युद्ध नको बुद्ध हवा.

Submitted by विवेक नरुटे on 3 October, 2023 - 06:34

आज प्रत्येकाला सत्ता हवी आहे, मग तो महासत्ता होऊ पाहणारा एखादा देश असो,वा आपल्याच विचारांचं घोडं नाचवणारा तालिबान सारखा दहशतवादी गट.सत्तेची भूक प्रत्येकाच्याच उदरात उसळलेली आहे.पण क्षणभूंगुर असणारी ही सत्ता सहसा मिळत नाहीच मुळी.ज्यांच्या हाती ती सत्ता आहे त्यांच्याकडून ती हिसकावून घ्यावी लागते.तिच्यासाठी रक्तार्पणाचा महायज्ञ करावा लागतो. या सत्ता ग्रहाणासाठी मग एकच मार्ग उरतो... युद्ध...ज्यामध्ये लाखो निरपराधी लोक हकनाक मारले जातात.युद्ध... जिथे सारं काही माफ असतं, अगदी सामान्य जणांच्या मुंडक्यांचा थर रचण्यापासून ते एखाद्या सात वर्षाच्या कोवळ्या मुलीचं शरीर ओरबडण्यापर्यंत. युद्धाला ना दया असते ना करुणा,असते ती फक्त रक्ताची न संपणारी तहान. युद्धामध्ये ना लहान मुल पाहिलं जातं ना जर्जर झालेला वृद्ध...पाहिला जातो तो फक्त बळी, आपल्या पराक्रमाचे प्रमाण देणारा,आपल्या बाहुबलाचा एक आविष्कार असलेला एक बळी, एवढीच किंमत असते त्याला.युद्धाचा इतिहास जरा मागे वळून पाहिला तर नजरेस पडतील उजाड झालेले ,अखेरचे श्वास मोजणारे गाव, तडफडणारे,भुकेने व्याकूळ, अर्धमेले जीव, कपाळावरचं कुंकू पूसलेल्या अन् त्यावर नियतीद्वारा लिखित यातना घेऊन मिरवणाऱ्या, आपल्या डोळ्यांसमोर तहान भुकेने तडफडून जीव सोडणाऱ्या आपल्या काळजाच्या तुकड्याला मांडीवर घेऊन असहाय्यपणे अकांत करणाऱ्या अभागी माता.अन् त्याही नरक यातना कमी म्हणून की काय लज्जा सोडून त्यांच्या अब्रूचे लचके तोडणारे, विजयाच्या धुंदीत वेडे झालेले वासनांध लांडगे...
युद्ध म्हटलं की हेच निर्दयी वास्तव डोळ्यांसमोर नाचतं... नाही... हे केवळ या मंचावर मांडण्यासाठी केलेलं अतिशयोक्ती पूर्ण रसरशीत वर्णन नव्हे, ही वास्तविकता आहे. मानवसमाजातील तुमच्या माझ्या अभागी पूर्वजांनी सोसलेल्या नरकयातनांचा इतिहास आहे.जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं युद्धं झालीत तिथं तिथं घडलेल्या अभद्राचा हा केवळ एक क्षुद्र अंश आहे. कारण युद्ध म्हणजे केवळ विनाश....
हाच विनाश सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धात याची देही याची डोळा पाहिला आणि तो अंतर्बाह्य हादरून गेला.आपल्या हातून सत्तेच्या मोहात किती मोठं पातक झालं या वस्तविकतेने त्याचं काळीज छिन्न विछिन्न केलं. तो शोक आणि पश्चातापाच्या अग्नीत होरपळून निघाला ,त्यावेळी त्याला हात दिला तो शांतता आणि अहिंसेचे पुजारी असलेल्या गौतम बुद्धांच्या विचारांनी...
मग तो शांत झाला. विश्वात संचारालेल्या परम शांतीने त्याच्या हृदयात प्रवेश केला. त्याने अहिंसा तत्व जाणून घेतलं आणि आयुष्यात कधीही युद्ध न करण्याची प्रतिज्ञा केली आणि आपलं आयुष्य बुद्धांच्या विचारांना समर्पित केलं...
आज आपली सुद्धा तीच गरज आहे जी सम्राट अशोकाची होती, ज्या गोष्टीने होरपळणाऱ्या अशोकला शांतीचा गारवा प्रदान केला...बुद्ध..., आणि बुद्धांचे विचार. युद्ध आणि युध्दाला रोखण्याचा केवळ एक मार्ग आहे... बुद्ध.हो तेच बुद्ध जे मानवता शिकवतात ,तेच बुद्ध जे शांतीच्या मार्गावर मार्गदर्शकांचे कार्य करतात.जी शपथ शतकांपूर्वी सम्राट अशोकाने घेतली होती जो मार्ग शतकांपूर्वी सम्राट अशोकाने अवलंबला होता, आज त्याच शपथेची अन् त्याच मार्गाची अखंड मानवजातीस नितांत गरज आहे.आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुद्धांचे विचार आचरणात आणण्यासाठी कोणताही धर्म बदलण्याची अथवा आपला पंथ सोडण्याची गरज नाहीच मुळी.गरज आहे ती फक्त त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांचे विचार आत्मसात करण्याची.गरज आहे अखंड शांतीकडे प्रयाण केलेल्या बुद्धांच्या पाऊलखुणा शोधण्याची, गरज आहे विनाशकारी युद्धाला टाळून शांतिकारी बुद्धाकडे जाण्याची.

