इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास

Submitted by पराग१२२६३ on 13 January, 2024 - 10:57

IMG20240109221028_01_edited.jpg

पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं. राखाडी-आकाशी रंगसंगती आणि त्यावर बसवलेल्या खिडक्यांच्या काळ्या फ्रेम्समुळं आमचा डबाही आकर्षक दिसत होता.

ठीक 18.35 ला इंद्रायणी पुण्याहून निघाली. त्याचवेळी शेजारच्या 3 नंबरवरून आझाद हिंदही हावड्याकडे निघाली आणि एकाचवेळी इंद्रायणी आणि ती विरुद्ध दिशेने जाऊ लागल्या. पहिल्यांदाच संध्याकाळी पुण्याहून मुंबईला जात असल्यामुळं बाहेरचं वातावरण वेगळंच वाटत होतं. संगम पुल ओलांडून शिवाजीनगर आल्यावर इंद्रायणी हळुहळू पुढं जात होती. शिवाजीनगरला लावलेला वेगमर्यादा समाप्तीचा फलक आल्यावर मग तिनं एकदम वेग घेतला. तोपर्यंत रेल्वेचा नाश्तावाला फेऱ्या मारायला लागला – साबुदाणा वडा, कटलेट, ऑमलेट हे नाश्त्यात पर्याय उपलब्ध होते.

खडकीच्या आधी इंद्रायणीचा वेग पुन्हा कमी झाला, म्हटलं खडकीत मालगाडी मेन लाईनवर असणार. ते खरंच झालं. खडकीत कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या BCN वाघिण्यांच्या मालगाडीला इंद्रायणीसाठी थांबवून ठेवलेलं होतं. दरम्यानच्या काळात लोणावळा चिक्की, कानातलं-गळ्यातलं वगैरेवगैरे विकणाऱ्या फेरीवाल्यांचाही कलकलाट सुरू झाला होता. खडकीनंतर मात्र इंद्रायणीनं चांगलाच वेग घेतला आणि ती मालगाड्यांना ओलांडत पुढंपुढं निघाली. त्याचवेळी पुण्याकडे जाणाऱ्या मालगाड्या, एक्सप्रेस, लोकल्सना इंद्रायणीला क्रॉस होत होत्या.

पुढच्या 6 मिनिटांतच शेजारच्या डाऊन लाईनवरून प्रगती धडाधडत पुण्याकडे निघून गेली. लोणावळ्याच्या TXR यार्डात तीन मालगाड्या कर्जतच्या दिशेनं जाण्यासाठी परवानगी मिळण्याची वाट पाहत उभ्या होत्या, तर दोन डिझेल आणि तीन इलेक्ट्रिक इंजिनं लावलेली एक मालगाडी कर्जतकडे जाण्यासाठी पुढं-पुढं सरकत होती. 19.31 ला लोणावळ्यात इंद्रायणी येत असताना शेजारून दख्खनची राणी बाहेर पडत होती. तिनं अगदी पटकन घेतलेल्या वेगाचा क्षण अनुभवण्यासारखाच होता.

लोणावळ्यातला थांबा आटोपून इंद्रायणी घाट उतरू लागली. राष्ट्रीय महामार्गाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या माझ्या खिडकीतून बाहेर आता काळोखच दिसत होता. अधूनमधून लोणावळा-खंडाळ्यामधल्या डोंगरांवर असलेल्या बंगल्यांमधले दिवे त्यात उठून दिसत होते. खंडाळ्यात मिनिटभराचा तांत्रिक थांबा आटोपून इंद्रायणी पुढच्या प्रवासाला निघाली. बोगद्यातून बाहेर येताच लांब खोपोलीमधल्या झगमगाटानं लक्ष वेधलं. नेहमी संध्याकाळी पुण्यात परत येताना डाऊन लाईनवरून फारसा खोपोलीमधला हा लखलखाट दिसू शकत नव्हता, तो आज दिसला. अमृतांजनच्या परिसरात एक्सप्रेसवे आणि जुन्या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या दिव्यांच्या माळाही मस्त दिसत होत्या. काही मिनिटांतच या दोन्ही महामार्गांच्या खालच्या बोगद्यातून इंद्रायणी मंकी हिलजवळ गेल्यावर तर खोपोलीमधले झगझगीत दिवे आणखी स्पष्ट दिसू लागले. खोपोली आणि त्याच्या आसपासच्या गावांमधला झगमगाट आणि महामार्गांवरची वाहतूक जांभरुंगपर्यंत दिसत राहिली.

