भारत का दिल देखो : बस्तर दशहरा (समाज जीवन/संस्कृती)

Submitted by मनिम्याऊ on 22 October, 2023 - 05:49

बस्तर दशहरा
मध्य भारतातला एक प्रमुख सण आणि जगातील सर्वात जास्त दिवस सातत्याने चालणारा उत्सव म्हणजे बस्तरचा दसरा उत्सव उर्फ 'बस्तर दशहरा'. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये साजरा होणाऱ्या दसरा उत्सव म्हणजे शक्तीचा जागर. बस्तरच्या कुलदेवीची 'आई दंतेश्वरीची' शक्तीस्वरूपात पूजा केली जाते. पारंपारिक रीतिरिवाजानुसार आणि अनोख्या शैलीत साजरा होत असल्याने, देशातील इतर ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या दसरा उत्सवापेक्षा हा उत्सव अनोखा आहे.

दरवर्षी सलग ७५ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरवात हरळी अमावास्येला होते. हरळी अमावस्या म्हणजे आपल्या आषाढ (तर त्यांच्या श्रावण) महिन्याची अमावस्या. यावर्षी मात्र अधिक महिना आल्याने ७५ दिवसांऐवजी हा उत्सव १०७ दिवसांचा असणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत बस्तर प्रदेशातले लाखो आदिवासी यात सहभागी होतात. यांतल्या प्रत्येक जनजातीचा नेमून दिलेल्या परंपरेत काही ना काही विशिष्ट सहभाग असतोच.
हरळी अमावास्येला म्हणजे उत्सवाच्या पहिल्या दिवशी माध्यान्हीच्या सुमारास जगदलपूर येथील दंतेश्वरी मंदिरासमोर पाट-जत्रा विधीने या महा-उत्सवाची सुरवात होते. यासाठी मचकोट येथील जंगलात 'बिलोरी' या गावाचे आदिवासी जातात. तेथे आधीच निवडून ठेवलेल्या साल वृक्षाची पूजा केली जाते आणि मग कुऱ्हाडीने घाव घालून या वृक्षाचे लाकूड तोडण्यात येते. या तोडलेल्या लाकडाला 'ठुरलू खोटला' म्हणतात.
यानंतर बिरिंगपाल गावातील लोक या लाकडाला वाजत गाजत सन्मानपूर्वक दंतेश्वरीच्या मंदिर परिसरात घेऊन येतात आणि तेथे एका विशिष्ट ठिकाणी ते रोवून 'डेरीगड़ाई विधी' पूर्ण केला जातो. derigadai.jpg
हा विधी संपन्न झाला कि रथाच्या बांधणीसाठी जंगलातून लाकूड आणण्याचे काम लगेचच सुरू होते. झारूमरगाव व बेदौमरगाव येथील ग्रामस्थांवर रथ बांधण्याची जबाबदारी असते. पारंपरिक हत्यारांच्या साहाय्याने रथबांधणीसाठी बराच वेळ लागतो तरीदेखील सर्वपित्री अमावास्येच्या आधी रथनिर्मिती पूर्ण करणे बंधनकारक असते. त्यामुळे जवळ जवळ एक महिना सर्व कामधंदे सोडून ग्रामस्थांना आपला पूर्ण वेळ येथे द्यावा लागतो. मात्र आजकाल ग्रामस्थ आळीपाळीने वेळ देत हे कार्य पूर्ण करतात. एखाद्या घरातून जर रथबांधणीसाठी कोणीच आले नाही तर त्या कुटुंबाला पंचांतर्फे दंड ठोठावला जातो ज्यात शारीरिक किंवा आर्थिक शिक्षा दिली जाते.
rathmaking3.jpg
रथयात्रेच्या मागचा इतिहास मोठा रोचक आहे. सहाशे वर्षांची परंपरा असलेल्या बस्तर दशहरा उत्सव आणि रथयात्रेची सुरुवात इ.स. 1408 पासून चालुक्य वंशाचा चौथा शासक राजा पुरुषोत्तम देव याने केली. एकदा राजा पुरुषोत्तम देव जगन्नाथ पुरीला गेले होते. पुरीच्या राजाला जगन्नाथ स्वामींनी स्वप्नात बस्तरच्या राजाचे स्वागत करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार पुरीच्या राजाने बस्तरच्या राजाचे शाही स्वागत केले. बस्तरच्या राजाने पुरीच्या जगन्नाथ मंदिरात स्वामींच्या चरणी एक लाख सोन्याची नाणी, मौल्यवान हिरे, आणि दागिने अर्पण केले. पुरुषोत्तम देवांना पुरीच्या राजाने प्रेमाची भेट म्हणून सोळा चाकी रथ व 'लहुरी रथपती' अशी उपाधी दिली.

