मी वाचलेले, पाहिलेले आणि ऐकलेले पु ल देशपांडे

Submitted by प्रथमेश काटे on 8 November, 2023 - 12:21

  पु. लं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. काही पुस्तके, कादंबऱ्या भावनिक करतात. अंतर्मुख करतात, तर काही खळखळून हसवतात. मात्र पु. लं हे असे लेखक होते. ज्यांची पुस्तके, कादंबऱ्या वाचताना कधी हसता हसता डोळ्यांतून अश्रू येतात. कधी एका क्षणी त्यांच्याच शब्दांनी गंभीर, जरासं अस्वस्थ झालेलं मन पुढच्याच क्षणी त्यांच्याच शब्दांनी हलकं होऊन जातं, आणि ओठांवर हलकंसं स्मित उमटतं.

•••••••

साहित्यिक पु. लं

   ' असा मी असामी ' हे पु. ल. देशपांडे यांचं माझ्या वाचनात आलेलं पहिले पुस्तक. किंबहुना या पुस्तकाद्वारेच माझा त्यांच्याशी परिचय झाला.
धोंडो भिकाजी कडमडेकर - जोशी नावाच्या एका मध्यमवर्गीय, सामान्य माणसाचे ' असामी ' म्हणजे काल्पनिक आत्मचरित्रच आहे. धोंडोपंत ऋषींच्या जोशींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना येणारी अनुभव नानाविध अनुभव, त्यांतून होणाऱ्या गमतीजमती, पुढे या धोंडो भिकाजी कडमडेकर जोशींच डी. बी. जोशींत रूपांतर होऊन त्यांच्या आयुष्यात झालेले लक्षणीय बदल हे सगळं काही ' असा मी असामी ' या पुस्तकात आपल्या खास स्टाईल मध्ये अत्यंत सुंदररीत्या चित्रित केले आहे.

त्यांच्या ' बटाट्याच्या चाळी ' तील सोनाजी त्रिलोकेकर, म्हाळसाकांत पोंबुर्पेकर, मंगेशराव हट्टंगडी, जनोबा रेगे यांच्या सारख्या अंतरंगी व नमुनेदार पात्रांनी आपल्याला भरपूर हसवल्यानंतर शेवटी खुद्द बटाट्याची चाळ मात्र आपल्या मनोगतातून वाचकाला काही क्षण स्तब्ध करून जाते.

' अघळपघळ ' हे पु. लं च्या सर्वोत्तम विनोदी साहित्यांमधील एक असे म्हटले तर गैर ठरणार नाही.

     ' मी आणि माझे पत्रकार ' या पहिल्याच प्रकरणात पु. लं ना वाचक, प्रेक्षक इ. च्या येणाऱ्या विविध आशयांच्या एक से एक पत्रांचे, त्यातील काहींना त्यांनी पाठवलेल्या उत्तरांचे, तर काही पत्रांवर उमटलेल्या त्यांच्या  प्रतिक्रियांचे किस्से सांगितले आहेत‌. काही किस्से अत्यंत मनोरंजक, गमतीदार आहेत. तर काही भावनिक.
' माझा एक अकारण वैरी ' या प्रकरणात साध्यासरळ धोंडोपंतांचे आणि देशी वा इराणी हॉटेलातील वेटर यांमधील परस्परसंबंधांचे भन्नाट चित्रण केले आहे.
यांसोबत ' काही साहित्यिक भोग,' ' ललित आत्मपरिचय कसे लिहावे,' ' काही ( बे ) ताल चित्रे,' ' विनोदी लेखन हे साहित्य ? ' ही प्रकरणे ही अप्रतिम, वाचनीय आहेत.

•••••••

कथाकथनकार पु. लं
      
     पु. लं चे साहित्य तर ग्रेट आहेच. मात्र त्यांची कथाकथनेही अप्रतिम व श्रवणीय आहेत. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे अनेक एकापेक्षा एक, अजरामर पात्रे निर्माण केली. आणि कथाकथनांतून आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याची चुणूक दाखवत, निरनिराळ्या आवाजांतून हीच पात्रे आपल्यासमोर जीवंत उभी केली.
    ' व्यक्ती आणि वल्ली ' मधील भलताच अॅटीट्यूड आणि कोडगेपणा असलेला त्यांचा ' नामू परीट ' आपलं भरपूर मनोरंजन करतो. त्याच्या निरनिराळ्या मजेशीर अॅक्शन्स, एक्सप्रेशन्स तर भन्नाटच. सखाराम गटणेचे शुद्ध मराठी ऐकून आणि त्याचा व्यासंग पाहून हसून हसून मुरकुंडी वळते. आपल्या ' ढ ' विद्यार्थ्यांच्या निर्बुद्धपणाची भरपूर चेष्टा करणारे ; पण तितकीच सगळ्या विद्यार्थ्यांवर माया करणारे, त्यांच्या पुढील भविष्याची चिंता करणारे, तिखट जिभेचे ; पण मायाळू  चितळे मास्तर मनात घर करून जातात. हे पात्र कथाकथनातून सादर करीत असताना मास्तरांच्या तोंडी असलेला रघुवंश श्लोक पु. लं नी इतका सुंदररित्या गायला आहे, की तो पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.
भरभक्कम आवाजाचे ; पण मिष्कील असे पेस्तन काकाही मोठे मजेदार पात्रं आहेत.