दिवसा नागनाथला गाडी थांबते, तेव्हा फक्त केबीनच्या मागच्या बाजूला असलेली काहीच घरं दिसतात, पण आज रात्रीच्या काळोखात त्या घरांबरोबरच आणखी काही वस्ती त्याच्या आसपास असल्याचं लक्षात आलं. त्यातच आता मुंबईतून उड्डाण करणारी, उतरणारी प्रवासी विमानंही आकाशात घिरट्या घालत असलेली दिसू लागली होती. नागनाथनंतर शेजारच्या डाऊन लाईनवरून एक मालगाडी 5 इंजिनांच्या मदतीनं सरसर घाट चढत वर गेली.

घाट उतरत असताना जांभरुंगच्या जवळ रेल्वेचा सामोसावाला आला, पण माझ्याबरोबरच्यांनी कर्जतमध्ये वडापाव खायचं ठरवलं असल्यामुळं गाडीत आम्ही काही घेतलं नव्हतं. लोणावळ्यातच एक संत्रेवाली इंद्रायणीत चढली होती, अगदी नवीकोरी जरीची साडी नेसलेली, गळ्यात-कानात सोन्याचे दागिने आणि अगदी टापटीप. “आरेंज घ्या आरेंज”, असा आवाज देत ती गाडीतून फिरू लागली होती.

आता घाट संपला होता आणि कर्जत आलं होतं. लोखंडाची भलीमोठी रिळं घेऊन जाणारी WDG-4 इंजिनं असलेली एक मालगाडी पुढच्या प्रवासासाठी परवानगी मिळण्याची वाट पाहत कर्जतच्या अप यार्डामध्ये उभी होती. त्याचवेळी डाऊन यार्डात एक मालगाडी घाट चढण्यासाठीची पूर्वतयारी करत होती. ठीक 20.22 ला इंद्रायणी कर्जतमध्ये पोहचली आणि आमची वडापावची प्रतीक्षाही संपली. बराच वेळ वाट पाहून मिळालेला गरमागरम वडापाव खूपच भन्नाट लागत होता. कर्जतला गाडीमधले बरेच प्रवासी उतरल्यावर शेजारी उभ्या असलेल्या सीएसएमटी लोकलमधली गर्दी वाढलेली दिसली. आमच्या समोरची आसनं तर पूर्ण मोकळी झाली. त्यामुळं इतका वेळ आमच्या मागच्या बाजूला कुठं तरी बसलेल्या एका काकूंनी कल्याणपर्यंतचा प्रवास त्या मोकळ्या सीट्सवर आरामात झोपून केला.

कर्जतमधून बाहेर पडत असताना 12163 लोकमान्य टिळक टर्मिनस-एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस कर्जतमध्ये शिरत होती. तिचे बँकर्सही तयारीत होतेच. कर्जतपासून इंद्रायणीचा वेग चांगलाच वाढला होता. या वेगाचा, डाऊन लाईनवरून क्रॉस होत असलेल्या गाड्यांचा अनुभव घेत वडापावनंतरचा आमचा चहाही झाला होता. त्यानंतर भिवपुरी रोड थोडं हळुहळूच ओलांडलं. नेरळ जंक्शन आणि वांगणीला दोन मालगाड्यांना बाजूला ठेवून इंद्रायणीला पुढं सोडण्यात आलं. नेरळनंतर इंद्रायणीचा वेग चांगलाच वाढला होता. त्याचवेळी दीड-दोन मिनिटांच्या अंतरानं शेजारच्या डाऊन लाईनवरून लोकल्स, मेल/एक्स्प्रेस, मालगाड्या अगदी वेगानं क्रॉस होत होत्या. पुढं बदलापूरला फलाटाच्या अलीकडच्या लूप लाईनवर वेगवेगळ्या प्रकारचे मोकळे प्रवासी डबे एकत्र उभे होते.

