
कैरीचं आंबट गोड पन्हं
चैत्र वैशाख महिन्यात होणारी उन्हाची काहिली आणि थंडगार पन्हं यांचं अगदी जवळच नातं आहे. पूर्वी शेजारी पाजारी सगळ्यांकडे चैत्र गौरीच हळदीकुंकू केलं जायचं आणि वेगवेगळ्या चवीच पन्हं खुप वेळा प्यायला मिळायचं. हल्ली हे हळदी कुंकू फार ठिकाणी होतं नसलं तरी गुढी पाडवा, रामनवमी किंवा एखादा खास रविवार अश्या निमित्ताने अजून ही घरोघरी चैत्रात पन्हं आवर्जून केलं जातं.
लहानपणी उन्हाळा सुरू झाला की लिंब गायबच व्हायची बाजारातून. क्वचित कधी मिळाली तर महाग एकतर असायची आणि वर रस ही नसायचा अजिबात त्यात. उलट उन्हाळ्यात कैऱ्या भरपूर मिळायच्या बाजारात. किंवा आवारात असलेल्या आंब्याच्या खाली पडलेल्या कैऱ्या तर फुकटच मिळत असत. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाचं सरबत फारस होत नसे , आई कैरीच पन्हंच करत असे.
तेव्हा असलेल्या साखरेच्या अभूतपूर्व टंचाईमुळे पन्ह्यासाठी साखर वापरणं अशक्य कोटीतली गोष्ट होती. आई पन्हं गुळ घालूनच करत असे. त्यामुळे त्याला नैसर्गिकच केशरी रंग येत असे. चांदीच्या फुलपात्रात ते पिण्यासाठी काढलं की तो रंग आणखीनच चमकून उठे. कधीतरी साखर असली घरात तर कच्च्या कैरीच साखर घालून सरबत ही करत असे आई. ते लिमिटेड असायचं. अर्थात असं सरबत क्वचित् होई त्यामुळे त्याची खुप अपूर्वाई वाटत असे.
पन्हं जनरली माठातल्या पाण्याचंच करत असे आई. किंवा कधी कधी विहिरीच्या ताज्या पाण्याची कळशी खास पन्ह्यासाठी आणली जाई. तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते , हवा जेव्हा थंड असते तेव्हा विहिरीचं पाणी उबदार असतं आणि हवा जेव्हा गरम असते तेव्हा ते पाणी थंड असतं. उन्हाळ्यात माठातलं पाणी संपलं असेल तर आम्ही जेवायच्या वेळी ताज्या पाण्याची कळशी भरून आणत असू. एकदम चवदार लागत ते पाणी.
लहानपणी फ्रीज आम्ही फक्त चित्रातच बघितला आणि पुस्तकातच वाचला असल्याने बर्फ ही फारच स्वप्नवत गोष्ट होती आमच्यासाठी. हळदी कुंकवाच्या दिवशी मात्र पन्ह्यात घालायला आईस फॅक्टरी मधून बर्फ आणला जाई. लाकडी भुश्यामध्ये लपेटलेला तो बर्फ भावाने सायकल वरून घरी आणला की नुसतं चैतन्य पसरत असे घरात. अर्धा बर्फ तर आम्ही नुसताच खाऊन संपवत असू. तो गारेगार बर्फ चोखत चोखत मिटक्या मारत खाताना जणू स्वर्ग सुख मिळत असे आम्हाला.
आज ही पन्हं केलं की हळदी कुंकवाच्या अनेक आठवणी मनात गर्दी करतात. आईने तिच्या तरुणपणी वर आयसिंगचे पक्षी, घरटे, फुलं अशी सजावट असलेला, कोणीतरी खाऊ म्हणून आणलेला केक एकदा गौरीच्या सजावटीत ठेवला होता.
