जेव्हा माशाचं पिलू पोहायला शिकतं!!

Submitted by मार्गी on 28 March, 2024 - 10:07

✪ अदूचं सायकल चालवणं- आनंद सोहळा!
✪ छोटे "मैलाचे दगड" पण आनंद अपरंपार
✪ अरे, मला वाटलं तू मागून धरलं आहेस, पण तू तर केव्हाच हात सोडला होतास! ओ येस्स!
✪ समवयस्क सायकल सवंगडी नसल्याने लागलेला वेळ
✪ तिला सायकलिंग व ट्रेकिंग करताना बघणं!
✪ आपल्याला मिळालेल्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद
✪ चिमुकल्या रोपट्याचा वृक्ष होणं अनुभवणं

सर्वांना नमस्कार. माझी नऊ वर्षांची मुलगी अद्विका- अदू नुकतीच सायकल चालवायला शिकली आणि सायकलिंगचा आनंद घ्यायला तिने सुरूवात केली! हा आनंद आपल्यासोबत शेअर करत आहे. त्या निमित्ताने मनात आलेले विचार शेअर करत आहे. आजवर अदूसोबत अनेक वेळेस फिरलो होतो आणि अनेकदा डबल सीट राईडसही केल्या होत्या. तिला सायकल चालवता यावी व त्यातली मजा तिलाही अनुभवायला मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले होते. माझ्या मोठ्या सायकलीचं सीट खाली करून सगळे जुगाड करून बघितले. तिच्याच वयाच्या- आठ वर्षांच्या कश्मीर ते कन्याकुमारी सायकलीवर जात असलेल्या रावी कौरला मी भेटलो होतो तेही तिला सांगितलं होतं. पण तिची सायकल आधाराची चाकं काढल्यावर काही सुरू होत नव्हती! तिचे पाय काही पुरत नव्हते आणि तिला बॅलन्स करणं काही जमत नव्हतं! आणि सायकलिंग ही इतकी सोपी गोष्ट आहे की, ती काही मला शिकवता येत नव्हती!

मी जेव्हा माझ्या सायकलिस्ट मित्रांना त्याबद्दल सांगायचो तेव्हा ते म्हणायचे, अच्छा म्हणजे माशाच्या पिलाला पोहणं शिकवणं सुरू आहे तर! गेले दोन वर्षं अशी स्थिती होती. किती तरी वेळा कंटाळून अदू म्हणायची तुला आवडतं, तू सायकल चालवतोस म्हणून मी का सायकल चालवू? अशी गंमत सुरू होती. पण आत्ता चौथीची परीक्षा झाल्यानंतरच्या सुट्टीमध्ये परत एकदा प्रयत्न करून बघावा असं वाटलं. आणि ह्यावेळी तिच्या छोट्या सायकलीवर तिचे पायही टेकले! पण बॅलन्स कसं करायला पाहिजे ते मात्र कळत नव्हतं. मग तिला सायकलीवर बसून पायाने ढकलायला सांगितलं. मग एक पेडल वर घेऊन जोरात मार असं सांगितलं. थोडा वेळ मागून धक्का दिला! आणि मग सुरूवातीला एक सेकंद, नंतर तीन सेकंद, मग पाच सेकंद असा तिला बॅलन्स जमत गेला! जेव्हा तिला कळालं की, ती पेडल मारत पुढे गेलीय आणि मी हात कधीच सोडून दिलाय तेव्हा तिचा आनंद बघण्यासारखा होता!


.

(आम्ही सोबत केलेल्या सायकलिंग व ट्रेकिंगचे काही फोटो इथे ब्लॉगवर बघता येतील- http://niranjan-vichar.blogspot.com/2024/03/when-baby-fish-learns-swimmi... -निरंजन वेलणकर 09422108376.)

तिचं सायकलिंग बघताना मला माझं लहानपणीचं सायकलिंग आठवलं! मी पहिली- दुसरीतच सायकल शिकलो होतो. कारण अगदी स्पष्ट होतं. तेव्हा सगळेच गल्लीतले मुलं आपोआप सायकल शिकायचे. एकमेकांकडे बघून शिकावी लागायचीच नाही. डायरेक्ट धक्के खात आणि धडपडत सगळेच सायकल चालवायला लागायचे! भाड्याने तासभरासाठी मिळालेली छोटी सायकल जास्तीत जास्त पळवायचे! अदूच्या बाबतीत मात्र अशा समवयस्क सवंगड्यांची उणीव खूप जाणवली! जे सहज एकमेकांचं बघून आणि निव्वळ सोबतीने जमलं असतं, ते करायला बराच वेळ लागला. पण हरकत नाही! एकदा सायकल शिकल्यावर तिला आता खूप छान मजा घेता येईल.

