तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनि गेला!

Submitted by प्रज्ञा९ on 4 May, 2024 - 11:09

आमची ओळख नक्की कधी कशी झाली हे नीट सांगता येणार नाही, पण ओळख होईल असं वातावरण मात्र
माझ्या लहानपणापासूनच होतं घरात. मोकळ्या वातावरणात वाढलो आम्ही बहिणी. मी १२वीत असताना पुण्यात ज्या घरी पेइंग गेस्ट होते तिथेच माझ्या एका रूममेटमुळे आमची - त्याची आणि माझी- ओळख झाली. ती रूममेट आणि तिची बहीण, दोघी संगीत विषयात शिक्षण घेत होत्या. तो त्यांचा मित्र, त्यामुळे त्यांच्या गाण्याच्या निमित्ताने जातायेता मीपण उगीचच जरा ओळखीचं हसू लागले. ओळख झाली. १२वीचे क्क्लासेस, अभ्यास, मेसमधून जेवून आल्यावर थकवा यायचा, तो आमच्या संवादामुळे कमी झाला. पण ते तेवढ्यापुरतंच राहिलं. पुढे मी पुन्हा रत्नागिरीत आले आणि पुन्हा अभ्यास, कॉलेज या सगळ्यांत वेळ जायला लागला. पण एव्हाना, ओळख ही फक्त ओळख नाहिये हे कुठेतरी जाणवायला लागलं होतं. आईचा विरोध नव्हताच, उलट तीही अधेमधे आमच्या संवादात सामील असायची.
मला आठवतंय, २ दिवसांनी डिप्लोमाची बोर्ड एक्झाम आणि मी आईबरोबर या कुटुंबाशी रात्री उशीरापर्यंत गप्पांत गुंगले होते! दरवेळी आईच असे असं नाही, कधीकधी माझी सखीही असायची. कारण पुण्यात जशी एक मैत्रीणच ओळख व्हायला कारण ठरली तशी इथेही मला कंपनी द्यायला माझी सखीच असायची. पण एव्हाना मला त्याच्याबद्दल वाटणारी ओढ मात्र वाढत होती. मध्यमवर्गीय मराठी घरात जसं अभ्यासू वातावरण असायचं तसंच ते आमच्याही घरी होतं. अभ्यासात हयगय नको आणि आई-बाबांचा विश्वास उडेल असं काही करायचं नाही असे संस्कार होते. मीही कधीच अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही. किंबहुना, भराभर अभ्यास संपवून, थोडा जास्तीचा करून मग मला माझ्या मनासारखं करता येईल हे नक्की झालं होतं.
तसा तो एकदम दिलदार स्वभावाचाच. त्याची भाषा कळायला मला खूप वेळ, वर्षंच लागली म्हणा ना! त्याचा एक भाऊ मात्र एकदम खेळकर! आधी माझी त्याच्याशीच गट्टी झाली. मग हळूहळू सगळं कुटुंब समजायला लागलं. केवढं मोठं कुटुंब!! बापरे! आणि सगळीच मंडळी तशी भारदस्त दिसत होती! आपला अभ्यासच बरा हे माझं मनातल्या मनात नक्की झालं होतं. कारण मी अशा टप्प्यावर होते ना करिअरच्या, की आता दुसरा कुठलाही निर्णय घेणं मला परवडणारं नव्हतं.
माझं शैक्षणिक अपयश बघून अनेकांनी मला करिअरच्या बाबतीत सल्ले दिले होते, पण मला ते कधीही स्वीकारावेसे वाटले नाहीत. पण आमची इतकी मैत्री झाली होती, की हा एकच सणसणीत अपवाद म्हणावासा वाटला मला, जो माझ्या आयुष्यात लहानपणीच आला असता तर, आणि तरच, मी शिक्षणाची दिशा बदलली असती. त्याचंच ऐकलं असतं असा विचार कधीतरी आजही मनात येतो.
माझं नशीब इतकं चांगलं, की हे सगळं समजून घेणारं आणि समंजसपणे स्वीकारणारं कुटुंब मला मिळालं. मी जेव्हा प्रत्येक ठिकाणी अपयशी होत होते, समुपदेशनही घेतलं गरज वाटली तेव्हा, त्याही वेळी मला आई-बाबांनी "पुरे आता!" असं नाही म्हटलं. आमच्यातला संवाद गरजेचा आहे हे त्यांना समजलं होतं. बरेचदा तो संवाद एकतर्फीच असे. आणि एरवी मी कोणाशीही बोलताना वक्त्याच्या भूमिकेत असायची, ती इथे मात्र फक्त श्रोता होत असे. माझा मूड जरा लवकर सुधारतो असं आमच्या लक्षात आलं होतं.

