स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - रणदीपनं यशस्वीरीत्या पेललेलं आव्हान.
मी स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्यामुळे पारतंत्र्याच्या अनुभवातून होरपळून निघालेले नाही. तरीही बालभारतीच्या पुस्तकात वा इतिहासविषयक ग्रंथांत तत्कालीन भारताबद्दल वाचनात आलेलं. त्यामुळे स्वा. सावरकर हे नाव तेव्हापासून परिचित. मराठीच्या पुस्तकात 'माझी जन्मठेप' मधले एक- दोन प्रसंग होते. त्या संदर्भात पुढे मूळ पुस्तक वाचलं. 'काळे पाणी' व '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' अशी पुस्तकं वाचल्यानंतर मग वीर सावरकरांची लेखनशैली व एकंदर देशकार्य व तत्संबंधी लेखनाचा सूर आणखीन थोडा उमगत गेला.
अर्थात् वाचकांचा गोंधळ उडाला असेल, की हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल लेखन आहे कि त्यांच्या लेखनाबद्दल.. हो ना?
तर लेख चित्रपटाबद्दलच आहे. परंतु मी हा चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त कशी झाले, याचा थोडा धांडोळा घेतला, एवढंच. स्वा. सावरकर हे नाव आणि कलाकार रणदीप हुडाच्या यातील कामाबद्दल कानांवर आलेले प्रशंसोद्गार ह्या दोन्ही कारणांमुळे आज चित्रपट पाहिला.
त्याबद्दल इथे लिहिण्याची उर्मी निर्माण झाली खरी, पण मग वाटलं की त्यावरून 'विशिष्ट' शिक्कामोर्तब तर होणार नाही!
तर, एक डिस्क्लेमर - वीर सावरकर ही व्यक्ती, तिचे व्यक्तिगत गुणविशेष व तिची देशभक्ती यांपैकी - देशभक्ती हा पैलू ,( ज्यावर भाष्य करण्याचा माझा अधिकार नव्हे तरीदेखील) तो अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात मांडलेला आहे आणि वर नमूद केल्याप्रमाणे, पूर्वी वाचन केल्यावर वीर सावरकर या जाज्वल्य देशभक्ताचं जे व्यक्तिमत्त्व मनात नोंदलं गेलेलं, ते प्रस्तुत चित्रपटात अतिशय मेहनतीने रणदीप हुडा नं साकारलेलं आहे. किंबहुना, ते इतकं भावलं, त्यायोगे लेखणी हाती घेतली आहे.. (या सदरात लिहिण्याचा एकदाच अनुभव घेतला होता. उंबरठा बद्दल लिहिताना. त्यामुळे चु. भू. द्या. घ्या.)
वीर सावरकरांच्या जीवनाचा, चरित्राचा आणि त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा असा वेगवेगळा आढावा घेणं अर्थातच अवघड आहे. त्यामुळे इथे त्यांच्या अगदी जन्मापासून नव्हे, तर त्यांच्या वडिलांच्या प्लेगमुळे झालेल्या मृत्यूपासून चित्रपट सुरू होतो. कोविड काळात आपल्याला ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेगमुळे काय नि कसा हाहाकार उडाला होता, याबद्दल वाचायला मिळालं होतं. टिळकांवरील काही लेख व चित्रपटातही याचा संदर्भ आलेला आहे. म्हणजे हा काही नवीन विषय नाही. तरीही इथल्या दृश्यांचा मनावर परिणाम झाला. कदाचित संपूर्ण चित्रपट एका विशिष्ट रंगछटेचा तंत्रात्मक वापर करून चित्रित केल्यामुळे असेल. मला या क्षेत्रातील काही गंध नसला तरी, दृश्यात्मक परिणाम साधण्यासाठी किंवा विशिष्ट विचार वा व्यक्तीची भव्यता दर्शविण्यासाठी, गांभीर्य ठसविण्यासाठी, राखाडी छटा /अंधाराच्या पार्श्वभूमीवर कालानुरूप योजलेले प्रकाशाचे माफक स्त्रोत इ. तांत्रिक गोष्टी संपूर्ण