पाककृती स्पर्धा क्र.३- मिलेट्स पाकृ- ज्वारीची उकड

Submitted by सायो on 26 September, 2023 - 10:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य- १ वाटी ज्वारीचं पीठ कोरडं भाजून, भाज्या सगळ्या बारीक चिरुन- कांदा, गाजर, भोपळी मिरची, कोबी (ऑप्शनल), मटार इ, हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा, कढिपत्ता, ताक (१ वाटी) पाणी-१ वाटी, वरुन घ्यायला तूप, खवलेलं खोबरं, कोथिंबीर, फोडणीकरता तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, चवीप्रमाणे मीठ, साखर.

क्रमवार पाककृती: 

१ वाटी ज्वारीचं पीठ कोरडंच भाजून घेऊन बाजूला ठेवावं. पाणी उकळत ठेवावं. वर सांगितलेल्या किंवा आवडीप्रमाणे भाज्या चिरुन घेऊन तयार ठेवाव्यात. कढईत तेल गरम करुन फोडणी करावी आणि त्यात कांदा परतून घ्यावा. त्यातच आलं, मिरची ठेचा, कढिपत्ता वगैरे घालून सगळ्या भाज्याही घालाव्यात. ह्यातच मीठ, साखर घालून झाकण घालून भाज्या शिजू द्याव्यात. ह्यातच १ वाटी आधणाचं पाणी घालून त्यात १ वाटी ताक घालून ज्वारीचं पीठ पेरत घालावं आणि एका हाताने ढवळत रहावं म्हणजे गुठळी होणार नाही. झाकण घालून छान वाफ आणावी. शिजल्यावर वरुन तूप, खोबरं, कोथिंबीर घालून गरम गरम खावं.
8625457a-3609-4cb9-835e-1bc33775a462_0.jpegdc503195-a457-4500-8248-2f94911ad837_0.jpeg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांकरता व्यवस्थित होते.
माहितीचा स्रोत: 
युट्युबवरची रेसिपी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wow! मस्त दिसते आहे!
मी तांदुळाच्या पिठीची करतो तशीच करून पाहिली होती मागे - फोडणीत नुसती लसूण ठेचून घालून. पीठही आधी भाजून नव्हतं घेतलं.
आता अशीही करून बघेन. (ही उकडीपेक्षा उपम्याच्या जवळ जाते आहे.) Happy

उपमा थोडा मोकळा होण्याची शक्यता असते पण ही उकड तशी होतच नाही. मी तांदुळाच्या पिठाची उकड करत नाही पण अशीच करत नाहीत का? फरक काय?

मस्त दिसतेय.
भाज्या, मटार घातल्याने वन डिश मिल होईल ही.

तांदुळाची उकड:
फोडणीत (हळद ऑप्शनल) हिरव्या मिरच्या आणि चालत/आवडत असेल तर लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या.
तांदुळाची पिठी आणि मीठ ताकात कालवून ती फोडणीत घालायची. तुकतुकीत दिसायला लागेतो दोन-तीन दणदणीत वाफा काढायच्या.
खायला घेताना वरून कच्चं तेल घ्यायचं. मला तेलात लसणीच्या पाकळ्या ब्राऊन करून मग ते तेल+ब्राउन्ड लसूण घ्यायला आवडतं.
देवा! आज ऑफिसला का आले!

J1

छान दिसते आहे उकड. आमच्या कडे वेगळ्या पद्धतीने उप्पीट म्हणून केले जाते. ते थोडे कोरडे असते फक्त. आणि मला दाणे घालून आवडते Wink

सही. फोटो कातील एकदम.

ज्वारीची केली नाही कधी, तांदूळ पिठाची करते पण भाज्या न घालता. ही करून बघेन. वर उल्लेख आलाय त्याप्रमाणे मस्त वन मिल डिश आहे.

फोटो छान आला आहे. वर स्वातीने लिहिली आहे तशीच उकड आवडते.
भाज्या घालून ती पौष्टिक वगैरे होण्याची भिती नाही का? पिठल्यात भाज्या घातल्यासारखी?

मामी, छान दिसतेय.
अमितव, मला तांदळाची उकड बोअर वाटते त्यापेक्षा ही जास्त चांगली वाटली.

मस्तच रेसिपी सायो.
इतके वर्ष तांदुळाच्या पीठाची च उकड खात होते. वर कच्च तेल घातलेली उकड आंब्याच्या लोणच्यां बरोबर थंडीत किंवा पावसाळ्यात खाणे खुप आवडत ही. पण मध्यंतरी ज्वारीच्या पिठाची ही उकड करतात हे वाचलं आणि करून बघितली. ती नेहमीच्या उकडी पेक्षा जास्तच आवडली म्हणून हल्ली ज्वारीच्या पीठाचीच उकड होते बरेच वेळा.

ही सायोची कृती ही छान वाटतेय. साधारण मोकळ भाजणी सारखी वाटतेय. कारण उकड आम्ही जरा जास्त मऊसर करतो . ही उपम्या सारखी वाटतेय. नक्की करून बघणार.

ज्वारीच्या पिठात थोड तांदूळ पीठ, थोडी कणीक , थोडा बारीक रवा , थोड दही, तेल घालून सरसरीत म्हणजे पात्तळसर भिजवायचे , वेळ असेल तसा इतर मसाला घालायचा मीठ लसूण, ही मिरची ठेचा कोथिंबीर ई. काही नसेल तर हळद तिखट जिर एवढं ही पुरतं आणि घावन घालायचे , मस्तच होतात. करून बघा नक्की ज्वा पीठाची आणखी एक रेसिपी.