सफर पूर्वोत्तर राज्यांची - आसाम , मेघालय

Submitted by सातारी जर्दा on 17 December, 2023 - 11:14

सफर पूर्वोत्तर राज्यांची - आसाम , मेघालय
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न असल्यानं थोडं सांभाळून घ्या.
या वर्षी राजस्थान ची सहल करावी असा मानस होता. पण आमचे चिरंजीव यांचं आसाम ला पोस्टिंग झालं अन मग ठरवलं या वर्षी पूर्वोत्तर राज्य.
नोव्हेंबर महिन्यात नियोजन करायचे ठरले पण दसरा आन दिवाळी यामुळे विमान प्रवासाचे चढे दर त्यामुळे डिसेंबर महिन्यात जाण्याचे पक्के केले.
जाताना पुणे ते दिल्ली व दिल्ली वरून गोहाटी या साठी स्वस्त म्हणून एअर इंडिया एक्सप्रेस या कंपनी ची तिकीट बुक केली. तसेच येताना गोहाटी ते पुणे इंडिगो ची तिकीट बुक केली.
पण प्रवास निर्विघन होईल तो प्रवास कसला. जाण्याच्या दिवशी सकाळी अकरा वाजता एअर लाईनचा फोन आला. तुमचं विमान उशिरा सुटणार आहे. जोडून असणारी फ्लाईट हि पोहोचण्या अगोदर सुटत होती. बरीच फोना फोन झाली. वाद विवाद, शेवटी एअर इंडिया एक्सप्रेस ला शिव्या घालत सगळं रिफंड घेतला आणि घाईने त्याच दिवशीचे तिकीट बुक केले. या मुले एकवीस हजाराचा भुर्दंड पडला. वाचकांना विनंती आहे कि एअर इंडिया एक्सप्रेस ची तिकिटे बुक करताना काळजी घ्या. पुणे, गोहाटी या ठिकाणाची या एअर लाईन्स ची विमाने उशिरा सुटत होती.
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या सौं. खरेदी करत होत्या. लाडक्या अन एकुलत्या एक लेकाकडे जायचे म्हणून खुश होत्या. त्याला आवडणारे पदार्थांची यादी वाढतच जात होती. शेवटी लक्षात आणून दिले कि विमानात वजन न्यायला मर्यादा असते.
शेवटी सर्व सोपस्कार उरकून विमानात बसलो आणि गोहाटी साठी उड्डाण केले. पहाटे गोहाटीला पोहचलो. विमानतळ बाहेर येताच थोडी भीती वाटली. सैन्याची चिलखती गाडी अन त्याच्या वर बसलेला स्टेनगन धारी जवान असं दृश्य पाहून कोणालाही भीती वाटावी. पण इथे नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था असते असे ड्रायव्हरशी बोलताना समजले. आमची टुरिस्ट कार ठरवलेच होती. पूर्वोत्तर राज्यात टुरिस्ट कार चे दर ठरवताना काळजी घ्यावी लागते. इथे पेट्रोलचे दर रु. ९६ ते ९८ प्रति लिटर आहेत. त्यामुळे टुरिस्ट कार नऊ रुपये प्रति किलोमीटर या दराने मिळते. पण रुपये अठराशे हा फिक्स चार्ज असतो. म्हणजे तुम्ही दिवसात अगदी शंभर किलोमीटर फिरलात तरी नऊशे अधिक अठराशे असे दोन हजार सातशे रुपये द्यावे लागतात. माझ्या मूलाने बर्याच ठिकाणी चौकशी केली पण गोहाटी मध्ये सर्व ठिकाणी टुरिस्ट कार साठी हाच दर होता. या मध्ये रस्त्याचे टोल, ड्रायव्हरचे जेवण, राहणे सर्व समाविष्ट असते त्यामुळे आपल्याला काही पाहावे लागत नाही. सर्व रिसॉर्ट, हॉटेल नि ड्रायव्हरच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय केलेली असते.
गोहाटी ते काझीरंगा नॅशनल पार्क हा प्रवास दोनशे किलोमीटरचा आहे. या साठी चार ते साडेचार तास लागतात. काझीरंगा पार्क जवळ प्रत्येक पाचशे मीटरवर प्राण्यांच्या सुरक्षेसाठी स्पीड ब्रेकर आहेत. पावसाळ्यात प्राणी रस्त्यावर येतात तसेच रात्री हि रस्त्यावर येतात. मधेच थांबून अल्पोपाहारासाठी ब्रेक घेतला. इथे नाश्त्यासाठी पुरी भाजी छान मिळते. स्वच्छ सुंदर हॉटेल होत इथेच फ्रेश झालो अन तासाभरातच वाईल्डर नेस्ट हॉटेलवर पोहचलो.