Group content visibility: 
Use group defaults

बुधिष्ट राष्ट्र च जास्त हिंसा करतात.
चीन,जपान ठळक उदाहरणे
श्रीलंकेत बुद्ध धर्मीय लोकांनी हिंसा स्वीकारली आहे..
भारतात आक्रमक,हिंसा करण्यास लगेच प्रवृत्त होणारे कोण आहेत,,?

लेखातल्या भावना पटतातच, रादर जगातल्या बहुतांश लोकांना युद्ध आवडते अशातला भाग नसतो. केवळ युद्ध नको असे सांगून युद्ध टाळता येते असे वाटत नाही.

पटलं
युद्ध होताच राहणार.. तरी तिसरे विश्वयुद्ध मात्र होणार नाही असे वाटते.
त्याचे काय परीणाम होतात याची अक्कल सर्वांना असेल.

धागा बरोबर आहे.
पण बुद्ध धर्मात जन्म घेतला म्हणून गौतम बुद्धांचे विचार अंगी आले असे नसते असे म्हणू शकतो.

जपान बौध्द धर्मीय आहे.
हिंसेचा कहर त्यांनी केला होता.
जास्त उदाहरणे नको.
९९% लोक कोणत्या ही धर्माची असू ध्या .
स्व फायदा ज्या मध्ये आहे तेच तत्व फक्त लक्षात ठेवतात.
त्या मुळे धाग्या मधील बुद्ध आणि शांतता हा जो संबंध जोडला आहे तो मजकूर काढावा..
बाकी धर्मीय लोक पण शांतेते चे रिअल लाईफ मध्ये पालन करतात.
बौद्ध म्हणजे शांतता साफ चूक

लेख चांगला आहे.
बुद्धांनी दाखवलेला मार्ग अवलंबावा हे ज्या अनुशंगाने लिहिले आहे ते योग्यच आहे.

बुधिष्ट राष्ट्र च जास्त हिंसा करतात.
चीन,जपान ठळक उदाहरणे >>>>>>>>>>
१००% सत्य !
दुसऱ्या महायुध्दात खुमखुमी जिरल्या मुळे जपान शांत झाला अन्यथा आज चीन पेक्षा जपान अधिक आक्रमक असता .
महात्मा गांधीच्या नावाने काँग्रेसचे नेते मते मागतात पण गांधीच्या तत्वज्ञान नुसता चालणारा एकही काँग्रेसी नेता आज पर्यंत दिसला नाही त्याच प्रमाणे बुद्धाच्या आदर्श प्रमाणे चालणारा एकही देश शिल्लक नाही ....

युद्धाचे नियम पाळले जात नाहीत हे धोकादायक आहे .त्या मुळे अती घातक शस्त्र सर्रास वापरली जातात ती मनुष्य हानी तर करतात च पण पर्यावरण साठी पण धोकादायक आहेत