मोहम्मद रफी जन्मशताब्दी वर्ष आठवणी आणि अभिवादन

Submitted by रघू आचार्य on 21 December, 2023 - 14:00

मोहम्मद रफी !

भारतीय चित्रपटसंगीतात आधुनिक पार्श्वसंगीताचे शास्त्र विकसित करण्यात महत्वाचे योगदान असलेले आणि आता दंतकथा बनत चाललेले व्यक्तिमत्व. येत्या २४ डिसेंबरला रफीसाहेब ९९ वर्षे पूर्ण करून १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. केलं असतं असं म्हणायला पाहिजे खरं तर. पण रफीचा आवाज अद्याप जिवंत आहे, एक तत्त्व जिवंत आहे तर रफी आपल्यात नाही असे कसे म्हणता येईल ? देह नाहीसा झाला. पण रफी म्हटल्यावर जी ओळख आहे तो आवाज मानवजात असेतो कधीच नष्ट होणार नाही.

किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांना पुरूष गायकात अफाट लोकप्रियता लाभली. मुकेश हे तिसरे नाव. त्यांचीही जन्मशताब्दी आहे. दुर्दैवाने तिघेही साठीच्या आतच गेले. मोहम्मद रफी यांची आराधना नंतरची काही वर्षे खडतर गेली. पण धर्मेंद्रने पसंती दिल्याने असेल "आज मौसम" या गाण्याने रफी आणि धर्मेंद्र परतले. धर्मेंद्रने त्या वर्षी नऊ हिट सिनेमे दिले ज्यात चार चित्रपटात धर्मेंद्राने चोराची भूमिका केली होती. असे म्हणतात कि अमिताभ बच्चन स्टार बनण्यापूर्वी लोफर , जुगनू मुळे राजेश खन्नाचे स्टारडम धोक्यात आले. आणि जंजीरने त्यावर शिक्कामोर्तब केले.

याच दरम्यान लैला मजनू सुपरहीट झाला, गाणी सुपरहीट झाली आणि लोफरने परतलेल्या रफींची सेकंड इनिंग सुरू झाली. ती नंतर बहरतच चालली होती. पर्दा है पर्दा, शिर्डी वाले साईबाबा अशी आधुनिक हिरोंना साजेलशी गाणी मोहम्मद रफी देऊ लागले.
पूर्वीची मोहम्मद रफीची गाणी आणि आताच्या काळातली गाणी पाहिली तर एकूणच संगीतालाच आव्हानात्मक दिवस सुरू झाले होते. हाणामारीच्या सिनेमातल्या देमार हिरोंना किशोर कुमार हा मॅनली आवाज वाटू लागला होता. यातूनच हाथ कि सफाईच्या वेळी विनोद खन्नाला किशोरचा आवाज त्याला न देता रणधीर कपूरला दिल्याचा राग आला होता. विनोद खन्ना सीनीअर असला तरी रणधीर कपूर हिरो म्हणून सिनीअर होता. त्याच्या नावावर जवानी दिवानी सारखे बरेच हिट होते. राज कपूरचा मुलगा होता. साहजिक त्याची स्टार व्हॅल्यू त्या वेळी विनोद खन्ना पेक्षा जास्त होती. विनोद खन्ना नुकताच काळे धंदे सोडून सभ्य व्यवसाय करायला लागला होता. अर्थातच पडद्यावर. त्यामुळे त्या वेळचा स्टार गायक किशोर कुमार रणधीरच्या वाटेला गेला. रणधीर आरडी बर्मन मैत्री जगजाहीर होती आणि आरडी किशोरकुमार मैत्रीही. त्यामुळे रणधीर कपूर किशोर कुमार हे काँबो बनलेलं होतं.