चित्रपटभर जाणवल्या. तिन्ही सावरकरबंधूंचं आणि येसूवहिनी व माई सावरकरांचं अनुक्रमे सक्रिय व अप्रत्यक्षपणे क्रांतिकार्यास जोडून घेणं, वि. दां चं लंडनला कायद्याच्या अभ्यासाकरता प्रयाण, तिथून भारतीय क्रांतिकार्यास प्रेरणा व सहाय्य, पुढे प्रसिद्ध अशी मार्सेय ची उडी, काळ्या पाण्याची शिक्षा इ. वाचलेल्या गोष्टी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर 'पाहिल्या'. अर्थातच दीर्घकाळ अंदमानला कारागृहात राहिल्याने तिथलं जीवन अधिक तपशीलांसह दाखवलंय. कोलू, बारी साहेब, खोड्याची शिक्षा, काथ्याकूट, मारहाण जिवंत अळ्यांसहित निकृष्ट दर्जाचं (किमान माणुसकीही न दाखवता)जेवण(मूळ पुस्तकात तर गोम, पाल, इ. चा उल्लेख वाचलेला), विशेषतः ते राजकीय कैदी असूनही तशा निर्धारित दर्जाची वागणूक न देणं इ. वाचणं जितकं क्लेशदायक होतं त्याहून अधिक त्रास ते इथे बघताना झाला. माध्यम शक्तिशाली असल्याने की आणखी कशामुळे याचा अंदाज आला नाहीये अजून. म्हणजे, देशाच्या न्याय्य स्वातंत्र्यासाठी लढत असताना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणं दिली जाणारी वागणूक सहन करणं, तरीही मनाचं खच्चीकरण होऊ न देणं हे पाहताना सतत "अनादि मी, अवध्य मी.." या त्यांच्या ओळी आठवत होत्या, नव्हे, ते अशाच भावनेनं अंदमानमधल्या छळातून टिकून राहिले असतील, असं वाटलं.
(स्पॉयलर टाळण्यासाठी) सगळ्याच घडामोडी लिहीत नाही.
दिग्दर्शक म्हणून रणदीप हुडा चं हे पदार्पण असलं, तरी कलाकार म्हणून मला त्याचे काही चित्रपट आधीही आवडलेले आहेत. पण वीर सावरकर साकारताना त्यानं जी मेहनत, गृहपाठ केलाय आणि जी देहबोली साधलेली आहे, ती अतिशय आवडली. म्हणजे ते वीर सावरकर म्हणून दिसत राहतात, हुडा म्हणून नव्हे. (अवांतर - स्वदेस मध्ये शाखा बद्दल असंच वाटलेलं) फक्त मराठी उच्चारांवर अधिक काम करायला हवं होतं.
रंगभूषाकारानंही कमाल केली आहे. त्या मानाने अंकिता लोखंडेला फूटेजही कमी आहे आणि रंगभूषाकारानं तिच्या बाबतीत तितकं बारीक काम केलेलं जाणवलं नाही. तरीही लक्षणीय गोष्ट म्हणजे माई व येसूवहिनी कोरीव भुवयारहित व अगदी साध्या परिधानात (वस्तुनिष्ठपणा जपलेला आहे) वावरताना दिसतात.
तो काळ उभा करताना काही तपशिलांवर लक्ष दिलेलं आहे. उदाहरणार्थ कंदील, भारतातील ब्रिटिशांची चैनीची राहणी (पायपंखे? चालवणारा एतद्देशीय माणूस), लेखणी, शाई वाळवण्याची पद्धत, इ.
मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मणी कुटुंबातील पती-पत्नींची संवाद साधण्याची पद्धत थोड्या दिग्दर्शकीय स्वातंत्र्यानं दाखवली असली तरी अगदी 'तान्हाजी' मध्ये दाखवल्याप्रमाणं पारावार गाठलेला नाही.
एकुणात चित्रपट प्रभावशाली वाटला, घरी आल्यावर पुन्हा एकदा 'माझी जन्मठेप' उघडून बघण्याची उत्कंठा वाटली,'सागरास' कवितेतील भावतरंग पुन्हा मनीं खळबळ माजवते झाले, पण...
"रणाविण स्वातंत्र्य कोणास मिळाले" हे खरं असलं तरी नेसत्या वस्त्रानिशी माई व येसूंना घराबाहेर पडताना पाहून कळवळायला झालं. सर्वच क्रांतिकारकांच्या कुटुंबाची त्या वेळी थोड्याफार फरकाने अशीच दुरवस्था झाली असणारे, याचा विषाद वाटला.
