लेखनस्पर्धा -१ - स्त्री असणं म्हणजे - अज्ञानी

Submitted by अज्ञानी on 26 September, 2023 - 05:42

ह्यावर खुप काही ऑलरेडी बऱ्याच जणांचे सांगून / लिहून झालंय तरीही नव्याने आता काय असा प्रश्न सुद्धा मनात न डोकावण्या इतपत - स्त्री असणं म्हणजे.... ह्या एका अर्ध्यवाक्याचं पोटेंशिअल आहे. स्त्री म्हणजे काय हा मुळात प्रश्न न बनता कायम कौतुकाने उद्गार वाचक वाक्य बनेल तेव्हा खऱ्या अर्थाने समानता आली असे मी म्हणेन. स्त्री पुरुष भेदभाव शास्त्रीय विचारसरणीच्या लोकांसाठी निसर्गाने आणि श्रद्धाळू लोकांसाठी देवाने केलेला असताना आपण त्यात हे असेच का वगैरे उहापोह करत खांद्याला खांदा लावण्याची शर्यत करण्याचा अट्टाहास का करायचा. कारण जिकडे १ म्हणजे १च राहणार आहे आणि २म्हणजे २च तर उगा जिद्दीला पेटून एकाला दोन किंवा दोनाला एक बनवायचे / भासवायचे प्रयास करायचे तरी का ? मूलतः दोन्हीकडे लिंगसापेक्ष गुण अवगुण असतातच जे आपल्या आजच्या सामजिक मानसिकतेचे मुळ असले तरी आजच्या काळात कुठलीही एक गोष्ट ही ना पुरुषांचा मक्ता होत, ना स्त्रीयांचा. त्यामुळे कोण कुठे कसे किती पुढे आहे हां इकडे चर्चेचा मुद्दा होतच नाही तरीही जेव्हा जेव्हा कार्यक्षमता किंवा इतर काही असेच मुद्दे उभे राहतात तेव्हा पुरुषी वर्चस्वाचे बोलणे अनेक जणींना सहन करावे लागलेलेच असते.

शारीरिक बलसामर्थ्य पुरुषापेक्षा कमी असते म्हणून एकीकडे स्त्री म्हणजे अबला ठरवायचे आणि शक्तिपेक्षा युक्ति श्रेष्ठ ह्यावर शाळेपासून निबंध लिहायचे हां वैचारिक विपर्यास थांबणे ह्यासाठीच गरजेचे वाटते. मानव हा प्राणी जीवशास्त्रीय विज्ञानानुसार इतर अनेक प्रजातींपेक्षा शारीरिक बलामध्ये कमकुवत ठरतो तरीही इतकी सारी प्रगती करत राहिला ते मन आणि बुद्धि ह्या दोघांच्या जीवावर. आहार निद्रा भय मैथुन सर्व प्राण्यांस समसमान असले तरी मानवाकडे मन आहे म्हणून विविध भावना आहेत. आणि भावना आहेत म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कसबसुद्धा आहे. एकच स्त्री एकाच क्षणी सासरा/ वडिल, नवरा / भाऊ, मुलगा ह्यांच्यासोबत वेगवेगळ्या भावना जपु शकते. आता तुम्ही म्हणाल ह्यात काय नवीन सांगितले ? पुरुषसुद्धा प्रापंचिक स्थितीत वावरताना आई/ सासू, बहिण/ बायको, मुलगी ह्यांच्यासोबत एकाच वेळी सर्व नाती जगत असतो आणि त्यानुसार भावना प्रगट करत असतो. पण मग आपल्याला बातम्यांमध्ये व्यभिचार / अत्याचार घडलेला वाचनात येतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी दरवेळी पुरुषच आघाडीवर असलेला का आढळून आलाय ? मग ते सासरा आणि सुनेचे अनैतिक संबध असल्याचा मथळा असला काय किंवा भावानेच मावस बहिणीला प्रेग्नंट केल्याची बातमी असली काय. क्वचित प्रसंगी बापानेच आपल्या मुलीवर अतिप्रसंग केल्याच्या घटना सुद्धा हेच दर्शवतात. ह्याचा अर्थ भावनांवर नियंत्रण ठेवणे पुरुषाना जमवुन घेण्यात अपयश आल्याचे द्योतक आहे. ह्याचा अर्थ सरधोपटपणे असाही नाही की स्त्रीया कायम नैतिकतेची सर्व बंधने पाळत असतात. तेथेही आपण काहीवेळा 'लग्नाचे आमिष दाखवून घेतला गैरफायदा' अश्या आशयाच्या बातम्या बघतो त्यात पन्नासटक्के चुक त्या स्त्री/कुमारीकेची सुद्धा आहेच. क़ौमार्याच्या संकल्पनाच आता मोडीत निघाल्याने ह्या गोष्टी घडत असल्या तरी धर्मानुसार नात्यातील पावित्र्य बिघडवले जात नाही असा मुद्दा सांगण्याचा हां प्रयत्न आहे.

