अस्तित्व...!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 26 November, 2023 - 12:33

अस्तित्व ..!!

तिलोत्तमाने आईच्या फोटोला फुलांचा हार घातला. बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला. फोटोतल्या आपल्या आईच्या हसऱ्या चेहर्‍याकडे एकटक बघणाऱ्या तिलोत्तमा वाटलं, आईने आपल्या जीवनात आई आणि वडीलांची दोहोंची भूमिका एकाचवेळी पार पाडली. ... आपल्या दुःखाचा, एकाकीपणाचा कुठलाही ऊहापोह न करता... अगदी निखळ आनंदाने..!

मात्र ह्या हसऱ्या चेहर्‍यामागे अफाट दुःख असावं, इतरांना न जाणवणारी वेदना लपलेली असावी.. जी कधीच कुणापुढेही उघड झालेली नाही आणि आता आईचं ह्या दुनियेतून अस्तित्वचं लोप पावल्याने ती उघड होण्याची काडीमात्र शक्यताच उरलीसुरली नव्हती..

दुःख आणि शोक ह्या दुनियेत कुणालाही अपरिचित नाहीत.. दुःख असलं की शोक सोबतीला आपसूकपणे मागोमाग येतो.. हे सगळं मानवी मनाला कितीही नकोसे वाटले तरीही.. आईही त्याला अपवाद कशी असणार..?

आपलं दुःख तिने मरेपर्यंत आपल्या पुढ्यात तरी कधीही जाणीवपूर्वक उघड केले नाही.. कधी कुणाबद्दल तक्रार, कसलीही कुरकूर नाही. .. आपल्या एकेटपणाचं ओझं एकटीने पेललं. .. संपूर्ण हयातभर... !!

तिलोत्तमाला वाटलं, तिने निदान आपल्याजवळ तरी स्वतःला व्यक्त करायला हवे होते.. आपण कुणी त्रयस्थ व्यक्ती नव्हतो. पण स्वभाव असतो एखाद्याचा.. इलाज नाही त्याला..!. ते काहीही असलं तरी आपल्या संगोपनात तिच्याकडून तसूभरही कसूर झाली नाही. एवढ्या मोठ्या शहरात वडिलांच्या माघारी आईने एकटीने तिला वाढवलं. उच्च शिक्षण दिलं. समर्थपणे घर चालवलं. एकटीने आई - वडिलांचं कर्तव्य पार पाडताना कोणतीच कसर सोडली नाही. वडिलांना तिने पाहिलं नव्हतं.. मात्र मनात तिने आपल्या वडिलांची असंख्य चित्रे रंगवली होती. त्यांच्यासोबत प्रेमळ संवादांचे अनेक प्रसंग रचले होते.. वास्तव कल्पनेपेक्षा कोसो दूर असले तरी रचित कल्पनेने तिच्या बालमनाला विलक्षण समाधान लाभे.

लहानपणी तिलोत्तमाला खूप प्रश्न पडत. एवढ्या मोठ्या जगात आपण आणि आई दोघीच कशा बरं एकट्या आहोत...?? सगळ्यांना वडील, भावंड, काका - मामा, आत्या- मावशी असे सगळे नातेवाईक असतात.. मग आई आणि मलाच का बरं नसावेत..? आपलं म्हणावं असं कुणीच का नसावं दोघींना...?? का..??

ह्या ' का ' चं उत्तर तिला काही केल्या सापडत नसे. फक्त स्वतःलाच प्रश्न विचारून पुष्कळ झगडत असे ती स्वतःशीच..!

उत्तरं न सापडल्याने आपलं डोकं प्रश्नांनी भणभणून गेल्यावर तेचं प्रश्न आपल्या आईला विचारून ती आईचा जीव भंडावून सोडे.. अगदी आई जिवंत होती तोपर्यंत..!!

" आपल्याला कुणीच कसे सगे-सोयरे नाहीत... आपलं गावं नाही, असं कुठे असते का..?? आपल्या गावाचं नाव तरी सांग ना गं आई..?? "

मग त्यावर तिच्या आईची ठरलेली नेहमीची तिरपागडी उत्तरं..!

" काय करायचंय तुला सगळं जाणून घेऊन...?? हे न जाणता तुला काही कमी पडलंय का आतापर्यंत ...?? ह्या जगात खूप सारे अभागी जीव अनाथ म्हणून जगतात... तुला आईची माया, प्रेम सगळं मिळतंय.. ते सुद्धा काहींच्या नशिबी नसते...सतत आपलं गावं, आपली माणसं करत बसू नकोस.. कुणीही नाही आपलं...!"

मग तिलोत्तमा एकदम चिडून, उसळून म्हणे,

" तुझं हे तत्वज्ञान माझ्या बिल्कुल पचनी पडत नाही. माथ्यावरचे केस पिकले की, अक्कल परिपक्व होते असे काही नाही , मात्र मनाच्या चोरकप्प्यात दडवून ठेवलेला तिरस्कार, द्वेष मात्र पिकल्या केसांसोबत परिपक्व होत जातो हेचं खरं..! एवढा अट्टाहास का..? मला तर वाटते, हा अट्टाहास नसून दुराग्रह आहे तुझा..!"

तिलोत्तमाचे हे असे काटेरी बोल आईच्या जिव्हारी लागत. तिचे डोळे ओलावा धरत.