त्यामुळे लेखाच्या शेवटास येता येता, एवढं नक्की म्हणावं वाटतंय, की हा चित्रपट पाहण्यासाठी वीर सावरकरांचे अगदीच भक्त असण्याची आवश्यकता नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या मूल्याची पुनः जाणीव होण्यासाठी, किंवा किमान रणदीप हुडा याच्या चांगल्या अभिनयासाठी तरी चित्रपट पहाण्यास हरकत नसावी.
इति अलम् |
प्रत्यक्षासम प्रतिमा उत्कट :स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट
Submitted by प्राचीन on 29 March, 2024 - 09:35
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारेंड,माझेमन,चिडकू चांगल्या
फारेंड,माझेमन,चिडकू चांगल्या पोस्ट्स.
गांधीजींनी चळवळ सर्वसामान्यांपर्यंत नेली.जहाल matavadyanni (सावरकर भगतसिंग आणि इतर सर्व) इंग्रजी साम्राज्याला वेळोवेळी खिंडारे पाडून खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला. सर्वांचेच ध्येय स्वातंत्र्यप्रा्ती होते.
ते 'वाट चुकलेले देशभक्त 'नव्हते.
असो.हिमाशेपो
प्रोपोगंडा ला बळी पडून आपण
प्रोपोगंडा ला बळी पडून आपण कोणाच्या कार्यक्रमात सतरंजीवाहक होणे टाळयाचा प्रयत्न करावा.>>> त्यासाठी आधी तथ्य आणि प्रोपोगंडा यात भेद कसा करावा हे तर कळायला हवं ना???
चिडकू, विथ ड्यू रिस्पेक्ट,
चिडकू, विथ ड्यू रिस्पेक्ट, असहमत.
गांधी व नेहेरू यांच्यावर अन्याय झाला असे गळे कुणी काढत नाहीत. त्यंच्या सिनेमात ते इतरांपेक्षा श्रेष्ठ होते असे दाखवण्याचा खटाटोप नसतो.
> बाकी माणूस म्हणून पाहावे. माणसे चुका करू शकतात. सावरकर आणि गांधी दोघेही वेगळ्या परिस्थितीतुन आले होते. त्यांनी त्यांच्या काळात त्यांच्या परीने प्रयत्न केला. चुका देखील केल्या
अशा वाक्यांमधून गांधी व सावरकर एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या असे दाखवून कुठेतरी बरोबरी करण्याचा प्रयत्न दिसतो. यापैकी एकाच व्यक्तीचे अनुयायी आज मॉब लिंचिंग, सामूहीक बलात्कार अशा घटनांना trivialize करणे, नैतीक पाठबळ देणे, प्रसंगी खिल्ली उडवणे हे करत असतात हा मूलभूत फरक आहे.
सावरकरांनी अंदमनातून सुटल्यावर काहीच हिंसक कारवाया केल्या नाहीत हे सत्य आहे आणी त्यात embarrassing असे काही नाही. य दी फडक्यांसारखे 'केली असतील बुवा' असे म्हणणे जरूरीचे नाही. आणी गुप्तपणे केल्याच असतील तर स्वातंत्र्य मिळाल्यावर तरी सावरकरांनी लिहिल्याच असत्या ना? योगी अरविंद सारख्या अनेक क्रांतीकारकांनी हिंसक चळवळींचा मार्ग सोडला आणी अशा सर्व लोकांबद्दल असलेला अतिव आदर त्यामुळे कणभरही कमी होत नाही.
सावरकरांवर पोस्ट तिकिट १९७० मध्ये आले. आपल्यापैकी जे मराठी माध्यमातून शिकले त्या सर्वांनी सावरकरांची एखादी कविता, माझी जन्मठेप मधला एखादा उतारा पाट्यपुस्तकात वाचलाच असेल.
फा, उदय, मी ‘माझा कट्टा‘ च्या
फा, उदय, मी ‘माझा कट्टा‘ च्या क्लिपची लिंक देण्याचं कारण, सावरकरांवर अन्याय झाला का नाही ह्या चर्चेशी संबंधित नव्हता. विकु आणि देवकी ह्यांच्या चर्चेत त्याचा उल्लेख ‘व्हॉट्सअॅपीय फॉर्वर्ड‘ झाला म्हणून ते तसं नसून, मंगेशकरांच्या मुलाखतीत आलेला भाग आहे हे सांगितलं, इतकंच.
फा, तुझ्या पोस्ट्स साठी +१
गांधी व नेहेरू यांच्यावर
गांधी व नेहेरू यांच्यावर अन्याय झाला असे गळे कुणी काढत नाहीत. त्यंच्या सिनेमात ते इतरांपेक्षा श्रेष्ठ होते असे दाखवण्याचा खटाटोप नसतो. >> त्यांना चांगले पटकथालेखक/ दिग्दर्शक लाभले इतकाच त्याचा अर्थ.