मग पुढे माझं शिक्षण संपलं, नोकरीला लागले आणि इथेही त्याच्या परिवाराशी चांगली ओळख असलेले सहकारी भेटले. मी अजून खूश झाले! नात्यातली परिपक्वता म्हणजे काय हे समजायला लागलं होतं. नव्या आयुष्यासाठी मीही उत्सुक होते, माझीपण काही स्वप्नं होती. ती पूर्ण करण्यासाठी मीही धडपडत होते.
सखीशी बोलणं कमी झालं होतं, पण कधीकधी रहावलं नाही की भरपूर वेळ आम्ही बोलायचो. मला न पटणार्‍या अनेक गोष्टी मी तिला सांगायचे. तिचीही बरेचदा तशीच गत असे. पण एक आश्चर्य होतं, काही गोष्टी 'पटल्या' नाहीत, तरी त्याने त्याच्या भाषेत सांगितल्या की निदान ऐकून घेतल्या जात असत. हा काय चमत्कार होता न कळे! आणि हे बरेचदा होत असे! काहीतरी प्रचंड गूढ असं त्याने सांगूनही आणि ते न कळूनही मनात भिनायचं. बरेच दिवस भेट होत नसे, पण अवचित कधी भेट झालीच तर लपाछपीच्या खेळात मी जिंकले असं वाटायचं. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एकूणच आवाका प्रचंड होता! कधीकधी तर मला आम्च्यातला संवाद झेपत नसे! तशी आमची कधीही भेट झाली तरी दिवस मावळताना जर तो भेटला तर मला जास्त आनंद होत असे. त्याची ती मालकीचीच वेळ! तेव्हा तो जास्त प्रसन्न वाटायचा. म्हणजे इतर वेळी घेतलेलं मसाला दूध आणि कोजागिरीच्या रात्रीचं मसाला दूध यात जो फरक होता तोच याच्या इतर वेळी भेटण्यात आणि दिवस मावळल्यावर जरा निवांतपणे भेटण्यात होता. त्या खास वेळी तो तेजाळून जातोय असं वाटायचं!
हे सगळं नक्की कुठे जाणार आहे कळत नव्हतं. घरी सगळं माहिती असूनही, 'हे आयुष्य नाही' हे घरच्यांनाच काय, मलाही माहिती होतं. आईबाबांनी माझ्या लग्नाचं बघायला सुरूवात केली तेव्हा मात्र मी ठाम सांगितलं, की माझ्या या ओढीसकट त्या परिवाराशी जुळवून घेणारा मुलगा मिळेपर्यंत मी लग्नाला होकार देणार नाही!
आणि मला तसा मुलगा मिळाला तेव्हा मी प्रचंड रिलॅक्स झाले! तोही त्या परिवाराशी संबंधित होता. माझ्या 'त्या'ला ओळखत होता. त्याच्या खेळकर भावालाही ओळखत होता. आणि तोही लहान असल्यापासूनच त्याची आणि त्याच्या कुटुंबाचीही 'त्या'च्याशी ओळख होती! मी नाही म्हणण्याचा प्रश्नच निकालात निघाला!

