शरद पवार यांचा नवा डाव

Submitted by ASHOK BHEKE on 10 February, 2024 - 02:48

ज्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची स्थापना केली त्या आदरणीय शरदचंद्र पवार यांचा त्यांच्या उतारवयात पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांचे पूतणे श्री अजितदादा पवार यांना देऊ केले. दुसर्‍याच्या मालावर मिटक्या मारणार्‍या अजितदादा समर्थकांनी यावर जल्लोष केला. फुगड्या खेळल्या गेल्या. फटाके फोडले. गुलाल उधळून आनंद साजरा केला. त्यांना सोशलमीडियावर ट्रोल करण्यात आले. विविध विपरीत शब्दाने त्यांची अवहेलना करण्यात आली. या निर्णयामुळे शरद पवार डगमगतील, रडतील, माझा पक्ष चोरला म्हणून बोंब ठोकतील, असे वाटले होते. पण डगमगेल ते शरद पवार कसले.... कुणाच्याही हाताला न लागणारा तेल लावलेला पहेलवान उगाच राजकीय विरोधक म्हणत नाहीत. पक्ष गेला म्हणून डोक्याला हात लावून न बसता शरद पवार पून्हा कामाला लागले. माध्यमांना काहीही टीकाटिप्पणी न करता त्यांच्यावर कुरघोडी करणार्‍यावर मात करण्यासाठी कामाला लागलेले दिसत आहेत. आजही ते चाणक्य आहेत. हे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी निवडणुकीत दिसणार आहे. हे सारे आतल्या आत घडत आहे. त्यांनी कुणाला सांगितलेले नाही परंतु त्यांच्या मागावर असलेल्या पत्रकारांनी त्यांना पूरते ओळखले आहे.
शिवसेना अपात्र प्रकरणी आलेला विधानसभाध्यक्ष यांच्या निर्णयामुळे पक्ष आणि चिन्ह जाणार ही पूसटशी कल्पना अगोदर आली होती. त्यामुळे ते आज 83 वर्षाचे झाले असले तरी त्यांची चिकाटी पाहता त्यांच्या वाटेवर किती काटे पेरले तरी ते फुलांच्या आच्छादनावरुण चाललो आहोत, असेच दिसेल. पक्ष गेला, चिन्ह गेले आता काय करायचे.... दूसर्‍याच दिवशी शरद पवार यांनी महाराष्ट्रातील एकूण 250 जणांची यादी बनविली. यादीत जुनी खोडं आहेत आणि नवतरुण देखील आहेत. राजकारणाच्या पटावरची अनुभवी मंडळी आहेत. गावागावात, तालुका, जिल्हा पातळीवर दबदबा असणारी मंडळी आहेत. त्यांना दिवसभर थेट संवाद साधत फोन करून प्रत्येकाला केवळ दोनच प्रश्न विचारले.... पक्ष चिन्ह गेल्याविषयी आपणास काय वाटते? आता आपण काय करावे असे वाटते? यावर दिलखुलास चर्चा केली. शरद पवार साधे व्यक्तिमत्व नाही. असामान्य व्यक्तिमत्व असल्याचे सातारा जिल्ह्यात पावसात भिजून सांगून दिले आहे. आजपर्यंत अनेक मातब्बर आसामीना धोबीपछाड केले आहे. कधी कुणाची खाट टाकतील हे सांगता येत नाही. कालच एका वर्तमानपत्राचा जानेवारी 24 महिन्याचे अनुषंगाने सर्व्हे आला. महाविकास आघाडीला 44% तर महायुतीला 40% टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात वंचित आघाडीची 4% मते महाविकास आघाडी मध्ये टक्केवारी सामील नाही. 48% मते म्हणजे महाराष्ट्र विधानसभेत अंदाजे 160 आमदार नक्कीच निवडून येतील, असा राजकीय व्होरा आहे. फेब्रुवारी महिन्याचा अंदाज जेव्हा बाहेर येईल तेव्हा आज शरद पवार यांना मिळालेली सहानुभूती किती टक्क्याने वाढेल, याविषयी राजकीय अभ्यासक आपला गळ मानवसागरात सोडून बसले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदार पसंती दर्शवीतील, त्याचा आज विचार करणे नाही. आज 250 लोक गोपनीयतेने शरद पवार यांच्या नव्या पक्षासाठी कामाला लागले आहेत. नवा डांव खेळण्याच्या तयारीत ते कुणाकुणाला गार करणार आहेत. हे लवकरच पाहायला मिळणार आहे. वय झाले असताना पायाला भिंगरी लावल्यागत ते फिरत आहेत. त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत त्यांना आडवे करू पाहणारे स्वत:च आडवे होऊन कुठल्या कुठे गायब झाले आहेत. विरोधकांनी त्यांच्याविरोधात कितीही मोर्चेबांधणी केली असली तरी त्यांचा नवा डाव घेऊन उध्दव ठाकरे शिवसेना आणि कॉग्रेस, वंचित यांना सोबत घेऊन मैदानात उतरणार आहेत.
अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभेच्छा.

या निवडणुकीत नेत्यांची परीक्षा नसून मतदारांची आहे.