स्वच्छ , सुंदर निसर्गरम्य वातावरणातील रिसॉर्ट पाहून मन प्रसन्न झाले. प्रवासाचा सिन होताच त्यामुळे फ्रेश झाल्यानंतर जेवण करून आराम करणे पसंत केले. चार वाजता पहिली भेट द्यायला निघालो ते ओर्चीड पार्कला. पूर्वेकडे लंबक सूर्यास्त होतो त्यामळे अंदाज चुकला. चार वाजता इथे संध्याकाळ होते त्यामुळे पूर्ण पार्क पहाता आले नाही. इथे जवळ जवळ दोन हजार देशी विदेशी झाड, फुलझाडं, वेळी जातं केल्या आहे. याची सर्व भाषेत माहिती देण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. हि सर्व रोप लाकूड तसेच विटांचे तुकडेआणि कोळसा वापरून लावलेली आहेत.
या पुढे लगेच आसाम मधील पारंपारिक वाद्यांचे संग्रहालय आहे. यातील काही वाढे हि म्हशीच्या शिंगा पासून बनवलेली आहेत. येथील स्वयंसेवक श्री इमू यांनीही सर्व वाद्यांची माहिती दिली तसेच काहीही वाध्य वाजवून व गाऊन दाखवली. हि सर्व वाध्य त्यांचे गुरु श्री गोगोई यांनी बनवली आहेत. इथं कोणत्याही गोष्टीला हात लावण्यास परवानगी नाही किंवा कोणत्याही वाध्य वाजवण्यास पर्यटकांना परवानगी नाही पण काही अति उत्साही पर्यटक आणि लहान मुले या मुले स्वयंसेवक त्रासून गेले होते. या नंतर होते ते आसाम मधील सामाजि संस्कृती दर्शविणारे संग्रहालय. आसाम मध्ये हिंदू व्यतिरिक्त बोडो, कोरबी अशा बर्याच जाती जमाती आहेत. यांची जुन्या काळातील शेती अवजारे, शिकारीची हत्यारे, वेषभूशा,, मासे पकडण्यासाठी बांबूची सापळे, होड्या तसेच हातमागावर विणले जाणारे कपडे. कपडे विक्री साठी होते पण दर पाहिल्यानंतर घेण्याची हिंमत झाली नाही. अंधार पडल्यामुळे उत्तर काही जसे बांबूचे बन व आणखी काही कलाकृती पहाता आल्या नाही.
या नंतर येथील खास आकर्षण म्हणजे इथला सांस्कृतिक कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी दिल्ली वरून काही विधार्थी आले होते. तरुणांचा भरणा प्रेक्षकात जास्त होता. या कार्क्रमात आसाम मधील वेग वेगळ्या जमातीचे पारंपारिक नृत्य, गाणी आणि वाध्ये यांचा सुरेख संगम होता. आसाम मधील प्रमुख सण बिहू हा संक्रातीच्या काळात साजरा होतो. या मधील नृत्याचे सादरीकरण सुरेख होते. तसेच नागा नृत्य, मणिपुरी, अरुणाचल प्रदेश मधील कला सुंदर रिर्तीने साजऱ्या केल्या.
आसामी शास्त्रीय नृत्य प्रकार हा शास्त्रीय नृत्य व योग याचा सुरेख संगम होता. याच सादरीकरण फार सुंदर होत. कार्यक्रम संपला अन थंडीचा कडाका बाहेर आल्यावर जाणवला. मोबाईल वर चेक केले तर तापमान १२ डिग्री होते. अशातच तेथील नागा जाकीट खूप आवडले होते पण हातमागावर विणले असल्याने किमंत खूप होती त्यामुळे नाद सोडून दिला. पूर्वोत्तर राज्यात प्रत्येक ठिकाणी पॅकिंग फी आणि प्रवेश फी आहे. ओर्चीड पार्क साठी एकूण रुपये ४५० इतकी फी आहे. थंडी सहन होण्य पलीकडची होती त्यामुळे लवकरच रिसॉर्ट चा रास्ता धरला. थोडं तीर्थ प्राशन केल्या वरही थंडी कमी होईना. पण सौ. चे मोठे झालेले डोळे पहिले, जेवण केले अन मुकाट हिटर लावून झोपलो. उद्या सकाळी लवकर उठून अभयारण्य पाहायला जायचे होते.
