शुभं भवतु

Submitted by nimita on 27 December, 2023 - 11:48

शुभं भवतु

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो आणि त्याच्याशी संलग्न माहिती वाचण्यात आली. अर्जेंटिना मधे एक कृष्णभक्त प्रत्येक वेळी प्रवास करताना स्वतः बरोबरच श्रीकृष्णाचं देखील तिकीट काढतो. त्या फोटोत दाखवल्याप्रमाणे विमानात आपल्या शेजारच्या सीटवर त्याने श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली आहे; इतकंच नव्हे तर त्याने श्रीकृष्णाच्या डोक्याखाली उशी आणि त्याच्या अंगावर (म्हणजे मूर्तीवर) ब्लँकेट घालून श्रीकृष्णाचा प्रवास सुखकर होईल याचीही काळजी घेतलेली दिसते.

तो फोटो बघितला आणि माझ्या डोक्यात विचारांची आवर्तनं सुरू झाली. अनेकविध उलटसुलट विचार मनात गर्दी करू लागले. सिनेमात किंवा आजकालच्या टीव्ही सीरियल मधे दाखवतात ना – अगदी तशीच माझी दोन मनं आपसांत वाद घालू लागली.

एक मन त्या व्यक्तीच्या भक्तीचा ,श्रध्देचा आदर करत म्हणत होतं – ‘ हा भक्त आणि याची भक्ती म्हणजे सगुण भक्तीचं शब्दशः मूर्तिमंत उदाहरण आहे. श्रीकृष्णाच्या त्या मूर्तीमधे त्या भक्ताला त्याचा देव दिसतो आणि नुसता दिसतच नाही तर त्याला त्याच्या आराध्याचं अस्तित्व जाणवतं देखील. त्याच्यासाठी ती श्रीकृष्णाची नुसती मूर्ती नाहीये, तर साक्षात् श्रीकृष्ण आहे. आणि म्हणूनच एखाद्या सजीव व्यक्तीची काळजी घ्यावी त्याप्रमाणे तो भक्त त्या मूर्तीची काळजी घेतोय. त्या मूर्तीसाठी स्वतंत्र आरक्षित जागा, तिच्या डोक्याखाली उशी,अंगावर पांघरूण – या कृतीतून हेच तर जाणवतंय. ‘

आपल्या आजूबाजूला देखील आपण असंच काहीसं दृश्य पदोपदी बघतोच की… खरं म्हणजे आपणही आपापल्या आराध्याची अशीच भक्ती करतो. रोज आपल्या देवघरातील देवांच्या मूर्तींची, तसविरींची षोडशोपचारे पूजा करतो. त्यांना आपल्यासाठी तयार केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्यरुपी पहिला घास भरवतो. मला आठवतंय – माझे बाबा जेव्हा महिन्याच्या सुरुवातीला त्यांचा पगार आईच्या हाती द्यायचे (तेव्हा कुठे होती आजच्यासारखी online transfer ची सुविधा); तेव्हा आई आधी ते पैसे देवापुढे ठेवायची आणि मग घरखर्चा साठी वापरायची.

मी इतरांची उदाहरणं कशाला देऊ? मी स्वतः प्रत्येक वेळी बाहेरगावी जाताना माझ्या देवघरातील देवांना हात जोडून नमस्कार करते आणि त्यांना सांगते -” माझ्या मागे माझ्या घरातल्या लोकांची, माझ्या घराची काळजी घ्या.” आणि प्रत्येक वेळी हे म्हणत असताना मला माझं स्वतःचंच हसू येत असतं; स्वतःच्या मूर्खपणाची कीव ही वाटत असते! मी स्वतःलाच दटावत सुनावते – ‘ स्वतःबद्दल किती व्यर्थ, भ्रामक कल्पना बाळगून आहेस उराशी… तुझी सगळी जबाबदारी देवांवर टाकून तू निर्धास्तपणे जाते आहेस. म्हणजे यातून तू अप्रत्यक्षरीत्या हे सूचित करते आहेस की जेव्हा तू इथे असतेस तेव्हा या सगळ्या जबाबदाऱ्या तू स्वतः पार पाडतेस… अगं वेडे, तू तर फक्त निमित्तमात्र आहेस. ते तुझ्या देवघरातील देवच सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात – तुझ्या कडून सगळं करवून घेत असतात. तुझ्या इथे नसण्याने खरं म्हणजे काहीच फरक पडणार नाहीये.’

हे कटू सत्य प्रत्येक वेळी जाणवत असतं, मनाला पटतही असतं ; पण तरीही देवासमोर हात जोडून प्रार्थना केली म्हणजे मन निर्धास्त होतं. घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्ती प्रमाणे देवघरातील ते देव मला आश्वासक वाटतात.