" हे असं आडून- लपून का वागतेस गं आई..?? ह्या अज्ञातवासाच कारण तरी काय..?? सगळं खुलेपणानं का सांगून घेत नाही... म्हणजे जे म्हणायचं ते..! सारखं आपलं मनात, आतल्या आत वर्षानुवर्षे दाबून ठेवायचं म्हणजे काय.?? त्रास होत नाही का तुला त्याचा..?? "

" कधीकधी ती पण गरज असते ... तिलोत्तमा, एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात.. माणसालासुद्धा... !" आई
जडावलेल्या स्वरात उत्तर देई.

" असेल.. तू म्हणतेस तसंही असेल.. तुझ्यासारखा शहाणपणा माझ्याकडे नाही बाई..!!"

तिलोत्तमा आईपुढे हार मानत असे. तिला त्याची एव्हाना सवय झालेली.

एकदा मात्र तिलोत्तमाने आईपुढे हट्टच धरला. मला आपल्या मूळ गावाचं नाव कळायलाचं हवं म्हणून..!

महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर आहे आपलं लहानसं गाव .. गावाचं नाव न सांगताच यापुढे गावाविषयी काहीही विचारायचं नाही .. अशी तंबी देत आईने तिला गावाविषयी अंधुक माहिती दिली.

गावाचं नाव , सगे- सोयऱ्यांची ओळख जरी आईने लपविली असली तरी थोडा-फार आपला पूर्वेतिहास मरण्याआधी तिलोत्तमाला सांगितला होता.

तिलोत्तमा आईच्या पोटात असतानाच तिचे वडील वारले.. पुढे पांढऱ्या पायाची म्हणून घरच्यांनी तिच्या आईची घरातून हकालपट्टी केली. खरंतरं नातेवाईकांना संपत्तीमधे हिस्सेदार नको होता हेचं तिच्या हकालपट्टीचं मुख्य कारण होतं आणि ते सरळ-सरळ उघड होतं. मात्र त्यांच्याशी न झगडता, कुठलाही उभा दावा न मांडता तिच्या आईने घराला आणि गावाला अखेरचा दंडवत घातला. पुढे तिने गावाचं नाव कायमचंच टाकलं.

तिच्या आईचा गळा गोड होता. वाणी मधुर होती. गावाला रामराम ठोकल्यावर शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंदिराचा आसरा घेत ती देवाची भजनं, गाणी आपल्या रसाळ स्वरात म्हणत असे..

एकदा मंदिरात भजन गात असताना तिचा दैवी देणगी लाभलेला आवाज कानावर पडून प्रभावित झालेल्या प्रफुलकुमार सारख्या देवमाणसाने तिला एका सेवाभावी संस्थेत दाखल करत पुढे चित्रपटात कोरस म्हणून गायची संधी उपलब्ध करून दिली..

प्रफुलकुमार संगीताच्या दुनियेतला कॅसेटकिंग होता.. त्याची संगीत कंपनी त्याकाळी मोठ्या जोमात होती.. त्याची पत्नीसुद्धा उत्तम गायिका होती.. तिच्या जोडीने तिलोत्तमाच्या आईने बरीच भक्तीगीते, भावगीते, भजने गायिली.. कृष्णाची भजनं ती आवडीने गायची म्हणून आवाजाच्या दुनियेत तिला राधादेवी नावाने ओळखले जायचे.

तिलोत्तमाचे उत्तम संगोपन करत , आपल्या मोडक्या संसाराच्या रथाची दोरी एकहाती घेत , रस्ता सोडून भरधाव धावणाऱ्या मायलेकींच्या आयुष्याच्या रथाला योग्य वळणावर आणण्यासाठी तिच्या आईने अपार कष्ट केले.

चलो मन गंगा - जमुना तीर...
चलो मन गंगा - जमुना तीर...
गंगा- जमुना निर्मल पानी...
शीतल होत शरीर.....
चलो मन गंगा-जमुना तीर..!

बन्सी बजावत... गावत कान्हा...
आ ss आ ss आ ss नाचत कान्हा..
संगलिए बलबीर...
चलो मन गंगा - जमुना तीर..!

कृष्णाचं भजन गात बसलेल्या आईला बिलगत तिलोत्तमा नेहमी म्हणत असे..

" आई , मला का शिकवत नाहीस गं तुझ्यासारखं गायला..?? कित्ती गोड गातेस तू....!"

तिलोत्तमाच्या प्रश्नाने आई अस्वस्थ होत असे. मात्र एकदा तिलोत्तमाच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेली तिची आई न राहवून रियाज मध्येच थांबवत तिथून उठून जात चिडून म्हणाली,

" पुन्हा नाव काढायचं नाही घरात गाण्याचं...
गाण्याव्यतिरिक्त शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत या जगात ...!!"

आई उठून बाहेर गेली. तिच्या मागोमाग तिलोत्तमाही.

अस्वस्थपणे गॅलरीत काहीतरी एकाग्रपणे पाहत राहिलेली आई . स्थिर.. तिलोत्तमा आईच्या जवळ गेली. आई चमकली पण बोलली काहीच नाही. तिलोत्तमाने आईच्या गळ्याला मिठी मारली. स्पर्शाआधी तिला जाणीवच झाली.. आईच्या ओल्या डोळ्यांची. आई रडत होती...

का..?? एकटीच....कशाकरता..?? तिने खूप विचारलं पण आई काहीच सांगायला तयार होईना. त्यादिवशी लेक आपल्या आईची आई झाली. तिलोत्तमाने मायेने तिच्या हातावर थोपटले.

अचानक आईचे डोळे भरून आले... स्वर कापरा झाला.

" ह्या गोड गळ्याने घात केला माझा ... सत्यानाश झाला माझ्या उभ्या आयुष्याचा..!!"