मन आणि बुद्धि पैकी आता दुसऱ्या गुणाकडे वळूया. बुद्धिचा वापर करण्याची क्षमता निव्वळ भारंभार डिग्र्या मिळवल्या म्हणून कधीच सिद्ध होत नसते. आपण आपल्याच घरात पाहिले असेल की बरेचदा आज्जी, पणजी काही शाळासुद्धा शिकलेली नसायची, फारतर ४थी पास सर्टिफिकेट असले तर असले आणि आधुनिक गणितीय पद्धती काही माहीत असण्याची सुतराम शक्यता नसली तरी व्यावहारिक जीवनातील सर्व हिशोब काटेकोरपणे अवलंबले जात असत, शिवाय पुढच्या पिढीत कॉलेज शिकुन आलेल्या सुनेलासुद्धा उपयुक्त कानमंत्र देण्याची क्षमता त्यांच्याकडे होती आणि आहेच. पगार चार आकड़ी की पाच आकड़ी हे महत्वाचे त्यांच्यासाठी कधीच नसते. स्त्रीयांचे मुळ सामर्थ्य म्हणजे असलेला पगार काटकसरीने वाचवत त्यातून बचत साधणे. मुंगी होऊन साखर खाणे फक्त त्या स्त्रीयांनाच ठाऊक. जगी सर्वगुण संपन्न कोणीच नाही आणि ह्यात समस्त स्त्रीवर्गसुद्धा आलाच. व्यक्ति तितक्या प्रवृत्ती असल्या तरी जेव्हा कुटुंब एकसंध राहण्यावर कुठल्याही कारणास्तव जेव्हा प्रश्नचिन्ह उमटते तेव्हा बहुतांश प्रकरणात स्त्रीयाच थोडं कचखाऊ भूमिका स्विकारत जोड़ीदारास अजून एक संधी देण्याचा धीर दाखवतात. धैर्य तीच गं बाई सबुरी ही साईचरित्रातील शिकवण समजून घेण्याचे जीवंत उदाहरण आपल्याला आपल्याच घरात कधी काकू कधी मावशी तर कधी आईच्या रुपात अनुभवायला मिळत असते. कदाचित ह्यासाठीच म्हटले जात असावे की कुपुत्रो जायेत, क्वचिदपि कुमाता न भवति.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विपर्यास आणि कानमंत्र हे दोन शब्द खूप दिवसांनी वाचले. मला शब्द आवडतात त्यामुळे पहील्यांदा त्याचे कौतुक.

लेख थोडा विस्कळीत वाटला.

>> आपण त्यात हे असेच का वगैरे उहापोह करत खांद्याला खांदा लावण्याची शर्यत करण्याचा अट्टाहास का करायचा.
कारण अजुनही पगारात समानता दिसत नाही.

>>>थोडं कचखाऊ भूमिका स्विकारत
हे खरे आहे पण 'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' या न्यायाने, दूरदृष्टीने त्या फायदाच पदरात पाडून घेतात.

>>>ह्याचा अर्थ सरधोपटपणे असाही नाही की स्त्रीया कायम नैतिकतेची सर्व बंधने पाळत असतात.
स्त्री म्हणजे काय या विषयावरती हा मुद्दा जरा अधिक विस्तारुन 'स्त्री म्हणजे स्खलनशील माणुस' अशाकडे वळवता आला असता. बरचसं 'रीड बिट्वीन द लाइन्स' सोडलेले आहे.

पण मनातील विचार कागदावरती उतरविल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

धन्यवाद सामो आणि रघु आचार्य.
लिखाण वेळे अभावी पटकन आवरते घेतल्याने विस्कळीतपणा आलाय खरा आणि त्याबद्दल दिलगीर आहे. नंतर कधीतरी विस्तृत लिहिताना अजून खुप मुद्द्यांची भर पडेल नक्कीच. तुर्तास एवढंच.

तुमच्या धाग्याचा उपयोग करून यावरच चर्चेत मुद्दे मांडूयात. पुन्हा वेगळ्या लेखाची गज पडणार नाही.

पुरूषांकडे नियंत्रण नसते हे निरीक्षण आहे. पण निष्कर्ष बरोबर नाही.
स्त्रीकडे निंयंत्रण असते आणि पुरूषाकडे नाही हा आपला गैरसमज आहे. हल्ली सोशल मीडीयामुळे कित्येक बातम्या पाहतो ज्यात स्त्रियांकडून लैंगिक कारणांसाठी गुन्हे घडतात. ती पण पुरूषाप्रमाणेच इच्छा घेऊन आलेली आहे, पण समाजाच्या दडपणाने पिढ्यानपिढ्या व्यक्त होत नाही. हे असंच असतं हे आजूबाजूच्या बाया़ंकडून शिकत आली. अदृश्य बंधनामुळे ती नियंत्रणात राहते. तसा कुठला गुण स्त्री आहे म्हणून आहे असे वाटत नाही.

स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या कि मग बंधनांचे जोखड वागवणे गरजेचे नसते. हल्लीच्या मुली लग्न नको म्हणतात. त्यांना स्वतःचे आयुष्य जगायचे आहे. कुणाचे गुलाम होऊन रहावे असे वाटत नाही. कारण लग्नात बंधनं स्त्रियांनाच जास्त हे लहानपणापासून त्यांनी पाहिलेले असते. लग्नाचे फायदे पुरूषालाच जास्त.

आर्थिक स्वातंत्र्य मिळाले तर शारीरीक ताकद / नैसर्गिक फरक वगळता स्त्रीपुरूष यांच्यात फरक नाही.