“अमेरिका सोडून उर्वरित जगाचा वीज वापर समजा माझ्या गुडघ्यापर्यंत असेल, तर एकट्या अमेरिकेचा वीज वापर माझ्या कमरेपर्यंत म्हणता येईल. त्यात राज्य म्हणून टेक्सास बघाल तर खांद्यापर्यंत आणि आपल्या ऑस्टिनविषयी बोलायचे झाले तर डोक्यावरून…”
सुखाची सरकारी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायांत पडण्यांत (हा शद्ब दोन्ही अर्थांनी घ्यावा) एक मजा (कम नशा) असते. स्वातंत्र्य आणि खूप काही शिकायला मिळतं. निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यांचे चाललेले अगणित उद्योग, जगतातल्या घडामोडी असं काय काय ऐकायला बघायला मिळतं. शिवाय आपणही त्या घडामोडींचा एक भाग सहज बनत जातो.
मागच्यावर्षी मी ऑस्टिनमध्ये एका ऊर्जाविषयक चर्चासत्राला गेलेली होते. विषय होता ‘जागतिक ऊर्जा क्षेत्रातले वारे आणि नव्या दिशा’. विद्यापीठाच्या पीचडी प्रोफेसरांनी बोलायला सुरुवात केली ती अमेरिकेच्या वीज वापरातल्या उधळपट्टीचा उल्लेख करत. वक्ते ओघवते, अभ्यासू आणि उत्तम विनोदबुद्धीचे असल्यामुळे (आणि आयोजकांनी खाण्या-पिण्याची सोय लावल्यामुळे) श्रोते उत्साहाने बसलेले होते.
दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देत ते म्हणाले की, जगाची एक तक्रार आहे की अमेरिका नेहमी उशीरा येतो… आता पाहा ना दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला आणि काय काय घडून गेलं पण अमेरिकेचा सहभाग अगदी शेवटी मग ते अणुवस्र प्रकरण झालं आणि युद्ध संपलं. तशी अमेरिका अनेक बाबतीत उशिराच जागी होते…
मला ते ऐकताना एक जुनं व्यंगचित्र आठवलं.
चार प्रवक्ते आहेत – एक आफ्रिकन, एक युरोपिअन, एक अरब आणि एक अमेरिकन.
मुलाखत घेणारा विचारतोय की “जगातल्या अन्न तुटवड्याविषयी आपलं काय मत आहे?” (What is your opinion about food shortage in the rest of the world?)
प्रवक्त्यांपैकी आफ्रिकन माणसाला प्रश्न पडलाय की ‘अन्न’… ते काय असतं? (What does ‘food’ mean?)
युरोपिअन माणसाला वाटतंय की ‘तुटवडा’ म्हणजे काय? (What does ‘shortage’ mean?)
अरब म्हणतोय की ‘मत’ म्हणजे काय? (What does ‘opinion’ mean?)
आणि अमेरिकन खांदे उडवतोय, ‘उर्वरित जग’ म्हणजे काय? (What does ‘the rest of the world’ mean?)
माझ्या विचारांची तंद्री भंगली. प्राध्यापक महाशय बोलत होते. ‘अमेरिकेतला पहिला कोविड झालेला आणि त्यातून वाचलेला मीच तो!’ अशी स्वतःवरूनच रंजक कहाण्यांची सुरुवात करून प्रोफेसर ‘जागतिक ऊर्जा क्षेत्रातले वारे आणि नव्या दिशा’ या विषयाला अनुसरून तास – सव्वा तास खुमासदार बोलले. त्यातली दुसरी कथा होती, ग्रीक पौराणिकांमधली ‘टॅंटलस’ची.
राजा टॅंटलसने म्हणे दुष्टपणाने आपल्याच मुलाचा बळी देऊन त्याचे भोजन देवांना वाढलेलं. देवांच्या सर्वज्ञतेची परीक्षा घ्यायची म्हणून केलेले हे महाभयंकर कृत्य जाणून देवांनी जेवणास नकार दिला आणि टॅंटलसला तडपवणारी शिक्षा सुनावली. पाण्यात राहून ना पाणी पिता येईल आणि फळांनी लगडलेल्या वृक्षाखाली असून ते ना खाता येतील अशी… अन्न पाणी सभोवती असतानाही तहानलेला आणि भुकेलेलाच राहण्याची. त्याच्यावरूनच इंग्रजीतला ‘tantalize’ हा शब्द पडला ज्याचा अर्थ ‘खोटी आशा दाखवणे’.
