एम टी आयवा मारू

Submitted by संप्रति१ on 24 December, 2023 - 00:51

'एम टी आयवा मारू' हे एका व्यापारी जहाजाचं नाव आहे. हे जहाज स्वतःचे कर्मचारी स्वतः निवडतं. जो एकदा आयवा मारू वर काम करतो, त्याला त्या जहाजाचं आकर्षण खेचून आणतं. असा साधारण प्लॉट.

कादंबरीच्या निवेदकाचं नावही अनंत सामंत असंच आहे. हे निवेदन वाचकांना समोर ठेवून केलेलं नाही. डायरी फॉर्मॅटमध्ये केलेलं हे लिखाण आहे.. 'चला, आता मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगतो', असलं काही नाही.
निवेदक जिथं कुठं असतो, तो भवताल, इमारती, रस्ते, थंडी, ऊन, आभाळ, मनस्थिती सगळं चित्रासारखं आपल्यापुढं उभं करतो. पार्श्वभूमी शब्दांतून उभी करतो. सामंतांना हे चांगलं जमतं, असं मला वाटतं.

कादंबरी सुरू होते हॉंगकॉंगमध्ये. तिथे वेगवेगळ्या ठिकाणांहून सगळे अधिकारी कर्मचारी एकेक करून जमा होणं, ते जुनं जहाज चालू करण्यासाठी सगळ्यांची धडपड, दीर्घकाळासाठी समुद्रात जाण्याआधीच्या भावना हे सगळं येतं.

'आयवा मारू' हॉंगकॉंगचा किनारा सोडते आणि आपणही तिच्यासोबत खोल समुद्रात जात राहतो, तिच्यासोबत मनाने समुद्रात राहतो, वावरतो. हे सामंत यांचं लेखक म्हणून यश.

निवेदक सामंत त्या जहाजाशी एकजीव झाले आहेत. जहाजाची स्पंदनं, जहाजाच्या मानवी भावना त्यांना सतत जाणवत राहतात. महिनोन्महिने दूर समुद्रात जगणाऱ्या खलाशांची आयुष्यं. त्यांना होणारे भ्रम. स्वभावातले बदल. हे सगळं निवेदक टिपतो.

जहाजाच्या चलनवलनाची यांत्रिक तांत्रिक माहिती भरपूर आहे. पण ती सहज आणि ओघानं येते. समजते. निवेदक त्या माहितीचं स्पष्टीकरण देत बसत नाही. इतर कुणी असता तर तो हे सगळं सांगत बसला असता. आणि त्या माध्यमातून वैताग आणला असता. सामंत तसलं काही करत नाहीत. ते आपल्यावर विश्वास टाकतात.

ऐन तारुण्यात जग फिरून आल्यामुळे सामंतांची नजर खुली झालेली असावी. आणि इथल्या जातिव्यवस्थेच्या, विचारसरण्यांच्या चक्रव्यूहातून ते बचावलेले असावेत. त्यामुळे त्यांना मोकळेपणानं लिहिता आलेलं आहे.‌

ह्या कादंबरीत सामंतांनी एके ठिकाणी एका प्रचंड लाटेबद्दल लिहिलंय. दीड-दोन पानं भरून ती लाट विस्तारलेली आहे. वाचण्यासारखं आहे ते.
ते समुद्राचं वर्णन करत नाहीत, तर खरा समुद्र कसा असतो, ते थेट दाखवतातच. त्यांची दारूची, पार्ट्यांची वर्णनं वाचून घसा ओला करण्याची तलफ होते, हे ही एक आहेच.
बाकी, त्यावेळी पुलंची महान मध्यमवर्गीय प्रवासवर्णनं वाचून सुस्तावलेल्यांना, सामंतांनी बंदरांवरच्या स्फोटक उत्तेजित रात्रींचा झटका उत्तम दिला आहे. सेक्सच्या बाबतीत सामंतांनी थेट लिहिलंय. उगाच ताकाला जाऊन भांडं लपवायचं, असला प्रकार दिसत नाही. हे एक मला चांगलं वाटतं.

ह्यातली कॅप्टन रॉस आणि उज्ज्वला, ही दोन पात्रं ठाशीवपणे लक्षात राहिलीयत. ऑर्केस्ट्रा सुरळीत चालण्यासाठी जसा एक मुख्य सूत्रधार असतो, तसा इथे कॅप्टन रॉस चितारलेला आहे. अनुभवी, दिलदार, खंबीर, कुशल, जबाबदार, मॅच्युअर असा कॅप्टन. अस्सल दर्यावर्दी..! जहाजांबद्दल मला काडीचीही माहिती नाही. पण 'कॅप्टन' कसा असतो, असं कुणी विचारलं तर कॅप्टन रॉस हाच माणूस डोळ्यासमोर येतो.