बस्स..! त्या प्रसंगानंतर तिलोत्तमाने आईसमोर पुन्हा गाणं शिकण्याचं नाव काढलं नाही. तिच्याशी त्या विषयावर बोलायचं धाडस झालं नाही. तो विषय नकोच काढायला एवढंच तिला वाटलं. तिलोत्तमा खरंतरं त्या प्रसंगानंतर गोंधळून गेली. तिथूनच पुढे तिच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले.

का म्हणाली असेल असं आई ? स्वर्गीय देणगी म्हणून तिचा आवाज नावाजला जात होता, त्याने तिचा घात केला...?? घात झाला म्हणजे नक्की काय घडलं असेल तिच्या आयुष्यात..?? ज्या गाण्याने आपण आज संपन्न आयुष्य जगतोयं.. त्या गाण्याने कसा बरं हिचा घात केला असेल..??

तिलोत्तमाने दीर्घ श्वास घेतला.

आईचा भूतकाळ नक्की कसा होता.. जाणून घ्यायला हवं का सगळं..?? पण आता त्याची खरंच आवश्यकता आहे ...??

आईच्या मृत्यूपश्चात तिच्या आयुष्यातली खोलवर गुडूप झालेली भूतकाळी मुळं उखडून काढणं म्हणजे तिच्या प्रेमाशी, आपल्यावर असणाऱ्या तिच्या विश्वासाशी प्रतारणा केल्यासारखं नव्हे का...?

मात्र तिची रक्ताची मुलगी या संबंधाने आपलाही भूतकाळ तिच्या आयुष्याशी जोडलेला आहेच .. तो जाणून घ्यायचा हक्क आपल्याला निश्चित आहे.

पण तसा हक्क आपल्याला खरोखर आहे का..?? कुणी दिला..?? आपल्याला नक्की काय हवं आहे ..?

आपल्याला जे हवं आहे त्याचा पाठपुरावा आपण करतो फक्त मनाच्या समाधानासाठी... आपण इतके स्वार्थी असतोच, म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार करतो.. आपण फक्त मध्यबिंदू बनतो.. त्यातून मग छळ मांडतो स्वतःचा आणि दुसऱ्याचाही..!

काही का असेना आपण आपलं मूळ गावं, रक्ताची माणसं शोधायला हवीत... निव्वळ मनाच्या समाधानासाठी. त्यांचा शोध घेणं अशक्य नक्कीच नाही. ते काही परग्रहावर राहत नाहीत. याबाबतीत हर्षराजचं मत विचारात घ्यायला हवं. तिने ठरवलं.

हर्षराज तिला कॉलेजात भेटला. आयुष्यात पहिल्यांदा कुणातरी पुरुषाशी तिचं नातं जुळलं. .. मैत्रीचं...आणि पुढे प्रेमाचही.... पुढे दोघांनी एकत्रितपणे सप्तपदी घेतली.

वडिलाचं छत्र लहानपणापासूनच हरवलेल्या तिलोत्तमाला वडिलाचं नातं काय असते तेचं माहित नव्हतं. ते नातं कशा प्रकारचं असतं .. त्या नात्याची एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात काय भूमिका असते.. तेही तिला माहित नव्हतं. .. हर्षराजने तिची ती उणीवही भरून काढली. तिच्या आयुष्याबद्दल, आईबद्दल, दोघींच्या भूतकाळाविषयी त्याने कधीही विचारले नाही. त्याला माहित असणार होतं तेवढचं.. बस्स..! याउपर काहीही नाही.

" पण मी म्हणतोयं.. तुला गरजचं काय ... इतक्या काळानंतर आपलं गावं , नातेवाईक शोधण्याची..?? आईने तुला आपलं गाव , नातेवाईक शोधण्यास मनाई केली होती म्हणजे काही तरी कारण असेल ना त्यामागे... भूतकाळाचा शोध घेऊन तू जास्त सुखी होशील असं वाटतं आहे का तुला.. ? नीट विचार कर ..!" हर्षराजने तिला विचारलं.

" सुखाचा काही संबंध नाही त्याच्याशी .. !"

" मग..?? तुला केवळ काहीतरी साठवून ठेवण्याजोगी माहिती हवीय...?"

" नाही.. आईने तिच्या आत दडवलेल्या दुःखाचा शोध घ्यायचायं मला... ती जिवंत होती तोपर्यंत तिने तिच्या मनाचा थांगपत्ता लागू दिला नाही.. तिच्या मृत्यूपश्चात तरी मला ते जाणून घ्यायला हवं.. मला माझी माणसं , माझी माती शोधायची आहे रे.. नाहीतर माझं मन कधीच शांत राहणार नाही..!"

" त्याची खरंतर आता काहीच गरज नाही. कुतूहल, उत्सुकता म्हणून तू हे करू पाहतेस.. यातून तुझ्या वाट्याला जे येईल ते सोसण्याची मनाची तयारी असेल तरच प्रयत्न करायला हरकत नाही..!"

" तुझी साथ असेल तर तयारी आहे माझी...!"

हर्षराज कायमच तिच्याबरोबर होता. त्याच्या होकाराने तिलोत्तमाच्या मनातील गेली कित्येक वर्ष दाबून धरलेली उदासी, निराशा, अस्वस्थता त्या क्षणापुरती एकदम ओसरून गेली. त्या जागी आनंदाचा नवा स्त्रोत फुटला... आपल्या आईच्या अन् आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा नवा शोध घेण्याची उमेद तिच्या मनात जागी झाली.

