आमचे धोत्रे गुरुजी ( भाग ४)

Submitted by मिरिंडा on 16 November, 2023 - 13:40

                 मी कपाटा मागे लपलो,ते कपाट किती जुनं होतं माहित नाही. पण वर्षानुवर्षाचा कुबट वास त्याला येत होता. अजून मला त्या स्त्रीचं नाव माहीत नव्हतं. तिला विचारायची संधीच मिळाली नाही. दरवाज्या उघडल्याचा आवाज झाला. नंतर लाथेने दरवाज्या ढकलून दोघेजण आत शिरले. त्याबरोबर ती स्त्री जमिनीवर भेलकांडली आणि पुढील शब्द ऐकू आले. " काय ग ए भवाने,कोनाला आनलंस घरात? कुटं हाय त्यो ? त्या आवाजाने तिचा मुलगा घाबरुन किचाळला " आई ग ऽऽ " तिच्या एक कानाखाली मारीत एक दणकट माणूस शिव्या देत तिचे केस धरून ओरडला," ए बोल की कुटं हाय पावणा ?  गुरुजींबद्दल काय बोलतोय , आं ?" तिला आणखीन एक मारणार एवढ्यात मीच कपाटामागून बाहेर येत म्हंटलं," सोड तिला,मी इकडे आहे. " तो तावातावाने माझ्यावर धाऊन आला. दुसऱ्या माणसाने तिचे केस पकडून धरुन ठेवली. माझ्या कानफटात मारण्यासाठी त्याने हात वर उचलला,पण मी तो वरच्यावर धरुन उलटा फिरविण्याचा प्रयत्न करु लागलो. तेवढ्यात त्याने दुसऱ्या हाताने माझ्या जबड्यावर दणका दिला. कानशिलात येणारी कळ दाबीत मी ओरडलो," कोण रे तू ? बाईमाणसाच्या घरात घुसून अरेरावी करतोस ? " असं म्हणून मी त्याच्या तोंडावर फाईट मारली तो कोलमडू लागला. स्वतःला सावरत माझा एक हात पिरगळत म्हणाला," काय रे, कशापायी पायजे गुरजीची म्हाइती? तू कोन हाय त्याचा ? गुरजीकडे गांजा सापडला, म्हनूनशान हाकलला शालेतून. चल निघ हितून न्हाईतर कोथला भायीर काढील " असं म्हणून त्याने मला दरवाज्याबाहेर ढकललं.आणि मोठा सुरा काढला. नंतर तिला धमकी देऊन म्हणाला," परत काय म्हाइती दिलीस तर जीभ कापून टाकील आनी हे तुजं कार्ट हाय ना तेला चिरुन,तुज्या हातात दील." ती भीतीने थरथरत होती. मग माझ्याकडे पाहून ओरडला," तू अजून हितंच ? निघ की भाड्या. " मग मात्र मी निघालो.माझं मन आक्रंदत होतं. " गुरुजी आणि गांजा ? शक्यच नाही." तपकिरी शिवाय त्यांना कोणतंच व्यसन नव्हतं.......खरंतर मला पोलीस ठाण्यात जायला पाहिजे होतं. पण मी गेलो नाही. त्याने माझ्या अडचणी बऱ्याच वाढल्या असत्या. मी तिथून निघालो. हॉटेल वर पोहचलो. दुपारचे दोन वाजत होते. माझ्या तोंडाची उजवी बाजू हळूहळू सुजत होती.