सिनेमात खटाटोप नसतो हा युक्तीवाद कसा असू शकतो???
बाकी सध्या लंबक एका बाजुला आहे, तो दुसर्याबाजूला गेला की नाण्याची दुसरी बाजू किती गणंग आहे हे दिसेलच. काँग्रेसचं पूर्णपुण्य किती दिवस कामाला येणार! गांधींचा खून झाल्यावर, इंदिरा गांधींचा खून झाल्यावर स्टेट सपोर्टेड मॉब लिंचिंग इ. इ. झालंच.
इतिहासत न रमता वर्तमानात जगावे आणि इतिहासाला गाडून टाकावे.
फा, उदय, मी ‘माझा कट्टा‘ च्या
फा, उदय, मी ‘माझा कट्टा‘ च्या क्लिपची लिंक देण्याचं कारण, सावरकरांवर अन्याय झाला का नाही ह्या चर्चेशी संबंधित नव्हता. >>> हो फेफ आले लक्षात.
vijaykulkarni गांधी किंवा
vijaykulkarni गांधी किंवा नेहरू यांच्यावर अन्याय झाला म्हणून कोणी गेले काढले नाही हे तुमचे बरोबर आहे. गांधी आणि सावरकर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या असे देखील म्हणायचे नव्हते. कायदेशीर भाषेत लिहिल्या सारखे सीता रामाची बायको होती म्हणजे राम तिचा नवरा हे वेगळे लिहिले नाही म्हणून फाटे फोडण्यासारखे आहे. तरी पण संशय नको म्हणून लिहितो.
गांधीजींच्या लढ्यात सावरकरांपेक्षा लाखो पटीने जास्त लोक सहभागी झाले. अहिंसक मार्गाने का साध्य करायचे याच्या मागचा त्यांचा विचार हा जगमान्य आहे. एखाद्या देशाची सूत्रे हिंसक टोळ्यांच्या हाती गेल्यावर काय होते याची इतिहासात असंख्य उदाहरणे आहेत. त्या मार्गाने मिळालेल्या सत्तेत असहमती दाखवणार्यांना काय स्थान असते हे वेगवेगळ्या देशात दिसून आले होते. या सगळ्यातून हिंसक विरुद्ध अहींसहक हा प्रश्न निकालात निघाला होता. त्यांच्या चुकांबद्दल म्हणाल तर औद्योगिकरण आणि कुटिरोद्योग यात त्यांचा पाठिंबा कुटिरोद्योगांना होता. काही प्रमाणात तो तितका परिमाणकारक ठरला नाही.
सावरकर यांची भावना जरी कुठेही कमी नव्हती तरी त्यांचा मार्ग आणि त्यात सहभागी झालेले लोक मर्यादित होते. त्यांनी त्यांच्या मार्गाचे नंतर काय परिणाम होतील याचा कितपत विचार केला, त्यांच्या मतांना काय आधार होता किंवा त्यांचे काय पूर्वग्रह होते याचा माझा फार अभ्यास नाही. हिंदूत्वालाही बहुदा लहानपणीच्या दंग्यांची पार्श्वभूमी ची किनार आहे का हे पहिले पाहिजे. १९ व्या शतकात हिंदू मुसलमान दंगे खूप प्रमाणात होते. त्यानंतर गांधी हत्या असेल किंवा अजूनही बऱ्याच घटनांमधून त्यांची मर्यादा लक्षात येऊ शकते. समाजामध्ये त्यांना मर्यादित मान्यता होती. क्रांतिकारक म्हणून त्यांना मनाचे स्थानच दिला गेलय. वादग्रस्त भाग हा नेहमी जाहीर उल्लेखातून वगळालाच गेला.
असो हा सगळं इतिहास आहे. त्यात काहीही बदल होणार नाही. इतिहास हा जंत्री आहे कोणी काय केले त्याचे काय परिणाम झाले. त्याबद्दल उगाच भावनिक होण्यात काही अर्थ नाही.