विनोद खन्नाची समजूत स्वतः प्रकाश मेहरांनी काढली. जर गाणंं आवडलं नाही तर पुन्हा रेकॉर्डिंग करूयात असं आश्वासन पण दिलं. विनोद खन्नाने नाईलाजाने होकार दिला. रेकॉर्डिंगला रफीला बोलवलं. रफीसाहेबांनी विनोद खन्नाशी गप्पा मारल्या. त्याचं व्यक्तीमत्व लक्षात आलं आणि त्याला अनुसरून त्यांनी आपल्या आवाजाचा टोन निश्चित केला. ते गाणं रेकॉर्ड झाल्यावर प्रकाश मेहरा यांनी ऐकलं मात्र, विनोद खन्नाला ते बोलावून घेऊन आले. त्याला गाणं ऐकवलं . विनोद खन्नाचा रूसवा कुठल्या कुठे पळून गेला. चाणाक्ष वाचकांनी बरोब्बर ओळखलं. ते गाणं म्हणजे "वादा कर ले साजना". प्रकाश मेहारांच्या हाथ कि सफाई या सुपरहीट चित्रपटाचे सर्वात हिट गाणे.

या काळात रफीने ऋषीकपूरसाठी पण हिट गाणी दिली.
कुर्बानी मधे पुन्हा विनोद खन्ना साठी कुणाचा आवाज द्यायचा हा प्रश्न आला. कारण दुसरा हिरो खुद्द फिरोज खान. फिरोज खानने यापूर्वी किशोर कुमार आणि मुकेश असे दोन्ही आवाज वापरले होते. पण या चित्रपटात संगीतकाराने ठरवलं कि फिरोज खानला रफीचा आवाज वापरायचा."क्या देखते हो, सूरत तुम्हारी " हे गाणं होतं.
ज्या माणसाने आधुनिक पार्श्वगायनात लटके झटके, निसरडे स्वर आणले, आळोखे पिळोखे आणले तो स्वतः असताना कलाकारी आशा भोसलेने केली पण रफीने गाणे एकदम शिस्तीत म्हटले. कुठेच वरचे सूर नाहीत, व्हेरीएशन्स नाहीत, झटके नाहीत. संगीतकाराला कळेना. तेव्हां रफीसाहेबांनी सांगितलं कि शूटींग होऊन जाऊ दे, मग बोलू.

फिरोज खानवर गाणं चित्रीत झालं आणि मग सर्वांच्याच लक्षात आलं.
फिरोज खानची सवय होती कि तो हॉलिवूडच्या नायकांप्रमाणे तोंडातल्या तोंडात पुटपुटायचा. तो क्वचितच जबडा पूर्ण उघडायचा. गाण्यासाठी लिपसिंगिंग करतानाही त्याची हीच सवय होती. त्यामुळे गायकाने त्याप्रमाणे गाणं गायलं. झीनत अमान सुद्धा फार काही वेगळं करत नव्हती. पण किमान चेहरा बोलका असल्याने आशाने त्यात माफक कलाकारी केली.

अर्थात या गाण्यात झीनूबेबीचा त्या वेळचा पेहराव ( आता त्या ड्रेसला हॉट म्हणतात हे सांगितलं तर हसतील लोक. आताच्या पिढीला तर वाटेल "एव्हढे" कपडे घातलेल्या बाईला तुम्ही असे बोलायचा ? ) बघून क्या देखते हो या प्रश्नाला फिरोज खान जे उत्तर देतो, त्यावर झू ठा अशी एक ओळ हवी होती असे नेहमी वाटते. हा जोक इतक्यातच अन्यत्र मारलेला आहे, माजोफुगे वाटल्याने रिसायकल केला.

असे किस्से हजारो आहेत. रफींचा जीवनप्रवास मायबोलीवर येऊन गेलेला आहे.
कमेण्ट मधे आपण रफीची आवडती गाणी, त्यातली वैशिष्ट्ये, किस्से शेअर करत त्यांना अभिवादनही करू आणि हे जन्मशत्बादी वर्ष साजरे करूयात. असेच आणखी किस्से, संदर्भ कमेण्ट बॉक्स मधे येत जातील.