काझीरंगा नॅशनल पार्क पाहण्यासाठी जीप सफारी आणि एलिफन्ट सफारी असे दोन प्रकार आहेत. बहुतेक लोक जीप सफारी ला पसंती देतात. जीप सफारी साठी रुपये तीन हजार इतका चार्ज पडतो त्यामध्ये सरकारी फी समाविष्ट असते. जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर त्याचे वेगळे पैसे. डी एस एल आर असेल तर थोडे जास्त पैसे. जीप मध्ये चार लोक बसू शकतात. आत मध्ये कोणतेही खाण्याचे पदार्थ नेता येत नाहीत. अभयारण्याच्या एंट्रीलाच लांब पल्ल्याच्या दुर्बीण भाड्याने मिळतात. रुपये ३०० ते २५० इतका चार्ज लावला जातो. तुम्ही गेलात तर जरूर घ्या. कारण प्राणी दूरवर असतात. दुर्बीण असल्यानं सहज पहाता येतात. प्रवेश करताच जवळच हरणाचा कळप चरत होता. काही हरिणी निवांत रवंथ करत बसल्या होत्या. सफारी जीप उघडी असल्याने चारी बाजूला पहाता येत होते. अगदी उभं राहून हि पाहता येते. फक्त कुठे हि खाली उतरता येत नाही. कोणताही प्राणी कधीही तुमच्या वर हल्ला करू शकतो. या नंतर रस्त्याच्या कडेला शांत पाने चारणारे गवा दिसला. मजबूत शरीर यष्टीचा, पल्लेदार शिंगे अन पायावर पांढरा रंग मोठा डौलदार प्राणी आहे. यानंतर झाडावर बसलेले नीलकंठ, हॉर्नबिल पक्षी ड्रॉयव्हरने दाखवले. ड्रायव्हरला बोलता करा. तो भरपूर माहिती देईल. यानंतर गवताळ प्रदेश चालू झाला. अचानक गवतातून रानडुक्कर रस्त्यावर आले. थोडा वेळ थांबलो , ड्रायव्हर ने सांगितले कि वाघ दिसण्याची शक्यता आहे पण डुक्कर रस्ता पार करून गेले. पुढे निघाले वाटेत वाघाचे पंजे धुळीत उमटलेले दिसले. थोड्याच वेळात काझीरंगा नॅशनल पार्क चे वैभव एक शिंगी गेंडा रस्त्यावर उभा होतो. शरीरावर चिलखती आवरण असणारे गेंडे २००० च्या संख्येने आहेत. पुढे एक तळे होते पलीकडे रानटी हत्तीचा कळप चरत होता. लहान मोठे १५ हत्ती तरी असावेत. शक्य तेवढे मोबाईलने फोटो घेतले. एका ठिकाणी तळ्यात मोठ्या प्रमाणात कासवे होती. पलीकडे उन्हात दोन गेंडे शांतपणे उन्हात पडले होते. ड्रॉयव्हरने एके ठिकाणे गाडी थांबवली. या ठिकानि टॉवर बांधला उतरून टॉवर चढून जंगल पहाता येते. दोन तास झाले होते. सर्व प्राणी पाहून झाले पण वाघोबाने दर्शन दिले नाही. पण आमचे नशीब जोरावर होते. परतीच्या प्रवासात अचानक एक रान डुक्कर समोरून गेले अन त्या पाठोपाठ वाघ रस्त्यावरून पलीकडे उडी मारून गवतात नाहीसा झाला. वाटलं याच साठी केला होता अट्टाहास.
हॉटेल वर पोहचताच तिथल्या लोकांनी सांगितलं जवळ १५ किलोमीटरवर काको चँग धबधबा आहे. मग निघालो धबधबा पाहायला. जवळ पोहचल्या नंतर पुहे दोन किलोमीटर चालत जायला लागले. चांगलीच पायपीट झाली पण धबधबा पहिल्या नंतर मात्र सगळा त्रास विसरून गेलो. वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद, वरून पडणारे फेसाळते स्वच्छ नितळ पाणी, मस्त मजा आली. वाटेत बांबू मध्ये शिजवलेले मटण दिसले पण चौकशी केल्यावर ते पोर्क आहे असे समजले. हॉटेलवर येऊन चेक आऊट करून परत गोहाटीला निघालो. निघायला साडेचार वाजले होते. थोड्याच वेळात पूर्ण अंधार पडला. वाटेत पुन्हा एकदा गेंड्यान दर्शन दिले.