इथे कोणतेही उपचार मिळणं कठीण होतं. गावात फिरणंही धोकादायक होतं. उद्या मिळेल ती बस पकडून घरी जायचं ठरवलं. मी अजूनही का थांबत होतो, कळत नव्हतं. मला अतिशय अस्वस्थ वाटत होतं. खरंतर मी आत्ताही निघू शकत होतो. पण , कोणत्याही बाबतीत , जेव्हा आपल्या हातात काही नसतं तेव्हा काही हालचाल न करता वाट पाहण्याची माझी पद्धत होती. कारण आजूबाजूच्या परिस्थितीला कृती करायला संधी द्यावी,असं माझं मत होतं. म्हणजे काहीतरी डेव्हलपमेंट होते आणि काही वेळा ती आपल्या फायद्याची असते. माझी ही अटकळ बऱ्याच वेळा बरोबर यायची. कामामधेही मी अडचणीच्या वेळी हीच पद्धत वापरीत असे. अगदी तसंच इथेही घडलं. दुपार नंतरचा वेळ जाईना,कारण गावात माझे संबंध अजिबात नव्हते. दुसरा एक प्रश्न होता ,की गाव लहान असल्याने मी या हॉटेलमध्ये उतरलोय हे लहानशा खेडेगावात पसरणं शक्य होतं. म्हणजे मला परत धोका होताच. मी तडक उठून मॅनेजर कडे चौकशी केली. " काय हो, इथे किती माणसं उतरल्येत सांगू शकाल का ? " असं विचारल्यावर मॅनेजर एक पोरसवदा मुलगा होता तो म्हणाला," अहो साहेब, इथे कुनीबी येत न्हाय. आत्ता तर तुमीच हायसा. तरी पप्पांणा बोललो होतो, कशाला हाटील चालवायचं ? पण तेंनी आईकलं नाय. " असं म्हणून त्यानी,मला काही पाहिजे का ते विचारलं. रात्रीच्या जेवणाची मात्र चांगली व्यवस्था केली.
                 सकाळ झाली. माझं सगळं उरकेपर्यंत साडेदहा वाजले. तासातासाने बस होती. म्हणजे वेळेवर सुटत होती असं नाही.मी नाश्ता वजा जेवण करून घेतलं. मॅनेजरला बऱ्यापैकी "टिप" दिली. नाही म्हंटलं तरी त्याने माझी व्यवस्था चोख ठेवली होती. तो फार नम्रतेने बोलत होता, जणूकाही मी परदेशी पाहुणा होतो. तो म्हणाला,"सायेब, तुमाला श्टॅंडपर्यंत सामान घेऊन जायला प्वोराला सांगतो. " एका कळकट पोराला त्याने सांगितलं. मी नको म्हंटलं. तो पोरगा कळकट होता म्हणून नाही तर एखाद्याचा जास्त फायदा घ्यायचा नाही या मताचा मी होतो. मी पंधरा वीस मिनिटात स्टॅण्डवर पोहोचलो.अकरा वाजत होते. आज माझी अटकळ कामी आली नव्हती.  बस लागली होती. ती बारा वाजेपर्यंत निघणार होती . अगदीच तुरळक गर्दी असल्याने मला खिडकीजवळची जागा मिळाली. जवळजवळ पाऊण तास मला नुसतंच बसायचं होतं.
***************************************
साडेअकराच्या सुमारास एक स्त्री दुपट्टयाने चेहरा झाकून स्टॅंडजवळच्या हॉटेल मधे शिरली. तिने मॅनेजरला विचारले," एक सायेब हितं राहतात ना ?"....."मग तुजं काय संबंध तेंच्याशी ?". ती म्हणाली," मला तेन्ला‌ भेटाचाय". तिच्याकडे आपादमस्तक पाहात मॅनेजर म्हणाला," हितं कुनीबी सायब नाय.जा तू." आणि तो आपल्या कामाला लागला.एवढं सांगूनही ती म्हणाली," ए,आईक,की रे पोरा.सायेब हितंच राहतात. " ती हटत नाही असं पाहून तो म्हणाला," सायब होते ते आत्ताच श्टॅंडवर गेले. निघ तू. " त्यावर ती चिडून म्हणाली,," खोटं बोलतोस होय रे." मग मात्र तो तिरसटून म्हणाला," मला काय ? बस दिवस
भर हितंच. इस्वास नाय तर इचारते कशापायी? आं ? जाते का आता ? ". .....मग मात्र ती स्टॅण्ड कडे निघाली. मॅनेजर तिच्या पाठी बघत राहिला. **************************************