कारण असा केक असू शकतो हेच तिला माहित नव्हते. तिला तो काहीतरी शोपीस वाटला होता आणि म्हणून त्याला त्या वर्षीच्या गौरीच्या सजावटीत मानाचे स्थान मिळाले होते. नंतर काही दिवसांनी जेव्हा समजलं की तो अंड्याचा केक होता तेव्हा आईने कपाळावर हात मारून घेतला होता. आणि आजीने त्या सदगृहस्थांचा उद्धार तर केला होताच पण देवीची क्षमा मागण्यासाठी पाच शुक्रवार ही केले होते. दरवर्षी सजावट करताना ही गोष्ट आई आम्हाला सांगत असे आणि आम्हाला ही ऐकताना दरवर्षी तितकीच मजा येत असे.
थंडगार पन्हं, केळीच्या पानावर दिलेली आंबा डाळ, गौरीची सजावट, आईचं आवडत खस अत्तर, गार गुलाब पाण्याचे अंगावर उडालेले तुषार, दुसऱ्या दिवशी केले जाणारे चटपटीत चणे, ठेवणीतल्या कपड्यात सुंदर दिसणाऱ्या शेजारच्या काकू आणि मैत्रिणी, खुप जणी एकदम आल्या तर सगळ्यांना सगळं देताना होणारी धांदल, मोठ्ठ्या आवाजात रंगलेल्या गप्पा अश्या अनेक आठवणी असल्या तरी सर्वात जास्त लक्षात राहिली आहे ती आई. दिवसभर एवढं काम करून ही ती दमत कशी नसे ह्याच आज आश्चर्य वाटत. तिचा चेहरा अगदी आनंदी आणि उत्साही दिसत असे. अंगावर जरीच फिक्या पिवळ्या रंगाचं लुगडं ( तिचं ठरलेलं होत, संक्रांतीच्या हळदीकुंकवाला काळी साडी आणि चैत्र गौरी च्या फिकी पिवळी ) नाकात नथ, कानात तिची रोजचीच मोत्याची ठसठशीत कुडी , अंबाड्या वर गजरा, कपाळावर छोटंसं कुंकू, गळ्यात हार, मंगळसूत्र घालून सजलेली, उत्साहाने आणि अधिकाराने घरात वावरणारी ती अजून ही स्पष्ट आठवते.
तिच्या परिचयातील नवरा नसलेल्या स्त्रिया, प्रौढ कुमारिका ह्यांना हळदी कुंकवाला न बोलावणे खरे म्हणजे तिला पटत नसे . त्यांनी ही ह्या आनंद सोहळ्याचा भाग व्हावे असे तिला मनापासून वाटत असे. पण इतर सुवासिनींबरोबरच त्यांना ही बोलावण्याची त्या काळी तिची हिम्मत नव्हती. ह्यासाठी तिने काढलेला मधला मार्ग म्हंजे आमच्याकडे हळदी कुंकू बॅचेस मध्ये होई. अश्या स्त्रियांना थोड उशिरा येण्याचं आमंत्रण ती देत असे. आणि त्यांचा ही डाळ, पन्हं , भिजवलेले हरभरे हे सगळ देऊन सन्मान करत असे. रात्री जेवणं झाली की वडील शेजार घरातल्या पुरुष मंडळींना पन्हं घेण्यासाठी बोलावत. रात्री अंगणात बसून डाळ पन्ह्याचा आस्वाद घेत त्यांच्या ही गप्पा रंगत असत.
तेंव्हा ह्यातलं वेगळेपण मला जाणवलं नव्हतं पण आज विचार करता आई किती काळाच्या पुढे पहाणारी, त्यांचा ही किती सह्रदयतेने विचार करणारी होती हे जाणवतं आणि तिच्या बद्दलचा आदर कैक पटीने वाढतो. ती खरं तर एक अगदी सामान्य स्त्री होती पण तिचं हे असामान्यत्व आणि ते निभावून नेण्याचं तिच्याकडे असलेलं धैर्य मला आज जास्तच स्तिमित करतात. तिची तीव्रतेने आठवण येते आणि एवढ्या वर्षा नंतर ही तिच्या आठवणीने गळ्यात हुंदका दाटून येतो.
हेमा वेलणकर
काही वर्षापूर्वी आम्ही हळदी कुंकू केलं होतं चैत्रातलं त्याचा फोटो, भिजवलेले हरभरे सोलून ते वाटीच्या काठात अडकवले आहेत.