पुरीच्या राजासोबत कायम मैत्रीचा करार करून व भेट मिळालेल्या सोळा चाकी रथात बसून राजे पुरुषोत्तम देव मधोता येथील आपल्या राजधानीत परत आले. येताना जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेच्या लाकडी मूर्ती घेउन आले. परत आल्यावर राजा पुरुषोत्तम देव यांनी जगन्नाथपुरीहून मिळालेल्या सोळा चाकांच्या रथाचे विभाजन करून रथाची चार चाके भगवान जगन्नाथांना अर्पण केली आणि उरलेल्या 12 चाकांचा मोठा रथ दंतेश्वरीला अर्पण केला. तेव्हापासून राजाने देवीसोबत स्वतः देखील रथारूढ होऊन शहर परिक्रमा करण्याची परंपरा सुरु झाली.
ratharohan.jpg
सन १४६८-६९ साली मधोता येथे प्रथमच दसरा रथयात्रा सुरू झाली. पुढे बर्‍याच वर्षांनी काकतीय घराण्याचे आठवे राजा वीर सिंह यांनी सन १६१० पासून १२ चाकी रथाचे पुन्हा एकदा विभाजन करून आठ चाकी 'विजय रथ' आणि चारचाकी 'फूल रथ' वापरणे सुरु केले जे आजतागायत कायम आहे.
71966415_2402525036630343_5748572382893703168_n.jpg
बस्तरचे लाडके महाराज प्रवीरचंद्र देव महाराणीसह रथयात्रा करताना दसरा उत्सव १९६२

दरवर्षी आलटून पालटून दोन्हीपैकी एकाच रथाचे निर्माण होते व एकदा तयार झालेला रथ सलग दोन वर्षे उत्सवासाठी वापरला जातो.
rath.jpg
बघता बघता भव्य असा दोन मजली रथ तयार झालेला असतो. सर्वपित्री अमावास्येला 'काछनगादी पूजा' केली जाते यात मिरगान या आदिवासी जमातीतील एखाद्या कुमारिकेला काछनदेवीचे बालरूप मानून वाजतगाजत सवारी करवतात. या विधीला बस्तरचे महाराज जातीने हजर असतात. उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी देवीला महाराज साकडे घालतात. हि कुमारीका बेलाच्या काट्यांनी तयार केलेल्या झुल्यावर बसून दसरा उत्सव साजरा करण्याची अनुमती देते.
kachangadi1.jpeg.jpg
ज्या वर्षी आई परवानगी देत नाही त्या वर्षी बस्तरमध्ये दसरा साजरा केला जात नाही. मोठा शंखध्वनी करून उत्सवाला सुरुवात झाल्याचे जाहीर करण्यात येते.

काछनगादी च्या विधीमध्ये स्थानिक देवी-देवता, उपदेव, ग्रामदेवता, आसरा, जलदेवी, वनदेवी, यक्ष-यक्षिणी इ. सर्वांना उत्सवात सामील होण्यासाठी आवाहन केले जाते. आणि मान्यतेनुसार हे सगळे दंतेश्वरी मंदिरात निवास करून देवीच्या छत्रछायेत भाविकांनी अर्पण केलेल्या पूजेचा / नैवेद्याचा स्वीकार करतात.

काछनगादीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शारदीय नवरात्राच्या घटस्थापनेला सीरसार भवन येथे जमिनीत लहानसा चौकोनी खड्डा खणला जातो. या खड्यात आमाबाल या गावातील हलबा समाजाचा एक युवक ९ दिवसांच्या निराहार उपोषणाला बसतो. याला 'जोगी बिठाई रस्म' म्हणतात.
jogi.jpg
या नऊ दिवसांत रोज संध्याकाळी दंतेश्वरी देवीच्या छत्राची पूजा अर्चना करून रथाने शहरात मिरवणूक काढतात. अश्विन शुक्ल द्वितीयेपासून ते सप्तमीपर्यंत सलग सहा दिवस चारचाकी रथ चालविला जातो. या चारचाकी रथाला 'फुल रथ' असे म्हणतात, कारण या रथावर स्वार होताना राजाच्या डोक्यावर फुलांची पगडी असते.
ful pagdi.jpg
फूल परिक्रमा झाली कि 'बेल नेवता' विधी होतो. ज्यात बस्तरचे महाराज स्वतः जवळच्या 'सरगीपाल' गावात जाऊन जुळे बेलफळ लागलेल्या बेलाच्या वृक्षाची पूजा करतात आणि ते फळ तोडुन आणून देवीला अर्पण केल्या जाते.
Bel.jpg
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीला बस्तरचे महाराज सहपरिवार व राजपुरोहितांसह दशहरा उत्सवाची निमंत्रण पत्रिका, जिला ‘विनय पत्र’ म्हणतात, घेऊन दंतेवाड्याला येतात. दंतेश्वरी माईसह आदिवासींच्या सर्व देवदेवतांना जगदलपूरच्या दशहरा उत्सवाचे निमंत्रण दिले ज़ाते. विनय पत्र संस्कृत भाषेत राजगुरूंनी स्वहस्ते लिहिलेले असते. दंतेश्वरी माईच्या चरणी विनय पत्रिकेसह अक्षता आणि सुपारी अर्पण केली जाते. आमंत्रण स्वीकारल्यानंतर हळदीपासून बनवलेली प्रतिमा देवीचे प्रतीक म्हणून गाभाऱ्याच्या बाहेर सभामंडपात आणून पालखीत ठेवतात. यानंतर पंचमीपासून अष्टमीपर्यंत देवी सभामंडपातच विराजमान असते.
vinay patr.jpg
अश्विन अष्टमीच्या मध्यरात्री निशाजत्रा विधी होतो. दंतेश्वरीच्या अनुपस्थितीत दंतेवाडा शहराची जबाबदारी बोधराज बाबा आणि घाटभैरव बाबा ज्यांना नगर कोतवाल म्हणतात, यांच्याकडे सोपवते आणि देवीसहित तिची सखी मावली माता व पुजारी आणि सेवकांसह इतर लवाजमा जगदलपूरकडे जायला निघतो. यावेळी पालखीसमोर बकरी, मासे आणि कबूतरांसह किमान बारा बोकडांचा बळी दिला जातो.
palkhi.jpg
दंतेवाडा ते जगदलपूरपर्यंत गीदम, बास्तानार, किलेपाल, कोडेनार, डिलमिली, तोकापाल या ठिकाणी माईचे स्वागत केले जाते. बडी माई जगदलपूरला पोहोचली कि 'जोगी उठाई रस्म' होवून तो नऊ दिवस खड्ड्यात बसलेला योगी उठून दंतेश्वरीचे तसेच तिच्या बरोबर आलेल्या मावली मातेचे व अन्य देवदेवतांचे स्वागत करतो. याला 'मावली परघाव' म्हणतात. दरवर्षी कोणी ना कोणी महत्वाची व्यक्ती यात हजेरी लावते. स्वागत आणि पूजा-अर्चना झाल्यावर बस्तरचा राजकुमार देवीची पालखी खांद्यावर घेऊन राजवाड्यात असलेल्या दंतेश्वरी देवीच्या मंदिरात आणतो.

