शक्यता

Submitted by संप्रति१ on 11 February, 2024 - 02:46

बुजरेपणाची मूळं बहुतेक लहानपणातच रूजलेली असावीत. चेहरा भरून, ओसंडून हसायला तेव्हाही जमत नव्हतं, आणि आजही नाही..!
ह्या घरकोंबड्या पोराचं काय करावं, ह्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसल्यामुळे हताशपणे माझ्याकडे बघत हळहळणाऱ्या आईचं, आणि त्या प्रश्नाचा नादच सोडून दिलेल्या वडिलांचं सांत्वन, मी तेव्हाही करू शकत नव्हतो, आजही नाही.

आईवडील, घरबार, नातेवाईक, शेजारीपाजारी, शिक्षकलोक, जगदुनिया वगैरेंनी फार आपल्याला घोळात घ्यायचा प्रयत्न करू नये, असं वाटणं तेव्हाही होतं, आजही..!
वाढदिवस, हळदीकुंकू, मुंज, बारसं, महाळ, सवाष्णं, हळद, डोहाळजेवण, सोळा-सोमवार उद्यापन, जागरण गोंधळ, लग्न, महाप्रसाद, भंडारा, गेट टुगेदर, सत्यनारायण, टिळा, सुपारी, मंगल परिणय, साखरपुडा, दिवाळी-फराळ, ॲल्युमिनी मीट, रिसेप्शन, हाऊस वॉर्मिंग, वास्तुशांती, जश्ने शादी, ईफ्तार पार्टी, ख्रिसमस, लंगर, गावजेवण अशा किंवा तत्सम समारंभांत/कार्यक्रमांत जायचं म्हणजे काहीतरी जे भीतीसदृश दडपण तेव्हा वाटायचं नंतर त्याचा हळूहळू वटवृक्ष होत गेला.

"अरेच्चा! हा इथं कसा काय आला?" असं म्हणत अचानक आपल्याला तिथून कुणीतरी हुसकावून लावेल की काय, अशी सूक्ष्म एक दचक .. आणि आपला हा गुप्त कॉंप्लेक्स कुणाच्या तरी लक्षात येईल, या विचारानं कॉन्शस झाल्यामुळे ती बारीक दचक आणखीनच वाढीस लागणं आणि परिणामी आपण अजूनच समजा वियर्ड होत जाणं वगैरे..! अर्थात, ह्या भीतीला तसा काहीही ठोस आधार नाही. पण हे असं होतं खरं..!

आपल्या मानवी संवेदनांच्या बऱ्यापैकी गरजा वाचनातूनच भागतात, असं तेव्हाचं जे वाटणं होतं ते योग्य नव्हतं, हेही समजा वयाच्या एका स्टेजला ॲक्सेप्ट करून झालेलं.‌.!
तरीही, आपण असे असे नाही झालो, याबद्दल फार काही गिलाशिकवा नाही. असायचं कारण नाही.‌ कारण माणसाच्या जीवनाच्या लाखो पॉसिबिलिटीज असतात, त्यापैकी आपण बरेच काहीकाही झालेलो नाही.

आपण अंबानीची पोरगी गटवून जन्माची ददात मिटवू शकलो असतो.‌ किंवा आपण विधवा जया भाद्दुरीवर सुमडीत लाईन मारत पावा वाजवणारा बच्चन होऊ शकलो असतो.
किंवा टायटॅनिकच्या डेकवर हात फैलावलेल्या केट विन्सलेटच्या मागं लिओनार्दोसारखा आश्वासक उभा राहू शकलो असतो आणि त्यामाध्यमातून जगभरातल्या एका आख्ख्या पिढीवर प्रभाव टाकू शकलो असतो.