ममोताई किती सुंदर लिहिले आहे.
ममोताई किती सुंदर लिहिले आहे. वाचताना मीही फराक (frock) (माझी आजी म्हणायची) घालून तिथेच लुडबुड करत आहे असे वाटले. गुळाचे पन्हं ATF.
Ssj, ऋतुराज, स्वाती २ ,
Ssj, ऋतुराज, स्वाती २ , माधव, सायो , प्रज्ञा, मंजु, धनवंती, सियोना धन्यवाद.
ऋतुराज, आम्ही पण करतो भाजक्या कैऱ्यांच पन्हं . त्याला जरा स्मोकी वास येतो.
प्रज्ञा , तोतापुरी कैरी आणून बघ, ती कमी आंबट असते जरा, त्यामुळे गुळ थोडा कमी लागतो. मी मेथांबा, पन्हं करायला त्याच आणते.
मंजु धन्यवाद, आता पूर्णत्व आलं लेखाला, नाहीतर चैत्र गौर, डाळ पन्ह्यावरचा लेख आणि चैत्र गौरीचा फोटो नाही एक ही म्हणजे काय ? ते कैरीचे पोपट मस्तच दिसतायत. अगदी आत्ता उडून जातील इतके जिवंत. इतर ही सजावट सुंदरच.
हेमाताई, तुमचं लिखाण चैत्रगौरीसारखं सुंदर असतं नेहमीच. मध्यभागी मुख्य विषय आणि भोवती आठवणींची आणि किश्श्यांची आरास. >> किती छान वाटलं वाचून , थँक्यु सो मच माधव.
सियोना, फराक
खुप दिवसांनी ऐकला हा शब्द.
काय सुरेख आरास केलिये...पोपट्
काय सुरेख आरास केलिये...पोपट्,भातुकली,कमळ सगळच छान!
आईकडे छोटा पितळी पाळणा होता त्यात गौर बसवायची...बाकी अगदी सगळ सेम, कलीगडाची कमळ्,पन्ह, वाट्या भरभरुन डाळ, हरभर्याची ओटी.
सुरेख आरास!!
सुरेख आरास!!
हेमाताई, तोतापुरीचीच कैरी, अडीचपट गूळ.
मीपण ती मेथांब्यासाठी आणून एक बॅच मेंथांबा झालाय.
पण परवा आमच्या कामाच्या मावशींनी दिल्या त्या तर कहर आंबट होत्या.
कैरीचे पोपट मलाही खूप आवडले..
कैरीचे पोपट मलाही खूप आवडले... माझी आई दरवर्षी कल्पकतेने वेगवेगळी आरास करायची. लोखंडी ट्रंका एकमेकांवर रचून त्यावर चादर,साडी टाकून त्या पायऱ्यांवर आरास मांडायची. पूर्वीच्या काळी आपली कला सादर करायला हळदीकुंकू, रूखवतासारखे कार्यक्रम असायचे आणि दुसरं कारण म्हणजे सोशलायझेशन!
महिनाभर भिजवलेल्या हरभऱ्यांचे वेगवेगळे प्रकार खावे लागायचे
अहा ! काय दिसतंय! मला फोटो
अहा ! काय दिसतंय! मला फोटो बघूनच प्यायल्याचा फील आला !!
डोळ्यासमोर दिसेल असं वर्णन केलंय !हृद्य आठवणी!
केकचा प्रसंग वेगळाच! त्यावेळी जेव्हा नंतर कळालं तेव्हा त्यांना असे झाले असेल की आता मी काय प्रायश्चित्त घेऊ नि काय नको
भरत, तुम्ही म्हणालात म्हणून
भरत, तुम्ही म्हणालात म्हणून चैत्र सर्च केलं तर चक्क त्याची शॉर्ट फिल्म मिळाली मग बघितली , चांगली घेतली आहे पण मी शेवटाचे अनेक अर्थ काढले. नाईक सासू तळतळाट देऊ नको म्हणली हिरोईन ( सोकु जुनी )ला पण सोकू चाच नवरा अचानक गेला. तिचं वाईट झाल.