वर उल्लेख केलेली सगळी उदाहरणं सगुण उपसानेचीच तर महती सांगतात. आणि म्हणूनच त्या कृष्ण भक्ताची निरागस, असीम भक्ती आपल्या मनाला देखील स्पर्शून जाते.

माझे हे विचार ऐकून माझं ते दुसरं मन काहीसं कुत्सित हसलं आणि म्हणालं,”हा कसला आलाय खरा भक्त? मी तर म्हणेन – तू सुद्धा स्वतःला भक्त म्हणवून घेणं थांबव आता. उगीच स्वतःची आणि स्वतःच्या भक्तीची स्तुती पुरे झाली. त्या अर्जेंटिना मधल्या भक्ताला आणि तुला स्वतःला देखील अजून खरा कृष्ण, खरा देव समजलाच नाहीये. मला तर त्या माणसाची गंमतच वाटते आहे – केवढ्या मोठ्या भ्रमात आहे तो! जर त्याने कृष्णासाठी स्वतंत्र तिकीट काढलं नाही तर काय कृष्ण त्याच्याबरोबर राहायचं नाकारेल का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे – कृष्ण काय फक्त त्याच्या त्या भक्ताने आरक्षित केलेल्या स्थानावरच बसून राहणार का? अगं, त्याचं अस्तित्व तर त्या संपूर्ण विमानातल्या प्रत्येक अणुरेणू मधे आहे. तो जितका त्याच्या या भक्ताबरोबर आहे तितकाच त्या विमानातल्या प्रत्येक प्रवाशाबरोबर आहे… मग भलेही त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था असो अथवा नसो!

अगं, तो जगनिय्यंता, तो विश्वाचा रचयिता काय फक्त अशा मूर्ती आणि देवघरा मधे सीमित आहे का ? तो तर सृष्टीच्या चराचरात भरूनही कितीतरी पटींनी उरला आहे. त्याची भक्ती करायला, त्याच्याशी संवाद साधायला देवघरासमोर हात जोडूनच उभं राहिलं पाहिजे असं नाहीये. तू जिथे असशील तिथे अगदी मनाच्या गाभाऱ्यातून त्याला साद घाल, त्याचं स्मरण कर… नक्की पोचेल तुझी प्रार्थना, तुझी भक्ती त्याच्यापर्यंत!”

माझं ते दुसरं मन मला काहीबाही सांगत राहिलं, मी स्वतः ऐकलेल्या, वाचलेल्या निर्गुण भक्ती बद्दल पुन्हपुन्हा समजावत राहिलं.

खरं म्हणजे मला माझ्या दोन्ही मनांचे विचार, त्यांचे तर्क मनोमन पटतात. या दोन्ही विचारधारा आपापल्या जागी योग्यच वाटतात. आणि म्हणूनच अधूनमधून मला माझ्या स्वतःच्याच ईश्वर भक्ती बद्दल संदेह वाटायला लागतो. वादळी वाऱ्यात दिशाभूल झालेल्या नौकेसारखं माझं मन विचारांच्या गर्तेत गटांगळ्या खाऊ लागतं. आणि मग माझ्याही नकळत मी अंतर्मनातून माझ्या आराध्याचं स्मरण करते; जर घरी असेन तर देवघरा समोर उभी राहून… नाहीतर मग जिथे असेन तिथेच!

त्या परमात्म्याचं ते शांत, सोज्वळ अस्तित्व माझ्या आजूबाजूलाच असल्याचा अनुभव येतो; मग मी माझ्या विचारांचं सुकाणू त्याच्या समर्थ हातांमधे सोपवून निर्धास्त होते… माझ्या मनाच्या गाभाऱ्यात ध्वनी उमटतो – ” शुभं भवतु” !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>त्या परमात्म्याचं ते शांत, सोज्वळ अस्तित्व माझ्या आजूबाजूलाच असल्याचा अनुभव येतो; मग मी माझ्या विचारांचं सुकाणू त्याच्या समर्थ हातांमधे सोपवून निर्धास्त होते… माझ्या मनाच्या गाभाऱ्यात ध्वनी उमटतो – ” शुभं भवतु” !
खूप छान.

चिंतन आवडले. शांती मंत्र मलाही सर्वात जास्त आवडतात. 'ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा ..." , "सर्वेशाम स्वतिर्भवतु ...." आणि पसायदान. त्यात आता तुमच्या 'शुभम भवतु' ची भर पडली.

आपण मानव सगुण उपासना सहज करु शकतो, म्हणून असेल कदाचित पण त्यामुळे अशा प्रकारची भक्ती केली जाते. देवा पाळण्यात टाकून झोपवणे, नैवेद्य दाखवणे वगैरे.
ह्याने शुद्ध भाव जोपासला जात असेल, aavdambar न करता, तर चांगलंच आहे की!
छान लिहिलंय

आवडलं ...

जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वाघटीं राम भाव शुद्ध ।। १ ।।
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ।। २ ।।