शब्दरूप आले, मुक्या भावनांना..

Submitted by संप्रति१ on 29 June, 2024 - 11:53

शीर्षकावरून काही वेगळ्याच अपेक्षा घेऊन आला असाल कदाचित. परंतु इथं एक वेगळाच उपद्व्याप करून ठेवलेला दिसेल. अंतर्मुख प्लस मुखदुर्बळ प्लस असामाजिक प्लस एकलकोंडे, अशा डेडली कॉंबिनेशनच्या माणसांबद्दलची काही निरीक्षणं इथं नोंदवली आहेत. किंवा त्यामाध्यमातून अशा माणसांच्या गुप्त कम्युनिटीची काही रहस्यं फोडण्याचा प्रयत्न केलेलाय.
यावर कुणी विचारेल की, ' हे का म्हणजे? कशासाठी हा उद्योग? काय गरज याची? '

तर काय बसल्या बसल्या जीव राहवत नाय. कायतरी टाईप करत रहायचं. दुसरं काय!

१.
तर हे लोक थिएटरमध्ये एकदम साईडची सीट‌ निवडतात.‌ दोन्ही बाजू अनोळखी मनुष्यांनी पॅक झाल्या की अनामिक दडपण बिल्ड व्हायला लागतं. सिनेमात गुंतता येत नाही. शेजारी जरा कुणी कौटुंबिक खुसपुस केली, चिप्सच्या पॅकेटचा आवाज केला की बेचैनीत भर पडते. आणि लगेच पुढे कुठे मनमोकळी जागा दिसतेय का, याचा शोध चालू होतो.‌

अनोळखी व्यक्तींशी समोरासमोर बोलणं म्हणजे बोंबाबोंबच.
अशा प्रसंगी काही खास लक्षणं दृगोच्चर होतात. उदाहरणार्थ नजरेला नजरच मिळू न देणं. माणसाचे डोळे म्हणजे त्याच्या आत्म्यात डोकावण्याचा रस्ता असतो. आणि कुणापुढेही आपला पोकळ आत्मा उघडा करणं योग्य वाटत नाही. मग लोक उगाच जज करतात. तर त्या दिशेने जाणं टाळलेलंच बरं. त्यामुळे इकडं तिकडं किंवा मोबाईलमध्ये बघत बोलणं. त्यातून समोरच्याला थोडंसं ऑड वाटतं, अवमानित झाल्यासारखं वाटतं. पण काय इलाज नसतो.

घरगुती किंवा एखाद्या सोशल कार्यक्रमांत जायचं म्हटलं की चार दिवस आधीपासूनच यांच्या पोटात गोळा यायला लागतो. चार लोकांसोबत जेवणं, खाणं, वावरणं, मिसळणं म्हणजे बिकट प्रसंग. असे प्रसंग टाळण्याकडे कल. अगदी जावंच लागलं तर कधी एकदा तिथून सुटून आपापल्या सुरक्षित गुहेत परत येतोय, अशी आस.! आस म्हणजे समजलं असेल ना तुम्हाला? 'ओढ' किंवा 'तीव्र इच्छा' वगैरे.!

.
समजा कधी हे लोक दुकानात किंवा मॉलमध्ये गेलेले असतात कपडे वगैरे घ्यायला. आणि दुर्दैवाने कधीकधी सगळे सेल्समन फ्री असतात. ह्यांनी आत प्रवेश केल्यावर सगळे सेल्समन अलर्ट होतात, कृत्रिम अदब दाखवतात. हे लगेच नर्व्हस होतात. अटेंशनची सवयच नसते. शॉपिंग करताना कुणी आपल्या मदतीला धावून यावं, अशी अपेक्षाही नसते. एक राऊंड मारावा, जे नजरेत भरेल ते उचलावं, दोन मिनिटांत बिल करावं आणि बाहेर पडावं. त्याचा उगाच सोहळा करत बसावं, असं यांना वाटत नाही.
काउंटरवरच्या सेल्समननं कितीही वेळा मोबाईल नंबर मागितला तरी हे मख्खपणे नकारार्थी मान हलवत राहतात. 'आमचं अमुक अमुक कार्ड आहे, ते घेतलं की असे असे पॉईंट्स मिळतील आणि पुढच्या शॉपिंगच्या वेळी तुमचा भरघोस फायदा होईल', वगैरे प्रलोभनांचा यांच्यावर ढिम्म परिणाम होत नाही.‌

.
बाईक रॅलींत, मिरवणुकांमध्ये नाचत ओरडत चाललेले लोक बघून यांना फक्त आश्चर्य वाटतं. पावसाळ्यात ताम्हिणी घाट, भुशी डॅम, आंबोली वगैरे ठिकाणी जाऊन पिऊन म्युझिक लावून दंगा करणारे ग्रुप, यांना अश्लील वाटतात. मुळात सगळ्यांनी घोळक्यानं फिरायला जाणं, आणि तिथं जाऊन सगळं ट्रॅफिक जॅम करणं, हे त्यांच्या आनंदाच्या व्याख्येत बसत नाही.

समजा कधी हे एखाद्या नेहमीच्या आईस्क्रीम पार्लर मध्ये वगैरे गेलेले असतात. पण तिथं अचानक कुणीतरी जुनी ओळखीची व्यक्ती दिसते. हे चपापतात. तिथं बसून आईस्क्रीम खाण्याचा आपला ओरिजनल प्लॅन रद्द करतात. आणि त्या व्यक्तीला काहीतरी भंपक कारण सांगून घाईघाईने पार्सल घेऊन तिथून निसटतात.

