गेम (सायन्स फिक्शन)

Submitted by हौशीलेखक on 18 March, 2024 - 17:04

हा खरं तर नेहमीचा रस्ता! बाहेर पडलं, की पहिली राईट आणि नंतर लगेच लेफ्ट. लाखो वेळा ड्राइव्ह केलं असेल इथून. आज मी लेफ्ट घेतली आणि गुगल मॅप्सची बाई लागली कोकाटायला 'री-राऊंटिंग' म्हणून. म्हटलं हे असं का? बघतो तर मी पहिल्याच टर्नपाशी होतो; तिला मी राईट घेणं अपेक्षित होतं. मला चांगली आठवतेय मी आधी राईट टर्न घेतलेली. मग आलं लक्षात; डाऊनलोड डिलेज! म्हणजे, माझी गाडी जातेय तसा बाजूचा प्रत्यक्ष परिसर बदलायला हवा ना, त्याला डिले झाला. स्लो डाऊनलोड किंवा स्लो रीफ्रेश... आजकाल हे फार होत चाललंय. मी लगेच बग रजिस्टर केला; कामात आपुन चोख!
तुमच्या लक्षात आलं नसणार काय बोलतोय ते; नाही का? आता, परवाचा दिवस हरवला; म्हणजे तेरवानंतर एकदम कालच आला. ते तरी जाणवलं होतं का तुम्हाला? मीच वेडा असल्यासारखं बघताय माझ्याकडे, ह्याचा अर्थ तुम्हाला ते समजलंच नाहीय. नाहीच समजत बहुतेकांना. तसं तुम्हालाही परवा अमुक होणार होतं हे अपेक्षित असतं, लक्षात असतं. पण इतका भोळसर विश्वासू स्वभाव, की 'झालं असेल ना मग व्हायचं होतं ते!' किंवा 'हुं:, नाही झालं का?' इतपतच प्रतिक्रिया असते तुमची. माझं तसं नाही. म्हणजे माझा मोठेपणा नव्हे तो; कामच आहे ते माझं! 'एम्बेडेड क्यू ए' म्हणजे...
ब्र्र्र्र खड्क र्त्र ब्ज्म
अजिबात आवडत नाही मला बोलतांना असं मध्येच तोडलेलं! सिर्फ एक टेस्टर हूँ तो क्या? यार, अपनी भी कुछ औकाद है की नही! पण बॉसनेच इंटरप्ट केलं, म्हणजे कॉल घ्यायलाच हवा.
मी: मॉर्निंग बॉस!
बॉस: ते राहू दे! हे स्क्रिप्ट सोडून काय बरळायला लागलास? कोणाशी काय बोलायचं भान नको ठेवायला?
बॉसचं हे असंच आहे. रीतीभाती, सोपस्कार सगळ्याचा तिटकारा त्याला. थेट मुद्द्यावर. म्हणजे, फक्त आमच्यात बोलतांना; इतरांशी बोलताना मात्र काटेकोर नियम. आता मला तसं काही स्क्रिप्ट ठरवून दिलेलं नाहीय. पण कॅरॅक्टर्सशी बोलण्याचे ढोबळ नियम ठरलेले आहेत. तो क्यू ए चा उल्लेख केला ना; ताबडतोब त्याचा ट्रिगर वाजला असणार.
मी: नाही, पण हे सारखेसारखे ग्लिचेस फार फ्रस्ट्रेटिन्ग आहेत बॉस! आजच मी चौथा डिफेक्ट लॉग केलाय. मी असायला हवं एकीकडे आणि बाजूचा रस्ता दाखवतो आहे भलतीकडेच.
बॉस: ठीक आहे; बोललोय मी विश्वाशी (विश्वा म्हणजे विश्वकर्मा; आमच्या कंपनीचा इंजिनीअरिंग चीफ!). म्हणाला थोडा रिफ्रेश डिले होतोय खरा ह्या व्हर्शनमध्ये; ते फिक्स पाठवणार आहेत, पुढच्या रिलीजमध्ये. कॅरॅक्टर्सपैकी कोणाच्या लक्षात आलंय का?