नोबेल पुरस्कार विजेत्या जॉन गुडइनफ यांच्या बॅटरीविषयक शोधकाम, बकिझ क्लिनर बाथरूम, हॉलिवूड चित्रपटांमध्ये ऊर्जेचे आलेले संदर्भ, विविध ऊर्जास्रोत, वीजनिर्मिती प्रक्रिया, वीज उत्पादन क्षमता, येत्या काळाची गरज, सूर्यऊर्जा ते अणुऊर्जा फायदे-तोटे, तंत्रज्ञानाचा उपयोग, नवे शोध, पृथ्वीवरील संसाधनांचा उपयोग, भविष्यातली आव्हाने आणि ऊर्जा बचत करण्याविषयी जागरूकता निर्माण करणे कशी आवश्यक आहे अशा अनेक मुद्द्यांवर स्पर्श झाला.
“ऊर्जा बचतीचा मुद्दा मला फार आवडला, फक्त दिवसाउजेडी काचेच्या तावदानांना आतून झाकून आणि विजेचे दिवे विनाकारण जाळत आपण हे ऐकतो आहे, नाही का?” समोरच्या नुकतीच तोंडओळख झालेल्या बाईच्या कानाशी मी पुटपुटले तशी ती मागे वळली. माझ्या प्रश्नावर तिला एकदम हसायला आलं तरी त्यावर प्रतिक्रिया कशी आणि काय द्यावी हे तिला कळेना. आता दर शुक्रवारी (म्हणजे TGIF) ‘हॅपी आवर’ (हा-आवर) करणारी अमेरिकन जनता घरी परतताना ज्या रस्त्यावरून जाते, तिथे नियमावलीप्रमाणे ‘नो ड्रिंक अँड ड्राईव्ह’ असतं… असो!
सत्रानंतर हाच प्रश्न मी त्या प्रोफेसरना भेटायच्या रांगेत उभं राहायचा वेळ घालवून विचारला. ‘अरेच्या किमान हे सत्र तरी आपण वीज बचतीचा मुद्दा लक्षात घेऊन करायला हवा होता, जेणेकरून आपण मांडत असलेल्या विषयाला आपल्या आचरणाची जोड मिळेल…’ याच्या जवळपासचं तरी उत्तर मिळेल ही माझी धुकधुकती आशा फोल ठरली. क्षणाचाही विलंब न करता, “That is always been a case…” प्रोफेसरांनी व्यावसायिक कोरं हास्य फेकलं.
“अमेरिकेत जिथे जावं तिथे हीच परिस्थिती पाहायला मिळते…” मी परत माझ्या मुद्द्याची ‘री’ ओढली… “साधी रेस्टारंटस् पाहा. भर दुपारीही आत अंधार करून हे लोक ढीगभर मिणमिणते दिवे जाळतात. शाळा, कॉन्फरेन्स सेन्टरमध्ये हुडहुडी भरेल इतका एसी चालू असतो. अनेक दुकानांमधले दिवे रात्री अपरात्री ‘शो’ नावाखाली चालू असतात… या सत्राच्या निमित्ताने मला हे बोलून दाखवता आले, शक्य असल्यास तुमच्या क्षमतेत त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी आशा व्यक्त करते इतकंच…” प्रोफेसरांनी होकारार्थी मान डोलावली, त्यांच्या हास्यात मिश्किल सच्चेपणा आलेला पाहून मी तिथून निघाले.
ऊर्जा काय एकूणच संसाधनांचा बेपर्वा वापर करणाऱ्यांना टॅंटलससारखी जवळ असून वापर करता येत नाही, उपभोग घेता येणार नाही अशी जालीम शिक्षा किंवा किमान त्याची झलक ठेवली जायला हवी का?
~
सायली मोकाटे-जोग
https://sayalimokatejog.wordpress.com/2024/03/02/tantalus-urja-shiksha/
छान. अणुउर्जेबाबत (Nuclear
छान. अणुउर्जेबाबत (Nuclear Power) काय चर्चा झाली आणि त्याबद्दल तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल.
अणुऊर्जा गरजेची आहे का, फायदे
अणुऊर्जा गरजेची आहे का, फायदे, धोके, प्रदूषण, निर्माण होणारा कचरा इ विषय चर्चिले गेले.
