पाक कृती स्पर्धा क्रमांक २ .. वांगी बटाटा भाजी .. मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 26 September, 2023 - 06:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

काटेरी वांगी पाच सहा ( मोठ्या फोडी करून ) नसल्यास जी मिळतील ती घ्या.
बटाटे २ (मध्यम फोडी )
तेल २ टेबल स्पून
लाल भडक तिखट २ चमचे
गरम मसाला १ चमचा
फोडणीचे नेहमीचे साहित्य (जिर, मोहरी हळद हिंग )
मीठ ,
गरम दूध एक कप

क्रमवार पाककृती: 

कुकर मध्ये तेल घाला, ते तापल की मोहरी, जिर हळद हिंग घाला,
गॅस बारीक करुन दोन चमचे तिखट घाला. नंतर आधी बटाट्याच्या फोडी घालून एक मिनिट भर परतून घ्या, नंतर वांग्याच्या फोडी घालून ही मिनिट भर परतून घ्या. नंतर गरम मसाला , थोडी धने पूड, मीठ घालून चांगले मिक्स करा. आता त्यात गरम दूध घाला. गरम दुधामुळे तर्री छान येते. कुकरचे झाकण बंद करा. प्रेशर धरलं की तीन चार मिनटानी गॅस बंद करा.

आता जाता येता थोड्या थोड्या वेळानी शिटी वर करून थोडी थोडी वाफ काढत रहा. भाजी ओव्हर कूक होऊ नये म्हणून हे करण गरजेच आहे. पूर्ण प्रेशर रिलीज झालं की झाकण उघडा आणि भाजी दुसऱ्या पातेल्यात काढून घ्या. ( गरम कुकर मध्ये ठेवली तर शिजण्याची प्रक्रिया चालूच राहिलं म्हणून )
नारळ , दाण्याचं कूट, किंवा इतर ही काही न घालता मस्त ग्रेव्ही वाली भाजी तयार आहे. दुधामुळे उग्र पण कमी होतो, एक छान चव येते आणि ग्रेव्ही ही होते.

20230324_205535~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

इतर काही नसल्याने तिखट आणि गरम मसाला थोडा चढा घाला त्याने भाजी चमचमीत आणि चविष्ट होते.
ह्या भाजीत तुम्ही कांदा लसूण, टोमॅटो अस बारीक चिरून घालू शकता.
ह्या भजीचा की इंग्रेडियंट दुध आहे. मस्त होते दूध घालून भाजी.

फोटो एकच आहे , नियमात बसत नसेल तर नाही घेतली तरी चालेल. दुध घालुन झटपट मस्त भाजी करता येते हे तरी कळेल.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आणि सोपी पाककृती! दिसायला चमचमीत दिसतेय. वांग्याच्या भाजीत दूध कधी ऐकलं,पाहिलं व खाल्लं नव्हतं... करून पाहीन

अरे वा.. मस्त दिसतेय भाजी!
गवारीची भाजी दूध घालून करतात. (असं ऐकलं आहे. घालायची हिंमत झाली नाही अजून)
ही मात्र करून पाहणार.

मंजु, sonalisl, वावे , सामो धन्यवाद.

करून बघा नक्की. तोंडली काजू आणि गवारीची भाजी ही छान होते अशी दूध घालून.
शिराळी आणि फ्लॉवर बटाटा मिक्स ही छान होते पण त्यात थोडा कांदा टोमॅटो घातला बारीक चिरून फोडणीत तर टेस्ट वाढते.

अगदी रसरशीत दिसतेय..
बटाटा मला सर्वात जास्त वांग्यातील आवडतो.
पण वांगे बिलकुल खात नाही Happy

मस्त दिसतेय भाजी...
तोंपासु. नक्की करून बघणार...कुठेतरी दूध शेव भाजी पण पाहिली होती

छान दिसते आहे भाजी . आजच केली होती पण दाणे कुट आणि सुके खोबरे घालून . आता अशी करून पाहीन . वांगे - बटाटा भाजीत दूध थोडे out of syllabus आहे, पण ममो नी केलीय म्हणजे चांगलीच असेल .
अवांतर - तुम्ही दुधाचा वापर बऱ्यापैकी करता का ? उकडीच्या मोदकांची रेसिपी मध्ये पण उकड काढताना तुम्ही दूध+ पाणी सांगितले होते .

मस्त दिसतेय भाजी. दूध नासत नाही का ? करून बघेन. फोटो बघून लग्नातल्या पंगतीतल्या भाजीची आठवण आली. छान तवंग आलाय. आवडलीच. Happy

इन्टरेस्टिंग आहे रेसिपी.
मी गवार शिजवताना घालते थोडंसं दूध. नाही नासत.
टण्याच्या आईची दूधवांग्याची रेसिपी आठवली नाव वाचून.

भाजी छान दिसतेयं..
तुमची रेसिपी म्हणजे चव अप्रतिमच असणार
अन्नपूर्णा तुमच्या हातात वसतेयं..

ऋ, सुनिधी, ऋतुराज, अश्विनी , लंपन, अस्मिता ओजस स्वस्ति, स्वाती, रुपाली ... धन्यवाद.

