक आणि आशयघन वाटली. मी शेवटचे नाव येईपर्यंत बघितली.

भुवनेश्वर होते का ते? मला आधी भाषा थोडी बंगाली सारखी वाटली आणि शहर मुंबईसारखे वाटले नाही म्हणून मग कलकत्ता असावे असा विचार आला पण पुन्हा बंगाली मला ओळखू येते, ही तोंडातल्या तोंडात 'रोल' होणारी वाटू लागली. Happy सच अ रिलीफ, थॅंक्स. डेफिनेटली ओरिया असावी.

केया, ऋ Happy नक्की बघा. कपिल शर्मा वाटतच नाही तो कुणीतरी वेगळाच वाटतो. त्याला वेगळ्या धाटणीच्या भूमिका मिळायला हव्यात.

हर्पा, Happy मी आयपीटिव्ही (केबल?) वर बघितला, पण तसा नवीन नाही हा. आला असावा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर.

भरत, Red white and Royal Blue मी बघितलेली सर्वात सुंदर गे प्रेम/परिकथा वाटली होती. धन्यवाद. Happy

द साँग ऑफ स्पॅरोज वरून घेतलाय का ? जितेंद्र जोशीचा मराठीत असाच कुठला तरी सिनेमा होता. >>> Happy आचार्य, कल्पना नाही बुवा.

अस्मिता, मस्त परीचय. कपील शर्मा हा कपील शर्मा वाटत नसेल तर बघेन. नाही तर डोक्यात जातो तो माणूस. खूप witty आहे पण लोकांना दुखावणारे विनोद करायची स्टाइल खूप डोक्यात जाते.

हपा, भारतात प्राइमवर दिसतो आहे झ्विगाटो.

मामी, उत्सुकता वाढवणारा परिचय. नक्की बघणार Predestination.

शहाना गोस्वामी पूर्वी ग्लॅमरस रोल करायची का? इथे चांगले काम केले आहे तिने.>>> मी तिला पूजा भटच्या 'बॉम्बे बेगम्स' मधे बघितले होते. त्याशिवाय मेमोरेबल काही आठवत नाहीये.
>>
रॉक ऑन मधे अर्जुन रामफळ ची बायको होती
रा वन मधे ही गेम डिझाईन टीम मधे होती
ब्रेक के बाद मधे दीपिका इम्रान ची गोल्ड कोस्ट मधली घरमालकीण म्हणून होती

ह्या विकेंडला रिलीज झालेले भुलभुलैय्या-३ आणि सिंघम-अगेन बघून घेतले - बस इतकंच. Happy

भुभु ला थिएटरमधली प्रि-टीन मुलं हसत होती. विजय राज, संजय मिश्रा, कार्तिक आर्यन ची कॉमेडी छान आहे. विद्या बालन आणि माधुरी दिक्षित छान दिसल्या आहेत. तृप्ती डिमरीचा कपडेपट बजेट कटमधे तयार केलाय.

सिंघम मधे होममेड फिजिक्स आहे (रोहित शेट्टी बॉलिवूडचा न्यूटन आहे). शेट्टी कधीच लॉजिकचा दावा करत नसल्यामुळे ती जबाबदारी पण त्याची नसते. ट्रेलरमधे जे दाखवलंय त्यापेक्षा वेगळं सिनेमात काही नाही.

भुलभुलैय्या-३ आमच्याकडे मुलगी तिच्या मैत्रीणी सोबत बघून आली आणि तिला फार आवडला आहे. तिला आमच्याशी चर्चा करायची आहे पण स्पोईलर मुळे करता येत नाहीये. त्यामुळे आमच्या मागे लवकर बघा म्हणून लागली आहे. वेळ नाहीये सध्या. जर खरेच तितकाच भारी असेल तर काढता येईल.

खूप witty आहे पण लोकांना दुखावणारे विनोद करायची स्टाइल खूप डोक्यात जाते.
>>>>
बॉडी शेमिंग फार असते. सध्या एक जाडी बाई आणि स्लिम फिगरवाली मुलगी याना घेऊन जे विनोद सादर करतो ते फार पथेटीक वाटतात. मी ते स्कीप करतो आणि सेलिब्रिटी येतात तिथून बघायला घेतो.
बाकी त्याच्या मेहनतीचे आणि कलागुणांचे फार कौतुक आहे. या बाबतीत तो त्याच्या क्षेत्रातील शाहरूख आहे.

अच्छा, अस्मिता आणि माधव. इथे शोधतो कुठे दिसेल ते.