जगदलपूरला पोचल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे महानवमीला देवी साठी खास सोलह-भोग नैवेद्य तयार केला जातो. या नैवेद्याला कावड भोग म्हणले जाते. संपूर्ण स्वयंपाक राजपुरोहित खास यादव जातीच्या खानसाम्यांकरवे तयार करवून घेतात. तयार नैवेद्य १६ कावडींमध्ये भरून मंदिरात पोचवला जातो. या रात्रीची 'निशाजात्रा' (मिरवणूक) सर्वात मोठी आणि प्रेक्षणीय असते.
nishajatra.jpg
देवीचे छत्र रथात चढवताना देवीला महाराजांचे सुरक्षारक्षक व राज्य पोलिसदलाकडून सशस्त्र सलामी दिली जाते.
salami.jpg
झाडांच्या सालापासून बनवलेल्या दोरीने रथ ओढतात.
pulling.jpg
यात्रेत आंगा देव सन्मानाने सामील होतो. आंगा देव ही बस्तरची स्थानिक देवता आहे, ज्याची कोणत्याही शुभ कार्यापूर्वी पूजा केली जाते. ही एक चल (फिरती) देवता आहे. आंगा देव म्हणजे सागवानाच्या लाकडी पालखीत बसलेले देवीचे अदृश्य अंगरक्षक. आदिवासी लोक या पालखीला खांद्यावर घेऊन मिरवणुकीत अतिशय वेगाने फिरवतात .
angadev.jpg
आता सुरु होते 'भीतर रैनी रस्म'. ८ चाकांच्या भव्य दुमजली विजयरथातून रात्री उशिरापर्यंत वाजत गाजत शहराची फेरी झाली कि मध्यरात्री माडिया आणि गोंड जमातीचे लोक या रथाला चोरून जवळच्याच कुम्हडाकोट गावी पळवून नेतात आणि जंगलात लपवून ठेवतात. हा सगळा चोरीचा मामला अगदी शांततेत अजिबात आवाज न करता पार पडतो.

इकडे शहरात हाहाकार उडालेला असतो. महाराज स्वतः कुम्हडकोट येथे जाऊन 'चोरांना' मनवतात. त्यांच्या मागण्या पूर्ण करून व आदिवासींसोबत सहभोजन करून रथाला जगदलपूर येथील दंतेश्वरी मंदिरात (छोटी माँ मंदिर) परत आणण्यात येते. हि झाली 'बाहर रैनी' रस्म.

विजयादशमीच्या दिवशी बडी माँ आणि छोटी माँ दोघी मिळून (दंतेवाडा येथून आलेली मोठी दंतेश्वरी जगदलपूरच्या छोट्या दंतेश्वरीसह) शाही पाहुणचाराचा स्वीकार करतात. प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. स्थानिक दंतेश्वरी मंदिरासमोर बांधलेल्या व्यासपीठावर आईची पालखी आणि छत्र ठेवून महाआरती होते.
temple_0.jpg
तेथून सायंकाळी छोट्या माईचा निरोप घेऊन सशस्त्र सलामीचा स्वीकार करत बडी माँ जवळच्याच जिया डेरा येथे जाण्यासाठी प्रस्थान ठेवते. जगदलपूर शहरातून मोठी शोभायात्रा काढून माई वाजत गाजत जिया डेराला पोचते. येथे देवीसह आवाहन केलेल्या इतर सर्व देवतांना विधीपूर्वक निरोप दिला जातो. 'डोली विदाई' रस्म संपन्न झाली की पुढच्या वर्षी परतून येण्याचं आश्वासन घेत माईची पालखी दंतेवाड्याकडे रवाना होते.

रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे देवीचे दंतेवाड्याला आगमन होते. मंदिराच्या महाद्वारावर 'घाट भैरव बाबा' व 'बोधराजबाबा' देवीचे स्वागत करतात व शहराचा कार्यभार परत देवीकडे सोपवला जातो. जगदलपूर वरून राजाने दोघांसाठी पाठवलेली भेट त्यांना दिली जाते. परत एकदा सशस्त्र सलामीचा स्वीकार करत देवी मंदिरात प्रवेश करते आणि ७५ दिवसांपासून सुरु असलेल्या या बस्तरच्या जगप्रसिद्ध दशहरा महा-उत्सवाची सांगता होते.

