अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश: "सप्तर्षी फाउंडेशन"
✪ "इंटीग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन"
✪ बौद्धिक अक्षम मुलाकडून मिळालेली प्रेरणा
✪ बेवारसांचे वारस आम्ही
✪ जोडीने जाऊ पुढे
✪ संवेदनशीलतेची क्षमता
✪ "आमच्यासाठी आम्ही एक दिवसही काढला नव्हता"
✪ एक दिवस संस्थेचीही गरज उरू नये
सर्वांना नमस्कार. आज ३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिवस. दिव्यांग ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये २१ प्रकारच्या दिव्यांग किंवा विविध प्रकारे विकलांग (differently abled) व्यक्तींचा समावेश होतो. त्यात अंध, मूकबधिर, शरीराने अधू असे शारीरिक दिव्यांग आणि बौद्धिक अक्षम असलेले, स्वमग्नता (ऑटीझम), सेरेब्रेल पाल्सी, डाऊन्स सिंड्रोम, अध्ययन अक्षमता असलेले (Learning disabilities), बहुविकलांग अशा बौद्धिक दिव्यांगांचा व इतरही प्रकारांचा समावेश होतो. आजचा दिवस ह्या सर्वांचे कष्ट आठवण्याचा, त्यांच्याबद्दल संवेदना जागी करण्याचा व ह्यांच्या भल्यासाठी काम करणा-या संस्था व व्यक्तींबद्दल जाणून घेण्याचा आहे.
ह्या लेखामधून आपण अशा एका संस्थेद्वारे व हे काम उभं करणा-या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. आज पुणे व पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिव्यांगांच्या अधिकारांसाठी व लाभांसाठी काम करणारी संस्था हा विषय डोळ्यापुढे आला की, सप्तर्षी फाउंडेशन हे नाव आठवतं. गेल्या काही वर्षांमध्ये सप्तर्षी फाउंडेशनने ह्या विषयावर अनेक प्रकारे काम केलं आहे. विविध प्रकारच्या दिव्यांगांसाठी असलेल्या सरकारी योजनांचे लाभ त्यांना मिळवून देणं, सरकारी यंत्रणेसोबत त्यासाठी पाठपुरावा करणं, तांत्रिक व शारीरिक अडचणी दूर करून दिव्यांगांना प्रत्यक्ष मदत मिळेल ह्यासाठी झटणं, त्यांच्यासाठी विविध शिबिर व उपक्रम राबवणं असं काम सप्तर्षी फाउंडेशन करत आहे. त्याशिवाय कोणीही वाली नसलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं कामही फाउंडेशन करत आहे. अलीकडच्या काळात संस्थेने सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी "इंटीग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन" हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे एकाच ठिकाणी दिव्यांगांसाठी असलेल्या सर्व शासकीय व खाजगी सेवांची माहिती त्यांना मिळेल व त्यांचा लाभ घेणं सोपं जाईल. ही सेवा वेब पोर्टल आणि एप्लिकेशनच्या माध्यमामधून उपलब्ध केली जात आहे.
(सप्तर्षी फाउंडेशनची वेबसाईट https://saptrishifoundation.in)
दिव्यांग बांधवांपुढे असलेले प्रश्न खूप मोठे आहेत. दिव्यांग बालक अथवा बांधव व त्यांचे पालक अथवा कुटुंबीय ह्यांचं जीवन अतिशय खडतर असतं. पण आज उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान व संसाधनं वापरून आणि हार्ड वर्कला स्मार्ट वर्कची जोड देऊन आणि सरकारी यंत्रणेसोबत काम करून त्यांचं जीवन थोडं आनंदी करण्याचा प्रयत्न सप्तर्षी फाउंडेशन करत आहे. कोणतीही संस्था ही एकत्र आलेल्या व्यक्तींपासून आणि एखाद्या ध्येयाने पेटून घेतलेल्या व्यक्तीपासून सुरू होते. सप्तर्षी फाउंडेशनसाठी हे नाव आहे मनोजकुमार साहेबराव बोरसे ह्यांचं.
