असेल माझा हरी.. (२)

Submitted by SharmilaR on 2 April, 2024 - 01:00

असेल माझा हरी.. (१)
https://www.maayboli.com/node/84928

असेल माझा हरी.. (२)

आता ह्या वेळची गोष्ट जरा वेगळी होती...

आता वसुधाला जावच लागणार होतं अमेरिकेला..

प्रियाला नुकताच सहावा महिना सुरू झाला होता. नातवंड येणार ह्याचा आनंद तर होताच. पण तिथे राहून तिचं.. पुढे बाळाचं सगळं करणं आपल्याला कसं जमेल ह्याची वसुधाला शंका वाटत होती. तेही त्यांच्या पद्धतीने..!

ती इथे असती, तर काही प्रश्नच नव्हता.. चांगले डोहाळे जेवणा सकट सगळे सोहोळे करता आले असते.. तिला नीट खायला प्यायला घालता आलं असत.. मुलीची हौस भागवता आली असती.. आणी ती इथे असती, तर रिती प्रमाणे प्रिया माहेरीच गेली असती बाळंतपणाला. फार तर वसुधा गेली असती तिच्या आईच्या मदतीला..

पण मुलं अमेरिकेत रहायला गेली, की नातवंडाचे जन्म तिथेच होतात.. वसुधा इथे घरात सगळं करत होती, तरी तिला अमेरिकेतल्या वातावरणाच टेंशनच आलं होतं.. इथे स्वयंपाक करणं वेगळं.. पण तिथे त्यांचा गॅस तरी पेटवता येईल की नाही कुणास ठावूक.. मग त्या बिना फ्लेम च्या गॅस वर, चांगला इंडियन स्वयंपाक जमेल का..? मसाले परतणं वैगेरे..? मग त्या शिवाय चांगला स्वयंपाक तरी कसा करणार..? शिवाय बाकी सगळ्या मशिनी वापराव्याच लागणार.. अर्थात त्याच्या घराची सगळी माहिती त्याने सांगितली तशी, आणी विडिओ कॉल करतांना त्याने घर दाखवलं तशी तिला मिळत होती.. प्रत्यक्ष तर ती कधी तिथे गेलेलीच नव्हती..

वसुधाला खूपच टेंशन आलं होतं ह्या संगळ्याचं... पण मुलांना त्यांच्या आईवडीलांच्या वयाची कधी जाणीव होते कुणास ठाऊक.. त्यांनी लहानपणापासून बघितली असते ती काय वाट्टेल ते करू शकणारी त्यांची आई.. त्यामुळे वय वाढलेली.. घाबरलेली.. भीती वाटणारी आई त्यांना दिसतच नाही..

वसुधा आता पर्यंत तरी, प्रियाच्या बाळंतपणाची ही सगळी जबाबदारी, प्रियाची आई घेईलच असं गृहीत धरून चालली होती. कारण कुठलीही मुलगी तिच्या आईबरोबरच जास्त कॉमफरटेबल असणार नं.. तेही अशावेळी..

पण प्रियाची आई अजून नोकरीत होती. जबाबदारीची नोकरी होती तिची. तिला एवढ्या सुट्ट्या घेणं शक्य नव्हतं. ईयरएंड ची कामं असणार होती.. ती डिलीवरी झाल्यावर जेमतेम पंधरा एक दिवस वसुधाच्या मदतीला म्हणून तिथे येणार होती. तेही वेळेवर तिच्या सुट्ट्यांचा काही प्रॉब्लेम नाही आला तर..

“आँटीजी, आप टेंशन मत लो यहा का.. सबकुछ मेनेज हो जायेगा.. ” निघण्याच्या आधी एकदा प्रियाचा फोन आला, तेव्हा ती म्हणाली. ती तशी नेहमीच अगदी सहज संवाद साधू शकायची ‘आँटीजीशी’. हल्ली खरंच, मुलींच्या वागण्या बोलण्यात मोकळेपणा असतो छान. त्या नाही उगाचच आधीच्या पिढी सारखं जगाला घाबरून रहात...

‘अरे बापरे! श्रेयस बोललेला दिसतोय तिच्याजवळ आपलं टेंशन.. हा पण ना! तिला कशाला सांगायचं..? तिला वाटेल सासू कामचुकार आहे..’ वसुधाच्या मनात आलं. हे आधीच्या पिढीचं सगळ्यांना घाबरणं..

“नही बेटा.. थोडा अलग लगेगा.. मै सिख लुंगी धिरे धिरे.. तू मला सांग.. इथून काय काय आणायचं आहे..? तुला लागणारं काही सामान..?” उघडपणे ती म्हणाली.

“आँटी, सिरियसाली! डोन्ट वरी. आप कुछ मत लाइये. बस आप आ जाओ.. आपके लीये एक सरप्रार्इज है यहा.. आनेके बाद पता चलेगा....” फोन ठेवत प्रिया म्हणाली.

‘हिची आई येणार का, तिथे मला सर्प्राइज म्हणून..? बरं होईल मला तेवढीच कंपनी.. अन् आपल्या वयाच कुणी असलं की एकमेकांना समजून घेणं सोपं जातं..’

आत्ता खरं तर सहाव्या महिन्या पासून काही गरज नव्हती, तरी श्रेयस ने आईचं काही नं ऐकता सरळ तिकीट काढून टाकलं होतं. सगळी आवरा आवरी करूनच यायला सांगीतलं होतं. पुढे पण भरपूर रहा म्हणाला होता. लगेच ग्रीन कार्ड करता पण अप्लाय करून ठेवणार होता, म्हणजे मग पुढे जमेल तसं राहता येईल म्हणाला. नाइलाजाने वसुधा तयारीला लागली.