सोकु ने चांगुल पण दाखवून हे नाईक सासूला कळू दिलं नाही आणि आपल कोणी वाईट केलं अपमान केला तरी आपण त्याच्याशी चांगल वागावं हे मुलाला स्वतःची वागणुकीतून शिकवलं. असो.
गौरी च्या पुढे डाळ पन्ह्याच्या प्रसादाच्या वाट्यांच्या काठावर भिजवलेले हरभरे सालं काढून आम्ही खोचत असू. हरभरे
द्वीदल असतात म्हणून नाजूकपणे केलं तर हरभरे दोन भाग न होता वाटीच्या काठावर मस्त बसतात. वाटीला काठाला जणू मोत्याची माळ बसवली आहे दिसतं ते. हरभरे सोलून ते वाटीच्या काठावर नीट लावणे हे मीच करत असे दरवर्षी. माझ्याकडे फोटो आहे पण अपलोड होत नाहीये. तुम्ही कोणी करायचात का ही सजावट ?
अंजू , फारच मजेशीर आहे केक सजावट म्हणून ठेवणे हे. आम्ही सगळे जमलो की अजून ही ती आठवण काढून खुप हसतो. एवढंच कशाला माझ्या मुलांना ही माहित आहे आजीने कसा केक ठेवला होता चैत्रगौरी पुढे ते .
मनीमोहोर, मी ती कथा
मनीमोहोर, मी ती कथा पाठ्यपुस्तकात वाचली होती. आणि तिथे ती हळदीकुंकवाशीच संपली होती. त्या स्त्रीचा पती जातो, हा भाग त्या कथेत नव्हता.
आता तीपाठ्यपुस्तकासाठी म्हणून संपादित केली की फिल्मवाल्यांनी बदलली हे मूळ कथा वाचून शोधणे आले..
त्या घरात झालेल्या अपमानाचा ओरखडा मुलाच्या मनावर कायमचा राहू नये यासाठीही त्या स्त्रीची धडपड असावी. मी वाचलेल्या कथेत नाईक सासूबाईंनी नवी पिढी आपल्या ऐकण्यात नाही, त्यांची रीत वेगळी अशी खंत त्या स्त्रीशी व्यक्त केल्याचे आठवते. फिल्ममध्ये बदलले असावे.
<नाकात नथ, कानात तिची रोजचीच मोत्याची ठसठशीत कुडी , अंबाड्या वर गजरा, कपाळावर छोटंसं कुंकू, गळ्यात हार, मंगळसूत्र घालून सजलेली उत्साहाने आणि अधिकाराने घरात वावरणारी ती अजून ही स्पष्ट आठवते.> तुमच्या लेखातलं हे वाक्य वाचून मला ती कथेतली स्त्री आठवली.
छान लेख. अमितव म्हणाले तसं
छान लेख. अमितव म्हणाले तसं सहज संगितल्यासारखे वाटले.
पन्हं पित आले ते साखरेचे.फारसे आवडायचे नाही.ऑफिसमधल्या एक बाई दरवर्षी चैत्रात आंबा डाळ आणि पन्हं आणायच्या.4-५ वर्षे खात /पित आलो.पण तीच सुरेख चव.त्या पन्हे गूळ आणि साखर मिक्स करून करायच्या.पिवळट केशरी रंगाचे पन्हे थोडेसे का होईना मी आवडीने प्यायचे.
तुमच्या लेखामुळे त्यांची आठवण झाली.
मंजूताई, किती सुरेख सजावट! ते
मंजूताई, किती सुरेख सजावट! ते कैरीचे पोपट फार आवडले.
छान लेख आणि सुंदर फोटो.
छान लेख आणि सुंदर फोटो. कैरीचे पोपट आणि ६ वेगवेगळ्या रंगांची सरबतेपण आवडली.
हेमाताई, तुमचं लिखाण
हेमाताई, तुमचं लिखाण चैत्रगौरीसारखं सुंदर असतं नेहमीच. मध्यभागी मुख्य विषय आणि भोवती आठवणींची आणि किश्श्यांची आरास. >>> अगदी अगदी.
