कोंदण

Submitted by SharmilaR on 21 April, 2024 - 04:29

कोंदण

हिरा तर देणारच नाहीस कधी
मग कोंदण तरी कशाला...?

माझी चिडचिड अन माझीच तक्रार...

कधीतरी आठवलं तटकन
दुःख कपड्यातलं चांगल्या
ही तर माझीच
कधीकाळची प्रार्थना

मागितल्यावर मिळतं ह्यावर
विश्वास होता बहुतेक अपार
पण ओंजळीत तर
होती ढीगभर लाज

सुख अन रेशमी कपडे
दोन्ही मागणं जमलंच नाही
फाटक्या आयुष्यात सुख असतं
हेही कधी पटलंच नाही.

आता सांभाळतेय मी
माझं भकास सोनेरी कोंदण
कुणाला कळू नं देता
त्याचं रिकामपण ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर...

आवडली कविता. पण थोडी दु:खी वाटली.
मग मनात हे आलं :

हिरा तर देणारच नाहीस कधी
म्हणून मग कोंदणच करून घेतलं

माझा आत्मविश्वास अन माझीच हौस

कधीतरी आठवतं तटकन
दुःख कपड्यातलं चांगल्या
ती तर माझीच होती
कधीकाळची प्रार्थना

मागितल्यावर मिळतं ह्यावर
विश्वास होता बहुतेक अपार
पण मग लक्षात आलं
कर्तृत्वच खरं घडवतं

सुख अन रेशमी कपडे
दोन्ही मागणं जमलंच नाही
जमतील तितके कष्ट
हेच आयुष्याचं ध्येय ठरवलं

आता अभिमानाने मिरवतेय मी
माझ्या कर्तृत्वाला लाभलेलं कोंदण
अनुभवतेय भरून पावलेलं
माझंच हे आयुष्य!

धन्यवाद दसा, कुमार, अवल, सामो.
@अवल,
तुमची कविता अतिशय आवडली. अतिशय प्रेरणादायी आहे.
आवडली कविता. पण थोडी दु:खी वाटली.>> बरोबर आहे तुमचं. माझं बहुतांशी लिखाण दु:खी आणि नकारात्मक असतं. कारण मनाच्या त्या अवस्थेत असतांनाच माझं आतून आलेलं लिखाण होतं. मनातलं दु:ख काढण्याचा माझा तो मार्ग असावा.
आनंदात असतांना लिखाण कधी सुचलच नाही. किंवा जे थोडंफार तसं लिहिल्या गेलंय ते अगदी मुद्दामहून ठरवून केलय.
जमतील तितके कष्ट
हेच आयुष्याचं ध्येय ठरवलं >> परिस्थिती कितीही खडतर आणि वेदनादायक असली तरीही हे मात्र आपोआपच झालं. दूसरा पर्याय तरी काय असतो लढून बाहेर पडण्याशीवाय?

आता अभिमानाने मिरवतेय मी
माझ्या कर्तृत्वाला लाभलेलं कोंदण >> सुंदर!!!

खरय शर्मिला, दु: ख जास्त सृजनशील असतॆ. म्हणूनच तुमची कविता पोहोचली.
फक्त त्या मूड मधून बाहेर येण्यासाठी काही ओळी लिहिल्या इतकच.
सहसंवेदना आहेतच