तिने नकाशा घेतला. महाराष्ट्र- गुजरात बॉर्डरवरच्या प्रत्येक जिल्ह्यातली गावाची नावं तिने डोळ्यांसमोर धरली.

कसं शोधणार आपलं गाव..?? जेवढे वाटते तेवढे सोपे नाही काम.. तिला जाणवलं. वृत्तपत्रात जाहिरात द्यावी का ..?? पण चाळीस वर्षापूर्वी निधन पावलेल्या व्यक्तीला फक्त नावाने ओळखणं कठिण जाईल. वडिलांचा एकही फोटो आईने जतन करून ठेवू नये..?? आठवण म्हणून तरी...! कमाल आहे..आश्चर्यच नाही का हे..?

तिला काही सुचेना.

" तुझं माहेरच आडनाव झायगावकर ना..!" नकाशात पाहत हर्षराजने विचारले.

" हो, पण का.. ? त्याचा काय संबंध इथे..?"

" आहे संबंध. हे बघ, महाराष्ट्र- गुजरात बॉर्डरवर एक झाई नावाचं गाव दिसतयं.., अंधारात तीर मारून बघूया का .??.

" जमेल असं वाटत नाही.. आडनाव आणि गावाचा काय संबंध..??"

" अगं, महाराष्ट्रात बरीच आडनावं लोकांच्या मूळ गावाच्या नावावरून आहेत..!"

तिला हर्षराजचं पटलं. तिला आठवलं, कधीतरी भूतकाळातल्या स्मृती जागवताना तिची आई बंदराचा उल्लेख करायची म्हणजे गावाच्या आसपास नक्कीच समुद्र किनारा असावा.. दोघांनी अंदाज बांधला.

'प्रयत्न वाळूचे कण रगडिता...' म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ती तत्पर होती.

तिने कल्पनेत अनेक गोष्टी रंगवल्या. आपलं गाव, आपली माणसं, न पाहिलेल्या वडिलांविषयी असणारं प्रचंड कुतुहल .. हे सारं जाणून घ्यायची ओढ तिला लागली. हर्षराज सोबतीला होताच.. त्याच्या सोबतीने ती मायलेकींचा निद्रीस्त भूतकाळ जागा करणार होती... नव्हे जणू ती भूतकाळ जगणार होती.

दोघेही गावात उतरले तेव्हा वातावरण ढगाळलेलं होतं. परिसर शांत होता.

गावाबाहेरच्या पारावर एक वयोवृद्ध व्यक्ती बसलेली पाहून दोघेही त्या व्यक्तीच्या जवळ गेले.

" आजोबा, इथे धैर्यवान जायगावकरांचे घर कुठे आहे...?" तिलोत्तमाने थेट प्रश्न विचारला.

" कोण पाहीजे..??" आजोबांनी आपल्या धूसर नजरेने डोळ्यांना ताणून पाहत विचारले.

" धैर्यवान जायगावकर.. जे चाळीस वर्षापूर्वी वारले..!!"

" चाळीस वर्षापूर्वी वारले..?? नाही माहित मला कोण ते....!"

अंधारात मारलेला तीर फुकट गेल्याची जाणीव दोघांना झाली.

निराशा, हताशा पदरी घेत दोघे परत जाण्यासाठी वळले.

तेवढ्यात आजोबांनी त्यांना हाक मारून जवळ बोलावलं.

" पोरी, आठवलं . धैर्यवान जायगावकर नावाचा एक माणूस बाजूच्या गावात होता. मोठा श्रीमंत माणूस.. पण तो मरून पाच-सहा वर्षच झाली.. चाळीस वर्षापूर्वी मेलेला तो दुसरा कुणी तरी धैर्यवान जायगावकर असेल..!"

तिनेही मान डोलवली.

"काय नातं पोरी तुझं धैर्यवान जायगावकरशी..??"

" मी त्यांची मुलगी...!"

आजोबा काही क्षण विचारात पडले.

" त्यांना एकच मुलगा आहे.. तो पण परगावी राहतो .. त्यांना मुलगी आहे की नाही ते माहित नाही मला. ..!"

पदरी फक्त निराशाच पडतेयं की काय असा विचार तिलोत्तमाच्या डोक्यात आला तेवढ्यात हर्षराजने तिला पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहुया म्हणून आजोबांनी सांगितलेल्या गावी जाण्यास तयार केले.

आजोबांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दोघे बाजूच्या गावी निघाले. रस्त्याने मोळीचा भारा घेऊन चालेल्या एका स्त्रीला त्यांनी धैर्यवान जायगावकरांचा पत्ता विचारला.

दोघांकडे नवलाने आळीपाळीने पाहत समोरच टेकडीवजा उंचवट्यावर असलेल्या बंगल्याकडे तिने हात दर्शवला.

समोर जे घर दिसले त्याला घर न म्हणता एखादा छोटेखानी राजवाडा म्हणायला हवं असं तिलोत्तमाला वाटलं. भूतकाळातील संपन्नतेच्या खुणा ते घर अजून अंगावर बाळगून होते. समोरच्या भल्यामोठ्या शिसवी दरवाज्याला कुलूप असल्याचं त्यांना दिसलं. दोघेही आजूबाजूला कोण भेटतंय का ह्याचा नजरेने अंदाज घेऊ लागले.

घरासमोर प्रशस्त अंगण होतं. घराशेजारी बाजूलाच मंदिर होतं. मंदिराच्या मागच्या बाजूला लहानसं घर होतं.. बहुतेक नोकर माणसांना राहायची तिथे सोय असावी.