खूप witty आहे पण लोकांना दुखावणारे विनोद करायची स्टाइल खूप डोक्यात जाते >> अगदीच! अजूनही तेच चालू आहे. मी त्या बाकीच्या लोकांची एन्ट्री झाली की त्यांच्या एक्झीट पर्यंत फॉरवर्ड करतो. ते लोक चांगले आहेत, पण त्यांना दिलेली वागणूक आणि त्यावर हसायचं हे पटत नाही.

मी त्या बाकीच्या लोकांची एन्ट्री झाली की त्यांच्या एक्झीट पर्यंत फॉरवर्ड करतो. >>>
+१ मीही आधी तेच करायचे. आता बघणेच बंद केले. अली आणि कृष्णा बायकांचे वेष घेऊन पाहुण्यांशी फ्लर्ट करायचे ते तर गलिच्छ वाटायचे.
तो टॅलेन्टेड मात्र आहे. तो करू शकतो.

मेइयाळगनबद्दल धन्यवाद माधव. बघितला आणि आवडला. खूप संथ आहे (त्यामुळे अनेकांना कंटाळा येण्याची शक्यता आहे, आणि ती रास्त आहे), पण सुंदर आहे. खूप बारकावे छान दाखवलेत.

तमिळ लग्न अगदी आपण तिथे असल्याचा अनुभव येतो. तो स्टेजवर बहीणभेटीचा प्रसंग खूप भावूक आणि तरल झालाय. पूर्ण चित्रपटात तो लक्षात राहतो. कार्ती टिपिकल कार्ती आहे ह्यात. अरविंद स्वामी त्याच्या घरी रात्री सायकल घेऊन चहा प्यायला जाऊ म्हणतो तेव्हा कार्ती एका माणसाला कॉल लावतो. पलीकडचा माणूस कॉल उचलेपर्यंत कार्ती जे काही अंगविक्षेप करतो, तिथे मी फुटलो. आपल्याला कॉलर ट्यून ऐकू आली नाही तरी तो त्यावर नाचत आहे हे कळतं.
पहाटे सडा रांगोळ्या घालणाऱ्या बायका - नुसत्या पार्श्वभूमीवर येऊन जातात, पण चपखल बारकावे.

आता हे मागे माधव यांच्या प्रतिसादात येऊन गेलंय का आठवत नाही, पण पोंनियिन सेल्वन बघितलेल्या लोकांना एक परिचित नाव सापडेल. शिवाय इथे माबोवर कुणी शब्दार्थ धागा फॉलो करणारे असतील तर त्यावर काही दिवसांपूर्वी अनिंद्य यांनी एका तमिळ शब्दाचा अर्थ सांगितला होता - ते माहीत असेल तर कार्तिच्या एका कूटप्रश्नाचं उत्तर गेस करता येईल. Happy

सिनेमातली गाणी मला तरी बेसुरी वाटली >> फारच आणि खूप रटाळ, कंटाळवाणी.

माधव, हपा +१.
मलाही सिनेमा फार आवडला. पहिला काही भाग कार्ती कॅरिकेचर टाइप वाटत होता. काहीवेळा टिपिकल सौदी होणार वाटू लागलेलं पण आवडला. गाणी काईच्याकाय बेसूर आहेत. ते दोघं पाण्यात पाय बुडवून गातात ते प्रथम पुरुषी बेसूर समजू शकतो. पण बाकी कथेच्या ओघातली गाणी बेसूर गायचं प्रयोजन समजलं नाही. बेसूर आहेत हे कुणाला समजलच नाही हे कसं शक्य आहे!
अरविंदस्वामी चांगलं काम करतो. बारीक सारीक डिटेलिंग मस्त आहे.

"द हेल्प" बद्दलः

पूर्वी पाहिला होता. पण हुलूवर ब्राउज करताना समोर आला आणि सहज परत लावला, आणि तितकाच एंगेजिंग वाटला. किंबहुना जास्तच. हा पिक्चर जरी सेग्रेगेशनच्या काळातला असला व त्यावेळच्या अन्यायाबद्दलही यात असले तरी एकदम इण्टेन्स गंभीर नाही. आणि विनोदी कॅटेगरीत नक्कीच नसला, तरी यात वेळोवेळी प्रसंगाप्रमाणे येणारे विनोदही अफलातून आहेत. इथे खाली गोरे व काळे हे उल्लेख तेव्हाच्या वर्णनामधे प्रचलित असलेल्या सोप्या शब्दांत केले आहेत. आता आफ्रिकन-अमेरिकन्स हा शब्द जास्त वापरात आहे हे माहीत आहे. द हेल्प हा शब्दही पूर्वी इतरांच्या घरी काम करणार्‍यांकरता वापरला जाई.