या वर्षात रफीसाहेबांच्या नातवाच्या रफी फाऊंडेशन तर्फे "सौ साल पहले" हा कार्यक्रम वर्षभर राबवला जाणार आहे.
https://www.google.com/search?q=rafi+centenanry+year+%2C+sau+saal+pehle+...

याबद्दलची अधिक माहिती.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/c...

या निमित्ताने षण्मुखानंद सभा, भारत सरकार, पोस्ट खाते यांच्या तर्फे जन्मशताब्दी वर्षाचा उद्घाटनाचा कार्यक्रम षण्मुखानंद हॉल मधे होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल या वेळी उपस्थित असणार आहेत. या प्रसंगी डाक खात्यातर्फे रफी यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट प्रकाशित केला जाणार आहे. तसेच पद्मविभूषण श्रीमती आशा भोसले यांना मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
https://allevents.in/mumbai/grand-inauguration-mohammed-rafi-birth-cente...
षण्मुखानंद हॉल मधे असा एक कार्यक्रम केल्याचे ऐकिवत आहे. सदर कार्यक्रमाला जमल्यास उपस्थित राहणार आहे. ही त्यांची अधिकृत वेबसाईट.
https://raficentenary.com/index.php/contact-us/

दास्तान ए रफी या नावाने रजनी आचार्य यांनी एक मेहनत घेऊन एक माहितीपट बनवला आहे. यात मोहम्मद रफी यांची दुर्मिळ माहिती आहे. रफी साहेब आणि सूफी फकीर यांचा नेमका किस्सा त्यांच्या भावाकडून ऐकायला मिळतो. अमृतसर जिल्ह्यातले त्या वेळच्या भारतात असलेले आता पाकिस्तानात असलेले सुलतान कोटला हे जन्मगाव, शाळा पहायला मिळते. शक्य झाले तर हा व्हिडीओ पहावा ही विनंती.
https://www.youtube.com/watch?v=akM5Ir1xamc

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९८७ ला किशोरकुमार गेल्यानंतर काहीच दिवसानी मी अमेरिकेत आलो. तेव्हा ईन्डिया अब्रॉड नामक एक साप्ताहीक यायचे. त्यात कुणीतरी त्याला रफी साहेबांपेक्षा किशोरकुमार आवडतो, अशी लेखाद्वारे श्रध्दांजली वाहिली होती.
त्यानंतरच्या आठवड्या वाचकांच्या पत्र व्यवहारामधे, 'रफींच्या पेक्षा किशोर चांगला असे लिहून तुम्ही समस्त इस्ला..चा अपमान केलेला आगे, तेव्हा मी यापुढे ईन्डिया अब्रॉड विकत घेणार नाही.. डॉ. अली... ' वाचनात आले होते, त्याची आठवण झाली.

असे सरकलेले सर्वत्र असतात. इथे कुणीच इस्लामचा अपमान झाला असे मानणारे नाही.

एका हेरगिरीच्या आरोपाखाली पकडलेल्या शास्तज्ञाने त्याच्या संस्थेत त्याच विशिष्ट धर्माच्या स्वातंत्रसैनिकांचा / वीरांचा / नेत्यांचा उल्लेख भाषणात, सांस्कृतिक कार्यक्रमात करायचा नाही अशी ताकीदच दिलेली होती. आता त्यांचं सगळंच हळूहळू बाहेर निघतंय. असे वेगवेगळ्या संस्थेत बसलेले अनेक लोक असतील. रिअ‍ॅलिटी शोज मधे किशोरकुमार आरडी स्पेशल चे एका सीझन मधे दोन तीन कायक्रम होतात. कुटुंबियांना बोलावले जाते. रफी स्पेशल कार्यक्रम झाला नाही, या वेळी जन्मशताब्दी असल्याने कसाबसा कार्यक्रम उरकला. कुटुंबियांना बोलवण्याऐवजी अन्नू कपूर यांना बोलवले होते.

