कथा

Submitted by बिपिनसांगळे on 19 May, 2024 - 12:54

कथा

या विषयावरची चर्चा

आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो असतो . पुढे आपली तीच आवड कथेकडे वळते . पण असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही . तरीही आता तो भारतात चांगलाच रुजलाय . सदर चर्चा ही त्या संदर्भात आहे .

कथा अनेक प्रकारची असू शकते. ती अनेक प्रकारे मांडता येऊ शकते . काही कथा या कायम मनात घर करून राहतात .
मराठी मध्ये चारुतासागर यांची ' नागीण' ही कथा , हिंदी - उसने कहा था , इंग्लिश - द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिट्टी , अशा काही कथांचे संदर्भ नेहमी दिले जातात . आणि अशा अनेक कथा .

पूर्वी मराठी कथा त्या वेळच्या काही एक पद्धतीने मांडली जात होती. आता ती तशीच राहिलेली नाही . ती काळानुरुप बदलली आहे आणि बदलायला देखील पाहिजे. पण ज्या नेमक्या ठिकाणी नवकथेची दखल घेतली गेली पाहिजे, तिथे ती घेतली जात आहे का ? की अजूनही तीच पद्धत, त्याच कथा आणि जुने कथाकार यामध्येच ती ठिकाणं अडकून पडली आहेत ? …

सध्या सामाजिक माध्यमांवर खूप जण लिहीत आहेत . जे ‘ चांगलं ’ लिहितात त्यांची दखल घ्यायला काय हरकत आहे ? विशेषतः जेव्हा मासिकं बंद पडत आहेत . वर्तमानपत्रं साहित्याला आक्रसून घेण्यात मग्न आहेत. एकूण गंभीर परिस्थिती आहे . विशेषतः रीडर्स डायजेस्टसारखं मासिक बंद पडतं तेव्हा ! ...

अमुक एक कथा चांगली , असं काही नाही . ती कशी लिहिली गेली आहे हे महत्त्वाचं . कौटुंबिक कथा आवडत असतील त्यांना गुन्हेगारी कथा आवडणार नाहीत. हा भाग वेगळा. ही आवडनिवड व्यक्तिनुरूप . पण लोकांना गोष्टी आणि कथा नेहमीच आकर्षित करतात. हे नक्की!

कथेचे अनेक प्रकार आहेत . शशकपासून ते दीर्घ कथेपर्यंत , जीवनावर भाष्य करणाऱ्या अगदी छोट्या कथांपासून ते मोठ्या घडामोडी मांडणाऱ्या कथांपर्यंत.

मराठीमध्ये उत्कृष्ट कथांचं संकलन करण्याचे प्रयोग केले गेले आहेत . उदाहरण म्हणजे राम कोलारकर संपादित काही खंड.

आजही मराठीमध्ये कथा स्पर्धा आयोजित केल्या जातात. जातात… पण आयोजक आणि परीक्षक स्वतःच आयोजित केलेल्या त्या स्पर्धांकडे नक्की कितीशा गांभीर्याने बघतात ?

अलीकडे कथा स्पर्धांमधील पुरस्कार प्राप्त कथा पाहिल्यावर... अरे बापरे! हाती सुतळी बॉम्ब यावा अशी अपेक्षा असताना हाती सुटा लवंगी फटाका येतो. मराठी भाषा मागे पडते आहे ही चर्चा नेहमीच चालते. या चर्चेमध्ये एक अगदी छोटासा का होईना पण हा मुद्दादेखील असावा का ?

माझी अशी विनंती आहे की तुम्ही इथे कथा या विषयावर चर्चा करावी . तुम्ही कथेकडे कसं पाहता याबद्दल व्यक्त व्हावं . कथास्पर्धा, वेगवेगळ्या कथा , वेगवेगळ्या ठिकाणच्या कथा याबद्दल बोलावं.

तुमच्या आवडत्या , लक्षात राहिलेल्या कथा , हे संस्थळ, इतर संस्थळं, सामाजिक माध्यमं , मासिकं - पुस्तकं , भारतीय कथा ते जागतिक पातळीवरची कथा असं सगळं या परिघात येऊ शकतं .

वाचक, प्रतिसादक , विशेषतः कथालेखक - लेखिका आणि इतरही सर्वांसाठी हे आवाहन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख आवडला... बिपिनजी..!

एका कथा लेखकाला कथा लेखनाबद्दल काय वाटतं ते तुम्ही अगदी सहजपणे शब्दांत उतरवलंय ..!