बटाटा मला सर्वात जास्त वांग्यातील आवडतो. >> पोळी भाकरी पेक्षा दही भातात ही भाजी घालून खायला मला जास्त आवडते. मस्तच लागतो भाजी घातलेला दही भात.

अश्विनी बरोबर निरीक्षण , बरेच वेळा मी पाण्या ऐवजी दूध पाणी मिक्स वापरते.

साल न काढलेलेच बटाटे छान लागतात अशा भाजीत. >> बरोबर लंपन

कूकर मध्ये नाही केली तर ???? >> चालेल पण कुकर मध्ये फारच पटकन होते पण वर लिहिलेली पथ्य पाळली तर नाहीतर मग लगदा होतो वांग्यांचा.

मी गवार शिजवताना घालते थोडंसं दूध. नाही नासत. >> बरोबर स्वाती , आमच्याकडे आम्ही खीरीत ही थोडी गार झाली की टेस्ट साठी मिठाची कणी घालतो. खीर अजिबात खराब होत नाही.

दूध खराब होत नाही का? डेअरिंग नाही दूध घालण्याच त्यांच्यासाठी ... हॉटेल मधल्या पंजाबी भाज्यांच्या व्हिडीओत किती वेळा तरी अगदी कौतुकाने क्रीम घालतात ते आठवा आणि करून बघा ही भाजी. माझ्या सारख्या सौम्य खाणाऱ्याना अशी ही आवडते पण आणखी मसाले दर हवी असेल तर फोडणीत बारीक चिरलेला कांदा लसूण आणि टोमॅटो घाला.

अन्नपूर्णा तुमच्या हातात वसतेयं.. > रुपाली Happy

वांगे - बटाटा भाजीत दूध थोडे out of syllabus आहे, पण ममो नी केलीय म्हणजे चांगलीच असेल . थँक्यू अश्विनी , बघ करून नक्की.

मी करून बघितली. स्वातीने दुधाची गॅरंटी घेतली, त्याक्षणी कुकर लावले. मस्त झाली भाजी. मी कांदा, लसूण +हिरवी मिरची पेस्ट ,कोथिंबीर ,तिखट ,गरम मसाला घालून चांSSगली चमचमीत केली व पोळी , साधं वरण भात खाऊन गुडूप डुलकी घेतली. रस्सा जरा कमी पडला कारण अर्थातच फोडी जास्त झाल्या. पुढच्या वेळी ते गुणोत्तर जमवेन. आता कल्पनेत मी दिसली भाजी- घाल दूध- टाक कुकरमध्ये असं करतेय. Happy

धन्यवाद ममो. Happy
क्रीम आणि दुधाचं नासण्याचं गणित वेगळं आहे, स्निग्धता जास्त असली की पदार्थ नासत नाही. सीमंतिनीच्या 'लेमन पॉसेट' या कृतीखाली वाचलं होतं.

वांग बटाटा अगदी आवडती भाजी आहे, अशी कधी खाल्ली नाही पण... अशा प्रकारे करून बघायला हवी.

पाणी अजिबातच नाही का लागत ??

>>> क्रीम आणि दुधाचं नासण्याचं गणित वेगळं आहे, स्निग्धता जास्त असली की पदार्थ नासत नाही.
ते आंबटासाठी गं.

Happy पण मीठ घातलं की घात होतो कधीकधी. मी तर नारळाचं दूधही नासवून दाखवू शकते. काल नासलं नाही हा अजूनही अपघात -चमत्कार वाटतोय. ते तसंही असूच शकतं, पण दहावेळा जर हे गणित जमलं तर विश्वास बसेल.

आज ही भाजी परत वर आली , तोंपासू फोटो दिसला आणि अस्मिताने ग्वाहीही दिलीय
आता शनिवारी काटेरी वांगी आणणं आणि ही भाजी करणं क्रमप्राप्त झालं Happy

(केली तर फोटो टाकेनच आणि भाजीची खुशाली कळवेन )

आशिका, अस्मिता, आबा मृणाली, स्वस्ति थँक्यु.
अस्मिता स्पेशल थँक्यु , करून बघितलीस आणि आवडली म्हणून. तू केलीस तशी लसूण वैगरे घालून जास्त चमचमीत आणि छान होते.
स्वस्ति बघ करून नक्की.

आता कल्पनेत मी दिसली भाजी- घाल दूध- टाक कुकरमध्ये असं करतेय. Happy >> भारी ग, जाम हसले.

क्रीम दूध ह्या मधला फरक नाहीत नव्हता स्वाती आणि अस्मिता. ज्यांना दूध नासण्याबद्दल डाऊट आहे त्यांनी अर्ध दूध अर्ध पाणी घालून बघा.

दुधी ची अशी दूध घालून भाजी पण भारीच होते. दुधीची सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करायच्या, कुकरमध्ये तेलावर जिर, हिंग, क. पत्ता, थोडे हि मि तुकडे , अगदी थोडी हळद घालून फोडणी करायची, त्यात दुधीच्या फोडी, मीठ घालून दोन मिनिट परतायचं , दूध घालून कुकरच झाकण लावून प्रेशर धरलं की जस्ट दोन मिनिटांनी गॅस बंद करायचा. एकदम सौम्य तरी ही टेस्टी भाजी तयार होते.

Pages