लेख हा एकूण चर्चासत्राच्या अनुभवाविषयी आहे, अणुऊर्जेवर पुन्हा कधीतरी.
चर्चासत्राच्या अनुभव ज्या
चर्चासत्राच्या अनुभव ज्या नर्मविनोदी पद्धतीने मांडलेला आहे, ते आवडले.
छान लिहिले आहे. पहिल्या
छान लिहिले आहे. पहिल्या परिच्छेदासाठी अगदी-अगदी झाले.
मस्त लिहिलं आहे.खुसखुशीत शैली
मस्त लिहिलं आहे.खुसखुशीत शैली आवडली.
टॅनटॅलस ची गोष्ट पूर्वार्ध वाचून चिलया बाळ आठवला.
अजून लिहा या एनर्जी विषयावर.
मस्त लिहिलं आहे.खुसखुशीत शैली
मस्त लिहिलं आहे.खुसखुशीत शैली आवडली.>>+१
लेख ऐन रंगात आलेला असताना संपला सुद्धा असं झालं.
छान लिहिलं आहे, अजून वाचायला
छान लिहिलं आहे, अजून वाचायला आवडेल
मस्त लिहिलं आहे.खुसखुशीत शैली
मस्त लिहिलं आहे.खुसखुशीत शैली आवडली.>>+१
लेख ऐन रंगात आलेला असताना संपला सुद्धा असं झालं )))) +1111
मस्त लिहिलं आहे.खुसखुशीत शैली
मस्त लिहिलं आहे.खुसखुशीत शैली आवडली.>>+१
लेख ऐन रंगात आलेला असताना संपला सुद्धा असं झालं )))) +1111
छान लिहिलंयत. बऱ्याच ठिकाणी
छान लिहिलंयत. बऱ्याच ठिकाणी अगदी मनातलं लिहिलंय अस वाटलं..
<< एकट्या अमेरिकेचा वीज वापर
<< एकट्या अमेरिकेचा वीज वापर माझ्या कमरेपर्यंत म्हणता येईल. >>
अमेरिकेत ऊर्जा वापर (energy consumption) खूप प्रमाणात आहे, हे खरे आहे. पण ऊर्जा वापर आणि इकॉनॉमीची वाढ यांचा फार जवळचा संबंध आहे. बहुतेक विकसित देशात "माणशी वीज वापर" गरीब देशांपेक्षा जास्तच असतो.
ऊर्जेच्या संदर्भात आज जगात ३ मुख्य प्रश्न आहेत.
१. हवेतील CO2 चे प्रमाण कमी कसे करायचे? (Greenhouse gases)
२. Fossil fuel चा वापर कसा कमी करता येईल ज्याच्यामुळे हवेतील CO2 चे प्रमाण वाढते?
३. High efficiency energy कशी बनवता येईल, ज्यात वाया जाणारी ऊर्जा कमी असेल? थोडक्यात, स्वस्त ऊर्जा कशी मिळेल?
<< ऊर्जा काय एकूणच संसाधनांचा बेपर्वा वापर >>
सहमत आहे. माझ्या मते खरा पर्यावरणप्रेमी म्हणजे, जी व्यक्ती निसर्गातले रिसोर्सेस जपून वापरते ती.
<< उपभोग घेता येणार नाही अशी जालीम शिक्षा... >>
पण इथे हे पण लक्षात घेतले पाहिजे की जर कुणाला ते रिसोर्स हवेच असतील, तर जास्त पैसे देऊन ते घेण्याचा पर्याय त्याला असला पाहिजे. (वाचा: Free to Choose by Milton Friedman) मुळात वीज किंवा पाणी जगात इथून तिथे सहजासहजी आणि स्वस्तात नेता येत नाही. म्हणजे अमेरिकेत कुणी बागेला आठवड्यातून ३ दिवस पाणी दिले किंवा मोठा स्विमिंग पूल घरात बांधला तर त्यामुळे इथिओपियातील कुणाचे प्यायचे पाणी कमी होणार नाही. त्याचप्रमाणे वीज एकदा ग्रिडमध्ये सोडली की ती वापरावीच लागते, सहजपणे साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे जर कुणाला शोरुममध्ये रात्रभर दिवे चालूच ठेवायचे असतील तर त्याला खूप जास्त दराने दिवसरात्र वीज जरूर द्यावी, तो पर्याय पण असला पाहिजे. समाजप्रबोधन चांगले आहे, पण खिशाला चिमटा बसला की तो जास्त प्रभावशाली असतो.