चहात दूध कमी पाहून " रत्नागिरीच्या समस्त म्हशी तूर्तास गाभण काय रे झंप्या ? " असा तिरकस शेरा मारणारे, " अहो रत्नागिरीस थंड हवा असती, तर शिमला म्हटले नसते ? " " दामू नेना ? अहो तो चैनीत आहे. वर रंभा त्याच्या टकलावर तेल थापते." " बाई ? अहो कसला तो आवाज आणि कसले ते दिसणे. मनात आणील, तर कडेवर घेईल त्या सुधाकरास." अशा आपल्या तिरकस, व्यंगात्मक कोट्यांनी पोट धरून हसवणारे कोकणातील फणसासारखे अंतू बर्वा जेव्हा " अहो उद्या प्रकाश आला तरी बघायचे दारिद्र्यच ना. पोपडे उडालेल्या भिंती, नि गळकी कौले बघायला वीज कशाला ? आमचं दारिद्र्य अंधारातच दडलेले बरे," " आमची ही गेली, आणि तेव्हापासून दारचा हापूस मोहरला नाही." अशा शब्दांत आपल्या मनातील भावना व्यक्त करतात, तेव्हा कसेसेच होते .

मी आणि माझा शत्रुपक्ष मधील आपले घर दाखवण्यास उत्सुक असलेल्या कुळकर्ण्याच्या बोलण्यातून, एक्सप्रेशन्स व देहबोलीतून त्याचा इरसालपणा प्रकट होतो‌‌.

आपल्या बेधडक स्वभावाप्रमाणेच बेधडक, सरळसोट बोलण्यातून ' रावसाहेब ' धमाल उडवून देतात.

' काही नव्या ग्रहयोगां ' ची, आणि त्यांच्या फलितांची पु. लं. नी दिलेली मजेशीर माहिती पोट दुखेपर्यंत हसायला भाग पाडते.

•••••••

संगीतकार पु. लं

     पु. लं हे एक उत्कृष्ट संगीतकारही होते, हे मात्र मला जरा उशीराच समजले. ' इंद्रायणी काठी ' सारखे रसाळ, अप्रतिम असे भक्तीगीत असो, माझे जीवन गाणे ' सारखे सुखात असो वा दु:खात, मनामध्ये प्रसन्नता, समाधान बाळगून आनंदाने जगण्याचा संदेश देणारे गीत असो, किंवा '‌ ही कुणी छेडिली तार, शब्दावाचून कळले सारे ' सारखे सुंदर भावगीत असो ही विविध प्रकारातील, नितांतसुंदर गाणी त्यांच्यातील संगीतकाराची प्रतिभा दाखवून देतात.

एक थोर साहित्यिक, ब्रिलियंट कथाकथनकार आणि प्रतिभावान संगीतकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या पु. लं. देशपांडे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. धन्यवाद.

@ प्रथमेश काटे

Group content visibility: 
Use group defaults

सर, सर, व्याख्या कथेची विचारली. पुन्हा वाचा वर जाऊन.
आणि तुम्हांला दिसलेले अमुक तमुक इतरांनी वाचावे, असे तुम्ही स्वयंघोषित कोण?

सर, सर, व्याख्या कथेची विचारली. पुन्हा वाचा वर
जाऊन. >> - कथा या साहित्य प्रकाराबाबत माझी स्वतःच्या
मतांवर आधारित अशी व्याख्या नाही. - हे वाचलं नाहीत किंवा या वाक्याचा अर्थ लक्षात आलेला नाही. स्वयंघोषित विद्वान हा तुमच्या बाबतीत तंतोतंत खरंच असलेलं विशेषण तुम्हाला आवडलेलं दिसत नाही ; पण तुमच्या कमेंटमधल्या शब्दा शब्दांत हे दिसून येते.

आणि तुम्हांला दिसलेले अमुक तमुक इतरांनी वाचावे,
असे तुम्ही स्वयंघोषित कोण? >> तुम्ही नका वाचू मी काही तुम्हाला आग्रह केलेला नाही. ज्यांना या लेखात वाचनीय असं काही आढळेल असे सुज्ञ, चिकित्सक असे वाचक वाचतात.

होय. मराठी माणसाच्या लहानपणातली ही एक सुंदर आठवण असणार. अर्थात मीही ऐकलेलं आहे, आणि पु. लं यांनी हे गीत संगीतबद्ध केल्याचंही मला ठाऊक होतं ; पण तरी राहून गेलं, अजून एक दोन गोष्टी अशाच राहून गेल्या. Bw

अर्थात मीही ऐकलेलं आहे, आणि पु. लं यांनी हे गीत संगीतबद्ध केल्याचंही मला ठाऊक होतं ; पण तरी राहून गेलं, अजून एक दोन गोष्टी अशाच राहून गेल्या>> खुपच छान लेख.
ज्या गोष्टी राहून गेल्या त्यावर पुढचा भाग येऊ द्या.

Pages