सायली मधील य....

Submitted by ASHOK BHEKE on 24 February, 2024 - 22:50

आज सायलीचा वाढदिवस... सायली म्हणजे नाजुक वेळीवरचे साजूक फूल. पण या वेलीचा वृक्ष झाला आणि त्याने इतरांना छायेत घेऊन प्रत्येक बाबतीत पाठराखण तीने करावी. हुशार, प्रतिभावान आणि उत्साही, स्वतःच्या मेहनतीने आणि प्रयत्नाने यशाला गवसणी घालणारी अनेक गुणांची कमतरता नसलेल्या सायलीशी मैत्री करायला नक्कीच आवडेल. कुंभ राशीच्या या मुलीना बुध्दिमत्तेची जोड जन्मत: असते. खूप स्पेशल असतात. मित्रांशी गट्टी जमविताना आपल्या कुटुंबावरचा प्रेमांश ढळू देत नाही. भल्या सकाळी शुभेच्छा द्याव्यात म्हणून मेसेज टाईप करायला गेलो. आपल्या वेगाने टाईप करीत असताना सायली मधील य हे अक्षर येतच नव्हते. उमटत नव्हते. प्रयत्न सुरू होते. पण सायली हा शब्दच टाईप होत नव्हता. काही करावे समजेना. टाईप झालेल्या अक्षरांचा अर्थ वेगळा निघत होता. शुभेच्छा तर द्यायच्या होत्या. मग कशा द्याव्यात या विचारात पडलो. पण सुचत नव्हते, काय करावे. तसं हे अक्षर अगदी मृदू आणि कोमल स्वरूपाचे, दुधावरच्या साय सारखे... जोडशब्द नव्हते तरी देखील अडचण. आज य का रुसून बसला, कळेनाच. य ने माझ्याशी रुसवा धरला की काय... बसलो होतो तेथे चाफा, मोगर्‍याच्या सुगंधाने आमच्या नाकपुड्या ची ट्रॅफिक जाम झाली होती. तरी देखील य शोधावया बसलो होतो. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तो आपली शांतता सोडीत नाही त्याप्रमाणे मी शांत बसून य शोधत होतो.अखेर भगवंताला गाऱ्हाणे घालावे म्हणून आकाशाकडे पाहिले अन मनोभावे म्हटले, कृपा करी भगवंता.. आता माझे हित तुझ्या पायी म्हणून कळवळून विनविले. बऱ्यापैकी सूर्य प्रकाशित झाला होता. पण जेव्हा मी विनाविले तेव्हा कोठे त्याच्यापुढे मोठा ढग आला आणि त्या कोवळ्या उन्हाला झाकून टाकले. वारा थंडगार धावू लागला. समोरची झाडे खळखळून हसावी त्याप्रमाणे डोलू लागली होती. झाडावरच्या पक्ष्याने मधुर आवाजात शीळ सुरू केली होती, ऐकत राहावं,पाहत राहावे, असे वातावरण तयार झाले होते. पुन्हा एकदा मी टाईप करायला लागलो आणि य प्रकटला. देव धावून आला होता. प्रसन्न झाला असावा. नांव पूर्ण झाले होते. सायली नांव प्रकटले आणि मी उसासा सोडला. एका अक्षरासाठी इकडे पाहतोय, तिकडे पाहतोय, वर पाहतोय डोळे मिटून घेतोय अशी माझी तगमग पाहून अनेक जण बुचकळ्यात पडले होते. माना वळवून वळवून पाहत होते. इष्ट परिणाम जेव्हा टप्प्यात आले तेव्हा कोठेतरी क्षणभर विसावा घ्यावा असे वाटले.
मराठी भाषा आहे एक अक्षर बरीच कमाल करते. एक अक्षर घटले,
आठवले ची आठले होते. एक काना सरकला, की राम ची रमा होते.
थोडीशी शाब्दिक गमंत होते.क्वचित अर्थ बदलला तर रागही येतो. पण मी त्या झंझट मध्ये न पडता प्रयत्न सुरू ठेवले. ध्येय गाठले.आणि सर्वांच्या वाढदिवशी आपलाच वाढदिवस समजून वावरणाऱ्या सायलीचे वाढदिवस अभिष्टचिंतन केले. य मुळे झाले आज...तेच लिहून प्रकट केले.

अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users