सोशल मिडियाचे आभार प्रथम मानायला हवेत कारण आपल्या विचारांना लेखनाच्या स्वरूपात मांडण्याचे स्वातंत्र्य मिळालंय.. हौशी तसेच नवलेखकांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झालेयं..

मायबोलीवर देखील वेगवेगळ्या विषयांवरचे माहितीपूर्ण लेख तसेच कथा उत्तमरित्या लिहिलेले असतात. लेखन, प्रतिसादात प्रगल्भता असते.

अमुक एक कथा चांगली , असं काही नाही . ती कशी लिहिली गेली आहे हे महत्त्वाचं . कौटुंबिक कथा आवडत असतील त्यांना गुन्हेगारी कथा आवडणार नाहीत. हा भाग वेगळा. ही आवडनिवड व्यक्तिनुरूप >>> हे पटलं.

मला स्वतःला गूढ, सामाजिक विषयावरच्या, संवेदनशील तसेच भावनिक कथा वाचायला आवडतात. लहानपणी विज्ञानकथा , विनोदी कथा वाचायला आवडायच्या. कालांतराने वयासोबत हळूहळू वाचनाची आवड बदलत गेली.

अलीकडे कथा स्पर्धांमधील पुरस्कार प्राप्त कथा पाहिल्यावर... अरे बापरे! हाती सुतळी बॉम्ब यावा अशी अपेक्षा असताना हाती सुटा लवंगी फटाका येतो. मराठी भाषा मागे पडते आहे ही चर्चा नेहमीच चालते. या चर्चेमध्ये एक अगदी छोटासा का होईना पण हा मुद्दादेखील असावा का ?>>

कथा स्पर्धांचा जास्त अनुभव नाही. मात्र एकदाच भाग घेतला होता स्पर्धेत.. नंबर नाही आला स्पर्धेत हा भाग वेगळा... ! कथा लेखनाची मासिकं बऱ्याच वर्षात नाही वाचली..! वाचनालयात गेले की, मी जुन्या कथांची सगळी पुस्तकं उचकत बसते.

बुक स्टॉलवर आता पूर्वीसारखी मासिकं उपलब्ध नसतात.. लिखित साहित्य मागे पडत चाललंय हे नक्की..!

मराठीमध्ये उत्कृष्ट कथांचं संकलन करण्याचे प्रयोग केले गेले आहेत .>>>

५०-६० च्या दशकातल्या 'हंस' मासिकातल्या काही कथांचे पुस्तकरूपी कथासंग्रह वाचले. कथांचा काळ जुना असला तरी कथांचे विषय, त्यातली भाषा अतिशय सुंदर , वाचनीय आहे.

गंगाधर गाडगीळ , रत्नाकर मतकरी , जी.ए. कुळकर्णी, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, भाऊ पाध्ये , राजन खान हे माझे आवडते लेखक आहेत. त्यांच्या कथा मी आवडीने वाचते. त्यांच्या कथेत गुंतायला होतं. ह्या सर्व लेखकांच्या कथा मनात घर करून राहिल्यात.

गूढकथा, भयकथा, सामाजिक कथा तर आवडतातच मात्र स्त्री मनोविश्वाच्या चित्रणाच्या तसेच स्त्री-पुरुष नाते संबंधांचा , त्यातल्या गहिरेपणाचा वेध घेणाऱ्या कथा मला नेहमीच भुरळ पाडतात. पूर्वी कादंबऱ्या वाचायला आवडायच्या मात्र आता लघुकथांचे संग्रह वाचायला आवडतात. आवड असूनही कादंबऱ्या, मोठी पुस्तकं वाचायला वेळेअभावी जमत नाही.

नामवंत नसलेल्या कथालेखकांच्या आणि लेखिकांच्या कथा सुद्धा मला खूप आवडल्या आहेत.

सध्याच्या नवीन लेखकांच्या कथा जास्त वाचनात आल्या नाहीत अजून..!

वाचक मंडळी

खूप आभार .

मी स्वतः कथा या विषयावर आत्ता तरी काही लिहीत नाही .
मी स्वतःच विचार मंथनात असतो .

पण तुमची मते स्पष्ट असतील तर येऊ दे की !

चर्चेचा प्रस्ताव आहे हे वाचायला सुरूवात केल्यावर समजले.
ललितलेखन किंवा अन्य ग्रुप मधे हलवाल का ? प्रतिसाद वाचायला आवडतील.

रघू
खूप आभार

धागा कसा शिफ्ट करायचा ?
वेमा
कृपया आपण हा धागा योग्य ठिकाणी हलवाल का ?

आभार