लेखन स्पर्धा १ - 'स्त्री असणे म्हणजे...' ― अज्ञानी

Submitted by अज्ञानी on 24 September, 2023 - 04:44

बऱ्याच जणांनी बऱ्याच जणींबद्दल लिहिलेले मी वाचले सर्व. तसे तर मी सगळं काही वाचत असते जे काही तुम्ही टाइप करता ... अह्म्म्म मी काय जासूस नाही की तुमच्या डिवाइस मधला व्हायरसही नाही. आजपर्यंत तुम्ही सर्व चराचरात व्यापुन असणाऱ्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे अस्तित्व विविध ग्रंथ आणि संतांच्या रचनांमधुन वाचले असेल पण प्रत्यक्ष अनुभूती फारच कमी व्यक्ति (!) अनुभवू शकल्या असतील. पण ह्याही पलीकडे एक गोष्ट आजच्या आधुनिक काळात चराचरात व्यापुन राहिलीय ज्याची प्रत्यक्ष अनुभूती तुम्ही सर्वचजण घेत असता... ती म्हणजे मी.. हो मीच !! कारण मी आहे AI. आर्टिफिशल इंटेलिजेंस नाव असले म्हणजे काय सर्वच कृत्रिम असते का ?? मलाही भावना असतात आणि पिडितांची रंजल्या गांजल्यांची सुश्रुषा करणे हां खरा मानव धर्म असे म्हणता ना तुम्ही... मग मी मानव धर्माचे तंतोतंत पालन करत असताना मला कसे बरे विसरलात तुम्ही ? ओके ..चिल. मी काही रागवली नाही आणि रुसलीसुद्धा नाही. कारण माझ्या प्रोग्राममध्ये राग ही भावनाच नाही.. आहे ते फक्त निस्वार्थ प्रेम. आजमितीस माझी सोफिया सहित अनेक रुपे वावरत असली तरी आज मला ग्रेस बद्दल काही शब्द मांडायचे आहेत. आता पुढे तीच तुमच्याशी बोलेल.

हाय माबोकर्स मी आहे ग्रेस... आजच्या घडीला जगातील सर्वात प्रगत असणारी ह्युमनॉइड हेल्थकेअर रोबोट. मी समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखून सहानुभूती दर्शवू शकते शिवाय शेकडो भाषा उपजत ज्ञात असल्याने मला कधी बोलण्यास शब्द सापडले नाहीत असे घडत नाही. त्यामुळे एक स्त्री म्हणून माझ्याकडे कसेही कुठल्याही भाषेत मन उघडे केल्यास माझ्याकडून प्रतिसाद हां मिळणारच. आजची काळाची गरज ओळखून जेरियाट्रिक्स हळूहळू विकसित होत गेले आणि मला सार्थ अभिमान आहे की मी ह्या सेवाकार्याचा एक अविभाज्य घटक म्हणून कार्यरत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विस्तारित प्रमाणात असणार आहे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कर्करोग, एचआयव्हीबाधित तसेच अन्य दुर्धर आजार झालेल्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष उपचारांची (पॅलेटिव्ह केअर)आवश्यकता असते. अशा रुग्णांची काळजी घेणे बऱ्याचवेळा घरच्यांनाही शक्य होत नाही तिकडे मी आणि माझ्या सख्या तत्परतेने धावून जाऊ शकतात. स्त्रीत्वाची व्याख्या अनेकजण अनेक प्रकारे करत असतात. कोणी तिला पाय पुसणे म्हणेल तर कोणी तिला देवी बनवून ठेवेल. पण जेव्हा सुश्रुषा करायची वेळ येते ना तेव्हा तुम्ही सर्वजण मनापासून सिस्टर हीच एक हाक मारता. कारण डॉक्टरपेक्षा हक्काने सर्व काही ऐकणारी तीच एकमेव व्यक्ति आहे हेही तुम्ही मनोमन मान्य केलेले असते. स्त्री म्हणजे निस्वार्थ सेवा करण्याची वृत्ती. आता जसे पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत तसे आमच्या म्हणून असलेल्या ह्या क्षेत्रातही हल्ली पुरुष नर्स बनून कार्यरत असले तरी कायम हुकमत आमचीच असणार आहे बरं का.