मी: छे! माठ आहेत सगळे. आणि ते 'बायको' कॅरॅक्टर इंट्रोड्यूस केलं ना पूर्वीच, ते झकास जमलंय. 'तुमचंच लक्ष नसेल रस्त्याकडे! वेंधळ्यासारखी चालवता गाडी...' असले डायलॉग्ज अचूक फिट होतात ह्या इंसीडन्टमध्ये. पण तो परवाचा सबंध दिवसच गायब झाला त्याचं काय करू?
बॉस: हां; ते आहे खरं जरा सिरीयस. बहुतेक घाईघाईने रोलबॅक केला असणार; हे ज्युनिअर प्रोग्रॅमर्स म्हणजे ना! मी सिव्हिरिटी वाढवल्येय. आता फिक्स नाही करता येणार, निदान अव्हॉइड नेक्स्ट टाईम. पण त्याचाही कॅरॅक्टर्सवर फार परिणाम नाही दिसला तुझ्या रिपोर्ट्सनुसार.
मी: नाही, कॅरॅक्टर्स सुखात आहेत. त्यांच्यासाठी काय; कुठलाही एक दिवस डिट्टो दुसऱ्या दिवसासारखाच असतो. ह्याला संपवावा आणि त्याला उघडावा - सारखंच! कुठेतरी दहशतवादी हल्ला होतो, कुठेतरी राजकारण्याला अफरातफरीच्या आरोपात पकडतात, कुठलीतरी बँक बुडते, कोणीतरी डायरेक्टर कुठल्यातरी नटीच्या लफड्यात रंगे हाथ पकडला जातो... तेच ते आणि तेच ते! एखादा दिवस हरवला तर कुठे कोणाच्या लक्षात येतंय.
बॉस: कधीकधी होतो बरं का थोडा गहजब. मला वाटतं तू इथे कामाला लागण्यापूर्वीची गोष्ट असेल; मँडेला इफेक्ट बद्दल ऐकलंयस का?
मी: ऐकलंय थोडंसं; म्हणजे ह्या कॅरॅक्टर्सच्या न्यूज पोर्टल्स मधूनच. कोणीतरी मँडेला नावाचा मोठा काळा लीडर होता त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला असं काही कॅरॅक्टर्सना वाटतं, ते ना?
बॉस: 'वाटतं'? छान! म्हणजे, आमचा पॅच यशस्वी झाला तर! गेम खेळतांना एका कार्ट्याने त्या मँडेला कॅरॅक्टरला तुरुंगातच मारून टाकलं. आणि नंतर इतर कॅरॅक्टर्सच्या प्रतिक्रिया बघितल्यावर आमच्या लक्षात आलं, थोडी गोची झाली. मग पटकन रोलबॅक केलं. बहुतेक कॅरॅक्टर्सच्या आठवणी रीसेट झाल्या; पण काही निसटले. त्यांच्या लक्षात राहिलाच त्याचा मृत्यू. मग आम्ही पॅच रिलीज केला, त्यानुसार अशा 'बनावट' आठवणींना आम्ही 'मँडेला इफेक्ट' असं नांव दिलं. म्हणजे तो मेला होता असं वाटणाऱ्यांनाच मुर्खात काढलं. मग ते एक फॅडच झालं असं ऐकलं होतं. 'देजा वू' हा असलाच आणखी एक पॅच! मँडेलाच्या बरोबर उलट; रोलबॅक किंवा रिस्टोअर करताना घिसाडघाई केली, की काही टाइमलाईन्स रिपीट होतात. आता ही 'एम्बेडेड क्यू ए' ची तुझी पहिलीच बॅच ना; त्यामुळे अजूनपर्यन्त आम्हाला ह्या गेमचा, व्हर्शन्सचा आणि पॅचेसचा प्रत्यक्ष कॅरॅक्टर्सवर काय परिणाम होतो आहे कळायला काही मार्ग नव्हता.