भावनिक लेख आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अजित पवार यांच्यासोबत कधीपासूनच आहे.
या पक्षाला मुळात कसलीही विचारधारा नाही. शरद पवार साहेब हे सूर्य आणि त्यांच्या भोवती फिरणारे संस्थानिक नवग्रह असे पक्षाचे स्वरूप. प्रत्येक संस्थानिक आपापले मतदारसंघ घट्ट धरून असतो. तो ज्या पक्षात जाईल त्या पक्षाकडे मतदान जाते.

माढ्यात विजयसिंह मोहितेपाटील भाजपात गेले कि तिथून भाजपचा उमेदवार निवडून येतो. प्रवरानगर - अहमदनगर या संपूर्ण भागात विखे पाटलांची सत्ता आहे. अधून मधून गडाख थोरात यांचा गट प्रबळ होतो. विखे पाटील भाजपत गेले कि तिथे भाजपचा उमेदवार येतो. ते जरी काँग्रेसचे असले तरी राष्ट्रवादीचे सुद्धा असेच आहे.

कोल्हापूर राष्ट्रवादीकडे होता. पण एका संस्थानात दोन संस्थानिक झाले कि त्यांच्या सुंदोपसुंदी मुळे ज्याला तिकीट मिळत नाही तो दुसर्‍या प्रबळ पक्षात जातो. महाडीक विरूद्ध मंडलिक विरूद्ध सतेज पाटील, सतेज पाटील विरूद्ध आर आर पाटील,जयंत पाटील विरूद्ध आर आर, विशाल पाटील (वसंतदादा पाटील यांचे सुपुत्र) अशा कुरबुरींमुळे इथे शिवसेना - भाजपचा फायदा होत असे. निवेदिता माने या राष्ट्रवादीच्या. तिकीट कापणार अशी कुणकुण लागली कि त्या सेना किंवा भाजपचे तिकीट घेतात.

आता शरद पवारांचे वय ८४ आहे. ही सर्व मंडळी विचारधारेशी नाही तर व्यवहाराशी जोडलेली आहेत. शरद पवारांचा शद्ब मोडण्याची कुणातही हिंमत नव्हती. पण अजित पवार हे आपल्या ऐकण्यात राहतील हा यांचा होरा आहे. फक्त बारामती लोकसभेला भावनिक मतदान होईल. पण बारामती विधानसभा क्षेत्राच्या बाहेर अजितदादा म्हणतील तिकडेच मतदान होणार. अजितदादा हे आतून भलत्यालाच मतदान करायला सांंगतात हा गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे.

राष्ट्रवादीचे राजकारण हा सर्वसामान्य माणसाच्या डोक्याबाहेरचा प्रश्न आहे असे राज ठाकरे म्हणाले होते. जेव्हां काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढले तेव्हां राज ठाकरे म्हणाले होते कि नाहीतरी बंडखोर या पक्षांचेच पुरस्कृत असायचे. आता ते अधिकृतपणे स्वतंत्र लढत आहेत.

इतक्या "प्रॅक्टिकल" लोकांनी भरलेला हा पक्ष आहे. त्याचा अंदाज मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत भल्या भल्यांना येत नाही. बूथ लेव्हलला मेसेज येतो.मग बूथ लेव्हलचे कार्यकर्ते कुणाला मतदान करायचे हे हार्डकोअर मतदाराला सांगतात. अनेकदा घड्याळ या चिन्हाऐवजी अपक्षाला मतदान करायचा मेसेज येतो. लोकसभेला तर कुणालाही निवडून आणण्यात रस नसतो. महाराष्ट्र काँग्रेसचे पण हेच आहे.

विधानसभा लागू द्या. सगळे जोमाने कामाला लागतील.

साहेब तुमच्या शी मी शंभर टक्के सहमत .
प्रश्न एकच आहे की वय त्यांच्यासोबत नाही.
कॅन्सर सारख्या असाध्य रोगाशी टक्कर देणारा हा योद्धा आहे परंतु
निसर्ग देवाच्या पुढे कोणाला जाता येत नाही.
साहेब शेवट पर्यंत लढत राहणार हे नक्की.

तरुण नेते अजूनही एकाच्या आधारानेच उभे असतात ही पक्षाची शोकांतिका. ( राजीनामा नाट्य आठवा.) इतर पक्षांतील चित्र वेगळे नाही.)

शरद पवार एका वटवृक्षाप्रमाणे उभे आहेत. त्यांच्या छायेत आज तरुणांनी एकत्र यायला हवे. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद

शरद पवार यांची चाणक्यगिरी व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, पक्षश्रेष्ठी या नात्याने केलेली विधायक कार्ये कोणती?
असा एखादा धागा आहे का ऑलरेडी?

या निवडणुकीत नेत्यांची परीक्षा नसून मतदारांची आहे.
>>>>
महाराष्ट्रात कोणाला मत द्यायची ईच्छाच मेली आहे.

खरं तर आज महाराष्ट्रातील मतदारांनी एकाही प्रस्थापिताला मत न देता पूर्णपणे नवीन उमेदवाराला मत देऊन निवडून आणणे गरजेचे आहे.
तरच या सर्व विष्टेतील किड्याना (एकही पक्ष अपवाद नाही) त्यांची लायकी कळेल.

महाराष्ट्र आता सुज्ञ मतदाराच्या शोधात आहे. लाचार आणि लोभी मतदार यांनी विचार केला तर...