किंवा "पुलिस ने तुम्हे चारो ओर से घेर लिया है. अपने आपको कानून के हवाले कर दो गुंडाप्पा" अशी वॉर्निंग देणारा इन्स्पेक्टर होऊ शकलो असतो.
किंवा "शासन आदेश अमुकतमुक नुसार यापुढे लोकांच्या प्रायव्हेट पार्टवर निगराणी ठेवण्यात येणार आहे. काही देशविघातक शक्तींनी शरीरावर फ्लेक्झिबल स्वरूपाचे प्रायव्हेट पार्ट बसवून घेतलेले आहेत. गर्दीच्या ठिकाणी ते अचानक मोठे करून त्या माध्यमातून घातपात घडवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तशी खबर गुप्तचर विभागाकडून प्राप्त झालेली आहे. तरी नागरिकांनी गांभीर्यपूर्वक आणि स्वयंस्फूर्तीने निगराणी करून घ्यावी आणि शासनास सहकार्य करावे", असा आदेश काढणारा सचिवही होऊ शकलो असतो.
किंवा आपण डोक्यावरही पडू शकलो असतो. पण नाही पडलो.
आपण हे सगळे सोपे रस्ते नाकारले..!
असंय की आपण १९९० साली एका खास कामगिरीवर या पृथ्वीवर आलेलो आहोत.‌ ती उरकून आपल्याला आपापल्या ग्रहावर निघून जायचं आहे. अर्थात, ही गोष्ट आत्ताच जाहीर करण्यात अर्थ नाही‌. कुणी विश्वास ठेवणार नाही. २०९० सालच्या पिढीला ते आपोआपच कळेल. आत्ता उगाच हळहळून काय उपयोग नाही.

तरीही खंत एका गोष्टीची आहेच.
साला लहानपणीची डोळ्यांतली ती कोवळी चमक तेवढी जपायला हवी होती. जपता यायला हवी होती. ते आपल्या हातात होतं..! पण नाय जमलं. आणि आता काय ती प्रोसेस रिव्हर्स करता यायची नाही..! एनीवे. असो.

हे मी एकाला व्हॉट्सअप करतो. तिकडून एका सेकंदात, न वाचताच रिप्लाय येतो.
'हे काय लिहिलंय बेंचो? तुला तुझ्या आजूबाजूला काय चाललंय दिसतं का नाय? कसला झाट्याचा कंटेट रायटर हैस तू?'
यावर मी कला, फॅंटसी वगैरे कायतरी पुटपुटतो.
'कसली घंट्याची कला?'-- रिप्लाय.
यावर मी गप्प बसतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
लहानपणीची डोळ्यांतली ती कोवळी चमक तेवढी जपायला हवी होती. जपता यायला हवी होती. ते आपल्या हातात होतं..>> ते तरी कुठे आपल्या हातात असतं. आजूबाजूचे लोकं छिनी हातोडा घेऊन आपल्यातून काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतच असतात नं...

ते तरी कुठे आपल्या हातात असतं. आजूबाजूचे लोकं छिनी हातोडा घेऊन आपल्यातून काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतच असतात नं...+१११ खरंय
परिस्थिती निगर गट्ट बनवते इच्छा आणि स्वभाव असो वा नसो.
चांगलं लिहिलंय

लहानपणीची डोळ्यांतली ती कोवळी चमक तेवढी जपायला हवी होती. जपता यायला हवी होती. ते आपल्या हातात होतं..>>>>> अगदी खरयं.

खुप छान लिहिलय.. आवडलं.

>>>>>लहानपणीची डोळ्यांतली ती कोवळी चमक तेवढी जपायला हवी होती. जपता यायला हवी होती. ते आपल्या हातात होतं
होय आपल्या हातातच असतं ते. माझ्या मते मी जपलेली आहे. हां चेहरा निबर असेल पण ती कोवळीक मनात १००% आहे.
-------------
>>>>>>.शासन आदेश अमुकतमुक नुसार यापुढे लोकांच्या प्रायव्हेट पार्टवर निगराणी ठेवण्यात येणार आहे.
या परिच्छेदाला फुटले Happy

मस्त लिहिलं आहे.
तुम्ही पाचपाटील का? की ते वेगळे?

कोरा वर असेच काहीसे वाचलेले , मग तिथे ह्याला पुस्तकं आवडतात वाचून ते तुम्हीच इतपत कळालं
डोळातल्या चमक साठी प्रोफाइल फोटो बघा जनहो
चांगलं लिहिता.