एकदा काय झालं....

Submitted by ASHOK BHEKE on 18 November, 2023 - 23:18

साधारणत: पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट. त्यादिवशी दहीहंडी उत्सव होता. ठिकठिकाणी दहीहंडी बांधली असल्यामुळे घोडपदेवला गोविंदाची गर्दी दिसत होती. मी देखील या गर्दीतला एक भाग होतो. त्यावेळेला कोंबडी बाजा वाद्य होते. त्या वादयाच्या तालावर गोविंदा एका रांगेत नाचत नाचत पूढे जात होते. मागे बैलाच्या लाडीसावर सुंदर वेशभूषा धारण करून मुले राम-कृष्ण हंनुमान बनून शोभारथ त्या गोविंदाची शोभा वाढवीत होते. खूप आनंदी वातावरण असायचे. त्यादिवशी इकडे तिकडे फिरत असताना अमरज्योत मंडळाचा गोविंदा निघाला. बुवाचाळी पासून सुरू झालेल्या गोविंदाचा आनंद घेत मी देखील सामील झालो. ढाकू माकुम करीत वाळूंजचाळी कडे गोविंदा प्रस्थान करू लागला. बारीक पाऊस असून देखील चाळीतून पाण्याने भरलेले फुगे अंगाखांद्यावर येऊन आदळत होते. ते थंडगार पाणी अंगावर काटा आणीत होते. वाळूंज चाळ आणि पेटीवाला चाळीच्या समोर खोजा चाळीला लागून एक दहीहंडी बांधली होती. तेव्हा अतिउंचावर दहीहंडी बांधत नसत. इनाम देखील नसे. आनंदाखातर दहीहंडी बांधायची. गोविंदा मंडळे ती फोडीत असत. दहीहंडी फोडायला गोविंदा आला की, घराघरातून महिला मुले धावत येत होती. सभोवताली खूप गर्दी झाली होती. कोंबडी बाजा तालात सूर धरून वाजत होता. इकडून तिकडून आवाज वाढला होता. जल्लोष सुरू होता. तेव्हा नेमकं काय घडलं, ते मी आजही विसरलो नाही आणि विसरता येणार नाही.
खोजा चाळीत रामचंद्र चतुर नावाचे गृहस्थ राहायला होते. आजही त्यांची खोली आहे. त्या चतुरांनी आपल्या घरात माकड पाळले होते. ते घरात कमी पाण्याच्या नळावर अधिक बसलेले असायचे. माणसाळलेले होते. त्याच्या आजुबाजुने गेले तरी कुणाला कधी दगाफटका त्याने केला नाही. पण त्यादिवशी त्याला काय झाले, कुणास ठाऊक. कदाचित कोंबडीबाजामुळे, गोविंदाच्या आवाजामुळे अचानक बिथरले असावे. दहीहंडी उत्सवाची मजा पाहत ते बसले होते. माणसासारखे ते माकड दहीहंडी उत्सवाची मजा घेत आहे हे लोक बघत होते. मलाही त्याचे वागणे पाहून आनंद झाला होता. पण अचानक त्याने माझ्यावर झेप घेतली. आणि माझ्या डाव्या दंडाचा मांसल भाग चावला. चावला कसला, अहो लोचकाच तोडला. त्यावेळी माझे वय जेमतेम दहा वर्षे. त्याचा अकस्मात हल्ल्याने मी भयभीत झालो. माझ्या डाव्या दंडातून रक्तप्रवाह वाहू लागल्याने रडू लागलो होतो. तेथे उभे असलेल्या मला नांव आठवत नाही, एका आजीने महापालिका दवाखान्यात जायला सांगितले. मी रडत रडत दवाखान्यात गेलो. तेथे असलेल्या दवाखान्यातील डॉक्टर, ख्रिश्चन गृहस्थ असलेले कंपौंडर यांना माझी दया आली. तेव्हा केसपेपरची नोंदणी करायला दहा पैसे घेत असत. पण त्यांनी काही न घेता माझ्यावर उपचार केले. इंजेक्शन आणि दंडाला पट्टी मारून मला घरी जाऊन आराम करायला संगितले. समाधान आणि कृतार्थ भावनेने हृदय दाटून आले. तसाच घरी गेलो. आईला सर्व हकीकत कथन केली. त्या माकडावरचा राग आतल्याआत दाबून तीने मायेने माझ्या डोक्यावर हात फिरविला. त्याक्षणी मी अर्धा बरा झालो. आईसारख्या ईश्वराकडून मानसिक आधाराचा हात अपेक्षित असतो. तोच डोईवर ठेवल्याने जखमा देखील झटदिशी भरून येतात.
माणसं पाळीव प्राणी पाळतात. पण त्यांना आवाजामुळे अत्यंत त्रास होतो. त्यामुळे ते चिडून हल्ला करतात. घरात नासधूस करीत असतात. सावळकर नावाचे गृहस्थ होते. त्यांच्याकडे दोन बैल होते. दिवसभर त्या बैलांना खटार्‍याला जुंपून मालवाहतूक करीत होते. ते प्राणी दिवसभर श्रमाने थकत असायचे. संध्याकाळी हरिष अर्जुन पालव मार्गावर तवेवाल्याच्या कारखान्यासमोर त्यांना उभे करीत असत. एक दिवशी एक टॅक्सी हॉर्न वाजवित चालली होती. त्या ड्रायव्हरला कदाचित सलगतेने हॉर्न वाजवित जाण्याची सवय असावी. त्या बेसुर आवाजाने माणसांचे कान बधिर झाले होते. तर त्या प्राण्यांचे दशा कोण विचारात घेणार...! ती टॅक्सी जवळ जवळ येत होती. त्या बैलजोडीतला काळा बैल तयारीत असावा. जशी टॅक्सी बाजूने जावू लागली तसा त्या बेलाने आपल्या उजव्या पायाने असा तडाखा दिला की, त्या टॅक्सीचा मागचा दरवाजा आंतमध्ये गेला. अकस्मात झालेला हल्ला टॅक्सी ड्रायव्हर गोंधळून गेला होता. त्याच्या कर्कश आवाजाने त्रस्त नागरिकांनी बरं झाले म्हणून आपला मार्ग धरला. बैलाने टॅक्सी ड्रायव्हरला अद्दल घडविली पेक्षा पर्यावरण आपण मंडळी किती दूषित करीत असतो. माणसात आणि जनावरं यांच्यात फरक काय? जनावरं वाकलेली असतात तर माणसं ताठ कण्याची असतात. जनावराना बुध्दी दिली पण त्यांचे जीवन जगण्यासाठी. माणसांना बुध्दी दिली स्वत:च्या हातून स्वत:चे जीवन बरबाद करून घेण्यासाठी का...? मला माकड चावले ते गोंगाटाने त्रस्त झाल्यामुळे....
आज सहज त्या घटनेची आठवण झाली आणि लिहिता झालो. या दोन ओळीच्या प्रपंचात माझी एक आठवण.