संदर्भ: १
छान लिहिलं. आवडलं
छान लिहिलं.
आवडलं
छान लेख.
छान लेख.
‘बाहेर कडकडीत ऊन असतांना कपड्यांना ड्रायर मध्ये का घालायच?’ हा प्रश्न मला माझ्या थोडक्या टेक्सास वास्तव्यात पडला होता. (अर्थात बाहेर कपडे वाळत घालत नाही वैगेरे वैगेरे महित असून..)
लेख आवडला
लेख आवडला
मस्त लेख लिहीला आहे.
मस्त लेख लिहीला आहे.
तो आफ्रिकन अरब अमेरिकन किस्सा आधीही वाचला होता.
लेखातले इतर संदर्भ देखील मस्त.
अजून वाचायला आवडेल..
छान लेख.
छान लेख.
खरेच दिवे बंद करून वीज वाचवता येते का? वीजबिल कमी येईल फार तर.
वीज एकदा ग्रिडमध्ये सोडली की ती वापरावीच लागते, सहजपणे साठवून ठेवता येत नाही. >> +१
वीज बिल कसे आकारतात? ठराविक युनीट पर्यंत फिक्स्ड दर असतो ना? मग अधिक वीजेसाठी जरा जास्त दर. हा माझा समज चुकीचा असेल तर माफ करा.
छान लिहिलय. गंभीक विषय नर्म
छान लिहिलय. गंभीक विषय नर्म भाषेत मांडूनही प्रभावीपणे पोहोचतोय.
अमेरिकेतल्या मोठमोठ्या ऑफिसेसमधले सगळे दिवे रात्रभर चालू असतात हे बघितलय. भले आत कोणीही काम करत नसेल. बघून थक्क व्हायला झालं. आपण मारे एका खोलीतून दुसरीकडे जातानाही लाईट बंद करतो...
अमेरिका हा अती श्रीमंत देश आहे, अन भारत विकसनशीलच हे ठळकपणे जाणवलेलं...
वेगळ्या विषयाला स्पर्श केला
वेगळ्या विषयाला स्पर्श केला आहे. हसतखेळत. Non preaching, ते आवडले.
आता अमेरिकेसारखे भारतातील शहरात भरपूर व्हायला लागले आहेच. दिल्ली-गुरगाव, जयपूर, हैद्राबादसारख्या अति-उष्ण उन्हाळा असणाऱ्या शहरात पूर्ण काचेच्या भव्य ऑफिस इमारती ! आधी ४८ डिग्री तापमान आणि तीव्र ऊन त्या काचांमधून आत घ्यायचे, मग प्रचंड क्षमतेचे वातानुकूलन, त्याला प्रचंड वीज, विजेला डिझेल जनरेटरचे बॅक-अप असा उच्च सेटअप ! सगळाच आनंद !
असो, लेख आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला.
SharmilaR
SharmilaR
ड्रायरऐवजी दोरीवर कपडे वाळवणे हेच असायला हवे खरं तर... एकतर टेक्सासमध्ये उन्हाळा आणि ड्रायरमध्ये टाकून टाकून कपडे पण लवकर खराब होतात. पण सांगणार कुणाला?
मस्त लिहिलंय. तो 'रेस्ट ऑफ द
मस्त लिहिलंय. तो 'रेस्ट ऑफ द वर्ल्ड' वाला विनोद आठवला
गोड शब्दांत कानऊघाडणी...
गोड शब्दांत कानऊघाडणी...
रोजगार हमी योजना भाषण आणि खानपानात काजू बदाम ...
खरेच दिवे बंद करून वीज वाचवता
खरेच दिवे बंद करून वीज वाचवता येते का? वीजबिल कमी येईल फार तर.
वीज एकदा ग्रिडमध्ये सोडली की ती वापरावीच लागते, सहजपणे साठवून ठेवता येत नाही>दिवे बंद करून वीज वाचता वाचता येत नाही हे नक्कीच. पण जर विजेची आवश्यकता कमी झाली तर वीज निर्मिती कमी करता येऊ शकते ज्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट कमी होऊ शकतो.
छान लेख!
छान लेख!