बॅलन्स चांगला येताना आधी सोसायटीच्या पार्किंगमध्ये दोन दिवस तिने सायकल चालवली. सुरूवातीला तक्रार करायची की, किती खड्डे आहेत फरशीवर, किती दगड आहेत! पण दोनच दिवसांमध्ये तक्रारीची जागा आनंद आणि उत्साहाने घेतली! बघता बघता चौथ्या दिवशी तिचा आत्मविश्वास व आनंद वाढला की, बाहेर मोठ्या रस्त्यांवर छोटी राईड करून बघितली! दोघं दोन सायकलींवर अशी राईड! आणि मग पाच किलोमीटर, सहा किलोमीटर असं करत ११ किलोमीटरची राईडही केली! तिचा आनंद खरंच बघण्यासारखा होता! "अरे निनू, मला विश्वास बसत नाहीय मी इतकी सायकल चालवतेय!” इतका तिला आनंद येत होता आणि मलाही होत होता!


.

आपल्याला मिळालेल्या गोष्टी अशा शेअर करण्यातला आनंदही खूप वेगळा! तिचं सायकलिंगचा आनंद घेणं, ट्रेकिंगमधली मजा अनुभवणं हा खूप वेगळा अनुभव! तिला ट्रेकिंग आवडतंच, तिने छोटे ट्रेक बरेच केले आहेत. अगदी सिंहगडही ती आरामात चढली आहे. आणि आता सायकलिंगचाही ती तसाच आनंद घेऊ शकते आहे! वेगवेगळ्या गोष्टी आणि खूप वेगवेगळे अनुभव- गमती- अगदी क्रिकेट किंवा चित्रपटातल्या मजा- किस्से तिला सांगण्याची मजा खूपदा अनुभवली आहे. छोट्या रोपाचं मोठं वृक्ष होणं! किती वेगळा अनुभव आहे! ह्या वाटचालीमध्ये ती माझ्यापेक्षा वेगळी आहे, खूप गोष्टी तिला लवकर समजतात आणि ती खूप वेगळ्या प्रकारे करते हेही जाणवतं. ती पुढे सायकलिंग किती करेल किंवा नाही करणार हा अर्थातच तिचा विषय आहे. पण त्यातली मजा व गंमत अनुभवण्यासाठी मी तिला सोबत करू शकलो हे समाधान मोठं आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!
सत्कारणी लावताय वेळ. मुलीचे अभिनंदन.
(आनंद पार्क जवळचा फोटो आहे का जाळीवाला पूल )

छान वाटलं वाचायला. आपल्याला आवडणाऱ्या कला-छंदांची ओळख करून देणं, एवढाच आपला रोल असतो. अशा गोष्टींमधून आनंद मिळतो, इतकं कळलं की मुलं आपले आपले छंद कधीतरी शोधतात.

माझी लेक याच वयाची आहे आहे आणि दिसण्यात पण विलक्षण साम्य आहे. फोटो बघून मी चमकलेच आणि झूम करून खात्री करून घेतली कोण आहे म्हणून.
तुमच्या आनंदाची सध्या मला अगदीच जवळून ओळख आहे. लेक नुकतीच छोट्या सायकलवरून मोठ्या सायकलवर शिफ्ट झाली आहे आणि शाळेत पण सायकलवरून जायला सुरुवात केली आहे.

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! Happy

@ रघू आचार्य जी, पिंपळे निलख व ज्युपिटर हॉस्पिटलच्या मधला पूल आहे तो. कदाचित तुम्ही म्हणताय तोच असेल.

@ सहेली जी, ओहह! अच्छा! ती नवव्या वर्षी मोठी सायकल शिकली म्हणजे मस्तच! तिला शुभेच्छा व कौतुक सांगा. Happy

छान लिहिले आहे.
मी मागच्या उन्हाळ्यात लेकाला(वय वर्ष ६) सायकल शिकवायचा प्रयत्न केला. बघू यावर्षी जमतेय का ते.
तेव्हा सगळेच गल्लीतले मुलं आपोआप सायकल शिकायचे. >> अगदीच. आमच्याकडे तर लहान सायकलही नव्हती. दुपारी काका झोपले कि त्यांची मोठी सायकल गुपचूप पळवायची. मग चाळीतले ५-६ सवंगडी ती सायकल शिकवायला यायचे. दांड्यावरून पाय दुसऱ्याबाजूला टाकता येत नव्हता तर त्या खालूनच पाय घालून पेडल मारायचे. सायकल पळू लागली कि ती थांबवता कोणालाच यायची नाही. मग वाळूच्या ढिगावर जाऊन उडी मारायची. सायकलच्या नादात गुढघे फुटले होते पण खूप मज्जा यायची.

दांड्यावरून पाय दुसऱ्याबाजूला टाकता येत नव्हता तर त्या खालूनच पाय घालून पेडल मारायचे. >> आमच्यकडे त्याला कैची म्हणायचे.