तसं मला इथे येऊन काहीच सापडलं नाही. गुरुजींकडे गांजा सापडला.हेच माझ्या डोक्यात घुमत होतं. मी जो जो विचार करीत होतो तो तो मला , गुरुजींना कोणीतरी अडकवलंय,असं वाटू लागलं. लवकरच कंडक्टर आला. आणि तिकीट देऊ लागला, म्हणजे लगेच बस सुटणार होती असं नाही. ते कंट्रोलरच्या मनावर होतं. सध्यातरी ही एकच बस होती. कंडक्टरने मोठ्या आवाजात जाहीर केलं, " जे सोडायला आल्येत तेंनी ताबडतोब उतरुन जा. न्हाईतर तिकिट घ्यावं लागलं." असं म्हणून तो दरवाज्या पाशी आला. एक स्त्री गर्दीतून आत चढायचा प्रयत्न करीत होती. कंडक्टरला धक्का देऊन ती आत शिरली. तो रागात ओरडला," ए बाय,बसं फुल झालिया ,चल उतर खाली. " तरीही तिने ऐकता पुढे जाणं चालूच ठेवलं. कंडक्टरने तिला मागे खेचली तेव्हा ती ओरडून म्हणाली," अवो, मला जायचं न्हाय, सायबान्ला भेटाचंय. मग कंडक्टर करवादून बोलला" कोन सायेब ? हितं समदंच सायब हैत. " मग ती सगळकडे नजर फिरवून माझ्या कडे बोट करून बोलली " ते बघा सायेब," मी तिच्याकडे पाहताच ती म्हणाली, " काल बोलायला नाय भेटलं. म्हनून शान समदं लिवलंय बगा, सावकाश वाचा. " असं म्हणून तिने माझ्या हातात कागद कोबला. मग मात्र ती परत धक्काबुक्की करीत बसमधून उतरली. माझ्या खिडकीजवळ येऊन ती म्हणाली," सायेब तेवडं वाचून घेवा नी आनी पुन्यांदा हितं येव नका. " असं म्हणून ती माघारी फिरली. बस सुटली. मी तिने दिलेला कागद काढून वाचू लागलो. लिहीलेलं थोडं अस्पष्ट आणि अशुद्ध पण होतं. आणि बसंही हालत होती त्यामुळे वाचायला वेळ लागत होता.तिच्या म्हणण्याप्रमाणे रमणिकच्या मुलाची कॉपी पकडल्यावर त्याने स्वतः जवळची कॉपी आणि गांजाची पुडी हेडमास्तरांकडे जाता जाता गुरुजींच्या कोटाच्या खिशात त्यांच्या नकळत टाकली. हे बाईने पाहिलं होतं.तिने ते सांगायचा प्रयत्नही केला होता. पण तुला पण शिक्षेला पाठवू असा दम दिल्यावर ती काय करणार? .अर्थातच हेडमास्तरांनी स्क्वॅडसमोर झडती घेतल्यावर या दोन्ही गोष्टी सापडल्या. एकच झालं हेडमास्तरांनी पोलीस बोलावले नाही. नाहीतर अमली पदार्थ जवळ बाळगल्याच्या आरोपाखाली गुरुजींना सजा झाली असती. शाळेची बदनामी टाळली म्हणून हेडमास्तरांना मात्र प्रसिद्धी मिळाली. गुरुजी हकनाक बदनाम झाले. पुढचे नसते भोग त्यांच्या नशिबी आले. .....दिशाचे अचानक बरेच मिस् कॉल दिसले. म्हणून मी फोन केला. त्यावर ती म्हणाली," गुरुजींनी फास लावून घेऊन आत्महत्या केली. ...." ती जोरजोरात रडू लागली. मी तिला कसंतरी समजावलं.संध्याकाळी सातच्या सुमारास बस दादर स्टेशनला पोहोचली.मी जवळजवळ धावतच रस्त्याने जात होतो.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह