प्लम केक

Submitted by अल्पना on 27 December, 2023 - 08:47
plum cake, christmas cake, fruit cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

१.भिजवण्यासाठी -
ड्राय फ्रूट्स आणि बेरीज - दिड कप (यात मी किसमिस, काळे कंदहारी किसमिस, मनुके, अ‍ॅप्रिकॉट, ब्लॅक करंट, क्रॅनबेरीज, ब्लूबेरीज, ग्लेझड चेरीज, टूटी फ्रूटी, खजूर, अंजिर, डिहायड्रेटेड फळं, अंत्र्याच्या पाकवलेल्या साली, पाकवलेले अद्रक यापैकी जे घरात आहे ते घालते. यावर्षी चेरीज, ब्लूबेरीज, अंजिर नव्हते घातले.)
हे भिजवायला अर्धा -पाऊण कप संत्र्याचा रस, अ‍ॅपल ज्युस किंवा रम. संत्र्याचा ताजा रस असेल तर जास्त चांगलं असं म्हणतात, पण मी नेहेमी पल्पी ऑरेंज ज्युस वापरला आहे
रम मध्ये भिजवलेली फळं बरणीत घालून ठेवायची आणि अधून मधून ढव्ळून घ्यायची. किमान १५-२० दिवस ते वर्षभर यापैकी तुम्हाला जितके दिवस जमू शकेल तितके दिवस फळं भिजवलेली चांगली. ज्युस मध्ये भिजवायची असल्यास किमान एक ते जास्तित जास्त ३-४ दिवस भिजवावी. पण ज्युस मध्ये भिजवलेली फळं मात्र फ्रिजमध्ये ठेवावीत.
याशिवाय अर्धा कप नट्स (काजू, बदाम आणि अक्रोड). हे भिजवायचे नाहीत.
२. कॅरमल साठी - १/४ कप साखर (साधी पांढरी), १/८ कप कोमट पाणी
३. केक बॅटर साठी
१ कप मैदा, १/२ कप ब्राऊन साखर, १/२ कप बटर, २ अंडी, १ टीस्पून बेकिंग पावडर, १/४ टी स्पून बेकिंग सोडा, पाव चमचा मीठ, १ टीस्पून व्हॅनिला इसेंस, १ टेबलस्पून ऑरेंज मार्मालेड किंवा मिक्स फ्रूट जॅम (मी यावेळी मिक्स फ्रूट आणि अ‍ॅप्रिकॉट असे दोन जॅम अर्धा अर्धा चमचा घेतले होते),पाव टीस्पून दालचिनी पावडर, पाव टीस्पून जायफळ पावडर

क्रमवार पाककृती: 