दुर्दैवी आहे. कलाकारांना असे तोलणे.

दुर्दैवी आहे. कलाकारांना असे तोलणे. >> खरय ! असा एका कँपात बसून लोक एका अतूट आनंदाला मुकतात. त्यांचेच नुकसान !

आचर्यजी तुम्ही वर रफि ने ."क्या देखते हो, सूरत तुम्हारी " अतिशय सरळ गायले आहे असे म्हणता पण मला तरी ते खूप मधाळपणे गायलय असे वाटत आले आहे. आशाच्या करामतींना एक बेस मिळाला आहे असे वाटते पात फिरोज खानचे कॅरॅक्टर पण फारसे कंगोरे नसलेले सरळसोट आहे सिनेमामधे त्यामूळे त्याला चपखल बसते (तुमचा पुटपुटण्याचा मुद्दा धरून)

समेवर सुरू करून समेवर राहात शेवट लो की करण्यामधे लता नि रफि मास्टर होते असे वाचलेले.

पण मला तरी ते खूप मधाळपणे गायलय असे वाटत आले आहे. >> बरोबर आहे तुमचे. पण व्हॉईस टेक्श्चर बद्दल नव्हतं ते. हरकती घेण्याबद्दल पण नाहीये.
ता री फ करू या शब्दात ज्या करामती आहेत तशा इथे घेतलेल्या नाहीत. त्याला रफीगिरी हेच नाव शोभेल.

रफीवरच्या लेखात मधुबन मे राधिका नाचे हा किस्सा नाही असे कसे होईल ?

या गाण्यासंदर्भात नौशाद, दिलीपकुमार यांच्या मुलाखती दूरदर्शनवर दाखवलेल्या होत्या. युट्यूबवर सुद्धा त्या उपलब्ध होत्या. त्या शोधोशोध करण्यात वेळ गेल्याने राहून गेलं. नंतर काही वैयक्तिक कारणांमुळे अनेक किस्से लिहायचे राहून गेले. आता वर्षसमाप्ती होऊन रफीसाहेबांची जन्मशताब्दी येईल, त्या आधी शक्य तितके पूर्ण करतो.

कोहिनूर हा चित्रपट दिलीप कुमारने मानसोपचार तज्ञाच्या नेहमीच्या ट्रॅजेडी भूमिका करायच्या नाहीत या ताकिदीमुळे केला होता. विशेष म्हणजे यात ट्रॅजेडी क्वीन मीनाकुमारीला सुद्धा हटके भूमिका आहे. यात ती राजकुमारी आहे. काही प्रसंगात खेळकर दिसलीय. नौशाद ने या चित्रपटासाठी हमीर रागात एक गाणे बांधले होते. ते मोहम्मद रफीकडून गाऊन घ्यायचे होते.

या गाण्याला रफीने नकार दिला होता. कारण हमीर तसा अवघड राग मानला जातो. पार्श्वगायन करणार्‍या गायकाचा शास्त्रीय गायकाइतका रियाज राहत नाही. शिवाय यातली सरगम रफीला खूप अवघड वाटत होती. रियाजासाठी सध्या वेळ मिळत नसल्याने मला हे गाणे म्हणणे अवघड आहे, मन्ना डे नियमित रियाज करतात त्यांच्याकडून गाऊन घ्या असे रफीने सुचवले. नौशादला सूचना केली कि मग तो हट्टाला पेटत असे. त्याने रफीला ठणकावून सांगितले कि हे गाणे आहे असेच राहील आणि ते तुलाच गायला लागेल.