तिथेच ओट्यावर एक म्हातारी स्त्री सुपात धान्य पाखडत बसलेली त्यांना दिसली.

" मावशी...!!" तिलोत्तमाने आवाज दिला.

" कोण ते..?" डोळ्यावरचा जाड भिंगाचा चष्मा सावरत ती स्त्री उद्‌गारली.

" धैर्यवान जायगावकर इथेच राहायचे का..??"

" हो.. धाकटे मालक ह्या घरातच राहायचे पण आता ते जिवंत नाही आहेत.. तुम्ही कोण..?" त्या स्त्रीने विचारलं.

" त्यांची पत्नी, मुलं ती कुठे असतात..?" हर्षराजने विचारलं.

" त्यांची पत्नी आणि मुलगा परदेशी असतात... लहानपणापासून मी जायगावकरांकडे काम करतेयं. इथेच वाढले, थोरल्या मालकांनीचं माझं लग्न लावून दिलं. माझे धनी वारले दोन वर्षापूर्वी.. मुलंबाळं नाहीत मला .. आता एकटीच राहतेयं इथे.. पूर्वी गावात राहायचे आता मंदिरामागच्या घरात राहतेयं मी. तुम्हांला कुणाला भेटायचंय..??" आपली संपूर्ण माहिती त्या म्हातार्‍या स्त्रीने सांगितली.

" कुणालाही नाही..!" हताशतेने तिलोत्तमा म्हणाली.

" मग..? इथपर्यंत येण्याच कारण काय .??"

तिलोत्तमाच्या गळ्यात हुंदका दाटून आला. हर्षराजने तिला सावरलं.

" काय झालं बाय..?" त्या स्त्रीने ममतेने विचारले.

हर्षराजने दोघांचं त्या परिसराला भेट देण्याचं प्रयोजन सांगितलं. हर्षराजकडून सगळं ऐकल्यावर ती म्हातारी स्त्री सुद्धा विचारात पडली.

" गावाचं नावच माहित नाही तर नुसत्या अंधुक माहितीवर जिवंत नसलेलं माणूस आणि नातेवाईक कसं बरं शोधणार..?? " ती स्त्रीही चुकचुकली.

दोघे दमून मंदिराच्या कट्टयावर बसले. शांतता , स्तब्धता काय असते त्याचा विलक्षण अनुभव दोघांना आला. त्या स्त्रीने दोघांना प्यायला पाणी दिलं. देव तुमची इच्छा लवकरच पूर्ण करो असं म्हणत तिने देवासमोर हात जोडले.

" हे मंदिर कोणी बांधलं मावशी..!" तिलोत्तमाने कुतुहलाने विचारलं.

" थोरल्या मालकांनी.. देश स्वतंत्र होण्यापूर्वी मालकांचं घराणं सुभेदार पदावर होतं.. हे गाव , हा परिसर पूर्वी संस्थान म्हणून प्रसिद्ध होता.. आता जरी तुम्हांला गावात गजबज दिसली नसेल तरी कोणे एकेकाळी खूप गजबजाट होता गावात..! आताची नवी पिढी शहरात शिकायला आणि नोकरीला गेली आणि गाव ओसं पडलं.. नावापुरता पण माणूस सापडायचा नाही गावात पुढच्या काही वर्षात..!! " ती स्त्री गतकाळात रमली. तिच्या पांढऱ्या होऊ पाहणाऱ्या पापण्या गतस्मृतींनी ओलावल्या. इतिहासाच्या खुणा ती जागवू लागली.

" थोरल्या मालकांच्या काळात इथे मंदिरात पूजा-अर्चा , देवाची भजनं, जागरण होतं. हिराबाई नावाची गायिका होती.. देवाची भजनं सुरेख आवाजात गायची.. इथेच थोरल्या मालकांनी तिला राहायला घर दिलं. तिचा आवाज ऐकायला पंचक्रोशीतून माणसं जमायची मंदिरात.. ! "

" हिराबाई..?" तिलोत्तमाची उत्सुकता जागी झाली.

" हो, हिराबाई नाव होतं तिचं.. तिच्याबद्दल बऱ्याच वंदता होत्या त्याकाळी. कुणी म्हणे, हिराबाई मुळची मथुरेची, वृंदावनात राहणारी विधवा होती तर कुणी म्हणे, कानपुरच्या एका कोठ्यावर शौकीनांसाठी ती आपली गाण्याची कला सादर करायची.. कुणाला खरंतर तिचाबद्दल खरं काहीच माहित नव्हतं. ती कोण होती, कुठली होती. काहीच पत्ता नाही..!"

" मग ती इथे कशी आली..?" हर्षराजने उत्सुकतेने विचारलं.

थोरल्या मालकांनी आणलं हिराबाईला इथे.. आपलं अंगवस्त्र म्हणून..! .बडोद्याला गेले असता त्यांना तिथे भेटली हिराबाई..! पंचक्रोशीत खळबळ माजली. सुभेदाराने नायकीणीला गावात आणून घरात ठेवली म्हणून. ती इथे आली आणि बंगल्यात वादळ आलं. थोरल्या मालकीणबाईंनी तिला घरात राहण्यास विरोध केला. पण सुभेदारांपुढे मालकीणबाईंचं काही एक चाललं नाही. त्यावेळी धाकटे मालक म्हणजे धैर्यवान जायगावकर लहान होते. तेही एकुलते एक होते. शेवटी घरात कलह नको म्हणून सुभेदारांनी हिराबाईला ते घर मंदिरापाठी बांधून दिलं राहायला ..!" मंदिरापाठच्या घराच्या दिशेने अंगुलीनिर्देश करत म्हातारी स्त्री म्हणाली.