आश्चर्य वाटेल. माझ्या ओळखीतला एकजण आहे. तो एकाच सलूनमध्ये सलग चारवेळा जात नाही. कारण मग सलूनवाला ओळखीचा होतो. किंवा बहुतेक याच्या प्रेमात बिमात पडतो. आणि दाढी/कटींग करताना आपल्या व्यवसायिक समस्या वगैरे सांगायला लागतो. मन मोकळं करायला लागतो. आणि हा "ब्लेड फार चांगलं आहे" वगैरे थातुरमातुर अभिप्राय व्यक्त करून नैसर्गिक मौनावस्थेत जातो. ब्लेड फार चांगलं आहे, हे चार शब्द जुळवायलाच त्याला मनातल्या मनात पाच मिनिटं प्रयत्न करावे लागलेले असतात. तर मग बोलण्यातून बोलणं वाढवण्यात आपण नेहमीप्रमाणेच अपयशी ठरल्याची भावना मनात उरते. ती घेऊन तो तिथून उठून येतो.

.
यांचा स्वभाव हळूहळू बाईक चालवण्यातही रिफ्लेक्ट व्हायला लागतो. दुनियाभरच्या सर्व शक्यता लक्षात घेऊन, ट्रॅफिकचे सगळे नियम पाळत सावधपणे चाललेले असतात. ओव्हरटेक करण्याच्या आधी हजार वेळा विचार करतात आणि शेवटी हमखास नाद सोडून देतात. ताशी चाळीसच्या स्पीडनं असंही कुणाला ओव्हरटेक करणार ना.!
कट मारणे, लूक देणे वगैरे गोष्टी यांच्या विचारकक्षेत येतच नाहीत. त्यात काहीतरी एक्साईटमेंट असू शकते हे यांच्या गावीही नसतं.
एखादेवेळी चुकून साईडस्टॅंड न लावता बाईकवरून उतरल्यामुळे बाईक पडणे, हा एकमेव अपघात यांच्या आयुष्यात‌ शक्य असतो.
यांच्यामागनं कुणी हॉर्न वाजवायला लागलं की यांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरतं. हे सगळ्यांना रस्ता मोकळा करून देतात. रस्त्याच्या मधोमध कधीच बाईक चालवत नाहीत. कारण यांच्या दोन्ही बाजूंनी समांतर वाहनं चाललेली असली की आत्मविश्वास खचतो. यांना शक्य असतं तर स्वतःसाठी वेगळे रस्तेच बनवले असते यांनी.

खूप काळजी घेऊनही हे कधीतरी ट्रॅफिक हवालदाराच्या तावडीत सापडतातच. अशा प्रसंगी हे न्यायाची अपेक्षा लगेच सोडून देतात, आणि तातडीने दयेची अपेक्षा करत राहतात. ज्या पडेल चेहऱ्यानं हे याचना करतात, त्याचं शूटींग करून ठेवलं गेलं पाहिजे. पोलिस ट्रेनिंग सेंटरच्या अभ्यासक्रमात अशा केसस्टडी अतिउपयुक्त ठरतील. नवख्या पोलिसांचा आत्मविश्वास दृढ करण्यासाठी हे लोक म्हणजे एकदम फिट केस असतात.

.
अर्थात असं नाही की हे लोक कायमच उदास असतात. यांच्याही आवडीचे काही विषय असतात. पुस्तकं, लेखक, सिनेमे, गाणी, इतिहास, शायरी, विचारसरणी किंवा तत्सम काही. तसलं काही जिव्हाळ्याचं बोलणं निघालं की हे अचानक चार्ज होतात. आतल्या आत कसलातरी गिअर पडतो. डोळ्यांच्या बाहुल्या चमकतात. न्यूरॉन्समधली कसलीतरी अदृश्य गाठ सुटते. आणि हे घाईघाईने भरभर बोलायला लागतात. बोलायला लागले की मग बोलतच राहतात. आणि ते इंटरेस्टिंग असतं म्हणजे. अशावेळी समोरच्या माणसानं संयमानं गुपचूप ऐकत रहावं. त्यांच्या बोलण्याच्या फ्लो मध्ये अडथळा आणू नये. फोन वगैरेची रिंगटोन तर बिलकुल वाजू देऊ नये. कारण आपण फार मौलिक काहीतरी बोलतोय, आणि ते लोकांनी प्राण कानांत आणून ऐकावं, असं त्यांना वाटत असतं. अशावेळी अचानक कुणी बेसावधपणे/मुर्खासारखं पर्सनल कायतरी विचारलं तर सगळं मुसळ केरात जाऊ शकतं. मग पुन्हा हे लोक स्वतःला कासवासारखं आत आत ओढून घेतात. आणि तुटक तुटक उत्तरं द्यायला लागतात. मग कुणी कितीही डोकं आपटलं तरी फरक पडत नाही.

