केरकरांचा वीणाधारी बाप्पा....

Submitted by ASHOK BHEKE on 16 February, 2024 - 08:46

nk.jpgनितिन केरकर.... मुंबई लालबाग काळाचौकी भागातील दिग्विजय चाळीचं साधी राहाणी, उत्तम विचारसरणी, समाजउन्नतीसाठी झटणारे सामान्य व्यक्तिमत्व. माणसाचे मोठेपण ओळखण्यात बराचसा कालावधी जातो, पण नितिन केरकरांच्या मुखाकडे पाहून लागलीच अंदाज येतो. माझ्या लेखन प्रवासातील एक सापडलेली शिदोरी. त्यांच्या विचारसरणीमुळे त्यांच्या सभोवताली एक वलय निर्माण झाले आहे ते मित्रांचे. त्यापैकी आम्ही एक भाग्यवंत. ज्याला भक्तीचे वर्म सापडले त्या घरी शांतता प्रस्थापित होते. नितिन सारखा भक्तीभाव जतन करणारा मित्र लाभणे म्हणजे एक सुवर्णयोगच. यंदा माघी गणेश जयंतीला खास वेळात वेळ काढून त्यांच्या गणरायाच्या दर्शनाला जाऊन आलो. फुलांच्या सुंदर सजावटीत बाप्पा विराजमान झालेली गोड प्रसन्न मूर्ति. हातात वीणा घेऊन बसलेले ते गोंडस रूप पाहून आमचे डोळे सुखावले. तर पायावर नजर जाता स्थिरावले माझे मन. देहभान हरपुणी साष्टांग नमन माझे गौरीपुत्रा विनायका... मुखात अलगद आले. मात्र समोर ठेवलेल्या मोदकाची थाळी पाहून मात्र तोंडाला पाणी सुटणे स्वाभाविक. सुख आणि समृध्दी साठी प्रार्थना करताना केरीच्या केरकर घराण्याला बाप्पा सदैव आनंदाचे दिवस येवोत असे साकडे घातले. सध्या माघी गणेश जयंती घरोघर साजरी होत आहे. गणपती बाप्पाचा जन्म भाद्रपद महिन्यातील असेल पण गणरायांनी घेतलेल्या अनेक अवतारापैकी एक महोत्कट विनायकी अवतार माघी गणेश चतुर्थीला झाल्याने सर्वत्र गणपतीची मनोभावे पूजा बांधली जाते. रुद्रकेतू पुत्र देवांतक आणि नरांतक या असुरांनी आपल्याच स्वभावाची आणि आसुरी विचाराची मंडळी जमा करून सकल सृष्टीला त्राही त्राही करून सोडले होते. त्यावेळी अवघ्या सोळा वर्षाच्या कश्यपमुनि आणि माता आदिती पुत्र महोत्कट विनायकाने देवांतक आणि नरांतकाशी घनघोर युध्द करून त्यांचा वध केला. देवांतक बरोबर लढाईत बाप्पाच्या सुळ्याला धरून लोंबकळू लागला. तेव्हा देवांतकाच्या वजनाने गणारायचा एक सुळका अर्धा तुटला. त्यावरून बाप्पाला एकदंत म्हणून संबोधू लागले. असा हा माघी गणेशोत्सव आगामी काळात भाद्रपद ऐवजी माघी चतुर्थीला सुरू होणार, म्हणून लोक विचार करू लागले आहेत.
माणसाच्या मनात विशुद्ध पूज्यभाव निर्माण करणारे अनेक गुण या गणेशाच्या ठायी एकवटलेले आहे. गणपती हा विघ्नविनाशक आणि मंगलदायक आहे. तो सर्व तऱ्हेच्या असुरी दोषांपासून सत्प्रवृत्तीचे रक्षण करतो. म्हणून सृष्टीवर जेव्हा जेव्हा असुरांनी देवांना आणि सजीव जीविताना त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा सृष्टीतील मुनिवरांनी याचनेतून मुक्त करण्यासाठी जप तप यज्ञ पुजा करून देवांना प्रसन्न करून घेतले. तेव्हा देवांनी अवतार घेऊन असुरांचा नाश केला. सध्यास्थितीला प्रत्येक क्षेत्रात असुरांनी धुमाकूळ घातला आहे. नागरिक सुरक्षित नाहीत. राजकीय क्षेत्रात सत्तेसाठी माकड उड्या सुरू आहेत. आपल्या वरिष्ठांनी लावलेल्या ज्या झाडावर लटकुन फळे खाल्ली, मजा केली, माया मिळविली... त्याच झाडावर हक्क सांगणारी राजकीय माकडे मोकाट सुटली आहेत. सुरक्षा त्यांच्यासाठी अधिक आणि जनता मात्र संकटात. सर्वत्र भय, दहशतीचे वातावरण आहे. खुलेआम हत्या होत आहेत.महिलावरील बलात्कार वाढीस लागले आहेत. कर्जाचा बोजा सहन होत नाही म्हणून आत्महत्या वाढल्या आहेत.अन्नदात्यावर अग्निवर्षाव होत आहे. त्यांच्या वाटेत खिळे ठोकणारे धरतीवर कर्तुत्ववान निपजले आहेत. वास्तु विकासक देखील गुंडांचा आधार घेत सज्जन, सालस जनतेला धमकावून त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी वखवखले आहेत. रामशास्त्री प्रभूणे देखील बढतीच्या दलदलीत लोकांकडे दुर्लक्ष करीत आहेत. जिकडे तिकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. आरक्षणासाठी जातीपातीच्या लढाया तीव्र होऊ लागल्या आहेत. जीवनगौरवाच्या मोबदल्यात धन दिल्याशिवाय जगाचे पान देखील हलेनासे झाले असताना गणपती बाप्पाची आजच्या घडीला घरोघर पूजापाठ करून देव प्रसन्न कसे होतील, यासाठी सामान्य नागरिक डोळे मिटून सुखशांती साठी धावा करीत आहेत. डोळे उघडून देव प्रसन्न कधी होणार आणि या सृष्टीवर सुरू असलेले अनैतिक उद्योग धंदे बंद केले जाणार, हा प्रश्न समस्त नागरिकांना भेडसावीत आहे. परंतु गणपती बाप्पाचे एकूण अनेक अवतार आहेत. बाप्पाची पूजा घरोघर पाहता नक्कीच अजून एक अवतार गणराज घेईल तेव्हा मात्र या असुरांचा नाश नक्कीच होईल. बाप्पाकडून माणसाला मानसिक आधार हवा असतो. असा आधार पाठीशी असल्यास उध्दाराची वाट सापडेल. नक्कीच.....
अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users