तिलोत्तमा आणि हर्षराज दोघेही त्या स्त्रीच्या गतस्मृतीत तिच्यासोबत रंगून गेले.

" हिराबाईला एक मुलगी होती..!" म्हातारी हळव्या स्वरात म्हणाली.

" मुलगी.?? थोरल्या मालकांपासून झालेली का...?"
तिलोत्तमाने कुतूहलाने विचारलं.

" नाही. हिराबाई जेव्हा इथे आली तेव्हा तिच्यासोबत तिची दहा - बारा वर्षाची मुलगी होती तिच्यासोबत..!"

" पुढे काय झालं.. नाव काय होतं तिच्या मुलीचं..?" म्हातारीच्या कथेत रंगत गेलेले दोघेही एकाच वेळी उद्‌गारले.

" नाव..??" नीरा नाव होतं तिचं..!"

" नीरा...!" तिलोत्तमा स्वतःशीच पुटपुटली.

" आईसारखाच तिचा आवाजही अतिशय गोड होता.. सुंदर, सोज्वळ मुलगी होती. माझ्यापेक्षा लहान होती.. पण आमची गट्टी जमायची. कृष्णाची भजनं अतिशय सुरेख गायची. दुर्दशा झाली बिचाऱ्या मायलेकींच्या आयुष्याची..!" म्हातारी हळहळू लागली.

हे ऐकून तिलोत्तमाचा श्वास वरखाली होऊ लागला.
नीरा तर आपल्याही आईचं नाव होतं.. राधादेवी हे तर तिने गाण्याच्या दुनियेत घेतलेलं नाव. हि स्त्री हिराबाईच्या मुलीचे जसं वर्णन करतेयं ते आपल्या आईच्या संदर्भात तंतोतंत जुळतेयं.. योगायोग असेल कि अजून काही _

तिलोत्तमा चमकली.

__ आणि अजून एक साध्यर्म..' धैर्यवान जायगावकर.!"

आपल्या वडिलांचे नाव ...

तिलोत्तमाचं डोकं बधीर होऊ लागलं.

" काय झालं मायलेकींचं पुढे..?" तिचा श्वास फुलला.

" पुढे वयात आल्यावर नीराच्या गोड आवाजावर आणि सोज्वळ चेहर्‍यावर धाकटे मालक भाळले. वयच होतं तसं ते प्रेमात पडायचं. नीरा तर अतिशय गोड मुलगी होती. तिच्यावर कुणीही भाळलं नसतं तर नवलंच..! प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर .. . पण त्यांच्यासाठी ते प्रेम असलं तरी जगासाठी तो गुन्हा होता ... एका खानदानी, प्रतिष्ठीत, वर्चस्ववान पुरुषाच्या प्रेमात एखाद्या नायकीणीच्या, रखेलीच्या मुलीने पडावं..?? लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घ्याव्यात..?? हा गुन्हा नाही तर काय..? आहुती पडली बिचाऱ्या नीराच्या आयुष्याची..!"

तिलोत्तमाला वाटलं आता आपल्याला रडू फुटेल.. पण कशाकरता रडायचं... ? कुणाची कहाणी ऐकतोयं आपण...? आपल्या आईची...?? छे ..छे.. काहीतरीच... मन पण उगाच उलटसुलट विचारांनी पाखरासारखं नुसतं भिरभिरत राहतं. ताब्यात काही केल्या राहत नाही.

" प्रेम जरी आंधळं असलं तरी जग डोळस असते पोरी... ! लपून काहीच राहिलं नाही. थोरल्या मालकांनी आणि मालकीणबाईंनी मायलेकींना जाब विचारला. भाबड्या नीराने खरं उत्तर दिलं. हिराबाईला काहीच कल्पना नव्हती. तिने नीराला खडसावलं. वास्तवाची जाणीव करून दिली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. निसर्गाने आपलं दान नीराच्या पोटी घातलं. धाकट्या मालकांपासून नीरेला दिवस गेले.. तोंड पाडून हिराबाई थोरल्या मालकांकडे गेली. लेकीला पदरात घ्यायला विनवू लागली. मग मात्र सुभेदार खवळले. धाकट्या मालकांनी कच खाल्ला. त्यांचाही नाईलाज झाला. ते कपटी नव्हते पण थोरल्या मालकांच्या दबावापुढे झुकले. आपल्या प्रेमामुळे घराण्याच्या इभ्रतीला कलंक लागू नये म्हणून त्यांनी कानावर हात ठेवले. विश्वामित्री पवित्रा घेतला. थोरल्या मालकांकडून मायलेकींना गावातून निघून जाण्यास बजावले गेले. त्याच रात्री हिराबाईने मंदिरापाठच्या लिंबाच्या झाडाला फास लावला आणि दुसऱ्या दिवशी नीरा गावातून बेपत्ता झाली. पुढे तिचं काय झालं ते कुणालाचं माहित नाही... थोरल्या मालकांनी नंतर आपल्या लेकाला दूरदेशी पाठवलं... पुढे त्यांचं लग्न झालं आणि एक मुलगा झाला.. ते संसारात रमले.. पण बिचाऱ्या हिराबाई आणि नीराच्या आयुष्याची राखरांगोळी झाली !" म्हातारीने डोळ्यांना पदर लावला.

थरथरत्या हाताने तिलोत्तमाने आपल्या पर्समधून फोटो काढला.. आपल्या आईचा.. तरुणपणीचा..!