हा म्हणजे थोडाफार राहुल द्रविडसारखाच प्रकार म्हणावा लागेल. द्रविडला 'द वॉल' किंवा भिंत असं म्हणतात. म्हणजे समजा शोएब अख्तर पार बाउंडरीपासून धापा टाकत येतोय आणि सुसाट बाऊन्सर्स मारतोय. द्रविड दोन्ही हातांनी बॅट हवेत उंचावतो आणि बॉल सोडून देतो. शोएब चिरडीला येतो. पुन्हा बाउंडरीपासून पळत येतोय, बॉल टाकतोय. आता द्रविड उडी मारतोय, बॅटनं टुच्चुककन् जागच्या जागी बॉल दाबतोय. बॉल पिचवरनं घरंगळत शोएबकडं परत जातोय. पराकोटीचा फ्रस्ट्रेट झालेला शोएब खाली वाकून बॉल उचलतोय. हताशपणे बाउंडरीकडं चालत जातोय. आणि द्रविडवर या सगळ्याचा काहीही परिणाम होत नाहीये. कारण तो एक महान इंट्रोव्हर्ट मनुष्य आहे.!

.
लहान मुलांशी संवाद साधणं हेही महाभीषण काम. इतर नॉर्मल लोक लहान मुलांशी जसं लाडेलाडे बोबडं बोलतात, ते यांना काहीतरीच वाटतं.
उदाहरणार्थ एक सहकारी कधीतरी तिच्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन आलेली असते कामावर. ओळख करून देत असते.
"हे बघ काका, हॅलो म्हण." तो मुलगा हॅलो म्हणतो. काकाच्या बाजूने फक्त एक अवघडलेलं अस्फुट हाफ स्माईल येतं.! बास्स. संपला संवाद. टाटाबायबाय खतम.!!

किंवा एकदा ती तिच्या मुलाला याच्या शेजारी बसवून जाते. "मी आलेच एका मिनिटात. तू बस हं काकांशेजारी" म्हणून जी जाते ती जातेच. मुलगा या तथाकथित काकाकडे बघतोय. तथाकथित काका मुलाकडे बघतोय. दोघांमध्ये काही क्षण असेच तणावाचे साचून राहिलेयत.
आई कुठे दिसेना म्हणून मुलगा रडण्याच्या बेतात दिसतोय. कुठल्याही क्षणी आता हा सुरु होणार अशी चिन्हं दाटून येतायत. आणि या बनावट काकाची धडधड वाढीस लागते. मुलगा अपेक्षेने बघतो की हा काहीतरी समजूत वगैरे काढेल. पण तसं काहीही होत नाही. मुलाला कळतं की हा काका काही कामाचा नाही. तो रडण्याचा जोरदार सूर लावतो. काका हतबल. डोक्याला हात लावून त्याच्याकडे बघत राहतो की ही परिस्थिती कशी हाताळावी? रडणाऱ्या मुलाला कसं शांत करायचं असतं? याला तो अनुभवच नसतो. याला स्वतःला काही मुलबाळ नसतं. असतं तरी या प्रक्रियेत तो कितपत यशस्वी झाला असता, शंकाच असते. असो.

.
यांचे फोन विकत घेतल्यापासून सायलेंट मोड वरच असतात.
यांना भेटायला जायचं असेल तर पूर्वकल्पना देऊ नये.‌ व्हॉट्स अपवर कळवू नये की आम्ही येत आहोत. डायरेक्ट जाऊन ॲंबुश करावं. पूर्वकल्पना दिली तर हे येडेलोक फोन बंद करून बसण्याची शक्यता असते.
तशीही ही जमात बऱ्याचदा पुस्तकात, लॅपटॉपमध्ये डोकं घालून लोळत पडलेली असते. फोन थरथरून थरथरून बंद होतात. ओळखीचे नंबर्सही उचलण्यात निरूत्साह असतो. आणि अननोन नंबर्स तर अजिबातच उचलत नाहीत म्हणजे.
यांच्या फोनमधलं सर्वात जास्त वापरलं जाणारं ॲप म्हणजे 'नोट्स' हे असतं. बोलण्याचा अभाव ते लिहिण्यानं भरून काढतात. लिहिताना मात्र सगळी कसर भरून काढतात. काही हातचं राखत नाहीत. नेम धरून शेलकी शेलकी शेरेबाजी करतात. राखून ठेवलेला सगळा दारूगोळा लिहिताना उपयोगात आणतात. ते बऱ्यापैकी जमतं त्यांना.

८.
अंतर्मुख्यांचा नेता : जगातल्या अंतर्मुख्यांनो एक व्हा. आपल्या हक्कांसाठी लढा. हे बहिर्मुख लोक आपल्याला सतत बोअर करत असतात. 'का गप्प आहेस?' 'बोलत का नाहीस?' 'काही प्रॉब्लेम आहे का?' असं सारखं सारखं विचारत बसतात.
त्यांच्याविरूद्ध लढा. त्यासाठी संघटित व्हा. घरातनं बाहेर पडा. कंफर्ट झोनमधून बाहेर पडा. कारण आपली अंतर्मुख लोकांची कम्युनिटी धोक्यात आलेलीय. आता आवाज उठवण्याची वेळ आलेलीय मित्रांनो. 'बोलणाऱ्याची मातीपण विकते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही विकत नाही', हे तर तुम्हाला माहितीच असेल ना?

एक अंतर्मुख : एकतर तुम्ही असं उगाच किंचाळू नका प्लीज. थोडंसं मार्दव ठेवा बोलण्यात. आणि दुसरं म्हणजे मला नाही काही विकायचं वगैरे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त! काही थेट रिलेट झाले, तर काही आजूबाजूला पाहिले आहे Happy

दुकानातले वर्णन रिलेट झाले Happy कोणी अवाजवी अटेंशन दिले की अवघडल्यासारखे होते हे खरेच आहे. पण लहानपणापासून पुण्यातील दुकानांचा अनुभव असल्याने ही आहे.