फार हृदयस्पर्शी, अनेक आठवणी जाग्या झाल्या. हेमाताई, मंजूताई फोटो आहाहा.
वेगवेगळी सजावट बघताना एकावर एक ट्रंक ठेऊन त्यावर रंगीत चादर, साडी आच्छादून त्यावर बाहुलया, खेळणी ठेवणाऱ्या शेजारच्या जोशीकाकू जास्त आठवल्या कारण त्या अनेक वर्ष हे हळदीकुंकु करायच्या, त्या फार लवकर गेल्या पण होत्या तोपर्यन्त दरवर्षी चैत्रगौर बसवायच्या. आईने काही वर्ष केलं चैत्रगौर हळदीकुंकु (संक्रातीचे मात्र खूप वर्ष केलं आईने). आई काय किंवा जोशीकाकू काय चाळीतल्या सगळ्यांना बोलवायच्या, सुवासिनी वगैरे असं काही नव्हतं. लहान मुलांपासून वयस्क, सगळे यायचे. मी काकूंच्या मदतीला जायचे. चाळीत एक माहोल असायचा. संक्रांतीच्या हळदीकुंकवालाही मजा यायची प्रत्येकाकडे. संक्राती ह कुंकु आमंत्रण देताना आई सगळ्यांना द्यायला सांगायची. एक आजी होत्या त्या मला म्हणाल्या (त्यांचे मिस्टर नव्हते), मी कशी येऊ हळदी कुंकवाला. मी आईला येऊन हे सांगितलं तर आई मला म्हणाली, आमच्याकडे तिळगूळ घ्यायला या असं आमंत्रण दे त्यांना, मग मी तसं सांगितलं तर म्हणाल्या चालेल आणि आलेल्या. तेव्हा मी खूप लहान होते, समजत नव्हतं असं का म्हणाल्या ते. त्यानंतर मी त्यांना तिळगूळ घ्यायला या असंच सांगायचे. तेव्हाचा काळ, आता परिस्थिति बदलली आहे. हळदीकुंकवाला या सर्वांना सांगितलं तरी चालते, तेव्हा खूप पगडा होता या गोष्टींचा.
भरत, फिल्म आणि पाठ्य
भरत, फिल्म आणि पाठ्य पुस्तकातील धडा ह्यामुळे gap पडली असेल. ओरिजनल गोष्ट वाचायला हवी.
देवकी धन्यवाद.
स्वाती २ आणि उबो , होय ते कैरीचे पोपट फारच मस्त झालेत.
अंजू , धन्यवाद , किती सुंदर लिहिलं आहेस.
तेव्हाचा काळ, आता परिस्थिति बदलली आहे. हळदीकुंकवाला या सर्वांना सांगितलं तरी चालते, तेव्हा खूप पगडा होता या गोष्टींचा. >> अगदी अगदी... निदान शहरात तरी बदल झालाय खुप.
छानच लेख. आमच्या घरी तंतोतंत
छानच लेख. आमच्या घरी तंतोतंत हे आणि असेच. आमचे घर मोठ्या काकांचे, मधली धाकटी काकू यायच्या, कझि न्स डेकोरेशन करुन द्यायच्या. आम्ही बारके खादाडीत पुढे. पुर्वी एक ओगले फॅक्टरी होती पुणे मुंबई जुन्या हायवेला तिथे काचेच्या वस्तु मिळत. तिथून घेतलेले आमच्याकडे एक काचेचे तांब्या भांडे होते त्यात पाणी भरुन त्यात कॅम्लिनचे निळे गुलाबी रंग मिसळून ठेवु. बाकी घरात बारकी वाद्ये आणि इतर डेको आय टेम्स खूप होते. मी माझी रबरची खेळनी खालच्या लेव्हलला ठेवत असे. मेन्यु तोच पन्हे बर्फ आंबाडाळ भिजवलेले हरब रे. हिना function at() { [native code] }तर. आईची ठेवणीतली नौ वार साडी. मस्तच.