कोण आहे 'तो'? माझ्या मनातल्या खास कप्प्यात जपलेला राग यमन! आमचं नातं काय हे आता वेगळं सांगायला नको ना? त्याचे सूर थेट मनात भिनतात. 'भय इथले.." असो की "मागे उभा मंगेश.." असो की आणि काही, मी माझी रहात नाही. त्याचे सूर माझा पूर्ण ताबा घेतात. हे माझ्या नवर्‍यालाही चांगलंच माहिती आहे. तो स्वतः लहानपणी गाणं शिकलाय, "हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत" या मोठ्या परिवाराशी त्याची ओळख आहे. कुटुंबात गाण्याची आवड आहे. माझं मैत्र फार छान फुललंय आता.
मला आठवतंय, माझी माऊ पोटात होती आणि मला ते माहिती नव्हतं, त्याहीपेक्षा तशी शंकाही मला आली नव्हती! माझं त्यावेळी पोस्टग्रॅजुएशन चालू होतं. असाईनमेंट्स आणि बाकीची कामं करून मी थकून गेले होते. तिन्हीसांजा उलटून गेल्या होत्या. मी पं. हरिप्रसादजींची बासरी लावून त्यावर यमन ऐकत होते. खोलीत दिवा लावायचा राहिला होता, पण मी त्या सुरांत इतकी हरवले की तेही भान मला राहिलं नाही. आणि एक्दम माझ्या डोळ्यांत पाणी आलं! दु:ख नक्कीच नव्हतं, उलट कसलातरी आनंदच होता तो! काहीही कळत नव्हतं काही क्षण.. मग मी शांतपणे उठून दिवा लावला. आतून शांत शांत झाल्यासारखं वाटत होतं. खूप दिवसांनी मी त्याला भेटले होते आणि मग समजलं, की माऊ पोटात असल्यामुळे सुरूवातीला होणारे मूड स्विंग्स होते म्हणून एकदम हळवी होऊन मला असं झालं.... माऊवर कुठलातरी संस्कार नक्कीच झाला होता!
माझं हे प्रेम पुढच्या पिढीत पोहोचलंय हे नक्की!
आता माऊ गाणं शिकतेय!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलयं!
यमन माझाही सखा आहे. आत्तापर्यंत किती वेळा त्या सुरांनी मला शांतवले आहे, सांभाळले आहे त्याला गणतीच नाही.

खुप सुंदर लिहिले आहे.. यमन राग माझाही आवडता आहे आणि कैक गायकांचाही… प्रत्येकाने प्रेमाने गायलाय आणि प्रत्येक वेळी तो वेगळा भासलाय.

रच्याकने हे देवदासी सदृश्य प्रकरण प्रत्येक ठिकाणी आहे. आमच्याकडे भाविणी म्हणतात. तिन पिढ्यंपुर्वीची भाविण तेव्हाच्या भटजींशी एकनिष्ठ राहिली पण लग्न करता आले नाही. तिच्या मुला मुलींनी मात्र लग्ने केली, नातवंडांचीही लग्ने झाली. परंपरेने चालत आलेली देवळातील कामे आजही हे लोक करतात.

भाविण... बरोबर. हा शब्द पण मी तिथेच ऐकला.

मी गाणं शिकलेली नाही. पण ऐकते खूप. कळलं पाहिजे असं नाही आणि तरीही यमन ताबा घेतो, आजवर कायमच घेत आलाय हीच गंमत आहे!

छान लिहिलंय.
मला असा एकच एक राग भावतो असं नाही. बदलत असतं कधी नॉस्टेल्जिक कधी नवीन. कधी विचारांची चक्रे चालू करणारे कधी शांत करणारे. बरेचदा मन शांत न होता आणखीनच आक्रंदू लागतं असाच अनुभव आहे आणि तेच हवंहवंसं ही असतं असं वाटतं. Happy

>> तेव्हा एक दिवस " नि रे ग रे ग रे, ग मं प मं ग रे सा" असे म्हणत पेटी वरील सूर ऐकु आले. तो जे म्हणत वाजवत होता ते पूर्ण ऐकुन छान वाटत होते.

वाह! जब दीप जले आना... Happy
अमोल पालेकर असेल तो Lol

अमोल पालेकर असेल तो >> Happy
चितचोर मधे दोन्ही गाण्यात अलंकार आहेत. ऐकायला छान वाटतं.

शास्त्रीय संगीत समजत नाही. कुणीतरी समजावून सांगा.
वर दिलेला राग यमनच आहे का ?
आरोह : सा रे ग म (#), प ध निसा
अवरोह : सा नि ध प म (#) ग रे सा

असा आरोह अवरोह मुलीच्या गाण्याच्या वहीत लिहीलेला आहे.
पकड : नि रे ग , रे मा (#) पधनिसा
निरेग , रे नंतर गरेग का घेतलं असेल ?
पकड , चलन आणि विस्तार मधे काय फरक आहे ?

छान लिहीलंय! उत्सुकता वाढवणारं व खिळवून ठेवणारं! शास्त्रीय संगीतात अलंकार असलेल्या माझ्या आईला वाचायला दिला लेख.

“ आरोह : सा रे ग म (#), प ध निसा” - यमनात सा ते र आणि प ते ध जाता येणार नाही. नी रे आणि म# ध जाता येईल.