" मावशी, हिला तुम्ही ओळखता..??" तिचा स्वर कापरा झालेला.

म्हातारीने फोटो नीट न्याहाळला. ती चकीत झाली.

" हि तर नीरा... हो नीराच ती. हिराबाईची लेक.. तोच चेहरा.. तेच हसू...! पण तू कशी ओळखतेस तिला..?"

" मी तिची मुलगी आहे मावशी.. धैर्यवान जायगावकर माझे वडिल आहेत..!" तिलोत्तमा जोरजोराने रडू लागली.

रडणाऱ्या तिलोत्तमाला हर्षराजने जवळ घेतलं. मोठ्या मायेने तिचे डोळे तो पुसू लागला.

म्हातारी तिच्याकडे निरखून निरखून पाहत राहिली. जणू नीरेलाच पाहते आहे . मग म्हणाली,

" नीरेची मुलगी.. माझ्या नीरेची मुलगी... !" तिचे हात हातात घेत कुरवाळू लागली. टिपं गाळू लागली.

तिलोत्तमा बंगल्याच्या उघड्या ओट्यावर आली. ओट्यावरच्या भिंतींवर सुभेदार घराण्यातील दिवंगत पुरुषांचे फोटो ओळीने लावलेले होते.

ती धैर्यवान जायगावकरांच्या फोटोसमोर उभी राहिली.

धैर्यवान जायगावकर आपले वडील आहेत..? असं कसं
म्हणू शकतो आपण .. फक्त ते आपले जैविक पिता आहेत म्हणून...?

__पण त्यांनी तर आपलं अस्तित्वचं झिडकारलं होतं.. नाकारलं होतं.. मग..?? आपण त्यांची अनौरस संतती आहोत..?? हो हेच सत्य आहे. कटू सत्य.. ते न नाकारता येण्यासारखं..!

ती स्तब्ध झाली.

आपल्या आईवर जर त्यांचं खरं प्रेम असतं तर त्यांनी कुठल्याही परिस्थितीत तिचा आणि तिच्या पोटात असलेल्या आपला स्वीकार केला असता.. पण नाही केला त्यांनी.. !

का केला नाही..?? प्रतिष्ठेसाठी, भीतीपोटी. की मग आईवरचं त्यांचं प्रेम हे सुद्धा एक नाटक होतं.. की, होती फक्त वासना.. क्षणभराचं आकर्षण...! तसं असेल तर मग आईचही चुकलचं .. ती सुद्धा तारुण्याच्या, वासनेच्या प्रवाहात वाहवत गेली.. खोटं बोलली ती आपल्याशी.. तिने आपल्याला खरं कधीच सांगितलं नाही..

पण तिला तरी कसा दोष द्यायचा..?? काय अधिकार आपला..?? ती तरुण होती.. बेभान झाली असेल प्रेमात. अजाणता एखाद्या निसरड्या क्षणी पाऊल वाकडं पडलं असेल.. मात्र तिच्या प्रेमात सच्चेपणा होता.. तिने पोटातल्या बाळाचं अस्तित्व नाकारलं नाही. आपल्या प्रेमाचं प्रतिक म्हणून तिने आपल्याला जन्म दिला असेल..?? असं असू शकेल.. ? कदाचित असेलही...! पुढच्या आयुष्यात संयमाने, स्वाभिमानाने जगली ती.. आपल्या कलेला , गाण्याला सन्मानाने वागवलं तिने..!

आई आज तू हे पाहायला जिवंत नाहीये ते एकाअर्थी चांगलचं म्हणावं असं वाटते मला... तुझ्या दुःखाचा , वेदनेचा मी घेतलेला शोध कदाचित तुला आवडला नसता.. त्याने तुझं दुःख शतपटीने वाढलं असतं.. माफ कर मला... ' अज्ञानात सुख असतं ' हेचं खरं...!

किती अपेक्षा होत्या आपल्या भूतकाळाकडून...! आपल्या आईचं अज्ञात दुःख जाणून घेत.. आपल्या माणसांना , आपल्या मातीशी नवं नातं जोडायचं होतं.. काय मिळालं आपल्याला..? भूतकाळाचा हा विचित्रपट आपल्या समोर उघड झाला. भाबड्या आशा होत्या आपल्या. आपण सरळ तर जग पण सरळ.. तसं नसतंच मुळी..! हि दुनिया एक विचित्रपटच आहे.. म्हणायला बुद्वीबळाचा पट.. पण इथे खेळ बुद्धीचा नाही बळाचा चालतो.. बळ नेहमीच जिंकते इथे..! दुबळ्या प्याद्याची बुद्धीबळाच्या पटावर नेहमीच मर्यादित चाल असते अन् राजा, घोडा , वजीर नेहमीच बलवान.. प्याद्याचा बळी घेण्यासाठी ते सदैव अमर्यादित चालीने खेळणार.. तो डाव, पट सगळं त्यांच्यासाठी.. आहुती मात्र प्याद्याची पडणार..!

आपण, आपली आई, तिची आई एक क्षुल्लक प्यादी.. आणि हे सुभेदार , हा समाज.. हे राजा, वजीर , हत्ती.. ते नेहमीच जिंकणार..!