मी फार दिवसांनी हैद्राबाद हून पुण्यात मेनका माहेर मासिकांच्या हपिसात काही कामाला गेले होते. तेहा तिथे त्यांनी पन्हे दिले. एकदम मन मागे गेले. हे च मी हैद्राबादेस मिस करत होते. कल्चरल मिस मॅच होता. मग काही वर्शा नी मुंबईत शिफ्ट झालो.
आ ता सर्व रिचुअले सोडून दिली. भयंकर गूळ असल्याने पन्हे पिता येत नाही. कधी तरी दोन घोट.
मस्त लेख!! बरेच रीलेट झाले..
मस्त लेख!! बरेच रीलेट झाले.. बरेच आठवणी जाग्या झाल्या..
आईस फॅक्टरी मधून बर्फ>> इथे तर थोडा वेळ लेख वाचायचे थांबवून आठवणीत रमलो..
मी लस्सी पेक्षा ताक आणि आमरसापेक्षा पन्हं जास्त आवडणारा माणूस..
नेहेमीप्रमाणेच उत्तम लेख आणि
नेहेमीप्रमाणेच उत्तम लेख आणि आठवणी. सगळे वास, आठवणी, पदार्थांच्या चवी सगळे काही पोचले..
अमा, ऋन्मेष, लंपन ...
अमा, ऋन्मेष, लंपन ... धन्यवाद
ही मायबोली कमी आणी
ही मायबोली कमी आणी ब्राह्मणकट्टाच जास्त वाटयला लागलाय.उगीच कशाचही कौतुक सांगत बसतात आणी बाकीचे छान छान करत बसतात...
मस्त लेख. कितीतरी
मस्त लेख. कितीतरी हळदीकुंकवांच्या नॉस्टॅल्जिक आठवणी जागवल्या त्या निमित्ताने! "चैत्र" गोष्टीची मलाही आठवण झाली. शॉर्ट फिल्म पण छान आहे ती.
इथे चैत्र चित्रपटचा उल्लेख
इथे चैत्र चित्रपटचा उल्लेख झाला म्हणून आत्ताच बघितला.
मला शेवट कळला नाही. पण ममो ची प्रतिक्रिया वाचून उलगडला. तसंच असावं.
Maitreyee धन्यवाद.
Maitreyee धन्यवाद.
SharmilaR, त्यांच्या गोष्टी थोडया अश्याच असतात. सरधोपट नसतात कधी.
सुजाण, समंजस आणि नीर क्षीर विवेक जागृत असणाऱ्या सर्व माबोकर सभासदांचे मी मनापासून आभार मानते.
छान लेख ममो.
छान लेख ममो.
आमच्याकडे चैत्र हळदी कुंकू ची प्रथा नव्हती.
पण आम्ही आई बरोबर शेजारि जायचो.ते हळदीकुंकु नेहमी वार्षिक परिक्षा संपल्यावर असायचे. म्हणून मला पन्हे म्हटले की मे महिन्याच्या सुटी ची आठवण येते. आमच्या कडे हळदी कुंकू ला पन्हे available नसेल तर रसना सरबत देत होते छोट्यांना.
मला चैत्र महीना उन्हाळा असला तरी खुप अवडतो ..
ती चैत्र नावाची शॉर्ट फिल्म
ती चैत्र नावाची शॉर्ट फिल्म आधी पाहिली होती पण लक्षात नव्हती म्हणून परत पाहिली. त्या नाईक काकू एकाच गावात रहात असताना त्यांना सोकुचा नवरा गेल्याचं माहित नसेल का असा प्रश्न पडला.
किती सुंदर लेख! फार निगुतीने
किती सुंदर लेख! फार निगुतीने असतं तुमच्याकडचं सगळं.
ती वाटीची हरभरा आरास तर किती युनिक आहे.
फार कौतुक वाटतं वर्षानुवर्ष ही परंपरा त्याच उत्साहात चालू ठेवणार्यांचं.
मीपण बघितली काल ती शॉर्ट
मीपण बघितली काल ती शॉर्ट फिल्म. चांगली आहे. एवढी छान असलेली कथा उगीचच शोकांतिका केली असं वाटलं. जी. एं. च्या गोष्टीतही तसंच असेल म्हणूनच तशी केली असेल अर्थात. वातावरण मस्त उभं केलं आहे. लालन सारंगचा अभिनय टॉप क्लास.