बाईक रॅलींत, मिरवणुकांमध्ये नाचत ओरडत चाललेले लोक बघून यांना फक्त आश्चर्य वाटतं >> यात "पार्टी डान्स"ही अ‍ॅड करा Happy फार पकवतात लोक. ज्यांना नाचणे म्हणजे आपण काहीतरी जागतिक दर्जाची एन्जॉयमेण्ट करत आहोत असे वाटते त्यांनी खुशाल नाचावे. बाकीच्यांना बोलावू नये.

बाकी फार थेट रिलेट नाही झाले पण तसेही लोक पाहिले आहेत. चपखल वर्णन आहे Happy

मस्त लिहिलंय. हे अंतर्मुख/बहिर्मुख बरेचदा भवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असतं असं मला वाटतं. काही सर्कल्समध्ये कंफर्टेबल वाटतं, काही सर्कल्समध्ये वेळ मारून नेता येते, इतकंच.

“ज्यांना नाचणे म्हणजे आपण काहीतरी जागतिक दर्जाची एन्जॉयमेण्ट करत आहोत असे वाटते त्यांनी खुशाल नाचावे. बाकीच्यांना बोलावू नये.” - +१ फा. खायचा, ‘प्यायचा’ आणि नाचायचा आग्रह कुणीही कुणालाही करू नये.

काही गोष्टी रीलेट झाल्या. छान लिहिलं आहे.

पूर्ण अंतर्मुखता ते पूर्ण बहिर्मुखता या स्पेक्ट्रमवर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण बहुत करून असतो. त्यात परिस्थिती, कालपरत्वे इकडे तिकडे शिफ्टही होत असतो. सर्व लक्षणं सर्वांमध्ये असतीलच असं नाही.

खायचा, ‘प्यायचा’ आणि नाचायचा आग्रह कुणीही कुणालाही करू नये >> +१. यात नाचणे हा आग्रह एखाद्याला आवडणार नाही हे अनेकांना पचनी पडत नाही. माणूस आहे म्हणजे नाचणारच हे श्वास घेण्याइतकं गृहीत धरतात ते.

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. Happy

>>काही थेट रिलेट झाले, तर काही आजूबाजूला पाहिले आहे>>
फारएण्ड,
आजूबाजूच्या अशा लोकांपासून हा मजकूर लपवून ठेवावा. त्यांना हे अर्थातच आवडेल. परंतु तसं सांगणार नाहीत. सांगू शकणार नाहीत. तसं सांगण्याची पद्धतच नसते.
कहे कबीर गुंगे गुड खाया, पूछे तो क्या कहिए.!
गुंगे केरी शर्करा, खाए और मुस्काए..!

अशा काहीशा मस्तमौला स्थितीला पोचलेले असतात ते. Happy

आणि शिवाय कुणाला हे फारसं माहित नाही, पण अशा लोकांचं पडद्याआड चालणारं एक मोठं जागतिक संघटन असतं. गुपचूप काम करत राहणारं एक व्यापक जाळं असतं. तर आपल्यात ही फंदफितुरी करणारा गद्दार कोण आहे, याचा अंतस्थ तपास बिपास चालू व्हायचा संघटनेकडून. आणि ते काय माझ्यासाठी इष्ट होणार नाही. Wink

मस्त.

आवडलं.

बरंच रिलेट झालं….

मला आजकाल कोणी घरी जेवायला वगैरे बोलावलं, किंवा घरी कोणी येणार आहे म्हंटलं की स्वतःची मानसिक तयारी वगैरे करावी लागते…..

खूपच छान.. Happy
मी ambivert आहे.. सगळे मुद्दे पटले..
बरेचसे मुद्दे relate झाले..

छान लिहिलं आहे.
वरच्या अनेकांसारखंच, काही मुद्दे रिलेट झाले, काही आजूबाजूला पाहिलेत. कायदेशीर नातेवाईकांच्यात वावरताना तर फारच दडपण येतं हसतमुखाने औपचारिक बोलण्याचं.

आपण अंतर्मुख असलो तर आजूबाजूला बहिर्मुख माणसं असलेली बरी असतात मात्र. कुणीच काही बोलत नसेल तर उगाचच तणावपूर्ण वाटायला लागतं वातावरण.

यातला 2 नंबरचा पूर्ण मुद्दा आणि 1 नंबर च्या तिसऱ्या परिच्छेदाशी पूर्ण सहमत.
(मोबाईल नोटपॅड आणि माईंड अल्कोव्ह नावाचं ऍप मीपण खूप वापरते.)
असे लोक असतात खरे जगात.पण पीअर प्रेशरखाली त्यांनाही हळूहळू बदलावं लागतंच.