तिलोत्तमा संतापाने बेभान झाली. अंगणातला दगड उचलून घेत आपल्या वडिलांच्या म्हणजे धैर्यवान जायगावकरांच्या फोटो समोर आली. ' धैर्य फक्त तुमच्या नावात आहे धैर्यवान जायगावकर ' प्रत्यक्षात तुम्ही घाबरट, पळपुटे आहात.. ! तिचं मन आक्रदंन करू लागले. त्यांच्या फोटोवर मारण्यासाठी तिने दगड उगारला. मात्र क्षणात तिचा हात तिच्याही नकळत खाली आला. तिला आईचे बोल आठवले.

"" एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असतात.. तिलोत्तमा. माणसालासुद्धा बाजू असतात... !"

ती खाली बसली. उद्वीग्न, सुन्न मनोवस्थेत..तिला भडभडून आलं.

" तुझं अस्तित्व माणसांनी , समाजाने जरी नाकारलं तरी निसर्गाने ते नाकारलेले नाही. कुणी आपल्याला नाकारलं म्हणजे आपल्यात काही कमीपणा आहे असं कधीच मानू नये.. आपल्यात उणीवा शोधत बसू नये..!" तिला हळुवार स्पर्श करत हर्षराज म्हणाला.

ती स्फुंदू लागली.

" तू मला कबूल केलं होतंस की, भूतकाळाचा शोध घेताना जे समोर येईन त्याला सामोरे जाईन म्हणून.. आठवतेयं ना..?"

" हो.. तुझी साथ असेल तर .. नक्कीच..!" डोळे कोरडे करत तिलोत्तमा म्हणाली.

" मी कायमच तुझ्यासोबत आहे तिलोत्तमा..!" तिला जवळ घेत हर्षराज प्रेमाने म्हणाला.

ती हसली.. मनमोकळेपणाने...!

बाहेर वातावरण ढगाळलेलं होते... पावसाची चाहुल लागली. तिलोत्तमा बंगल्याच्या ओट्यावरून बाहेर अंगणात आली. पावसाचे थेंब तिच्या अंगावर पडले. पाण्यामातीचा गंध भवताली बिलगून आला.

__ क्षणभर .. अगदी क्षण दोन क्षण ..तिला भास झाला.. आपल्या आईचा... ती उभी असल्याचा.. तिच्या सोबतीचा..!!

समाप्त..!

धन्यवाद..!

©रूपाली विशे - पाटील

( सदर कथा काल्पनिक असून कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखावणे हा कथालेखिकेचा उद्देश नाही)

.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. आवडली.
काही लोकांचे आयुष्य एव्हढे कॉम्प्लीकेटेड का असते?

चांगली होती गोष्ट
पण थोडी प्रेडिक्टेबल होती ,
गोड गळ्याने घात केला ह्या वाक्याने थोडा अंदाज आला कथा काय असेल ह्याचा

खूप छान लिहिलीस कथा! अनेक कंगोरे होते.. पुलेशु.

मा‍झ्या डोळ्यांसमोर मराठी चित्रपट तरळुन गेला- नीरा- आशा काळे, तिलोत्तमा- निवेदिता जोशी, हर्षराज- ..., धैर्यवान- रविंद्र महाजनी, थोरले मालक- विक्रम गोखले, हिराबाई- जयश्री गडकर.
व्हॉट से पीप्स ? Wink

छान..
बऱ्याच दिवसांनी तुमची कथा आली.

छान कथा.
(जयश्री गडकर ची मुलगी आशा काळे???)

केशवकूल, धन्यवाद.. ! काही जन्मजात दुर्भाग्यशाली असतात ज्यांचं आयुष्य खरंच कॉम्प्लीकेटेड असते.

किल्ली , आशु, वीरुजी, योगी, उर्मिला, एस्, साधनाजी, दत्तात्रेयजी, आईची लेक, ऋन्मेष, लावण्या, अनु खूप आभार तुमचे..!

वीरुजी - हो, बऱ्याच महिन्याने लिहिली कथा..! कथा लिहायचा उत्साह असतो तेव्हा वेळ नाही आणि वेळ मिळाला की उत्साह नाही .. ही गत आहे सध्या.

आशु - तुम्ही मस्त सुचविले आहेत सगळे कलाकार.. अनु म्हणताहेत त्याप्रमाणे जयश्री गडकर आणि आशा काळे समकालीन आहेत त्यामुळे सुलोचना छान शोभतील हिराबाई.. थोरले मालक म्हणून श्रीराम लागू किंवा मग अरुण सरनाईक शोभतील का.?? धाकटे मालक म्हणून रविंद्र महाजनी किंवा विक्रम गोखले दोघेही छान वाटतील. सोनाली कुलकर्णी ( सिनियर ) तिलोत्तमा किंवा मग अमृता सुभाष आणि तुषार दळवी हर्षराज म्हणून पण आवडतील मला.

खरच एखाद्या मराठी चित्रपटाची कथा वाचतोय अस वाटल, जे कलाकार वरील कमेंट मधे आलेत ते कथा वाचताना डोळ्या समोर येत होते.
सुरेख लेखनशैली
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा

अवल, manya खूप आभार... प्रतिसाद आणि शुभेच्छांसाठी..!

कथा छान फुलवली आहे. विशेषतः इतकी परवड होऊनही "अनेक बाजू" असतात हे तत्त्व मनाशी बाळगून राहिलेली आई.. असं समतोल साधणं किती कठीण असतं.

मस्त होती कथा.

प्रतिसाद नंतर पाहिले. पण खरंच डोळ्यापुढे चित्रं येत होती. पात्रांची नावं खूप कल्पक.
कॅसेटकिंग वरून काही काही सत्यकथा आठवल्या.
सकाळी सकाळी छान वाचलं कि दिवस चांगला जातो.

Pages