तळटीप
'भारत का दिल देखो' या माझ्या मध्य भारतीय लोकजीवनावर आधारित सिरीज मध्ये काही महिन्यांपूर्वी मी छत्तीसगढ मधील बस्तर प्रदेशाच्या प्रवास वर्णनाची १० भागांची मालिका लिहिली होती. त्या लेखमालेतील आठव्या भागात 'बस्तर दशहरा' या स्थानिक उत्सवाचा उल्लेख येतो. त्यावेळीच ठरवले कि यावर एक स्वतंत्र लेख लिहायला हवा. ६०० वर्षांची अखंडित परंपरा लाभलेला हा जगातला सर्वात जास्त दिवस सलग चालणारा उत्सव. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक दसरा बघायला छत्तीसगढला भेट देतात मात्र अगदी सख्खे शेजारी असून देखील आपल्याला याबाबत फार कमी माहिती आहे.

लेखात काही परंपरांचा उल्लेख आहे ज्या आजच्या काळाशी विसंगत वाटतील. उदाहरणार्थ बालिका देवी किंवा पशूंचा बळी देण्याची प्रथा. पण हि त्या आदिवासींची जीवन पद्धती आहे. त्यांच्या सगळ्या श्रद्धा या जंगलाशी, त्यांच्या देवतांशी, त्यांच्या भूमीशी आणि त्यांच्या राजाशी निगडित आहेत. घनघोर जंगलात राहणारे हजारो आदिवासी पायपीट करत या उत्सवासाठी आणि उत्सवापुरतेच शहरात येतात. केवळ माईच्या रथाचा दोर हाती घ्यायला मिळेल इतकीच त्यांची अपेक्षा. सोबत एक जोडी कपडे, काठीला बांधलेले घोंगडे, पाणी प्यायला लोटा आणि जंगली जनावरांपासून बचाव करण्यासाठी एखादा कोयता. इतकाच संसार. पोटात भूक पण गाठीला शिदोरी नाही. भीक मागणे हा आदिवासी समाजात मोठा अपराध मानल्या जातो. त्यामुळे कोणासमोर हात पसरणार नाहीत. मग देवीसमोर बळी दिलेले कोंबडे, मासे, बोकड इ. पशु त्यांच्या भोजनाची सोय ठरतात. यात्रेच्या दिवसात मद्यपानाला असलेली जाहीर परवानगी, रात्रभर चालणारी यात्रा, भजन हे सगळे त्यांचे श्रमपरिहार करण्याचे मार्ग आहेत. मात्र कोणीही मद्यधुंद अवस्थेत काही गुन्हा केला तर देवीला साक्षी ठेवून तिथल्यातिथेच त्याचा न्यायनिवाडा होऊन शिक्षा केली जाते.
म्हणूनच या रितीरिवाजांचा अर्थ व त्यांच्या पाठी असलेल्या भावनांना समजून घ्यायचे असेल तर आपल्यालाही त्यांच्या सारखाच विचार करावा लागेल.

आम्ही जगदलपूरला भेट दिली त्यावेळी हा उत्सव पार पडला होता. मात्र त्याबाबत चर्चा सतत ऐकायला मिळत होती. लेखात वापरलेली बरीचशी माहिती तिथल्या स्थानिकांसोबत गप्पा करताना मिळाली आहे. जगदलपूरच्या रिसॉर्ट मधील कर्मचारी, गाडीचे ड्रायवर, गाईड, मंदिरात भेटलेली स्थानिक जनता आणि पुजारी हे सगळेच दशहरा पर्वाबद्दल भरभरून बोलत होते आणि एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवायला येण्याचे निमंत्रण देत होते. वापरलेले काही फोटो आंतरजालावरून घेतले आहेत. तर काही मित्रमंडळींच्या कृपेने मिळाले.
बस्तर दशहरा उत्सवाला अनुभवणे माझ्या बकेट लिस्टीत सामील झालंय. बघू कधी जमतं ते. मात्र मागे लेखमाला संपवताना म्हंटलं होतं तेच परत एकदा सांगते.
या सुंदर प्रदेशाबद्दल सामान्यांच्या मनात असलेली भीती या लिखाणाने जरा फिकट झाली तर लेखनाचे सार्थक झाले असे समजेन.
'भारत का दिल' बहुत बडा है जी..."