आता गाडीमधली हालचाल जरा वाढली होती. कल्याणजवळ येत असल्यामुळं तिथं उतरणारे दरवाज्याजवळ जाऊन उभे राहू लागले होते. हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे, स्टेशन यायच्या बराच वेळ आधीपासूनच प्रवासी दरवाज्याजवळ नंबर लावल्यासारखे उभे राहतात. रात्री 9.02 ला कल्याणमध्ये इंद्रायणी उभी राहिली. तिथं आणखी गर्दी कमी झाली. कल्याणपासून आता आजपर्यंत पुणे-मुंबई-पुणे प्रवासाच्यावेळी कधीही न दिसलेल्या गाड्या – जशा की विदर्भ, ऐतिहासिक पंजाब मेल आणि हावडा मेल (व्हाया नागपूर), पुष्पक, अमरावती – मला दिसू लागल्या होत्या. कल्याणमध्ये पुष्पक इंद्रायणीच्या आधी आली होती, पण तिच्या आधी इंद्रायणीला पुढं सोडण्यात आलं होतं. कल्याणनंतर तिकडून विदर्भ कल्याणकडे जात होती, तर इकडून अत्याधुनिक WAG-12B हा कार्यअश्व जिंदाल स्टीलची गाडी घेऊन कल्याणकडे निघाला होता. ठाण्याचा थांबा आटोपून इंद्रायणी दादरला आली आणि अगदीच मोकळी झाली. आमच्या डब्यात आम्ही चार जणच राहिलो होतो, तर पुढचा डबा तर पूर्ण मोकळा झाला होता. आता आमचा प्रवास शेवटच्या टप्पात आला होता. इंद्रायणी रात्री 10.12 ला 12 मिनिटं उशिरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 12 नंबरच्या फलाटावर जाऊन विसावली, तेव्हा 14 नंबरवर आणखी एक ऐतिहासिक हावडा मेल निघायची तयारी करत होती.

link
https://avateebhavatee.blogspot.com/2024/01/blog-post_13.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. आम्हांला नेहमी कल्याणला उतरायचे असल्याने डेक्कन क्वीन, प्रगती कधी चालायच्या नाहीत. त्यामुळे मुंबई पुणे आणि परत हा प्रवास नेहमी इंद्रायणीनेच! पुण्याला जाताना सकाळी सकाळी इंद्रायणीत फार मस्त वाटायचं. कल्याणहून निघाल्यावर तासाभरात घाट यायचा आणि हवेत सुखद गारवा यायचा आणि खिडकीतून घाटातली हिरवीगार दुष्य यायची. तेव्हा गाडीत ब्रेकफास्टला चीजटोस्ट मिळायचा. आता मात्र इंद्रायणी सोलापूरपर्यंत वाढवून तिची शान घालवली आहे असं मला वाटतं. Proud

छान.
काही वर्षे इंद्रायणीने दर शुक्रवार - सोमवारी प्रवास केला आहे. शुक्रवारी अप आणि सोमवारी डाउन. शिवाजीनगरला सकाळी बरोब्बर ९ ला यायची. उतरुन लगेच कामावर. बहुतेक हा प्रवास झोपेतच केलेला आहे. अगदी कर्जतला वडे घ्यायची ही शुद्ध नसणार्‍या झोपेत. Happy
अप जाताना तेव्हा कर्जतला थांबा न्हवता आठवतं.

छान वर्णन
हो सुरवातिला अप जाताना कर्जत आणि कल्याणला पण थांबा न्हवता. सकाळी दादर नंतर सरळ कर्जत आणि येताना लोणावळा वरुन दादर.

कल्याण फार पूर्वी न्हवता ना... इंद्रायणीच्या पुढे कर्जत असते. आता तुम्ही म्हटल्यावर त्या कर्जतने जाऊन तिकडे इंद्रायणी पकडलेली पुसट आठवते. ठाणे बराच उशिरा वाढवला.
कल्याण थांबा नसलेली एक डेक्कन क्वीन आठवते. प्रगती पण थांबायची मला वाटतं. डेक्कन क्वीनच्या पुढे एक सेमी फास्ट अंबरनाथ असायची. ती दादर नंतर एकदम ठाणे होती. ठाण्याला दोन नंबरला काढायचे. आणि मागून पाच नंबर वरून डे. क्वी. धडधडत जायची लगेच.

हो पुण्याला जाताना दादरचा थांबा वगळला (जो डेक्कनला नसतो) तर सुरूवातीला डेक्कन क्वीन सारखेच स्टॉप्स होते इंद्रायणीचे. पण कल्याणला थांबू लागल्यावर एकदम माणसांत आली गाडी Happy

मस्त लिहीले आहे. मी पण एकेकाळी खूप प्रवास केला आहे. अगदी आवडती गाडी होती. तेव्हा रिझर्व्ड सेकण्ड क्लास मधूनही प्रवास आरामाचा असे. डब्याच्या दारात थांबलेले काही सोडले तर आरक्षित डब्यांत इतरांना येउ देत नसत. तेव्हा निळी-पांढरी लिव्हरीही असे बहुधा. किंवा निळी-पिवळी.