मनोजजींना सामाजिक कार्याची आवड लहानपणापासून होती. गुरूजनांच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी कर्वे समाज सेवा संस्थेतून एमए- सामाजिक कार्य पूर्ण केलं. ते करत असताना एका बाल निरीक्षण गृहामध्ये बौद्धिक अक्षम मुलाच्या पुनर्वसनाचं काम त्यांच्याकडे आलं. दीड वर्षं त्यांनी त्या मुलाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले. ते करताना ह्यासाठीच्या सामाजिक योजना व कायदे ह्यावर त्यांचा अभ्यास झाला. निरामय आरोग्य विमा योजना ही नॅशनल ट्रस्ट अंतर्गत केंद्र सरकारची योजना आहे व त्यातून चार प्रकारच्या दिव्यांगांना वैद्यकीय खर्च मिळतो. जेव्हा १०० पालकांना ह्या योजनांची माहिती दिली जायची, तेव्हा कुठे त्यातले पाच जण हा लाभ घेण्यासाठी सरकारपर्यंत पोहचायचे. त्यातून काही गोष्टी कळत गेल्या. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती कळत गेली. पण ह्या योजनांचे लाभ दिव्यांगांना प्रत्यक्ष मिळण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने संघर्ष करावा लागतो. पुढे जाणवलं की, बांधवांसाठीच्या सुविधा व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ह्यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे मग पुढे ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय मनोजजींनी घेतला. त्यासाठी पुण्यातल्या विशेष शाळांसोबत त्यांनी काम केलं व पालकांसोबत संवाद साधला.
MSW चं शिक्षण झाल्यानंतर राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI) येथे व नंतर सूर्योदय परिवारासोबत काही वर्षं काम केलं. पुढे सूर्योदय परिवाराचे प्रणेते भय्युजी महाराज ह्यांच्या प्रेरणेने २०११ पासून पुण्यामध्ये बेवारस मृतदेहांवर अंत्य संस्कार हा विषय घेऊन त्यावरही काम सुरू केलं. अतिशय कष्टाचं आणि thankless असं हे काम! नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो असं काम! ते त्यांनी केलं. पूर्वी विमा ह्या विषयामध्ये काम केल्याचा अनुभव होता. त्यामुळे नंतर मनोजजींनी व्यक्तिगत पातळीवर कन्सल्टन्सी म्हणून विमा सेवा २०१४ मध्ये सुरू केली.
जोडीने जाऊ पुढे
मध्ये हे काम व्यक्तीगत पातळीवर मर्यादित न राहता संस्थेच्या माध्यमातून आणखी पुढे जावं म्हणून कालांतराने २०१७- १८ सप्तर्षी फाउंडेशनची स्थापना झाली व त्याद्वारे काम सुरू झालं. श्रीकांतजी चव्हाण हे फाउंडेशनचे मार्गदर्शक आहेत आणि वैशालीताई मुळे अध्यक्षा आहेत. विश्वस्त स्वयंसेवक म्हणूनही काम करतात आणि इतरही स्वयंसेवक संस्थेच्या कार्यात हातभार लावतात. २०१४ मध्ये मनोजजींच्या अर्धांगिनी सौ. वृषालीताईसुद्धा ह्या कामात सहभागी झाल्या! संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे शिबिर व अन्य उपक्रम आयोजित करण्यास सुरूवात झाली. हे करताना लक्षात आलं की, एखाद्या योजनेवरच काम करून उपयोगी नाही. कारण सगळे प्रश्न निगडीत आहेत. त्यामुळे योजना, कागदपत्र पूर्तता, पात्रता, तांत्रिक बाबी पूर्ण करून प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी एकत्रित काम करण्याची व ते एका छताखाली असण्याची गरज आहे.
आपण जेव्हा दिव्यांग म्हणतो, तेव्हा त्यात अनेक प्रकार येतात. १९९५ च्या विकलांगता असलेल्या व्यक्ती अधिनियमानुसार (Persons with disabilities act, 1995) दिव्यांगांचे मुख्य प्रकार पाच होते. कालांतराने नॅशनल ट्रस्ट एक्ट, १९९९ नुसार दिव्यांगांमधील अधिक दिव्यांग- जसे बौद्धिक अक्षम, बहुविकलांग व कुटुंबियांवर अवलंबून असलेले व्यक्ती असे प्रकार केले गेले. २०१६ साली Persons with disabilities act मध्ये आलेल्या सुधारणांनुसार २१ प्रकारचे दिव्यांग मानले गेले. त्यामध्ये हिमोफेलिया, थॅलेस्मिया, सिकल सेल असे रक्ताचे आजार असलेल्या व्यक्ती, एसिड एटॅकचे पीडित अशा इतरांचाही समावेश झाला. हे काम करताना निरामय आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये बौद्धिक अक्षम प्रकार- मानसिक अक्षम हे अधिक प्रमाणात होते व आजही अधिक लाभार्थी ह्या प्रकारातले आहेत, असं मनोजजी सांगतात. सरकारी योजनांचा ह्या दिव्यांगांना मुख्यत: आर्थिक पाठबळासाठी उपयोग होतो. ते असंही म्हणतात की, ह्या समस्येकडे असंही बघता येऊ शकतं. दिव्यांगांचे पालक हे सक्षम होते, म्हणून हा संघर्ष कदाचित त्यांच्या वाट्यासाठी आला असेल. ह्या विषयावर विविध विशेष शाळा, थेरपिस्टस, विशेष शिक्षक, डॉक्टर्स आणि इतर घटकही काम करत आहेत. पण त्यांना एकत्र करून एका छताखाली आणण्याची गरज आहे. ही व्यवस्था सप्तर्षी फाउंडेशनने निर्माण केली.