“ आरोह : सा रे ग म (#), प ध निसा” >> हा यमनच आहे. पण आता तसा फारसा वापरला जात नाही. कारण नि(.)-रे-ग आणि म(#)-ध-नि ही जी सिमेट्री आहे ना, ती खूप भावते आणि ती तशी लक्षात आल्यावर पुढे अनेकांनी तश्याच चलनावर रचना आणि विस्तार केला आहे. पण सा-रे-ग किंवा प-ध-नि येणार्‍या रचनाही यमनात आहेत. मी शिकलेलं एक यमनाचं स्वरगीत आहे त्यात स्थायीची दुसरी ओळ गरेगम(#) पधनीध पम(#)गरे गरेसा अशी आणि अंतर्‍यात पहिली ओळ सारेगसा रेगम#प धनीसांनी धपम#ग अश्या आहेत.

यमन रागाची जाती बघाल तर 'संपूर्ण' आहे. म्हणजे सर्व स्वर आरोहात आणि अवरोहात - दोनींत आहेत. त्यात आरोहात प वर्ज्य असता तर षाडव संपूर्ण झाली असती. पण तशी ती नाही.

पकड , चलन आणि विस्तार >> पकड ही रागाची सिग्नेचर ट्यून असते असं म्हणता येईल. त्यात रागाचे सर्व स्वर कव्हर होतातच असं काही नाही. त्या त्या रागाची मुख्य मजा ज्या स्वर-पॅटर्नमध्ये आहे (म्हणूनच पकडीला रागाचं मुख्यांग असंही म्हणतात), तो पॅटर्न म्हणजे पकड. चलन म्हणजे पकडीच्याही पलिकडे जाऊन रागाची इतर अंगं, तो राग कसा चालतो, ते दाखवलं जातं ते. म्हणजे यमनात नि(.)-रे-ग आणि म(#)-ध-नि कसे घ्यायचे याचं टिपिकल उदाहरण दाखवणं म्हणजे यमनाचं चलन कसं आहे ते सांगणं होय. विस्तार म्हणजे रागाचं संपूर्ण एक्स्प्लोरेशन. त्या रागाचे स्वर माहीत आहेत, चलन माहीत आहेत, पण त्याचे ते नियम पाळून ते स्वर वेगवेगळ्या प्रकारे लावले तर त्या रागाच्या सौंदर्याची वेगवेगळी अंगं दाखवता येतात. त्या रागाची 'तेव्हाच्या सादरीकरणापुरती' संपूर्ण ओळख करून द्यायची म्हणजे विस्तार करावा लागतो. शास्त्रीय कलाकार एखादा राग गाताना डायरेक्ट चिजेला हात घालण्याआधी जी नोम-तोम किंवा आलापी करतात तिथे सहसा रागविस्तार केलेला असतो.

ता.क.
'तेव्हाच्या सादरीकरणापुरती' संपूर्ण ओळख >> असं म्हणालो, कारण एखादा राग सादर करताना त्या रागाचा जो भाव आहे, त्याचे कुठले पैलू श्रोत्यांसमोर मांडायचे, हे त्या सादरीकरणावेळी कलाकराची मनःस्थिती, आजूबाजूचं वातावरण, त्याला/तिला तेव्हापर्यंत असलेली उमग, तेव्हाची कल्पकता, आणि अमुक एक पैलू दर्शवायची क्षमता - यांवर ती ओळख कशी होते हे अवलंबून असतं. वेगळा दिवस, वेगळा कलाकार, किंवा तोच कलाकार इतर वेळी त्याच रागाचे निराळे पैलूही दर्शवू शकेल.

हपा , धन्यवाद या स्पष्टीकरणाबद्दल.
__/\__

( हपा कोण आहेत याबद्दलची उत्सुकता आता पूर्वीपेक्षा जास्त ताणली गेलीय. आता ते महेश काळे किंवा राहुल देशपांडे असावेत का असे वाटतेय).

हपा, भारीच!
( असा (कानसेन)व्यासंग करायची माझी इच्छा आहे Lol Light 1 )

किती सुरेख प्रतिसाद आहेत सगळ्यांचेच! आज मला फार मस्त वाटतंय की माझ्या या धाग्यावर इतकं छान काहीतरी लिहितायत लोक! सगळ्यांचे मनापासून आभार..

छान लिहीलंय! उत्सुकता वाढवणारं व खिळवून ठेवणारं! शास्त्रीय संगीतात अलंकार असलेल्या माझ्या आईला वाचायला दिला लेख. >>> __/\__
तुझ्या माऊला तिचे सूर आणि तिचा राग सापडो!>> हे निसटलं होतं! नक्की नक्की सापडो! आभार तरी कसे मानू?!

Pages