कॅरामल साठी :
एका जाड बुडाच्या भांड्यात साखर भिजेल इतपत पाणी घालून गॅसवर ठेवावे. साधारणतः पाव कप साखरेला चमचाभर पाणी खूप होते. साखर विरघळून मिश्रणाचा रंग डार्क ब्राउन होईपर्यंत मंद आचेवर राहू द्यावे. गॅस बंद करून दोन मिनिटे या मिश्रणाला थंड होवू द्यावे. यात कोमट केलेलं १/८ कप पाणी घालावे, मिक्स करून २-४ मिनिटे हे घट्ट होवू द्यावे.
सगळ्या पाककृतींमध्ये हे मिश्रण थंड झाल्यावर वापरा असं सांगितलं आहे. पण मी हे कोमट असतानाच वापरते. थंड झाले असेल तर किंचित पाणी घालून वापरताना मी परत थंड करून घेते.
केक बॅटर ची कृती :
भिजवलेल्याड्रायफ्रूट मधून रम / ज्युस गाळणीतून गाळून घ्यावा. ड्रायफ्रूट्स ना २-३ चमचे मैद्यात घोळवून बाजूला ठेवावे. उरलेला ज्युस /रम काढून ठेवावी.
अंड्याचा पांढरा आणि पिवळा भाग वेगळा करावा. एग व्हाईट्स ना सॉफ्ट पिक येईपर्यंत फेटून घ्यावे आणि बाजूला ठेवावं.
दुसर्‍या भांड्यात अंड्यांचा पिवळा भाग फेटावा. ते व्यवस्थित फेटले गेले कि त्यात बटर आणि ब्राउन साखर घालून फेटावे. आता यात आपण केलेलं कॅरमल घालून फेटावं. कॅरामल जरा कोमट किंवा गरम असलेलंच बरं. नाहीतर या थंड मिश्रणात (आमच्याकडच्या थंडीत तर नक्कीच) ते लगेच गोठून जाते.
त्यात जॅम, व्हॅनिला इसेंस घालून फेटावे. यात जायफळ आणि दालचिनीची पावडर घालावी.मैदा, मीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्यावा. मैदा आणि इतर घटक अर्धे अर्धे दोन वेळा अंडी-बटर-साखर मिश्रणात घालावे. प्रत्येक वेळी मैदा घातला का फेटून घ्यावे. गरज पडल्यास त्यात बाजूला काढून ठेवलेला ज्युस /रम घालावी.
यामध्ये फेटून ठेवलेला अंड्याचा पांढरा भाग हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करावा.
आत्ता या मिश्रणात मैद्यात घोळवलेले ड्राय फ्रूट्स आणि काजू -बदाम-अक्रोड घालून चमच्याने हलक्या हाताने मिक्स करावे. केक च्या या बॅटर ला बटर पेपर लावलेल्या टीन मध्ये काढावे.
ओवन १०-१५ मिनिटे १८० डिग्री सेल्सियस वर प्रि हीट करून ठेवावा. केक सुरवातीला ४० मिनिटे १८० वर आणि नंतर २० मिनिटे किंवा सुई व्यव्स्थित न चिकटता निघेपर्यंत १६० वर बेक करावा. ३०-३५ मिनिटांनंतर केक वरून जास्त ब्राऊन होतोय किंवा करपेल असं वाटलं तर फॉइल नी झाकावा.
बरेच जण केकच्या टीनला बाहेरून जाड पेपर ने कव्हर करतात. मी एकदाच केलं होते.
हल्ली मी अंड्याचा पांढरा भाग आणि पिवळा भाग वेगवेगळे फेटून करते हा केक. मी फेटायला बजाज चे हँड मिक्सर वापरते. पूर्वी साधे ब्लेंडर वापरून फेटायचे. त्यावेळी अंड्याचा पिवळा आणि पांढरा भाग एकत्रच फेटायचे.
रम वाला केक केला असेल तर केक थंड झाल्यावर त्यावर परत थोडी रम ब्रश ने लावावी आणि क्लिंग फिल्म मध्ये किंवा घट्ट झाकणाच्या डब्यात केक ठेवावा. किमान आठवडा ते महिना दिड महिना रोज ब्रश ने थोडी रम केकला फीड करावी.
मी स्वतः रम फीड करत नाही केकला. रम फीड न करता सुद्धा गेल्या वर्षी आठवड्यभराने केकला जास्त स्ट्राँग फ्लेवर आला होता.
plum cake.jpg
हा गेल्या वर्षीचा रम केक
123.jpeg
हा या वर्षीचा संत्र्याचा रस वापरलेला नॉन अल्कोहोलिक केक

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके
अधिक टिपा: 

मी गेली ५-७ वर्षे नेमानी प्लम केक बनवतेय. रम मध्ये फळं भिजवून, संत्र्याच्या रसात भिजवून, अ‍ॅपल ज्युस मध्ये भिजवून, अंडं घालून आणि बिना अंड्याचा असे सगळे प्रयोग करून झालेत. लोकं वर्ष सहा महिने आधी भिजवतात फळं रम मध्ये. मी सहसा दिवाळी झाल्यावर भिजवते. किमान १०-१५ दिवस भिजली फळं तर चवीत जास्त फरक जाणवतो. आमच्या घरी संत्र्याचा रस वापरून केलेला नॉन अल्कोहोलिक प्लम केक आणि ओल्ड मॉन्क वापरून केलेला अल्कोहोलिक रम केक आवडतात.
पहिल्यांदा हा केक करताना खूप रेसिपी वाचल्या होत्या. त्यावेळी वाचलेल्या बहूतांशी पाककृती मध्ये treacle syrup चा वापर केलेला होता. त्याऐवजी काय वापरता येईल हे शोधल्यावर मोलॅसेस हे उत्तर मिळालं होते. त्यावेळी या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. हे न वापरता केलेल्या प्लम केक च्या पाककृती शोधताना फेसबूक वर sumodtomz या नावाचे एक पेज सापडले आणि mariasmenu नावाचा एक ब्लॉग सापडला. यांच्या रेसेपी वाचून त्यानुसार १-२ वेळा बनवून मी आता माझी रेसेपी फायनल केली आहे.
इथे दिलेल्या प्रमाणात एक मध्यम आकाराचा केक बनेल. मी गेल्या वर्षी याच्या दुप्पट फळं भिजवली होती. त्यावेळी तिन केक (एक छोटा लोफ - टी केक चा बाजारात मिळतो त्या आकाराचा आणि दोन मध्यम- ३५० ग्रॅम, ५३० ग्रॅम आणि ७५० ग्रॅम वजनाचे) झाले होते.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम मस्त!
हा केक प्रचंड आवडतो.दरवेळी करायचा म्हणून ठरवते,शेवटी विकत आणते.
विना अंड्याचा केक करायचा असेल तर त्याला पर्याय म्हणून काय घालायचे?