क्रमश.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरवात .माझा जानेवारी महिन्यात पुणे - गौहाटी प्रवास आखलेला आहे. चांगलं मार्गदर्शन मिळेल.

मस्त लिहिलंय.खर्चाचे तपशील लिहिलेत तेही बरं केलं.ईशान्य भागातल्या सफरीबद्दल फार कमी ज्ञान असते(म्हणजे 'गुवाहाटी ला उतरून पुढे जायचं' इतकं एकच वाक्य माहीत असतं.)
फोटो असतील तर नक्की टाका.

छान...
फोटो टाकले तर अजून छान..

छान लेख....! जमलं तर फोटो नक्की टाका..

गेल्या पंधरा वर्षात ईशान्य भारताची चार वेळा भ्रमंती करण्याचा योग जुळून आला होता.. मेघालय, सिक्कीम, आसाम हि पूर्वेतर राज्य निसर्ग संपन्न आहेत यात शंका नाहीच.२००८ ला भर पावसाळ्यात केलेली चेरापुंजी, शिलाँग, आसामची भ्रमंती.. खूप छान आठवणी आहेत माझ्या त्या प्रवासाच्या.. आता तुमचे अनुभव वाचता - वाचता माझेही स्मृतिरंजन होईल.

२०१३ ला काझीरंगा अभयारण्य फिरलो. हत्ती आणि जीप दोन्ही सफारी केल्या होत्या. हत्ती सफारीमध्ये ' हाथी मेरा साथी' झाला होता.. हत्ती वरून जाताना माझी ओढणी झाडांच्या फांदीत अडकली होती आणि माहुताने हत्तीला काय तरी त्यांच्या भाषेत सांगितलं आणि हत्तीने सोंडेने माझी ओढणी मला काढून दिली होती. खूप छान अनुभव होता. अभयारण्यात एक सरोवर होतं त्याच्या मागचा जो निसर्ग होता .. त्याची मला खूप भुरळ पडली होती .. पण तिथपर्यंत जाता आलं नव्हतं.

आमचं हॉटेल अभयारण्याच्या जवळपास होतं. ज्यादिवशी तिथे थांबलो होतो त्यादिवशी रात्री वीज - गडगडाटसह पाऊस पडला होता. अनोळखी प्रदेशातल्या त्या पावसाने आमची रात्रीची झोप उडवली होती.

गोहाटीला ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्रात एक सुंदर बेट आहे.. तिथे बोटीने जावं लागतं.. बेटावर एक मंदिरही आहे.. छान परिसर आहे.. मनिम्याऊ, जमलं तर अवश्य जा तुम्ही..!

गोहाटीला ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्रात एक सुंदर बेट आहे.. तिथे बोटीने जावं लागतं.. बेटावर एक मंदिरही आहे.. छान परिसर आहे.. मनिम्याऊ, जमलं तर अवश्य जा तुम्ही..! >>>>

नक्कीच... कारण गौहाटी सोडून इतर कुठे जाणं शक्य नाहीय. मात्र त्या बेटावर कामातून वेळ काढून नक्की जाणार. शिवाय कामाख्या मंदिराला भेट द्यायची इच्छा आहे.

कारण गौहाटी सोडून इतर कुठे जाणं शक्य नाहीय. कामातून वेळ काढून नक्की जाणार<<<<
महाराष्ट्रात परत आल्यावर थेट मुख्यमंत्रीच Lol
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री : मनिम्याऊ

मस्त….

आमचाही गेले कित्येक वर्षे प्लॅन होतोयच नुसता. एकदा गोवाहाटी व शिलॉन्ग भेट देऊन आलेय पण निवांतपणे परत एकदा जायचेय.. बघु कधी जमतेय.

वाचतेय ...
ममा, गौहाटीला उमानंद मंदिर आहे बोटीने जावं लागतं तिथं विवेकानंद केंद्र इन्स्टीट्यूट ऑफ कल्चर आहे. तिथे भेट दे..
अन् जगातलं एकमेव नदीतलं बेट माझुली नक्की बघ. माझा लेख आहे. त्यावर. चारची जोरहाटहुन फेरी पकडली तर सर्वात भारी सूर्यास्त व येताना पहिली फेरी पकडली की सूर्योदय!