उन्हा़ळ्यात ड्रायर ऐवजी दोरीवर/ड्रायिंग रॅकवर कपडे हे आमच्या भागात सामान्य आहे. आमच्या ओळखीतले काहीजण तर हिवाळ्यातही स्नो नसेल तर कपडे बाहेर वाळवतात. तसेच हिवाळ्यात किंवा बाहेर वाळत घालायला परवानगी नसल्यास, नो हीट/ लो हीटवर कपडे थोडा काळ फिरवून नंतर हँगर्/लाईन ड्राय असा मधला मार्ग वापरणारेही बरेच आहेत.
आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा वापर जसा वाढेल तसे विजेचा वापर खूप वाढेल असेही ऐकले ते कितपत खरे आहे? बिट कॉइन वगैरेसाठीही खूप वीज लागते असे ऐकले.
<< बाहेर कडकडीत ऊन असतांना
<< बाहेर कडकडीत ऊन असतांना कपड्यांना ड्रायर मध्ये का घालायच?’ हा प्रश्न मला माझ्या थोडक्या टेक्सास वास्तव्यात पडला होता. >>
असं काही म्हणू नका ओ. नाहीतर मग म्हणाल की मिक्सरऐवजी पाटा-वरवंटा वापरायला हवा, कारऐवजी सायकल का वापरत नाही, ऑफिस वातानुकूलित कशाला हवे वगैरे वगैरे.
गेल्या १०० वर्षात मनुष्याचे आयुष्य पूर्वीपेक्षा खूपच सुखकर झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे औद्योगिक क्रांती, माणसाने केलेली प्रगती. आणि त्यासाठी ऊर्जा लागते, पूर्वीपेक्षा भरपूर. उन्हात कपडे वाळवून किती ऊर्जा वाचवणार? आणि मग कपडे चुरगळले म्हणून इस्त्री करायला परत उर्जाच वापरणार ना? ती पण low grade energy (सूर्यप्रकाश) ऐवजी high grade energy (इलेक्ट्रिसिटी).
माझा एक मित्र गूगलमध्ये काम करतो, त्याचे काम फक्त इतकेच की गूगलच्या डेटासेंटरमध्ये जी प्रचंड ऊर्जा लागते त्याची कार्यक्षमता वाढवणे आणि खर्च कमी करणे. वीज खूप खर्च होते म्हणून इंटरनेट बंद झाले तर चालेल का कुणाला? हे असे लेख ब्राऊनी पॉइंट मिळवायला छान असतात, प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा उपयोग शून्य.
खरं आहे.एनर्जी वाचवताना पण
खरं आहे.एनर्जी वाचवताना पण आपले प्रेफ्रन्स बघून कुठे वाचवायची कुठे त्यातल्या त्यात कमी करायची हे ठरवावं लागेल.
“ हे असे लेख ब्राऊनी पॉइंट
“ हे असे लेख ब्राऊनी पॉइंट मिळवायला छान असतात, प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा उपयोग शून्य.”+१
>>>ब्राऊनी पॉइंट मिळवायला छान
>>>ब्राऊनी पॉइंट मिळवायला छान असतात, प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा उपयोग शून्य.
नवीन Submitted by उपाशी बोका on 24 March, 2024<<<
वेगळा दृष्टिकोन, विचार करायला लावणारा. पटेश __/\__
एका घरात ड्रायर न वापरून
एका घरात ड्रायर न वापरून फारशी वीज वाचणार नाही, पण मोठ्या संख्येने लोक असं करायला लागले तरीही नाही वाचणार? मला खरोखरच माहिती नाही म्हणून विचारत आहे. वाद घालण्यासाठी नाही.
मोठ्याप्रमाणात लोक करू लागले
मोठ्याप्रमाणात लोक करू लागले तर नक्कीच वाचेल.
पण आजूबाजूला बघितलं की असं होणे शक्य नाही हे दिसतं. माणसाला आरामात राहायला आवडतं. पाटा वरवंटा ते मिक्सर, चालत ते घोडागाडी ते मोटर, हंटर ग्यादरर ते आजचा मानव, कबुतर जा जा ते ईमेल ते Tiktok. दरवेळी दुसराच का जोपासलं जातं? माझी सगळी उदाहरणं अशीच आहेत, मी कदाचित डोळेझाक करत असेन.
पण एकदा डिशवॉशर वापरायला चालू केलं की हाताने ढीगभर भांडी कशाला कोण घासेल? आणि ड्रायरच का? वाशर ही विजेवरच चालतो. मग तुका म्हणे त्यातल्या त्यात शिवाय यात कितपत अर्थ आहे?
Pages