छुपके छुपके...

Submitted by ASHOK BHEKE on 7 February, 2024 - 11:02

छुपके छुपके...
संपूर्ण राज्यात एका विशिष्ट रोगाची साथ आली असताना राज्याचा कारभार बादशाह घरातून बघत होता. त्यात तो देखील आपल्या शारीरिक व्याधीमुळे अधून मधून आजारी पडत होता.सेवकांना देखील भेटेत नव्हता. आपसूकच राज्याची सूत्रे प्रधानाच्या हाती आली. प्रधान खूप हुशार होता. काम करण्यात पटाईत होता. येणार्‍या आपल्या दरबारी मंडळींना वेगवेगळे उपहार देऊन खुश ठेवीत होता. काळाचे घड्याळ टिक टिक त्याच्या गतीने वाटचाल करीत असताना त्याचे काटे उलट्या दिशेने फिरले. सुभेदाराच्या नेमणुकीत घात झाला.सर्व नियुक्त सुभेदाराना एकत्रित ठेवताना बादशाहला उद्या होणार्‍या घातपाताची कल्पना नव्हती. बादशाह समंतीचा सुभेदार निवडणुकीत पडला. तेव्हा बादशाहला कळले. प्रधानजी कडून कृत्रिमरित्या महापूर आणला गेला अर्थात बंड केले होते. मोठी मोठी झाडे परराज्यात वाहून गेली होती. पुंजक्यापुंजक्याने त्यात पृथ्वीतलावरून गायब झाल्यासारखेच परागंदा सुभेदार परराज्यात पळाले होते. बादशाह त्या पावसात भिजला होता. डोळ्यात अश्रु होते, हुंदके आतल्या आत येत होते. पण पावसामुळे भिजलेल्यांचे अश्रु दिसत नव्हते. बादशाह केवळ त्या तुफानात गवताप्रमाणे राहिला होता. अंगाला चिखलाने बरबटलेले असताना साहजिकच चिड निर्माण झाली होती. युवराजांची काहिली काहिली झाली होती.रागाने लालबुंद झाले होते. चिडलेल्या युवराजाने परराज्यात दबा धरून बसलेल्या प्रधानजी आणि सहकार्‍यांचे वाभाडे काढले.आज टीका करणारे उद्या प्रधानजीच्या आश्रयाला जात होते. बादशाहला कळत नव्हते.आज येथे तर उद्या तेथे... कोण आपला आणि कोण परका... उडून गेले ते कावळे, राहिले ते मावळे अशी नेहमीच्या भाषेचा उपयोग करीत राहिलेल्यांना आपलेसे करण्यात बादशाह यशस्वी होत होता. लोक माझे सांगाती, भले कितीही म्हटले तरी प्रधानाने महाशक्तीच्या जोरावर बादशहला पूर्णत: खुमासदार व तिरकस शैलीत सांगून टपली मारली होती. सत्ता काबिज केली गेली. बादशाहच्या जहागिरीवर, हिरेजडित धनुष्यबाणावर दावा ठोकला होता. महाशक्तीने तो दावा यशस्वी करण्यात मदत केली.
राज्यात राजकीय स्थितीचे अवडंबर माजलेले असताना सैनिकाने कोठे जावे, कोठे राहावे या संभ्रमात असताना कोठे चांगले मिळेल त्याकडे ओढा असल्याचे प्राथमिक चित्र दिसून आले आहे. सुभेदार काहीही करो, फक्त आमच्या चरितार्थ चालवण्याइतपत कमाई ओंजळीत मिळेल या आशेने सैनिकांचे प्रस्थान दिसून येत होते. कोणी म्हणत असतील निष्ठा, पण निष्ठेने सुभेदार राहत नाही.वजीर देखील परागंदा झाले होते. सैनिकांचे काही विचारूच नका. दरबारी वजिरांच्या,सुभेदारांच्या ओठात एक आणि पोटात एक हे अवघडलेले गणित पाहत सैनिकांनी निष्ठा वेशीवर टाकून गमज्या मारायला सुरू केल्या. प्रत्येकाला सुखाची ओढ असते. सुख ही तृप्तीची भावना. ती जेवढे पवित्र तेवढे त्याचे ऐश्वर्य मोठे. सुखाच्या मागे लागून सुख मिळत नाही. परंतु अशाच एका सैनिकाच्या वाट्याला सुख धावून आले.
दक्षिण प्रांतातील सुभेदार म्हणजे देवमाणूस.. फणसासारखा आतून गोड . भक्त देवळात त्या दगडी मूर्तीसमोर उभा राहतो त्याप्रमाणे निरागसतेने उभे राहून मनातल्या मनात देवा धाव रे... प्रार्थना करतात.मनकवड्या सुभेदाराला देखील सैनिकांच्या डोळ्यांची भाषा कळते. एका सैनिकाच्या डोळ्यातले भाव जाणून सुभेदार छुपके छुपके खाजगी रथाने वेश बदलून बरोबर कोणताही गोतावळा न घेता एकटाच त्या सैनिकाच्या घरी आला.पण शेजारीपाजारी राहणारानी सुभेदारास ओळखले आणि मनात पाल चुकचुकली होती. सुभेदारांची भेट गोपनीय होती. एका सैनिकाच्या निष्ठेला शाबसकी म्हणून खाजगी दौरा आखला गेला होता. सुभेदारास देखील वाटले, दिवसभर विभागाविभागात, गांव पातळीवर राब राब राबणार्‍या सैनिक हा जनतेच्या पसंतीतून आपल्याला तारू शकतो. त्यामुळे सध्या सैनिकाना चांगले दिवस आले आहेत. ज्याच्या घरी सुभेदार आले त्या ठिकाणी सैनिक पिंपात पाइप धरून पानी भरीत होता. सैनिकाने सुभेदारासाठी खास पुणेरी प्रांतातील मासवडी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत आखला होता. सोबतीला गावरान मिरचीचा ठेचा. सुभेदाराने पंक्तीत बसून आस्वाद घेतला. ठेच्याने घाम काढला होता. नागपूरी तिखटपेक्षा गमत्या स्वभावाच्या सैनिकाच्या घरचे तिखट खाल्ले होते. घोटलेल्या दुधाचा खवा करून त्यात पिठीसाखर टाकून बनविलेले घरगुती पेढे सुभेदाराच्या रसवंतीला सुख देऊन गेले. खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे या हेतूने सैनिकाचे ते जिने पाहून सुभेदार माझा सैनिक असे जिने जगत असेल तर त्याच्यासाठी मला काहीतरी करावेच लागेल. त्यावेळी सुभेदार सैनिकाला काही बोलला नाही. परंतु मनातल्या मनात जबरदस्त आखणी करून ठेवली.सुभेदार हा वेदनांशी, समस्यांशी जवळीक साधून मानवतेशी मैत्री करणारा खरा समाजसेवक होता. समाजसेवा ही एक आंतरिक तळमळ. दुसर्‍या दिवशी दक्षिण प्रांतातील कंत्राटदाराला बोलावून खास सूचना करून सदर सैनिकास दरबारी फंडातून सर्व सोयीयुक्त माडीवजा घर बांधून द्यावे, असा हुकूम सोडला. कंत्राटदार सुभेदाराचा हुकूम मानून कामाला लागले आणि थोड्याच अवधीत त्या सैनिकाला चांगलेसे घर बांधून मिळाले. तो सैनिक सुखावला. अन्य सैनिकांच्या मनात साशंकता उभी राहिली. आमच्या डोळ्यातले भाव सुभेदाराला कसे कळत नाहीत....! सर्वप्रति समभाव हा केवळ सुभेदाराचा वाकचातुर्याचा भाग हा सैनिकाच्या मनामनात तळ ढवळून टाकत आहे. झिजलेले खांदे बोलनारांच्या ओठापेक्षा श्रेष्ठ असतात. हे कळायला हवेच.
अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users