नाही म्हटलं तरी, तिथे नेण्याचं खूप सामान झालच. प्रिया करता छान कॉटन च्या कुरतीज.. इथली खास ज्वेलरी.. मुलींना तर काय कितीही दागिने असले तर आवडतातच. शिवाय प्रियाला तर होतीच हौस ह्या सगळ्याची.. थोडा इथे घरी तयार केलेला खाऊ.. .. श्रेयसला पूरणपोळ्या खूप आवडतात.. आता तिथे कितपत जमतील करायला ते माहीत नाही.. म्हणून इथूनच करून घेतल्या.. थोड्या चकल्या.. कसली कसली पीठं.. अन् काय काय..

चांगलं साठ किलो वजन नेलेलं चालणार होतं. वसुधाने अगदी पुरेपूर फायदा घेतला त्याचा. शिवाय सर्प्राइज म्हणून प्रियाची आई नाही, पण त्यांची एक बॅग आली, प्रियासाठी सामान घेऊन. इथे तर लोकं आहेतच मदतीला.. टॅक्सीत सामान वगैरे ठेवू लागायला.. एकदा चेकईन केलं की झालं. तिथलं तिथे बघू..
......................................
क्रमश:...

https://www.maayboli.com/node/84937

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लगेच ग्रीन कार्ड करता पण अप्लाय करून ठेवणार होता, म्ह>> हिला ग्रीन कार्ड वाट बघा. उगीच मधाचे बोट.

आय वॉज सो राइट. मेतकुट नाही नेले?

मस्त चालले आहे. प्रियाच्या आईच्या ब्यागेत काय होते ते लिहा. पुभा प्र.

आय वॉज सो राइट. मेतकुट नाही नेले?>>> अर्रर्रर्र... राहिले वाटतं.
प्रियाच्या आईच्या ब्यागेत काय होते ते लिहा. >> बघते उघडून...

लोल अमा. पण काये की नातवंडं म्हटलं की बायका फशी पडतातच. उद्या तुम्हीही पडाल. Wink
बाकी गोष्ट तशी टिपीकल वाटतेय पण होपफुली अगदीच तशी नसेल.

असू दे बायकी कथा.
स्त्रियांच्या मनाचे प्रतिबिंब असले की काही जणी नक्कीच relate करतील.
काही जणांसाठी predictable असेल.
ठीके ना पण

स्त्रियांच्या मनाचे प्रतिबिंब >>>
आजूबाजूच्या मैत्रिणी... नातेवाईक.. ह्यांच्या गप्पंमधून येणारे मुली सु्नाचे अनुभव... शिवाय परक्या जागी जाणं... त्यातून आणि सासू वर येणारं दडपण... हे टिपायचा प्रयत्न केलाय.

फार लांबवणार नाहीये.
वसुधा मुला सुने कडे पोहोचल्या नंतर दोन दिवसात संपणार आहे.

मस्त सुरु आहे कथा..!
सासूबाई अमेरीकेत गेल्यावर काय घडेल ते वाचायला आवडेल..!

<<शर्मिला तुम्ही लिहा हो.
Go ahead with whatever ia there in your mind>>
सहमत..

.<<< पण मुलांना त्यांच्या आईवडीलांच्या वयाची कधी जाणीव होते कुणास ठाऊक.. त्यांनी लहानपणापासून बघितली असते ती काय वाट्टेल ते करू शकणारी त्यांची आई.. त्यामुळे वय वाढलेली.. घाबरलेली.. भीती वाटणारी आई त्यांना दिसतच नाही..>>>
हे खूप पटले. मी माझ्या आईला अशीच म्हणायची की काय गं आई, एवढी MA MPhil प्राध्यापक तू, आणि हे एवढे कसे जमत नाही ??? आणि ती समजूतदार आवाजात म्हणायची, अगं त्यावेळेस वय वेगळे होते, आता या वयात छोट्या गोष्टींचे पण मोठे दडपण येते गं...

वसुधा मुला सुने कडे पोहोचल्या नंतर दोन दिवसात संपणार आहे.

>> आईंग?? प्रियाला आत्ताशी सहावा महिना चालू आहे तर २ दिवसात कशी संपणार?

पण मुलांना त्यांच्या आईवडीलांच्या वयाची कधी जाणीव होते कुणास ठाऊक.. त्यांनी लहानपणापासून बघितली असते ती काय वाट्टेल ते करू शकणारी त्यांची आई.. त्यामुळे वय वाढलेली.. घाबरलेली.. भीती वाटणारी आई त्यांना दिसतच नाही. >> हे आवडले.

>>पण मुलांना त्यांच्या आईवडीलांच्या वयाची कधी जाणीव होते कुणास ठाऊक.. त्यांनी लहानपणापासून बघितली असते ती काय वाट्टेल ते करू शकणारी त्यांची आई.. त्यामुळे वय वाढलेली.. घाबरलेली.. भीती वाटणारी आई त्यांना दिसतच नाही. >> होते खरे असे. कुठेतरी जाणवत असतेही पण ते मान्य करणे फार कठीण असते.

+786
आणि हे वडीलांबाबत सुद्धा होते..

पण मुलांना त्यांच्या आईवडीलांच्या वयाची कधी जाणीव होते कुणास ठाऊक.. त्यांनी लहानपणापासून बघितली असते ती काय वाट्टेल ते करू शकणारी त्यांची आई.. त्यामुळे वय वाढलेली.. घाबरलेली.. भीती वाटणारी आई त्यांना दिसतच नाही. >> >> छानच लिहिलय.