कायदेशीर नातेवाईक >>> Lol

पण अशा लोकांचं पडद्याआड चालणारं एक मोठं जागतिक संघटन असतं. गुपचूप काम करत राहणारं एक व्यापक जाळं असतं. तर आपल्यात ही फंदफितुरी करणारा गद्दार कोण आहे, याचा अंतस्थ तपास बिपास चालू व्हायचा संघटनेकडून. आणि ते काय माझ्यासाठी इष्ट होणार नाही. >>> Lol

मला ते अंतर्मुख्यांच्या नेत्याला एका अंतर्मुख्यानेच दिलेले उत्तर आवडले Happy

कधीकधी बरीच लीडरगिरी/मॅनेजरगिरी करत असल्याने कुतूहल म्हणून एक पुस्तक घेणार होतो - अ‍ॅमेझॉनवर सापडले होते: The Introverted Leader. त्याचे रिव्यूज वाचले. मला वाटले होते की अंतर्मुख लोकांची (असलीच तर) जी काही बलस्थाने असतील त्याचा वापर करून लोकांचे नेतृत्व कसे करायचे असे काहीतरी असेल. म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व मुळात "फादर फिगर" म्हणतात तसे नाही - हरकत नाही. तुमचे बोलणे अगदी गोडाउन मधला पीटर व त्याची गँग नाही, तरी किमान तीस चाळीस सभ्य सुशिक्षित लोकांच्या गलबला चाललेल्या मिटिंग मधे त्यांना क्षणार्धात गप्प करून आपले बोलणे ऐकायला लावेल असे बच्चन स्टाइल "बॅरिटोन" वगैरे नाही - हरकत नाही. चार अनोळखी लोकांच्या संभाषणात घुसून त्यांना कालचे बार-बे-क्यू, नुकतीच केलेली क्रूझ, कॅम्पिंग किंवा जनरल वाइनमेकिंग याबद्दल बोलण्यात तुम्हाला बिलकूल इंटरेस्ट नाही - आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सगळे तुमच्या चेहर्‍यावर व बॉडी लँग्वेज मधे दिसते - तरी नो फिकीर - असे ठासून लिहीले असेल. असे लिहीले असेल, की तुमची बलस्थाने ओळखा व ती वापरा. कोणतेही काम पूर्ण करायला त्याचा गाजावाजा करण्याइतकेच किंवा त्यापेक्षा जास्त ते शेवटपर्यंत नेण्याचा ध्यास घेतलेले आणि पडद्यामागे राहायला आवडणारे/चालणारे लोक लागतात. ते तुम्ही व्हा - वगैरे वगैरे. पण या रिव्यूज मधे असे कळाले की तो महान लेखक की लेखिका अंतर्मुख लोकांना बहिर्मुख होण्याचा सलला विविध प्रकारे देण्याव्यतिरिक्त यात फारसे काही सांगत नाही. तेव्हा नाद सोडून दिला. हे म्हणजे पार्टीत नाचणार्‍याने नाचण्यात बिलकूल इंटरेस्ट नसणार्‍याला नाचायला बोलावण्याचाच प्रकार आहे.

बाय द वे अंतर्मुख लोकांनाही आपण भलतेच सोशल आहोत असे वाटायला लावणारेही लोक असतात. माझ्या आधीच्या ऑफिसमधे एकजण होता. ऑफिसमधे कधी कॉरिडॉरमधे किंवा इतरत्र तो समोर आला आणि आपण "हाय" केले किंवा मानेने नॉड केले की तो आपल्याकडे स्पेसिफिकली बघायचा नाही - तो कोणाच्याही नजरेला नजर देऊन क्वचितच बघायचा. तो जेथे ऑलरेडी बघत असेल तेथेच मान उडवून आपली सलामी स्वीकारायचा. ते नॉड करणे आपल्याकरता होते हे आपण समजून घ्यायचे Happy

लिखाण खुसखुशीत आहे.
सहावा पॅरा आवडला.
फारएण्डशी बर्‍याच प्रमाणात सहमत.

सही आहे.
मी introvert होतो आता ambivert झालोय.
दुसऱ्याला आपला त्रास नको, त्यानेही देउ नये अशी माफक इच्छा असणे हे ही एक लक्षण म्हणावे काय?

मस्तच भट्टी जमली आहे. तुमची निरीक्षण शक्ती जबर आहे. वाचताना हसू आवरत नव्हते. अर्ध्याहून अधिक ठिकाणी ती मीच आहे असं ही वाटलं. असो.

कायदेशीर नातेवाईक >> in laws साठी हा मजेशीर शब्द आजच ऐकला. Lol >> आणि त्याचा माबो शॉर्ट फॉर्म काना Happy .

काना शब्द टीपापा, जर्सी बाफ वर खूपच प्रचलित होता एकेकाळी.

छान लेख. मला पण लोकांशी बोलायचे, मिस ळायचे फार टेन्शन येते. दुसृयांच्या घरी राहायला तर आजिबातच आवडत नाही. आता तर इंट्रोवर्ट पणा इतका वाढला आहे की घरात दोन प्रशस्त बेडरुम आहेत पण तिथे ही कामा शिवाय जात नाही. ड्रोइन्ग रुम मधला सोफा बरा आणि फोन . अधून मधून जनसंपर्क ठेवायला पेपर रोज वाचते त्यातही लोकांचे व्यापार, फसवणूकी, नाहक दुसृयांच्या चुकीने नाही तर अपघातात वारलेले लोक मुले तरुण ह्यांचे वाचून एक प्रकारचे खिन्नच वा टते. नव्या प्रकारच्या सायबर फ्रोड वगैरेची माहिती मिळते. पिंक पेपर्स इन्वेस्ट मेंट साठी.

डिलिव्हरी घेउन येणारांना पाणी विचारणे व थेंक्यु म्हण णे इतके मात्र करते. स्वतःच्या अवकाशात फिजिकल व मेंटल/ इमोशनल कोणाचाही चंचु प्रवेश सहन होत नाही.