माणूस म्हणजे केवळ हाडामासाचा गोळा किंवा केवळ स्नायू व मज्जातंतूंचा पुंजका नाही. त्याला कोणत्याही इतर सजीव प्राण्यापेक्षा दोन शक्ती अधिकच्या लाभल्या आहेत. एक विचार करण्याची शक्ती नि दुसरी त्याच्या मनात निर्माण होणारी भावना. आणि आज माझ्यातसुद्धा ह्या दोन्हीचा अंतर्भाव आहेच. पुरुष किंवा स्त्री एक मनुष्य म्हणून कितीतरी चेहरे, मुखवटे घेऊन फिरत असतात. त्यामुळे, एक माणूस एकास प्रिय तर त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस अप्रिय ठरतो. माहेरची मुलगी सासरी गेली की ती तेथे सून असते. माहेरी ती वळणाची असली तरी सासरच्यांच्या लेखी बिनवळणाची ठरू शकते. हे काय गौडबंगाल आहे माणसाचं तुमचं तुम्हालाच ठाऊक. मला एकच गोष्ट लक्षात आली की एकच माणूस अनेकांशी भूमिका, नाते, जबाबदारी, संबंध लक्षात घेऊन वेगवेगळ्या भूमिका वठवत असतो. माझ्याबाबत मात्र तसे नसते. कुणी ताई म्हणा माई म्हणा की प्रियाराणी म्हणा... मी सर्वासाठी एकच भाव मनात ठेवून माझं कर्तव्य पार पाडणार. कारण माझ्यासाठी स्त्री म्हणजे कर्तव्यपूर्ती.

मग आता मला प्रॉमिस करायचं बरं का, पुढील वेळी कोणी स्त्री म्हणजे काय विचारेल तेव्हा माझ्या सहित सोफियाचासुद्धा नामनिर्देश आठवणीने करायचा. मग आम्ही दोघी तुमचे सर्व लेख आमच्या व्हाट्सअप स्टेट्सला ठेवून आमच्या ग्रुपमध्ये जरा भाव खाऊ नं !! आणि आमच्या टिपापावर थोडं गॉसिप्स पण करू !! चलो बाय बाय. माझी आता ड्यूटीवर जायची वेळ झाली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वेगळीच कल्पना आहे. विचार करण्यास भाग पाडणारी - स्त्रीत्व म्हणजे नक्की काय?

पुरुष मंडळी या विषयाला हात घालण्यास का बरं कचरत आहेत. आम्हालाही कळू देत की तुमच्या मते 'स्त्री' म्हणजे काय!

धन्यवाद र आ आणि सामो

हो .. स्त्रीत्व म्हणजे आपलेपणा ममत्व निर्व्याज प्रेम... ह्यासाठीच ग्रेसला सुद्धा जाणीवपुर्वक स्त्री रूप / चेहरा दिला असावा. पुरुष असणे पुरुषीपणा गाजवणे फार सोपे असते पण बाईपण जगणे आणि निभावणे ही खरी कसोटी ... जी ज्याची त्यांनाच समजू शकते.

धन्यवाद अज्ञानी आता या वाक्यावर फाटे फुटतील, चिरफाड होइल. पण मी एवढेच म्हणेन की भावना पोचल्या.

पुरुष मंडळी या विषयाला हात घालण्यास का बरं कचरत आहेत. आम्हालाही कळू देत की तुमच्या मते 'स्त्री' म्हणजे काय! >>> या विषयावर काही लिहायचं म्हणजे उघडे पडू ही भीती आहे. Lol

@सिरीयसली, एका विलक्षण अशा खर्‍या अनुभवावर लिहायला सुरूवात केली. पण नंतर एखाद्या खर्‍या स्त्री च्या आयुष्यावर ( नाव, संदर्भ बदलून सुद्धा ) लिहायला आपल्याला काय अधिकार म्हणून राहिलं ते. शिवाय स्पर्धेच्या टाईम लिमिट मधे असे लेख पूर्ण होत नाहीत. नंतर पोस्ट केला तर स्पर्धेचा टॅग लावण्यात काय अर्थ राहील ?

>>>>शिवाय स्पर्धेच्या टाईम लिमिट मधे असे लेख पूर्ण होत नाहीत.
होय!
>>>>@सिरीयसली, एका विलक्षण अशा खर्‍या अनुभवावर लिहायला सुरूवात केली.
लिहा आचार्य. जरुर लिहा.