अशोक भेके
घोडपदेव समूह

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरे आहे.. मुक्या प्राण्यांना उगाच त्रास देऊ नये हे संस्कार आपल्या सर्वावर झाले असतात. आपणही आपल्या मुलांना हेच सांगतो. पण दैनंदिन जीवनात जे काही सवयीने करतो त्याचा प्राण्यांना त्रास होत असेल याचा आपल्याला विसर पडतो.

पोरांसोबत गार्डन मध्ये फिरताना एखादा पक्षी कुठे दाणा टिपताना दिसला तर मी पोरांना आवर्जून दुरून चालायला सांगतो. आपली चाहूल लागताच तो घाबरून उडतो हे मला एखाद्याला जेवणाच्या ताटावरून उठवल्यासारखे वाटते.

>>>>>>हे मला एखाद्याला जेवणाच्या ताटावरून उठवल्यासारखे वाटते.
साने गुरुजींनंतर तुम्हीच Wink

हा हा सामो.. तसे नाही पण संवेदनशील आणि प्रॅक्टिकल याच्या अध्येमध्य राहायचा प्रयत्न करतो. कदाचित आपल्याच सोयीनेही असेल.
म्हणजे नॉनव्हेज आवडते. त्यामुळे प्राण्यांना खायला मारा ते ठिक वाटते, तो निसर्गाचा नियम वाटतो. पण मनोरंजनासाठी त्रास देऊ नका असा विचार करतो.
ताटात अन्न टाकायला जीवावर येतेच, पण एखाद्याने नॉनव्हेज टाकले तर जास्त जीव कळवळतो. कोणीतरी जीव दिलाय तुमचे पोट भरायला त्याची तरी कदर करा असा विचार डोक्यात येतो.