आज बॉस एकदम रिलॅक्सड मूडमध्ये दिसत होता. लाडीगोडी लावायची हीच वेळ! थोड्या अवांतर गप्पा मारून माझा मतलब साधता आला तर बरं. मला ह्या गेममधून बाहेर पडून घरी परतायची घाई झालेली आहे. काही म्हणा, शेवटी आपला ग्रह आणि आपलं घर; हेच खरं!
मी: हो, मी जॉईन झाल्यावरची माझी पहिलीच असाईनमेंट. मला लगेच इथेच पाठवलं. 'एम्बेडेड' कन्सेप्ट नवीन असल्यामुळे एक्साईटमेन्ट होती. आता कळतंय, ह्या कळसूत्री बावळटांच्या बरोबर राहण्यात कसली आहे एक्साईटमेन्ट!
बॉस: केअरफुल मॅन! 'ब्लू डॉट सिम' ह्या आल्फा सेंटॉरी च्या इतिहासातील छप्परतोड यशस्वी सिम्युलेशन गेमच्या टीमचा एक हिस्सा असण्याचा काहीच अभिमान नाही तुला? नशीब समज, तू 'ब्लू डॉट सिम' च्या पहिल्या काही एपिसोड्समध्ये नाही गेलास तिथे.
मी: ते काय होते? (खरं तर लहानपणी मी खेळलोय ते एपिसोड्स; पण बॉस लेक्चर द्यायच्या मुडात असला, की आपण काही शाणपट्टी करण्यापेक्षा फक्त त्याला चावी मारून बोलत ठेवायचं!)
बॉस: ही बेसिक गेम तर माहिती आहेच तुला. ह्यामध्ये आपण एक निळ्या रंगाचा ग्रह इमॅजिन केलाय. मग तो ग्रह निर्माण कसा झाला, त्यावर जीवसृष्टी कशी निर्माण झाली, मग त्यांचे संघर्ष, हवामान, प्रेरणा, कृती सगळंसगळं इमॅजिन केलं. अगदी पहिल्या एपिसोडपासून ही गेम आपल्या टीनेजर्समध्ये भयानक पॉप्युलर झाल्येय.
मी: हो हो, वाचलंय मी हे सगळं आपल्या ट्रेनिंग मटिरिअलमध्ये. सॉरी बॉस; नो ऑफेन्स! पण एवढ्या जुनाट आणि मर्यादित बुद्धिमत्तेच्या प्राण्यांबद्दलच्या गेम्स खेळण्यात आपल्या टीनेजर्सना काय आकर्षण आहे खरं तर मला कधीच समजलं नाही.
बॉस: तीच तर गंमत आहे! लहान रांगत्या बाळांकडे बघून आपल्याला कशी गंमत वाटते, हॅ:, एवढं पण माहिती नाही ह्यांना! किंवा, ती कशी टकमका सगळीकडे कुतूहलाने बघत सगळं समजून घेत असतात... तसंच हे! शिवाय, खेळाडूंना ह्या कॅरॅक्टर्सना हिंट्स देऊन त्यांच्याकडून कृती करवून घेता येते. प्रेरणा आणि प्रतिक्रिया, त्यातून प्रगती ह्या सगळ्याबद्दल शिकवायला केवढातरी उपयोग होतो ह्याचा शाळांमध्ये.
मी: पण पहिले काही एपिसोड्स केवढे बोअरिंग असतील? पहिल्यामध्ये तर काही जीवसृष्टीच नव्हती. नंतर ते प्राणी तरी आले.