मस्त लिहीलंय. दुकानाचा मुद्दा अगदीच रिलेट झाला. सेल्समननी उगाच खूप बडबड करून आपली विचारशृंखला तोडू नये असं मला वाटतं. 'मला काय हवंय ते नाही सापडलं तर मी विचारते तुम्हाला, तुम्ही मला छळू नका' असं माझं मत आहे. आणि दुकानात खूप वेळ रेंगाळायला पण आवडत नाही. आता मॉल मधे वेस्टसाईड टाइपची दुकानं असतात तिथे कोणी असा त्रास देत नाही तर मला तिथे खरेदी करायला आवडते.

हे सगळे मुद्दे लागू होतील अशी काही लोकं आहेत ओळखीत. परफेक्ट वर्णन केलं आहे.

काउंटरवरच्या सेल्समननं कितीही वेळा मोबाईल नंबर मागितला तरी हे मख्खपणे नकारार्थी मान हलवत राहतात. >>> हा लेख आल्यापासून यावर खूपदा लिहावंसं वाटलं, पण दोस्ती बनी रहे म्हणून लिहीले नाही.

पण इतक्यातच मला एक फोन कॉल आला. पहचाना क्या, बस क्या , आवाज नही ना पहचानी असे करत करत बोलता बोलता त्याने १९ हजारच्या दोन ट्रॅन्झॅक्शन्स केल्या. त्याने आधी ओळख आहे असे दाखवत मुलाला इमर्जन्सी पैसे हवेत तो फोन करेल म्हटल्यावर मी गुगल पे अकाउंट नाही असे सांगितल्याने त्याने एन ई एफ टी केलं. मलामेसेजेस आले होते. मग बॅंकेला फोन करून आवश्यक त्या स्टेप्स घेतल्या आणि अकाउंट सुरक्षित केलं.

तर मोबाईल नंबर न देण्याचं सर्वात महत्वाचं कारण सुरक्षितता हे आहे. मी आयटी क्षेत्राशी संबंधित नसल्याने हॅकिंग वगैरे माहिती नाही. पण डेटा कसा जमवतात याचे साधारण मार्ग माहिती आहे. त्यामुळे मॉलमधे मागे लागणारे सर्व्हे वाले , कार्ड हवे का विचारणारे यांना टाळतो. त्यांच्याकडे फॉर्म भरला रे भरला कि संध्याकाळी किंवा फारतर दुसर्‍या दिवशी एखाद्या मुलीचा फोन आलाच म्हणून समजा. तुम्हाला बक्षीस लागलेय. जे एम मॅरीएटला संध्याकाळी सहा वाजता मिसेस ला घेऊन या. येताना क्रेडीट कार्ड घेऊनच या असा प्रेमळ आग्रह असतो. दोन वेळा गेलो होतो तेव्हां एकदा चमचा सेट आणि एकदा कुत्र्याला खायला घालायला प्लेट मिळाली होती. तिचा उपयोग झाला.

इथे संदर्भ वेगळा आहे हे माहिती असूनही अगदीच राहवले नाही.
हल्ली तर कार, बाईक बघायला वेळ काढून गेलंच तर आधी फॉर्म पुढे करतात. हा डेटा नंतर विकतात. त्यांना इंटरेस्ट त्यांचं प्रॉडक्ट दाखवण्यात आहे कि आपली माहिती विकत (फुकट घेऊन विकण्यात) आहे ?

अनोळखी नंबरचा हा प्रताप.
माझ्या एका सहकार्‍याला एकदा बँकेतून बोलतेय म्हणून एका मुलीचा फोन आला होता. तुमच्या मुलीला चेन्नईत कार्ड इश्यू झाले आहे, कन्फर्मेशन कॉल आहे. पत्ता पुन्हा एकदा सांगा. तर तो सहकारी म्हणाला कि माझी मुलगी घरात भांडण करून निघून गेली आहे , तिलाच विचारा.
मी म्हटलं काय सर ,काय झालं ?
तर तो म्हणाला," माझी मुलगी चेन्नईला कधीच गेलेली नाही. तिच्या नावावर पेट्रोल घेतलं, दागिने घेतल्याचे स्टेटमेण्ट येतंय. हे कार्ड तिचं नाहीच" आपण जी कागदपत्रं हजार ठिकाणी देतो त्याचा उपयोग करून ड्युप्लीकेट सीम कार्ड बनवून कार्ड घेतलं होतं.
सावध असावं लागतं.....

सॉरी या धाग्यावर रसभंग केल्याबद्दल.
पण अज्जिबात राहवलं नाही.

आवडीचा विषय! उद्या लिहिते.
तुर्तास या संबंधी फेबुवर गौरी साळवेकर यांची पोस्ट वाचनात आली. ती पण खूप आवडली.