सावरकरांवर अन्याय झाला म्हणून कोणी तुम्हाला भावनिक करत असेल तर तुम्ही ओळखले पाहिजे करणाऱ्याला काय हवय. त्या उलट नेहरूंवर गांधींवर अन्याय झाला म्हणून कोणी भावनिक करत असेल किंवा केले तर त्यालाही त्यात तराजूत मोजले पाहिजे. दिशाभूल करणे हा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि राहणार. आपण त्याला बळी पडायचे का नाही हे आपण ठरवले पाहिजे. समाज भावनिक आहे का सुज्ञ आहे यावर ठरेल भविष्य कसे राहील.
चिडकू - पोस्ट आवडली!
चिडकू - पोस्ट आवडली!
चिडकू - छान पोस्ट.
चिडकू - छान पोस्ट.
चिडकू , दोन्ही पोस्ट अतिशय
चिडकू , दोन्ही पोस्ट अतिशय छान आहेत.
चिक्कू, उत्तम पोस्टस.
चिडकू, उत्तम पोस्टस.
चिडकू, छान पोस्ट्स !
चिडकू, छान पोस्ट्स !
मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील दिलगीर आहे.
चिडकू, छान पोस्ट्स आहेत
चिडकू, छान पोस्ट्स आहेत दोन्ही.
चिडकू , दोन्ही पोस्ट अतिशय
चिडकू , दोन्ही पोस्ट अतिशय छान आहेत.
प्रचारपट पहिल्या महिन्यांत ३१
प्रचारपट पहिल्या महिन्यांत ३१ कोटी रु. पल्ला पार करत आहे. जनतेनी घोर उपेक्षा केली आहे असे वाटते.
जवान, डंकी, पठाण या चित्रपटांनी पहिल्याच दिवशी अनुक्रमे ७५, २८, ५७ कोटी रु. आणि पहिल्या आठवड्यांत १०० कोटीं रु. पेक्षा जास्त व्यावसाय केला होता. चित्रपट रसिक कुठल्या चित्रपटाला डोक्यावर घेतील याचे अंदाज बांधता येत नाही.
<< असो हा सगळं इतिहास आहे.
<< असो हा सगळं इतिहास आहे. त्यात काहीही बदल होणार नाही. इतिहास हा जंत्री आहे कोणी काय केले त्याचे काय परिणाम झाले. त्याबद्दल उगाच भावनिक होण्यात काही अर्थ नाही.
सावरकरांवर अन्याय झाला म्हणून कोणी तुम्हाला भावनिक करत असेल तर तुम्ही ओळखले पाहिजे करणाऱ्याला काय हवय. त्या उलट नेहरूंवर गांधींवर अन्याय झाला म्हणून कोणी भावनिक करत असेल किंवा केले तर त्यालाही त्यात तराजूत मोजले पाहिजे. दिशाभूल करणे हा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि राहणार. आपण त्याला बळी पडायचे का नाही हे आपण ठरवले पाहिजे. समाज भावनिक आहे का सुज्ञ आहे यावर ठरेल भविष्य कसे राहील. >>
---- इतिहासातल्या घटनांचा अभ्यास करतांना भावनिक होण्यात अर्थ नाही या बाबत सहमत.
वर दोन वेळा संशयी शब्द आला ते खटकले म्हणून पुन्हा... गांधी हत्ये मधे सावरकर हे केवळ संशयी म्हणून नव्हते तर खटल्यातले आरोपी क्र. ७ होते, नखशिकांत बुडाले होते. दिगंबर बडगे यांची महत्वाची साक्ष होती, पण या साक्षीला दुजोरा असणारा सज्जड पुरावा समोर ठेवला गेला नाही, पुराव्या अभावी दोषित्व टळाले. पुढे कपूर कमिशन आले पण तोपर्यंत त्यात्याराव प्रायोपवेशनाच्या अहिंसक मार्गाने वैकुंठात पोहोचले होते.
स्टॅच्यू ऑफ युनिटीवाले पटेल यांनी सावरकरांच्या सक्रिय सहभागाबद्दल १९४८ मधे सुस्पष्ट लिहीले आहे. सावरकर यांना गोवण्यासाठी सरदार पटेल यांनी खोटे लिहीले असेल तर जगातला उंच पुतळा उभा त्यांच्या नावाने तयार झालाच नसता.
Sardar Patel's correspondence , 1946-1950, vol 6
" ..... It w'as a fanatical wing of the Hindu Mahasabha directly under Savarkar that [hatched] the conspiracy
and saw it through.... "
इतिहासाचा अभ्यास करणार्यांसाठी लिंक पुन्हा डकवतो.
https://ia601002.us.archive.org/9/items/sardar_patels_correspondence_vol...
Pages