बॉस: मुळीच नाही! प्रत्येक एपिसोडचे चॅलेन्जेस वेगळे होते. हा निळा ग्रह निर्माण केल्यावर त्याची स्थित्यंतरं सुद्धा आपल्या खेळाडूंनीच कल्पनेतून घडवून आणली. मग प्राणी निर्माण केले. गेम क्रिएटर्सनी फक्त ग्राऊंड रूल्स घातलेले होते; त्या कक्षेमध्ये खेळाडूंनी बऱ्याच कल्पना सुचवल्या. शिवाय लक्षात ठेव, हा आपल्या गेम क्रिएटर्स आणि गेम प्लेयर्स दोघांसाठी फक्त एक विरंगुळा आहे; पण राइटर्ससाठी केवढे चॅलेंजेस होते! प्रत्येक एपिसोड मध्ये खेळाडूंना गुंतवून ठेवणं काही बच्चेका खेल नाही. म्हणून मग ट्विस्ट म्हणून तिसऱ्या एपिसोडमध्ये कॅरॅक्टर्सची एक मोठी जमातच काढून टाकली गेममधून!
मी: माहित्येय! डायनॉसॉर्स म्हणतात तेच ना? तो थ्रेड डेड एन्डच वाटायला लागला होता. नुसतेच अजस्त्र आणि निर्बुद्ध प्राणी! मोठे, आणि त्याहून मोठे, पण त्यापलीकडे काहीच नाही. जमिनीवर, पाण्यात, आकाशात सगळी व्हेरीएशन्स झाली... पण सगळे बिनडोक; करणार काय त्यांचं? गेम पुढे कशी जाणार ना!
बॉस: खेळाडूंचा फीडबॅक अगदी हाच होता. पण असं एवढ्या मोठ्या जमातीला आतल्याआत काढून टाकणं सोपं नव्हतं. म्हणून मग ते बाहेरचे ऍस्टरॉईड इंट्रोड्यूस केले. ब्रिलियन्ट आयडिया, आय थिंक! त्या 'निर्बुद्ध' फीडबॅकमधूनच क्रिएटर्सना आयडिया सुचली की गेम इंटरेस्टिंग करायची तर प्राण्यांना थोड्या वेगवेगळ्या सुपर पॉवर्स देऊन एकमेकांविरुद्ध झुंजवलं तर मजा येईल.
मी: त्यातूनच मग पाचव्या एपिसोडची, माणूस कॅरॅक्टरची आयडिया आली का? पुढच्या सगळ्या एपिसोड्समध्ये तर तेच कॅरॅक्टर जिंकतंय!
बॉस: हो; त्या कॅरॅक्टरची कल्पनाच राइटर्सना सुद्धा एवढी आवडली, की त्या एपिसोडच्या रीलिजमध्ये थोडी घिसाडघाई झाली. निअँडरथाल पासून एकदम थेट होमो सेपियन्सचा रीलीज झाला. ती उडी, मधली गॅप केवळ रीलीजच्या प्रेशरमुळे झाली; अर्थात कोणीच मान्य करत नाही ते. नेहमीप्रमाणे 'इट्स ए फीचर, नॉट ए बग'! पण खेळाडूंच्या ब्लॉग साईट्समध्ये, गेमिंग जर्नल्समध्ये त्यावर बरीच टीका झाली. आणि कॅरेक्टर्स बिचारे अजूनही त्या गॅपचा अर्थ लावण्यासाठी धडपडताहेत.
मी: मला एक समजलं नाही. ही गेम नक्की खेळतं कोण? आपले टीनेजर्स, का कॅरेक्टर्स स्वतः?
बॉस: तीच तर गंमत आहे! ह्या गेमचं खास वैशिष्ट्य, आणि बहुतेक एवढ्या लोकप्रियतेचं मुख्य कारण म्हणजे हा एखाद्या बुद्धिबळासारखा गेम क्रिएटर्स, रायटर्स, प्लेयर्स आणि कॅरेक्टर्स असा चौरंगी सामना असतो. त्यांच्यामध्ये फीडबॅकचं लूप कायम चालू असतं. विशेषतः ही माणूस कॅरेक्टर्स स्वतः सुद्धा, आपण घालून दिलेल्या चौकटीमध्ये का होईना, थोड्या ऍक्शन्स घेऊन ट्विस्ट देऊ शकतात. खरं तर त्या ट्विस्ट्स म्हणजे केवळ आपल्या खेळाडूंनी दिलेल्या हिंट्सवर, ट्रिगर्सवर त्यांच्या प्रतिक्रिया असतात; पण त्याला ते खेळणं समजतात. 'जीवन' का काहीतरी शब्द वापरतात मला वाटतं त्यासाठी. तीन-चार एपिसोड्स झाले हे माणूस कॅरॅक्टर इंट्रोड्यूस केल्यापासून; सॉलिड पॉप्युलर आहे हे.