बडी_ नोबडी (रिपोस्ट) आपल्या समाजाची एक गंमत आहे. आपण कधीच कोणत्या गोष्टींच्या खोलात जात नाही. निरीक्षण, अभ्यास न करताच ,त्या विषयाचा वेगळा अँगल असेल हे लक्षात न घेता आपली ठाम मतं बनवतो. त्यातूनच अनेक concepts ची सरमिसळ किंवा गल्लत करताना आपल्याला त्याची जराही जाणीव नसते.
कुठल्याशा शाळेत बडी बेंच ही संकल्पना असल्याचं वाचलं. संकल्पना उत्तम आहे यात वाद नाही.पण ती उत्तम कोणासाठी आहे याचा विचार केलात तर लक्षात येईल की जी मुलं बहिर्मुख आहेत ,ज्यांना माणसं अवतीभवती लागतात त्यांना याचा उपयोग होऊ शकतो पण जी मुलं अंतर्मुख आहेत ,ज्यांना एकटं राहायला आवडतं त्यांना असाच एखादा कोपरा चित्र काढायला, रेघोट्या मारायला, काहीतरी वाचायला उपलब्ध करून दिला तर? ही मुलं देखील आनंदाने आपल्या कोषात जातील आणि मग बाहेर येऊन मित्रांमध्ये मिसळतील. आपल्या समाजात अंतर्मुख असणं हे जणू विकृतीचं लक्षण मानलं गेलं आहे .आणि काहीही करून ही 'विकृती' घालवायचीच असा पण करून लोकं अंतर्मुख व्यक्तींना 'जरा लोकांमध्ये मिसळत जा, थोडं सोशल व्हायलाच हवं, असला घुमेपणा काय कामाचा' असं म्हणून ओढून ताणून नव्या ठिकाणी, गर्दीत ,समारंभात घेऊन जातात. याचं कारण असं की आपण व्यक्तिमत्त्व (पर्सनॅलिटी) आणि व्यक्तित्व/पिंड/ चरित्र (कॅरेक्टर) यात केलेली गल्लत.

एखादया व्यक्तीचा मूळ पिंड कसा आहे याबद्दल असलेलं अज्ञान! आणि हो ,हे आपला मेंदू जन्मतः ठरवतो की आपण अंतर्मुख आहोत की बहिर्मुख! हा स्वभाव नसून एक जन्मजात वैशिष्ट्य आहे. आपण पहिल्या गोष्टीवर नितांत कष्ट घेतो कारण ' वक्तृत्व ,संभाषणकला,लोकं जोडता येणं हे सर्वोत्तम कौशल्य आहे हे सगळ्या सेल्फ हेल्प ,मोटीवेशनल पब्लिकने आपल्या मनावर यशस्वीपणे बिंबवलेलं असतं. सतत आपले विचार मांडत राहणं ,लोकांची मतं जाणून घेण्यासाठी जिवाचं रान करणं, यशस्वी होण्यासाठी बोलता येणं, लोकांमध्ये आपली छाप पाडता येणं अत्यावश्यक आहे या भावनेने आपल्यातील बहुतांश जण पछाडलेले असतात. अर्थात तुमच्या व्यवसायाची ती गरज असेल तर तुम्हाला टाइम बीइंग ते यायलाच हवं

पण ते आयुष्य जगण्याचा निकष होऊ शकतं का याचा विचार करता काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील अनेकदा मी एखादया कार्यक्रमाला तासभर गाडी चालवत जाते आणि गेल्यावर दहाव्या मिनिटाला तिथून बाहेर पडते. I don't miss calls I stare at them! कित्येकदा मी लोकांना भेटायला अनुत्सुक असते किंवा चक्क टाळते. पण एखाद्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात मला 500 लोकांसमोर बोलण्याची वेळ आली तर ती मी कोणत्याही अडथळ्यांशिवाय सहज निभावून नेते. मला माणसं नको वाटतात. इतकंच काय सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत कुणाशी बोलणं ,संगीत किंवा गाणी ऐकणंदेखील नको वाटतं! पण जेव्हा ऑफिसमध्ये जर सकाळी 8 वाजता मिटिंग असेल तर तिथे मी आपोआपच लीड घेतलेला असतो. ज्या व्यक्तींशी माझे सूर जुळतात त्यांच्याशी मी भारंभार बोलत नसले तरी ही लोकं मला माझ्या आयुष्यात नेहमी हवी असतात. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असण्याचं कारण इथे लोक तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हजर नसतात! ही स्पेस जपली जाते.त्यामुळे इथे संवाद साधतानाही मी तशी एकटीच ,माझ्या कोषात असते. तरीही इथे किंवा wa वर कोणत्याही ग्रुपमध्ये मी ऍडजस्ट होऊ शकत नाही कारण त्यात मी रमू शकत नाही माझ्या व्यक्तिमत्वातील हा विरोधाभास कित्येकांना त्रासदायक वाटतो. पण त्याला मी काही करू शकत नाही कारण ती त्यांची अडचण आहे माझी नव्हे.

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळून, एकटं फिरायला ,ट्रीपला,शॉपिंगला ,इतकंच काय एकटं जेवायला जाणं हा प्रकार अनेकांना विचित्र वाटला तरी तो मला नितांत आनंद देणारा आहे. एखादया व्यक्तीशी मी सुरुवातीला फोनवर बोलताना व्यवस्थित बोलेनही पण नंतर मला कंटाळा येतो. अगदी मेसेजमध्ये भारंभार बोलणाऱ्या लोकांना देखील माझा लांबूनच नमस्कार असतो. एका पॉईंट नंतर ,माझे पेशन्स संपल्यावर त्यांना माझ्या आयुष्यात कोणताही ऍक्सेस मी देऊ इच्छित नाही. आणि विचित्र वाटलं तरी याचं कारण 'खूप बोलते/ खूप बोलतो' हेच असतं. याचं कारण मी कुणीतरी ग्रेट आहे असं नसून , मला बहिर्मुख लोकांपेक्षा वेगळे stimuli लागतात इतकंच आहे.