रफीने हे गाणे मग रियाज करून गायले. पण खूप रीटेक झाले. सरगम गाताना रीटेक होत होते. पण नौशाद हट्टाला पेटलेले असल्याने त्यांनी ते रफीकडून गाऊनच घेतले. नौशाद ला असे वाटत होते कि रफी आज जो काही आहे तो आपल्यामुळे आहे आणि आज त्याच्या कडे इतके काम आहे कि एका गाण्याच्या रियाजसाठी बाकिच्या गाण्याचा वेळ कमी होईल म्हणून तो बहाणेबाजी करत आहे. मात्र ते गाणे रफीला रियाजाअभावी खरंच कठीण गेले.

याच्या पुढची गंमत म्हणजे दिलीपकुमार वर हे गाणे चित्रित व्हायचे होते. त्याचे चित्रीकरण सुरू होत असताना नौशाद ने सल्ला दिला कि या गाण्यातले सतारी च्या क्लोअ अप साठी ज्यांनी ही सतार वाजवली आहे त्या हलीम जाफर चेच क्लोज अप घेता येतील. पण दिलीप कुमार म्हणाले कि मी स्वतः सतार वाजवीन. मला सतार शिकवा आणि आता चित्रीकरण न करता शेवटी ते घ्या.

चित्रपट पूर्ण व्हायला वर्ष लागलं. तोपर्यंत दिलीप कुमार रोज सतारीवर रियाज करत होते. आणि रफीने गायलेल्या सरगम वर सुद्धा मेहनत घेत होते. ती काही केल्या त्यांना पाठ होत नव्हती.

एकदा कोहीनूरच्या टीमला जेवण असताना नौशाद आधी येऊन बसले होते. दिलीपकुमार काही वेळाने आले. नौशादने पाहीलं कि दिलीपकुमार यांच्या एका हाताच्या चार बोटांना पट्ट्या आहेत. त्यांनी कारण विचारल्यावर दिलीपकुमार यांनी मजेशीर उत्तर दिलं ," आपने वो जो मुसीबत मेरे गले मे बांधी है ना ? उस सितार का रियाज करते वख्त मेरी उंगलियां कट गई. और अगर पहले पता होता कि सरगम इतनी मुश्कील है तो यह फिल्म मै कभी नही करता. इससे तलवार के सीन्स आसान थे. वोह करते समय मेरी उंगलिया नही कटी , आपके संगीत कि वजह से कट गयी "

नौशाद म्हणाले " मैने तो पहले ही सुझाव दिया था कि हलीम जाफर का क्लोज अप ले लेते है "
दिलीपकुमार म्हणाले " अब मुझे क्या पता इतना मुश्कील होगा. हमने आंव देखा ना तांव, हम ही करेंगे कह दिया, अब कह दिया तो फिर पीछे कैसे हट सकते है ? फिर आपके पास आकर गुजारिश करना अच्छा नही लगता "
यावर सगळेच हसायला लागले.

सिनेमा पाहताना जाणवते कि क्लोज अप ऐवजी दिलीपकुमार स्वतः सतार वाजवताना दिसल्याने ते दृश्य जास्त प्रभावी झाले आहे.

अरेच्चा ! अचानक सापडल्या या चित्रफिती.
नौशादचा इंटरव्ह्यू
https://www.youtube.com/watch?v=CnTJ7IBOl78

दिलीपकुमार इंटरव्ह्यू
https://www.youtube.com/watch?v=pvBG0fPKa1I

मोहम्मद रफी लाईव्ह
https://www.youtube.com/watch?v=5DfwDvX5gYo

छान किस्से. यातलं फक्त दिलीपकुमार या गाण्यासाठी सतार शिकले एवढंच आधी ऐकलं / वाचलं होतं. रफीचा नकार आणि बोटांना जखम होण्याचे किस्से माहीत नव्हते. थोर माणसं.

सतारीने बोटांना जखम झाली हे वाचताना हळदीकुंकू चित्रपटातलं झन झननन छेडिल्या तारा हे युगुल गीत आठवलं.

Pages