सेग्रेगेशनच्या काळातली अमेरिकन साउथ -जॅक्सन मिसिसीपी. सेग्रेगेशन म्हणजे गोरे व काळे यांना सर्व ठिकाणी वेगळ्या सोयी, त्याच्या दर्जात तफावत ई. तेव्हा बर्‍याच श्रीमंत गोर्‍या कुटुंबांमधे कामाला काळेच असत. ते गुलाम नव्हते. गुलामी संपून जवळजवळ १०० वर्षे झाली होती. तरी वंशभेद होताच. यांची वस्ती वेगळी, त्यांची वेगळी. बसमधे बसायच्या जागा वेगळ्या. टॉयलेट्सही वेगळी. अशा भागातील काही गोरी कुटुंबे व त्यांच्याकडे काम करणार्‍या काळ्या स्त्रिया - यांची ही कथा आहे.

मुख्य लीड्स म्हणजे व्हिओला डेविस (एबीएलीन - एबी) आणि ऑक्टेविया स्पेन्सर (मिमी) या दोघी नोकर स्त्रिया. गोर्‍या कुटुंबातील व यांना तुच्छतेने वागवणार्‍या एक दोन स्त्रिया (एक "हिली" - सध्या जुरासिक वर्ल्ड मधे असते ती ब्राइस डॅलस हॉवर्ड, व तिच्या एक दोन मैत्रिणी), गोरीच पण आधुनिक असल्याने सर्वांना समान वागणूक देणारी सिलीया (जेसिका चॅस्टेन), साधारण तशीच "स्कीटर" (एमा स्टोन), आणि आणखी गुंतागुंतीचे कॅरेक्टर असलेली तिची आई (अ‍ॅलिसन जॅनी - वेस्ट विंग मधली "सी जे")

एकूण कथा ही या नोकर स्त्रियांवर होणारे अन्याय, त्यातील एकीने त्याचा घेतलेला माफक (आणि "ग्रोस" असला तरी धमाल) बदला व त्याचा पुढेही खुबीने केलेला वापर, त्याचे परिणाम, पुस्तक लिहायच्या खटाटोपात असलेल्या "स्कीटर"ने या स्त्रियांना त्यांच्या कहाण्या सांगण्यास उद्युक्त करणे, त्यातून अनेक कहाण्या उलगडणे, स्कीटरचा तिच्या लहानपणी त्यांच्या घरी नोकर असलेल्या कॉन्स्टंटिनचा शोध, या सगळ्याच्या अधूनमधून दिसणारी एबीची कथा - हे सगळे आपल्याला पूर्ण एंगेज करते. याहून जास्त काही लिहीले तर न पाहिलेल्यांना स्पॉईलर होईल.

सर्वांचीच कामे चांगली असली तरी मिमी आणि एबी या स्क्रीनवर असल्या की सीन्स खाउन टाकतात. एरव्ही गंभीर असलेली एबी जेव्हा मिमी तिच्यासमोर येते तेव्हा एकदम खुलते. त्यांच्यातली केमिस्ट्री जबरदस्त जमली आहे. त्या दोघींमधले बँटर हे कोणत्याही घरात असलेल्या कामसू बायका जेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीवर हसतात अगदी तसे वाटते. पण मिमी! या बाईने नुसत्या संवादफेकीवर मला तुफान हसवले.

पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा आवडल्याचे लक्षात आहे. पण संवाद वगैरे इतके समजले होते का लक्षात नाही. अमेरिकेत हुलू व प्राइमवर आहे. कदाचित भारतातही असेल. ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी अगदी आवर्जून बघा. मिमीच्या रोल करता ऑक्टेविया स्पेन्सरला ऑस्करही मिळाले आहे.

गाणी काईच्याकाय बेसूर आहेत याला +७८६
एकतर मी मध्यरात्रीचा शो बघत होतो. गाणी लागली की बायको आतून ओरडायची, अरे आवाज कमी कर... पोरे उठतील.
काही गाणी तर ढकलू सुद्धा शकत नव्हतो. कारण त्यातील प्रसंग बघायचे असायचे.
इथे नेटफलिक्सवर तो चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर दाखवत आहेत. आणि दोन पत्ती पहिल्या क्रमांकावर कायम आहे. (कदाचित त्यांचेच अपत्य असल्याने असेल म्हणा) पण त्यामुळे सारखा बघायचा मोह होतो. त्यात क्रिती आवडीची. कुठवर संयम राहतो याची परीक्षा आहे.

salem's lot पाहिला आहे का कुणी??>>>>>
नारायण धारपांच्या लुचाई कादंबरीवर आधारित आहे.

अमेरिकेत नारायण धारपांच्या पुस्तकांना जबरदस्त डिमांड आहे.
रिचर्ड किंग याने तर लुचाई पुस्तक प्रकाशित होण्याआधीच अनुवाद करून ठेवलेला होता.

Pages