एखाद्याच्या बाबतीत मोठ्या आवाजातील संगीत,गाणी ,हसणं खिदळण , मित्रमंडळी , गेट together, परफ्युम हे एक catalyst ठरतील ;पण अंतर्मुख लोकांच्या बाबतीत हेच घटक त्रासदायक ठरतील. अनेकांना लोकांना स्वतःहून भेटायला आवडतं. ते चूक आहे असं अजिबात नाही. पण त्या व्यक्तीचा पिंड हा अंतर्मुख नक्कीच नसतो. थोड्याफार प्रमाणात आपण सगळेच Ambivert म्हणजे दोन्ही स्वभावाचे मिश्रण असणारे असलो तरी यातला कोणतातरी एक ट्रेट आपल्यात प्रबळ असतो. टोकाचा अंतर्मुख किंवा पराकोटीचा बहिर्मुख माणूस 'नॉर्मल' मध्ये येत नाही. जस्ट राईट- ना कमी ना जास्त या मात्रेत अंतर्मुख व बहिर्मुख लोकांना वेगवेगळ्या stimuli ,catalystची गरज असते. पण हे लक्षात न घेता आपल्याकडे अंतर्मुख लोकांना बहिर्मुख लोकांच्या पंक्तीला बसवण्याचा त्रासदायक उद्योग लोक समाजसेवा म्हणून करत आले आहेत. राहता राहिला प्रश्न आत्मविश्वास असण्याचा.

तर बहिर्मुख लोकांत आत्मविश्वास ठासून भरलेला असतो हे जसं एक मिथक आहे तसंच अंतर्मुख लोक मुखदुर्बळ असल्याने त्यांचं आयुष्य अवघड आहे,ही देखील एक अंधश्रद्धाच ! Character या घटकावर आपण कामच करत नसल्याने अमेरिकेत महामंदीच्या काळात ज्या सेल्फ हेल्प लेखकांनी अनेक तात्पुरते तोडगे सांगितले त्याला आपण वेदमंत्राइतकं पवित्र समजून बसलो आहोत वास्तविक या लेखकांनी ,लोकांना पद्धतशीरपणे वेड्यात काढलं, बक्कळ पैसा कमावला आणि हीच माहिती( याला ज्ञान म्हणवत नाही) जगभर पसरवली.

आपल्या व्यक्तित्वाचा पाया ,सॉलिड रॉक कसा असायला हवा यापेक्षा वर दिसणारा डोलारा कसा आहे यातच आपल्याला जास्त रस. असं म्हणतात की मूर्ख लोक अनोळखी लोकांशी ,गर्दीत भडाभडा बोलतात आणि आपल्या जवळच्या लोकांशी अंदाज घेत घेत बिचकत बोलतात आणि शहाणी लोक बाहेरच्या अनोळखी लोकांशी, गर्दीशी अंदाज घेत घेत बिचकत बोलतात आणि जवळच्या लोकांजवळच आपलं मन मोकळं करतात. हे सहज आठवलं म्हणून लिहिलंय ,लगेच बहिर्मुख मूर्ख व अंतर्मुख शहाणे अशा पट्ट्या चिकटवू नयेत अनेकदा हे उलट देखील असतं मी वर म्हटल्याप्रमाणे व्यक्तीच्या character वर ते अवलंबुन आहे. असो बडी बेंचच्या निमित्ताने जे आठवलं ते लिहिलं - गौरी

अंजली_12, पोस्ट आवडली. हे सगळं खूप रिलेट होतंय. माझ्यासारखे बरेच जण असतात/आहेत हे पाहून एक टोचणी कमी झाली Happy

अनोळखी ठिकाणी नंबर वरून आठवले.
शाईन.कॉम वर कधीकाळी प्रोफाइल बनवले होते.किवर्ड पण नीट दिले होते.पण फारच वेडेबागडे जॉब ओपनिंग यायला लागले.प्रोफाइल डिलीट करावं म्हटलं तर डिलीट चा ऑप्शन नाही, ते त्यांना मेल लिहून करावं लागतं.cv डिलिटावा म्हटलं तर आधी नवा चढवावा लागतो मग जुना डिलीट करता येतो.मग वाणसामानाची यादी cv म्हणून चढवली तर 'इथला नंबर नाव आणि तुम्ही दिलेलं नंबर नाव मॅच होत नाही'म्हणून तो चढेना.मग शेवटी काहीतरी वेडंबागडं नाव दिलं, नंबर डिलीट करता आला नाही कारण नवा चढवावा लागतो ते करायला otp म्हणजे खरा खरा चढवावा लागतो.खोटा 000000000 किंवा 99999999 चालत नाही.शेवटी त्यातल्या त्यात जमेल ती माहिती डिलीट केली, खोटी लिहिली आणि त्यांना मेल लिहून प्रोफाइल डिलीट करा सांगितलं.एकंदर शाईन.कॉम शी घरोबा केल्यास काडीमोड घेण्याचा सहज ऑप्शन नाही.नाते जोडताना विचार करा.

अंजली छान post..
आता मला शंका आहे की मी खरंच अंतर्मुख आहे की बहिर्मुख.
.
मी basically moody /लहरी आहे. मला वाटलं तर बडबड करेन नाहीतर शून्यात नजर लावून बसेन.
त्यामुळे बरेच गैरसमज होतात.
मुलगी शिष्ट आहे हा common शेरा!