बिना अंड्याच्या केक मध्ये दही किंवा व्हिनेगर घालतात. त्यासाठी एक दुसरी रेसिपी वापरते मी. सगळंच प्रमाण बदलते त्यात. बर्‍याच वर्षांमध्ये बिना अंड्याचा केक केला नाहीये. यावर्षी जर करणं झाले तर त्याची वेगळी कृती लिहिन.

मस्त रेसिपी. लिहिलेही छान. संज्योत कीरची (बिनअंड्याची) प्लम केकची रेसिपी परवाच फीड मध्ये आली होती.

बाप रे गोड काहीतरी खायची तिव्र इच्छा होतेय या धाग्यामुळे. आता स्टारबक्सची वारी करुन आता चॉकलेट चिप कुकी खाणे आले.

वॉव मस्त, एकदम प्रो लेव्हल. अगदी आजच रीच प्लम खाल्ला रिसेप्शन कृपेने Pasteur bakery camp चा. रंग आणि सगळेच एकदम परफेक्ट प्लम दिसत आहे. चव पण मस्तच असणार. तुम्ही दालचिनी कमी घातली आहे का? बऱ्याच ठिकाणी ह्यात बऱ्यापैकी दालचिनी ची तिखट चव आणि वास असतो. पुणे कॅम्प मधल्या सिटी, Pasteur, जरापुढे इंपिरियल , डायमंड इथे ह्या सीजन मध्ये एकसे एक केक व्हरायटी असते नाताळ स्पेशल. Happy

अगदी हलका फ्लेवर जाणवतो यात दालचिनी चा. मुख्य चव मुरलेल्या फळांची.
बरेच जण दालचिनी जास्त घालतात, काही जण लवंग पूड पण घालतात किंवा all spice powder पण घालतात.
गोड, मध्येच फळांचा आंबुस पाणा, पाकवलेल्या आल्याचा तिखट पणा आणि कॅरमल व रम नी येणारी कडसर चव असं मिक्स कॉम्बो असतं चवीचे.

Merwan चा प्लम केक कधी खाल्ला नाही. इथे दिल्लीत माझ्या घराजवळ मिळणाऱ्या ३-४ बेकऱ्या मधला प्लम केक खाल्ला आहे. अगदी एका टिपिकल केरला ख्रिश्चन ठिकाणचा सुद्धा. त्यांच्या प्लम केक पेक्षा बराच जास्त रिच आणि चांगला लागतो.

धन्यवाद अल्पना!
आतापर्यंत 3 वाइन आणि प्लम केक आणून खाल्ले.अजून बाकी आणायचे आहेत.

कातील दिसताहेत! निव्वळ सुख आहे हे केक्स म्हणजे.
बॉंग इट्स चॅनल वर दिलेला केक ही मस्त आहे. यांच्याच चॅनल वर ऑरेंज-पॉपी सीड केक आहे तो ही सुरेख Happy

खतरनाक !
मी गेल्या वर्षी संज्योत कीरच्या रेसिपी ने केलेला . रमच्या ऐवजी orange juice वापरून . जबरदस्त झालेला.
आता ही रेसिपी पाहून यावर्षी न केल्याचा पश्चाताप होतोय Happy

केक मस्त दिसतोय! पाककृतीही छान सविस्तर दिली आहे.
मी गेले काही वर्ष नाताळात हा केक करते. पण अजून माझी रेसिपी फायनल झाली नाही. तुमच्या पद्धतीने करून बघेन. धन्यवाद.

एकदम वॉव केक!
आणि काय ती चिकाटी! तुम्हाला दंडवत.

छानच रेसीपी. इथले प्रतिसाद वाचून मी काल थिओब्रोमा मधून सिंगल सर्विन्ग क्रिसमस केक ऑर्डर केला. छान स्पायसी फ्लेवर आहे. पण महाग आहे ५९० रु. खूपच रिच आहे. फ्रिज मध्ये ठेवायचा नाही. मी रोज दोन चमचे खात आहे.

अमा >>> मीपण थिओब्रोमामधून ऑर्डर करायचा विचार करत होते म्हणजे पोर्शन कंट्रोल होईल. आता नक्की करणार.