संवेदनशीलतेची क्षमता
ह्या बाबतीत समाजानेही अनेक गोष्टी केल्या पाहिजेत. समाजाने व कुटुंबानेही दिव्यांगांना स्वीकारलं पाहिजे. स्वीकारामुळे पुढचे टप्पे सुरू होतात. लवकर स्वीकार झाला तर उपचार व सहाय्य देता येऊ शकतं. आणि त्या समस्यांची तीव्रता कमी करता येऊ शकते. समाजानेही दिव्यांग व त्यांच्या पालकांची जवाबदारी घेतली पाहिजे. मनोजजींचे मित्र ज्ञानेश ठाकुर ह्यांचा एक उपक्रम प्रेरणादायी आहे. मुलांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देण्या- घेण्याच्या ऐवजी त्यांनी दिव्यांग मुलांसाठी दान करायचा निर्णय घेतला व तसं इतरांनाही आवाहन केलं. सप्तर्षी फाउंडेशनच्या शिबिराचा खर्च त्यातून त्यांनी व त्यांच्या मित्रांनी केला. समाजात इतकी संवेदनशीलता असली तर असा बदल घडू शकतो.
मनोजजींना हे सगळं काम करणं सोपं अर्थातच नव्हतं. संस्था पातळीवर आर्थिक गोष्टी जुळवणं कठीण होतं. अशा कामांसाठी वेळ, ऊर्जा व पैसा लागतो. वेळ व ऊर्जा असली तरी संस्था म्हणून काम करताना आर्थिक अडचणी येतात. पालकांच्या व देणगीदार मित्रांच्या सहयोग राशीने हे काम चालतं. मर्यादित प्रमाणात संस्थेला निधी उपलब्ध होतात. संस्थेसमोरच्या अडचणींसंदर्भात मनोजजींचे मार्गदर्शक विजय मुनेश्वर ह्यांनी त्यांना एक उपाय सांगितला. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन विमा व सामाजिक सुरक्षा विषयात काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ह्या क्षेत्रात काम करून स्वार्थ व परमार्थाची योग्य सांगड ते घालत आहेत. चांगला व्यवसाय करून त्याद्वारे संस्थेला मदत करण्याची त्यांची इच्छा आहे. आणि व्यवसायाबरोबर हा एक सामाजिक विषयसुद्धा आहे. अचानक येणारे मृत्यु, आजारपण, अपघात ही सामाजिक समस्या आहे. त्यामुळे कुटुंबावर संकट येतं. कोरोना काळात आपण सर्वांनी हे अनुभवलं आहे. आपल्या निवृत्तीचं नियोजन न केल्यामुळे वृद्धापकाळातही वॉचमन म्हणून अनेक ज्येष्ठ नागरिक काम करताना दिसतात. अशी वेळ कोणावर येऊ नये, म्हणून त्या दिशेनेही ते लोकांचं प्रबोधन करत आहेत.
"आमच्यासाठी आम्ही एक दिवसही कधी काढला नव्हता"
सप्तर्षी फाउंडेशनने विशेष मुलांच्या माता व बहिणींची वेगळी सहल आयोजित केली होती. त्यांना संस्थेने अंजनवेल कृषि पर्यटनाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये नेऊन त्यांचं दु:ख एक दिवस विसरायला लावले. तिथे ह्या सर्व जणी हसल्या, खेळल्या, नाचल्या, रडल्या व हलक्या झाल्या. उन्नती सोशल फाउंडेशनने ह्यासाठी सप्तर्षी फाउंडेशनला सहकार्य केलं होतं. आमच्यासाठी कधीच आम्ही एक दिवस काढू शकलो नाही, अशी भावुक प्रतिक्रिया ह्या मातांनी दिली.
ह्या मॉडेलचा प्रसार व्हावा
तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांसमोरच्या अडचणी दूर करून त्यांना लाभ मिळावून देण्यासाठी एकात्मिक पद्धतीचं नावीन्यपूर्ण मॉडेल (Integrated one stop solution) विकसित करण्याची गरज आहे. त्याद्वारे एका क्लिकवर सर्व सुविधा दिल्या जातील. सुरूवातीच्या काळात सप्तर्षी फाउंडेशनचे स्वयंसेवक प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी व सरकारी कार्यालयांमध्ये जायचे. पण तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सोपं होऊ शकेल. त्याबरोबर ह्या कामाचा विस्तार होईल, ते अपस्केल होईल व त्याचा प्रसारही होईल.