आणि मग उज्ज्वला..!
मराठी पुरुष लेखकांनी आजवर वेगवेगळ्या नायिका उभ्या केलेल्या आहेत. पठारेंची 'हारणबाई' आहे, पेंडसेंच्या तुंबाडमधली गोदावरी आहे, बेडेकरांच्या रणांगणमधली हॅर्टा, नगरकरांच्या सात सक्कं त्रेचाळीस मधली 'आरोती' आहे, नेमाडेसरांची 'सावनूर' आहे, आणखीही असतील..! पण मग सामंतांची 'उज्ज्वला' ही पण एक आहे. ऐन विशीत पहिल्यांदा ही कादंबरी वाचली होती. तेव्हा ह्या उज्ज्वलानं बऱ्यापैकी धडधड वाढवली होती, आणि हे काही आपल्याला 'झेपणारं' प्रकरण नाही, असंही गुप्त ज्ञान तेव्हाच झालेलं, हे एक आठवतं.

बाकी मग, सामंतांच्या इतर साहित्यापैकी ऑक्टोबर एंड आणि ओश्तोरीज ह्या कादंबऱ्याही वाचनीय आहेत.‌ तसेच त्यांनी जॅक लंडन च्या 'व्हाईट फॅंग' या कादंबरीचा 'लांडगा' ह्या नावाचा भावानुवाद ही उत्तम आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिचय आवडला. उज्वला बद्दलची 'धडधड ' टिपण्णी समर्पक आहे.
अकारण पुलंच्या प्रवासवर्णनाचा केलेला उल्लेख मात्र आवडला नाही. एखादी रेघ मोठी दाखवण्यासाठी दरवेळेस दुसरी रेघ लहानच दाखवावी लागते असे नाही...

मोद +१ पुलंच्या प्रवासवर्णनांचा काय संबंध ते समजलं नाही.

मीवापु धाग्यावर मी कालच या पुस्तकाबद्दल लिहिलंय त्यामुळे इथे परत वेगळं काही लिहीत नाही. मस्तच आहे कादंबरी.

ममव वाचकांना बराच धक्का देणारी कादंबरी.. या विषयावर तर मराठीत फार कोणी लिहिलेच नाहीय.
तुमचा हा लेख मात्र हात फारच आखडता घेऊन लिहिलाय असे वाटले. तुमची नेहमीच खास शैली जाणवली नाही..

एम टी आयवा मारू नाही पण अनंत सामंतांची २ पुस्तके वाचली आहेत. त्या वयात ती धाडसी/युनिक वाटली होती. पुनर्वाचनानंतर तेवढीच अपील होतील का नाही याबद्दल खात्री नव्हती.
तुमचे परीक्षण वाचून एम टी आयवा मारू वाचायची इच्छा होते आहे.

तुमचे परीक्षण वाचून एम टी आयवा मारू वाचायची इच्छा होते आहे. > +१

वर बरेचजण म्हणताहेत तुम्ही हात आखडता घेउन लिहिलाय, अजुन सविस्तर लिहिल्यास वाचायला आवडेल.

मोद +१ पुलंच्या प्रवासवर्णनांचा काय संबंध ते समजलं नाही.

तुमचं लिखाण नेहमीच आवडत.. अजुन वाचायला आवडेल.

अनंत सामंत भारी च अनुवाद करतात यात काही वाद नाही, लांडगा नावाचं एक पुस्तक आहे, the white fang चा अनुवाद, मिळालं तर नक्की वाचा.

वाचतोय

कालच आणली आहे लायब्ररी मधून . वाचते आहे . खूप दिवसांनी सलग वाचतेय पुस्तक . छान वाटतेय वर्णन आणि एका वेगळ्याच प्रोफेशन ची माहिती होतीय. या आधी ' क्लिफ्टन क्रोनिकल ' चे सर्व भाग असे झपाटल्यासारखे वाचले होते .

संप्रति१ , एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !!! शेवटपर्यंत खिळवून ठेवते . कॅप्टन रॉस ला खरोखर सलाम !! उज्वला ही व्यक्तिरेखा तिच्या जागी बरोबर असेल पण फारशी आवडली नाही . कदाचित शेवटी तिचे झालेले रूपांतर मला आवडले नाही . Ana ची मात्र फसवणूक झाल्यासारखी वाटली .
बाकी पुस्तक मात्र वाचनीय आहे हे नक्की . डोळ्यासमोर दृश्ये उभी राहतात.

यासंदर्भात खालची एक quote आठवली. Happy

'What are you reading?'
It's a simple question but a powerful one, and it can change lives, creating a shared universe for people who are otherwise separated by culture and age and by time and space...

When we ask one another "What are you reading?" sometimes we discover the ways that we are similar; sometimes the ways that we are different. Sometimes we discover things we never knew we shared; other times we open ourselves up to exploring new worlds and ideas.

-- Will Schwalbe, Books for Living

मूळ उद्धृताचा स्रोत :
https://www.goodreads.com/quotes/9665447-there-s-one-question-i-think-we...

मस्त उतारा आहे. माबोवरही अनेकांची विचारांची झेप स्तिमित करते. अनेक जण अ‍ॅव्हिड रीडर असल्याचे कळून येते. काहींच्यात पॉझ असतो, विचारी, विवेकी वॄत्ती आढळते. वाचनाशिवाय हे साध्य होत नाही. अनेक अवलंबिण्यासारखे गुण आहेत.