सकाळी कल्याणला उत्तरेकडे जाणार्‍या गाड्या व त्यांची वाट पाहात असलेले मोठमोठ्या बॅगा वगैरे घेतलेले लोक व त्यांच्या तुलनेत ही वेगळ्या रंगातील गाडी आणि त्यातले "ममव" प्रवासीही उठून दिसत.

मीही कधीकधी वीकेण्डला पुण्यात यायचे असेल तर शनिवारी सकाळी या गाडीने येऊन रविवारी संध्याकाळी परत जायचो. बराच वीकेण्ड मिळत असे.

फारच रोचक लेख.

या गाडीनं प्रवास केलाय - अप, डाऊन दोन्हीही.

छान लेख.
मला रेल्वेने प्रवास करताना वाटेतल्या स्थिर स्टेशनचं नाव वाचायची मारामार, तिथे तुम्ही विरुद्ध दिशेने जाणार्‍या गाड्यांची नावं, इंजिनांचा प्रकार, संख्या एवढं सगळं बघू शकता याचा अचंबा वाटला. अर्थात यात तुमचा अभ्यास आणि रेल्वेप्रेम दिसतात.

डेक्कन क्वीनच्या पुढे एक सेमी फास्ट अंबरनाथ असायची. ती दादर नंतर एकदम ठाणे होती. ठाण्याला दोन नंबरला काढायचे. आणि मागून पाच नंबर वरून डे. क्वी. धडधडत जायची लगेच. >> बरोबर, ती लोकल व्हीटी ला कायम सात नंबर ला लागत असे. आणि मागे डेक्कन असल्याने अगदी वेळेवर सुटायची. पाच सदतीस ला ठाण्याला टच व्हायची दोन नंबर ला त्यामुळे पूल चढावा लागायचा नाही.
घाटकोपर स्टॉप नसल्याने फर्स्ट मध्ये बऱ्याच जणी त्या बाजूला खाली बसत असत

सेमी फास्ट अंबरनाथ या गाडीचं १९६५ अगोदरचं नाव एंजिन लोकल होतं. कारण त्याला एक एंजिन जोडलेलं असे ते कल्याणला काढत. मागे डेक्कन क्वीन लागल्याने ती म्हणे जोरात पळायची. कुणाला नाही आवडत क्वीन ते पळतात. ते दिवस गेले आणि एंजिनही गेले.

लेख झकास.

डेक्कन क्वीनच्या पुढे एक सेमी फास्ट अंबरनाथ असायची. >> आजुनही आहे आणि त्याच प्लॅटफॉम वरुन सुटते/येते. मागच्या वर्षी घरच्याना डेक्कन क्वीन मध्ये बसवुन दिल्यावर ह्या गाडीने प्रवास केला आहे. बाकीच्या गाड्या लेट होतिल पण ही गाडी वेळेवर जाते
डब्याच्या दारात थांबलेले काही सोडले तर आरक्षित डब्यांत इतरांना येउ देत नसत. >> ह्या गाडीत अनाआरक्षित प्रवास्याना बंदी होती. फक्त आरक्षित आणि पास वाले हेच गाडीत चढु शकत होते.
प्रगती आधी कल्याण ला थांबत न्हवती मग थांबा केला. हल्ली प्रगती दिवा - पनवेल - कर्जत मार्गाने जात त्यामुळे कल्याण लागत नाही.

इंद्रायणी सुरू झाल्यावर ७-८ वर्षांनी तिला कर्जत आणि कल्याणचे थांबे दिले गेले. ठाण्याचा साधारण २००० नंतर दिला गेला.

मस्त लिहीलेय. ट्रेन खूप वीक पॉइण्ट आहे तुमचा.

इंद्रायणीच्या उलट्या टायमिंगमुळे या गाडीतून प्रवास करायचा कधी योग आला नाही. सहारवरून रात्रीची फ्लाईट पकडायची तरी खूप लवकर जाऊन करायचं काय शिवाय दादर वरून सांताक्रूज टॅक्सीने जायचं तर तेव्हढ्या पैशात रात्रीचे जेवण करून प्रायव्हेट कॅबने थेट पुणे ते सहार जाता येतं. तरी पण लेख वाचून मुद्दामून या गाडीतून एकदा जाऊन यायची तीव्र इच्छा होतेय.