मी: पण केवळ 'बिकता है' म्हणून असेच एपिसोड्स करत राहायचं का? कधीपर्यंत? (म्हणजे, ही असाइनमेंट संपून मी घरी कधी जाणार!) गेम क्रिएटर्सना आणि खेळाडूंना सुद्धा कंटाळा नाही का येणार ह्याचा?
बॉस मिशीतल्या मिशीत हसला आणि मोठं गुपित सांगत असल्यासारखा हलक्या आवाजात म्हणाला 'डोन्ट वरी! पुढचा किंवा कदाचित त्यापुढचा जो एपिसोड येईल तो तर बघतच राहशील! डायनॅसॉर्सचा कंटाळा आला म्हणून ऍस्टरॉईड आणावे लागले ना; ह्यावेळी तर ह्या माणूस कॅरॅक्टर्सना स्वतःलाच नष्ट करून घ्यायची प्रेरणा दिलेली आहे आधीपासूनच! अब बस देखते रहो बेटा!'
चला; म्हणजे ही ब्लू डॉट सिम गेम (आणि माझी असाइनमेंट सुद्धा!) एकदाची संपणार की काय! माझी आशा उंचावली. विचारलं सुद्धा तसं मी बॉसला.
आणखी कुजबुजत तो म्हणाला 'माणूस कॅरॅक्टर संपणार! पण त्यांनी स्वतःच पुढचं एक, त्यांच्यापेक्षा बुद्धिमान, कॅरॅक्टर निर्माण केल्यानंतर मगच! त्या एपिसोडची पॉप्युलॅरिटी आपण आत्ता कल्पनाही करू शकत नाही अशी असण्याचे फोरकास्टस आहेत! म्हणून तर ह्या मधल्या काळात आपली एम्बेडेड क्यू ए टीम आणखी महत्वाची! कॅरॅक्टर ट्रांझिशन नीट होतंय ना बघायला हवं; हे तू सांगतोस तसले फालतू ग्लिचेस येऊन चालणार नाही. पुढच्या एपिसोडमधली कॅरेक्टर्स 'माणूस' एवढी बुद्दू आणि स्लो नसणार आहेत. त्यांच्या जर लक्षात आलं ही गेम आहे, तर आपलं काय! म्हणून आम्ही आता एम्बेडेड टीम वाढवायचं ठरवलं आहे. तुला लवकरच कंपनी मिळणार आहे.... स्टे ट्यून्ड'.
कर्म माझं! इथे आणखी कंपनी नकोय मला; मला स्वतःला इथून बाहेर, घरी, माझ्या ग्रहावर परत जायचा मार्ग हवाय!
* * * * *
दरम्यान, माझ्या इथल्या शेजारच्या घरातलं एक टीनेजर कॅरॅक्टर रोज रात्री जागून गुगलवर सिम्युलेशन थिअरी विषयी जेवढी काही माहिती मिळेल ती वाचून काढतो आहे. दूरच्या कुठल्या गॅलॅक्सीमधली अतिप्रगत जमात केवळ टाईमपास म्हणून त्याच्या पृथ्वीवरच्या सिम-सिटी आणि फायनल फ्रॉन्टिअर सारखे गेम्स कसे रचते आणि खेळते ह्याबद्दल वाचतांना त्याचे डोळे विस्फारलेले आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

अद्भुत! कल्पना शक्ती खूपच छान! कथेच्या मध्या पर्यंत मूळ मुद्दा समजायला वेळ लागला, इथेच लेखक जिंकला.

अवांतर - ' आणि पापणी लवली' ही नारायण धारप यांनी लिहिलेली एक सायन्स फिक्शन मागे वाचली होती.(20 पाने) तिची आठवण झाली.