बस्तर भटकंतीवरील लेख

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्यामुळे बस्तरशी नाळ जोडली गेली आहे मनिम्याऊ Happy
लेख नीटनेटका, मुद्देसूद आणि रंजक झाला आहे. आवडला. काही गोष्टींची गंमत वाटली, उपास करणारा युवक, चोरीची रस्म, रथाची गोष्ट, देवीची यात्रा, आदिवासींच्या पद्धती, राजे प्रविणदेव, पुरीतून आलेला रथ... सगळं खूप आवडलं. फोटोही छान. रथ घडवतानाचे व रथाचे विशेष आवडले. हे लिहिल्याबद्दल तुझे मनापासून आभार. Happy

ही सिरीज मला खूप आवडते. मस्त आहे! हा पण लेख मस्त! >> +१
नेहमी प्रतिसाद दिला जातो असं नाही पण सर्व लेख आवर्जून वाचते!

लेख प्रकाशित केल्यानंतर एका परिचयाच्या व्यक्तीने संपर्क करून सांगितलं कि महाराजा प्रवीरचंद्रांचा तो रथारूढ फोटो १९६२ सालचा आहे. १९६१ साली प्रवीरचंद्रांच्या लग्नानंतर काही महिन्यांत तत्कालीन भारत सरकारने महाराजांना राजपदावरून पदच्यूत करून त्यांच्या लहान भावाला संस्थानिक राजा म्हणून घोषित केले होते. पुढील वर्षी म्हणजे १९६२ ला भारत सरकार बस्तर संस्थानातील दसरा उत्सवासाठी (विजयचंद्राला राजा म्हणून जनतेची मान्यता प्राप्त व्हावी म्हणून) अनुदान द्यायला पण तयार होते. पण स्थानिक आदिवासींना प्रवीरचंद्राव्यतिरिक्त इतर कोणी राजा म्हणून मान्य न्हवता. इतर वेळेस क्वचितच रथारूढ होणारे प्रवीरचंद्र त्यावर्षी खास लोकांच्या हट्टाखातर 'जनतेचे राजा ' म्हणून सपत्नीक रथारूढ झाले. त्यावर्षीच्या दशहरा उत्सवाचा खर्च संस्थानाच्या तिजोरीतून न घेता लाखो आदिवासींनी मिळून उचलला. तो बस्तरच्या इतिहासातला सगळ्यात शानदार दसरा ठरला. १६६५ साली महाराजांची हत्या झाल्यानंतरच्या प्रत्येक दसरा सोहोळ्यात देवीसोबतच महाराज प्रवीरचंद्रांना पण पुजले जाते.

महाराज प्रवीरचंद्राच्या आयुष्यावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत शिवाय Pravir - The Adivasi God नावाची एक शॉर्ट फिल्म YouTube वर उपलब्ध आहे.

लेख प्रकाशित झाल्यानंतर बऱ्याच मायबोलकर व non मायबोलीकरांनी आवडल्याचे आवर्जून कळवले.
तसेच काही माहिती नव्याने सांगितली. त्यांचे मनापासून आभार. नव्याने मिळालेली माहिती लेखात सामील केली आहे.

प्रवासवर्णनाला फारच छान प्रतिसाद मिळाला. काहींनी तर येत्या दिवाळीत सहकुटुंब सहपरिवार बस्तरची सफर देखील आखली आहे. रायपूर येथील महाराष्ट्र मंडळाने लेखमालेची आवर्जून दाखल घेतल्याचे सांगितले.

एकीने मला फोन करून त्यांच्या १९९६ बस्तर ट्रिपच्या आठवणी सांगितल्या. तिच्या मामा मामीने २० वर्षे बस्तर मध्ये वास्तव्य केले होते. त्यावेळेचे अनेक रोमांचक प्रसंग सांगितले. आदिवासींबरोबर झालेल्या काही थरारक encounters चे तिच्या मामांचे अनुभव सांगितले. जवळ जवळ १ तास अखंड गप्पा झाल्या. विषय फक्त बस्तर आणि बस्तरीये.

'भारत का दिल देखो' या सिरीजवर तुम्ही सारे मनःपूर्वक प्रेम करत आहात. पुन्हा लवकरच भेटू मध्य प्रदेशातील काही अनवट जागांच्या सफरीसह.
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.