ह्या मॉडेलनुसार संस्थेने पहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कागदपत्र पूर्ततेसाठी मार्गदर्शन, योजनांची माहिती देणे (कधी कधी सरकारी अधिकारीही सप्तर्षी फाउंडेशनला ही माहिती विचारतात), विमा, शिबिरांचे आयोजन, संसाधन केंद्र, सर्व योजनांची माहिती देणारं केंद्र अशा सहा सेवा सुरू केल्या आहेत. केवळ माहिती देऊन न थांबता अंमलबजावणी होऊन लाभ मिळवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे व त्यासाठी हँडहोल्डींग सुविधा दिली जात आहे. दिव्यांगांना पूर्वी विमा मिळत नसायचा. पण आता कायद्यात सुधारणा झाल्या आहेत व भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने त्यासाठी पावले उचलली आहेत. मानसिक आरोग्यासाठी व सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांसाठी विमा आवश्यक आहे, असे प्राधिकरणाने सांगितले आहे. त्यासाठी विमा कंपन्याही हळु हळु पुढे येत आहेत. अशा विविध विमा सेवा सप्तर्षी फाउंडेशनच्या मोबाईल app व पोर्टलवर उपलब्ध असणार आहेत.
ह्या विषयावर काम करणारे अनेक घटक आहेत. त्यांचं मोलाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा काम करणा-या सर्व शासकीय व अशासकीय संस्था, नेटवर्क्स, थेरपिस्टस, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, साहित्याचे उत्पादक ह्यांना फाउंडेशन एकत्र आणू इच्छिते. सर्व लाभार्थी व सेवा प्रदाते एकत्र येतील व त्यांची सांगड घातली जाईल. वाजवी दरामध्ये, उपलब्ध होऊ शकेल असे व विश्वसनीय असं हे मॉडेल बनवण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न आहे. मनोजजी सांगतात, आम्ही हे करणारे पहिले आहोत. आम्ही फर्स्ट आहोत आणि बेस्ट होण्याचाही प्रयत्न करू. संस्थेच्या कामामुळे निरामय आरोग्य योजनेमध्ये जर १०० लाभार्थी जोडले गेले तर त्यातील ८०% लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मदत मिळते, असा संस्थेचा अनुभव आहे. अन्य असलेल्या १२- १८% प्रमाणाच्या तुलनेत हे मोठं प्रमाण संस्थेचं काम दर्शवतं. मनोजजी सांगतात तसं हे सरकारचं कर्तव्य तर आहेच, पण त्याबरोबर स्वयंसेवी संस्था व समाजाचीही साथ हवी. आणि असं मॉडेल व अशी यंत्रणा इतकी उपयोगी पडत असेल, तर ते मॉडेल देशभर उभं राहावं व सरकारने त्यासाठी मदत करावी, असं ते सुचवतात.
एक दिवस संस्थेची गरजही उरू नये
खडतर संघर्ष करताना कधी दिव्यांग बांधवांच्या पालकांना योजनेच्या लाभांसाठी सरकारी कार्यालयात जाण्याची इच्छा उरत नाही. अशा स्थितीमध्ये हे मॉडेल त्यांना उत्तम मदत करू शकेल. पण हे सगळं काम एक मनोज बोरसे किंवा एका संस्थेला शक्य होणारं नाही. त्यात सर्वांचा सहभाग हवा. ह्या कामामध्ये सगळ्या समाजाच्या संवेदनशीलतेची व सहभागाची गरज आहे. आणि असं झालं तर एक दिवस ह्यामध्ये संस्थेने काम करण्याचीही गरज उरणार नाही. आणि तसं व्हावं, असंही मनोजजी म्हणतात.
त्यांच्या ह्या कामाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी, त्यामध्ये यथाशक्ती सहभाग घेण्यासाठी, शिबिरामध्ये स्वयंसेवक किंवा तांत्रिक व्यक्ती म्हणून मदत देण्यासाठी व कामाला अजून व्यापक करण्यासाठी सुधारणा सुचवण्यासाठीही संस्थेला संपर्क करू शकता.
सप्तर्षी फाउंडेशन वेबसाईट - https://saptrishifoundation.in
ईमेल: saptrishifoundationpune@gmail.com
मोबाईल: 9762184554 / 9665363177 / 9172716630
लेखाचं शब्दांकन- निरंजन वेलणकर 09422108376
__/\__
__/\__