सायो, ती म्हणते की कालच काशीयात्रेहून आले. पहिल्यांदा तुम्हालाच आमंत्रण द्यायला आले हळदीकुंकवाचं वगैरे. त्यामुळे तिला माहिती नसणार.
खुप मस्त लेख... सगळ्या आठवणी
खुप मस्त लेख... सगळ्या आठवणी जाग्या झाल्या लहानपणीच्या.
मी कराड्ची.. आमच्यकडे हनुमान जयंतीपासुन पुढे ४ दिवस चैत्रोत्सव आणि मग गावभर हळदिकुंकु... कराड ला कृष्णेच्या घाटावर सार्वजनिक हळदिकुंकु पण असते... काही वर्षांपुर्वी मी पण चैत्र आठवणींचा एक लेख इथे माबोवरच लिहिला होता.. त्यात सगळ्या कराड्च्या आठवणी लिहिल्या होत्या.......लिंक देता येत नाहिये मला इथे :-(.. जौदेत
हळदिकुंकु म्हणजे आईच आठवते .... तुम्ही लिहिलंय अगदी तसंच जवळपास... उत्साहाने आणि अधिकाराने वावरणारी.... आता आई नाही पण तिची लिगसी पुढे जायलाच हवी....उद्या माझ्या कडे घरी हळदीकुंकु आहे... आई काय काय करायची ते सगळं अंगात भिनलंय... तशी तयारी अपोआप चालु आहे..... शक्य असेल तर उद्याचे फोटो काडुन चिकटवेन.
मनातला चैत्र .
मनातला चैत्र .
स्मिता श्रीपाद, ही घ्या लिंक , मी प्रतिसाद लिहून धागा वर आणला आहेच, नक्की वाचा छान आहे. अजून आईची आठवण म्हणून हळदी कुंकू करता मस्त वाटलं. फोटो पाहायला उत्सुक आहे. मी ही फोटोत वाटीच्या काठावर जे हरभरे लावलेत ते आईची आठवण म्हणूनच.
अमूपरी मस्त आठवणी.
सायो, मला ही ते strike झालं होतं हीला कस माहित नाही म्हणून पण वावेचा काशी यात्रेचा पॉईंट परफेक्ट आहे, माझा तो न मिस झाला होता. मी पुण असेल आणि तेव्हा ही ते शहरच होतं , सगळ्यांचं सगळ माहित नसेल होत असा विचार केला होता.
एवढी छान असलेली कथा उगीचच शोकांतिका केली असं वाटलं >> सहमत वावे ...पण गरिबीचा अपमान, दागिने विकून हकू चा घाट हे ही फार आनंदी नाही आहेच.
फार कौतुक वाटतं वर्षानुवर्ष ही परंपरा त्याच उत्साहात चालू ठेवणार्यांचं. >> थँक्यु, दरवर्षी नाही करत. हळदी कुंकू ज्या वर्षी केलं होत त्या वर्षी सकाळ पासून घोकत होते, वाट्या ना हरभरे लावायचे आहेत म्हणून, केवळ आईची आठवण म्हणून. तसा ते करायला वेळ लागतो , एका साईज चे हरभरे शोधायचे, सोलायचे आणि अलगद वाटीच्या काठावर लावायचे, जास्त जोर लागला तर दोन भाग होतात हरभऱ्याचे आणि मेहनत वाया जाते . पण अर्थात खुप मजा आली होती लहानपणीच्या आठवणी काढत हे करायला.
सर्वांना थँक्यु पुन्हा एकदा.
अरे हो वावे, ते लक्षात नाही
अरे हो वावे, ते लक्षात नाही आलं ऐकलं तरीही.
यंदाची आईची चैत्रगौर
यंदाची आईची चैत्रगौर
नंतर अजून सजावट सुरु आहे
छान दिसतेय आरास किल्ली ...
छान दिसतेय आरास किल्ली ...
Pages